Menu

जशी रुपे, तशी नावे

image By Wayam Magazine 08 March 2023

चिरेबंद नावाचं एक राज्य होतं.राज्य होतं खरंच मजबूत.तिथे साऱ्याच गोष्टी होत्या भव्य,दिव्य,अफाट मोठ्या आणि अतिशय मजबूत.मोठे मोठे वाडे,मोठी स्वयंपाकाची भांडी,भल्याथोरल्या सुरया,भलीथोरली आसनं.भले मोठे रस्ते.नगरात शिस्तीत गस्त घालणारे तगडे शिपाई,बूट वाजवत चालणारे सरदार,धीरगंभीर आवाजात चर्चा करणारी शाही मंडळी, मुजरे करणारे जामदार चोपदार.पण सारं काही पुरुषी.जिकडेतिकडे केवळ पुरुष.त्या राज्यात केवळ पुरुषवर्गच राहत होता.नावालादेखील तिथे स्त्री नव्हती. सारं शिस्तबध्द पण रुक्ष; भारदस्त पण भावशून्य,.

पण सध्या एक नवाच प्रश्न तिथे उपस्थित झाला होता.राज्याला वारस नव्हता.राज्यात स्त्रियांना अनेक वर्षं पूर्ण मज्जाव असल्याने लहान मुलांचं अस्तित्वही तिथे नव्हतं.दुसऱ्या राज्यातील कोणीही आपलं मूल त्या राज्यात पाठवायला तयार होत नव्हतं. राजाचं मन वारसासाठी हपापलं होतं.पण राज्यात स्त्रियांना प्रवेश घडवायचा कसा,हा मोठा प्रश्न होता. त्याला आठवली वडिलांनी सांगितलेली कथा.

राजा अगदी लहान असताना महालात एके दिवशी सिध्दस्वामी येणार होते.त्या वेळी चिरेबंद राज्यात स्त्रिया होत्या. सर्व स्त्रीपुरुष त्यांच्या आदरातिथ्याची तयारी करीत होते.सिध्दस्वामी त्यांच्या कुळाचे आद्यगुरू होते.राज्यात झाडलोट केली गेली.सडासंमार्जन केले गेले.रोषणाई केली गेली. उत्तमोत्तम पदार्थ तयार केले गेले. सर्वत्र एकच धावपळ,लगबग सुरू होती आणि तेवढ्यातच राज्याच्या वेशीबाहेरच्या रानात सुवर्णमृगांचा कळप आला आहे,अशी बातमी कोण्या एका महिलेने दुसऱ्या स्त्रीच्या कानात सांगितली.“सुवर्णमृग? अगं म्हणजे रामायणात ज्याचं वर्णन आहे ते? अगं मग? अगदी लखलखणारं,झळाळणारं सुवर्णमृग? कसं शक्य आहे पण? प्रत्यक्ष पाहिलं म्हटल्यावर असणारच की.” झालं बातमी छोट्याशा मुलीपासून आज्यापणज्यांपर्यंत हा हा म्हणता पसरली आणि काय सांगणार

झाडून सगळ्याजणी राज्याच्या वेशीबाहेर धावल्या. राज्यात सुबत्ता होती, सोन्यामोत्याला तोटा नव्हता. पण काय कोण जाणे, कोणाला भान कसं ते उरलं नाही. रामायणानंतर एवढ्या वर्षांनी सुवर्णमृगाच्या केवळ नावाने मुलीबाळींच्या मनावर गारुड केलं आणि सगळ्याजणी रानात गेल्या. इकडे सिध्दस्वामी महाराज राज्यात आले. आरती ओवाळायला स्त्रिया नाहीत. आजोबा अत्यंत चिडले. खूप वाट पाहून आजोबांनी निर्णय जाहीर केला.–“स्वामींचं आगतस्वागत पाहुणचार सर्व पुरुषच करतील.आता स्त्रिया परतल्या, तरी इथून पुढे राज्यात त्यांना प्रवेश दिला जाणार नाही.यापुढे चिरेबंद राज्यात स्त्रियांना प्रवेश बंद.”- सुवर्णमृग दिसलंच नाही.स्त्रिया भानावर आल्या.पण आता उपयोग नव्हता.

त्या हद्दपारच राहिल्या.किती रडल्या भेकल्या,पण आजोबांनी निर्णय बदललाच नाही.राज्यात राहणाऱ्या पुरुषांना हळूहळू सवय झाली आणि आता तर कोणीच स्त्रियांचं नावही काढायला तयार होत नव्हतं.पण आता प्रश्न वारसाचा होता.राजा सिध्दस्वामींनाच शरण गेला.त्यांनी एक लहान मुलगा आणि पुतळ्यांची माळ राजाला दिली.ते म्हणाले,“हा मुलगा रडता कामा नये आणि बिघडताही कामा नये. त्याला सांभाळताना अडचण आली की या माळेला स्पर्श कर. तुला मदत मिळेल.”-- राजा लहान मुलगा घेऊन आनंदाने राज्यात आला.सर्व पुरुष मुलाच्या संगोपनाच्या तयारीला लागले.एक तास गेला. दुसऱ्याच तासाला खात असलेला प्रत्येक घास तो मुलगा थुकू लागला.कोणाला काहीच समजेना.ओरडायचं तरी पंचाईत.,रडायला लागेल.राजाने माळेला स्पर्श केला,एक स्त्री हातात खिरीचा वाडगा घेऊन आली.थोडं रागे भरून गोष्ट सांगून तिने बाळाला खीर भऱवली.साक्षात् अन्नपूर्णाच आली.त्या मुलाचा अभ्यासाचा तास सुरू झाला. सगळ्यांनी असंख्य प्रयत्न केले. अं हं.मूल ऐकेना. त्यने धूळपाटी फेकली.पेन्सिली तोडून टाकल्या. राजाने माळेला स्पर्श केला. आणखी एक स्त्री आली.

साक्षात् सरस्वती तिने बाळाच्या हाताला धरून अक्षरं गिरविली.मग साक्षात् दुर्गा आली.तिने बाळाला तलवारबाजी शिकवली.अगदी दिवसाच्या शेवटी साक्षात् निद्रादेवी आली.तिने अंगाई गायली आणि बाळ दुलईत शांत झोपी गेलं.एव्हाना राजाने असंख्य वेळा पुतळेच्या माळेला स्पर्श केला होता आणि कोमलता,सुंदरता,त्याग,संवेदनशीलता,अन्नपूर्णा,मधुरता यांच्या मूर्तिमंत प्रतिमा स्त्रीरुपाने सर्वत्र वावरू लागल्या होत्या.राजाला वारस हवा होता,आजोबांना नातू हवा होता. आणि त्यामुळेच या साऱ्या स्त्रियाही हव्याच होत्या.साऱ्यांना आपली चूक उमगली. सिध्दस्वामी परतले.राजाने आणि सर्व प्रजाजनांनी त्यांच्या पायांवर लोटांगण घातलं.सिध्दस्वामी म्हणाले,“राजा स्वतःची चूक उमगणं ही पुढच्या प्रगतीपथाची सुरुवात असते.हवा तो वर माग.”राजा म्हणाला,“एक छोटा पुत्र दिलात आता एक कन्याही मला द्या.एवढे उपकार माझ्यावर करा.” स्वामींनी कृतकृत्य होऊनतथास्तुम्हटलं.आणि तेव्हापासून चिरेबंद राज्यात स्त्रियांचा पुन्हा प्रवेश झाला.

असं आहे स्त्रीचं महत्त्वं. स्त्रियांचा योग्य तो आदर राखला जावा, यासाठीच आता या मार्च महिन्याच्या आठ तारखेला जगभर साजरा केला जाईल,आंतरराष्ट्रीय महिला दिन.या महिला दिनाची सुरुवात साधारण 1905 च्या सुमारास झाली.न्यूयॉर्कमध्ये कापडकारखान्यात काम करणाऱ्या कष्टकरी महिलांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रचंड मोठा मोर्चा काढला आणि निदर्शनं केली.“वुई वॉन्ट ब्रेड अन्ड रोझेस टू...” अशी त्यांची मागणी होती.आम्हाला योग्य वेतन द्यावं आणि रोजगाराच्या ठिकाणी चांगल्या सोयीसुविधा असाव्यात,अशी त्यांची मागणी होती.या आपल्या मोर्चाला जगभरातून पाठिंबा दिला गेला पाहिजे, असं ठिकठिकाणच्या कष्टकरी महिलांना वाटायला लागलं. आणि अशा तऱ्हेने आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना उदयाला आली.8 मार्च 1914 रोजी रविवार होता.म्हणून खरं तर तो दिवस निश्चित करण्यात आला. आणि मग जगभरच्या स्त्रियांनी 8 मार्च हाच दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून पाळण्यास सुरुवात केली.संयुक्त राष्ट्रसंघानेही महिला दिन जगभर साजरा व्हावा,यासाठी सक्रीय हातभार लावला.

1975 हे साल खास आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून सर्वत्र साजरं करण्यात आलं.आता तर जगभरातील 100 देश महिला दिन साजरा करतात.मुलांनो,आपल्या घरीही आपली आई, ताई,नोकऱ्या करत असतात.त्यांची धावपळ आपण पाहत असतो.त्या किती कष्ट करतात, ते अनुभवत असतो. तेव्हा त्यांना आपण केवळ  महिला दिनाच्या वेळीच नव्हे,तर सगळ्याच वेळी सतत मदत केली पाहिजे. त्यांना समजून घेतलं पाहिजे.त्यांच्या कष्टाचा मान राखला पाहिजे. काय? खरं की नाही?

भारतीय संस्कृतीही आपल्याला हेच शिकवते.आपल्या संस्कृतीत स्त्रीपुरुष समानता या तत्त्वाला खूपच महत्त्व दिलं गेलं आहे.म्हणूनच आपण हे संपूर्ण विश्व पुरुष आणि प्रकृती या दोन तत्वांपासून निर्माण झालं आहे,असं मानतो.तुम्हाला माहिती आहे का,संस्कृतमध्ये स्त्री या शब्दासाठी 10 वेगवेगळ्या अर्थच्छटा असलेले जवळजवळ 100 शब्द वापरले जातात.

 नारी,वनिता,बालिका,युवती,महिला,ललना,योषा,पुरन्ध्रि,मनुजी,शर्वरी,लता,मानिनी,सीमंतिनी, बाला असे असंख्य शब्द स्त्रीसाठी वापरले आहेत. पैकी युवती म्हणजे तरुण स्त्री,मानिनी म्हणजे स्वाभिमान असणारी स्त्री,तर सीमंतिनी म्हणजे मर्यादशील स्त्री अशा अनेक अर्थच्छटा त्यातून व्यक्त होतात.

वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत स्त्रियांचा खूप मान ठेवला गेला.त्या काळीही स्त्रियांना शिक्षण दिलं जाई.एवढंच कशाला,या स्त्रिया स्वतःही शिक्षिका होत्या.काही जणी ब्रह्मवादिनी होत्या ब्रह्मवादिनी म्हणजे ब्रम्हन् आत्मन् अशा आध्यात्मिक संकल्पनांचं सखोल ज्ञान असल्याने त्याविषयी बोलू शकणाऱ्या स्त्रिया असा त्याचा अर्थ.पुरुषांच्या बरोबरीने ब्रह्मवृंदात बसून त्या वादविवादात सहभागी होत. ब्रह्मविद्येचा सखोल अभ्यास करून आत्म्याविषयीचे असंख्य प्रश्न त्या विचारीत.प्रसंगी वादात पुरुषांनाही जिंकण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठायी होतं. अशा या स्त्रिया आचार्या असत.आत्मतत्त्वाचं ज्ञान प्राप्त करून तेजःपुंज झालेल्या या स्त्रिया विविध विषयांचं अध्यापनही करीत असत.

ऋग्वेदातील अश्विनीकुमारांना उद्देशून सूक्तरचना करणारी घोषा ही स्त्री अशीच ब्रह्मवादिनी होती.स्वतःचा दुर्धऱ रोग तिने तिच्या आत्मिक बळावरती दूर केला असला पाहिजे.अश्विनीकुमारांनी संतुष्ट होऊन तिला मधुविद्या शिकवली होती असा तिच्याबद्दल उल्लेख सापडतो.मधुविद्या म्हणजे चिरतरुण राहण्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान.मैत्रेयी ही याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी होती आणि तीही ब्रह्मविद्येत निपुण होती. तिनेही भौतिक संपत्तीला असार मानून आत्मविद्या शिकून घेतली.गार्गी वाचक्नवी हीही मैत्रेयीच्याच काळातील स्त्री.मिथिलेचा राजा जनक याच्या विद्व्तसभेत अनेक विद्वानांना तिने वादात जिंकलं होतं.लोपामुद्रा ही अगस्त्य ऋषींची पत्नी. तीही ब्रह्वादिनी होती.पाणिनी या व्याकरणशास्त्रकाराने आणि अर्थशास्त्र लिहिणाऱ्या कौटिल्यानेही गुरूकुल चालविणाऱ्या गुरुतुल्य आचार्य स्त्रियांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. प्राचीन काळी अनेक स्त्रिया या शस्त्रास्त्रविद्येत आणि युध्दकलेतही निपुण होत्या,असे स्पष्ट उल्लेख आहेत.

अनेकविध शास्त्रात निपुण असणाऱ्या स्त्रियांचेही उल्लेख आहेत.भास्कराचार्यांनी त्यांची कन्या लीलावती हिला गणितविद्येत पारंगत केलं होतं.शारदाम्बा नावाच्या स्त्रीने शंकराचार्यांना वादात जिंकलं होतं.आज हीच गार्गी आणि मैत्रेयीची परंपरा आपल्या देशात कायम ठेवली गेली आहे.

असंख्य क्षेत्रात तरबेज असणाऱ्या आधुनिक गार्गी, मैत्रेयी यशशिखरं काबीज करीत आहेत. त्यांना मानाचा मुजरा 2016 च्या या महिलादिनाच्या निमित्ताने करू या. कन्या या शब्दासाठी दुहिता शब्द वापरला जातो.मुलगी ही आधी आईवडिलांच्या घरी असते आणि लग्न झाल्यानंतर ती दुसऱ्या घरी येते. आपल्या चांगल्या वागण्याने ती दोन्ही घरांंचं हित साधते. भलं करते. म्हणून ती दु-हिता.स्त्री हा शब्द स्तृ म्हणजे पसरणे या धातूपासून तयार झाला आहे. स्त्रीमुळे प्रेमाचा विस्तार होतो.कुटुंबाचा विस्तार होतो. असा स्त्री शब्दाचा अर्थ आहे

गार्गी वाचक्नवी ही वचक्नू ऋषींची कन्या आणि ती गार्ग्य वंशाची होती. तर मैत्रेयी ही जनक राजाचा सल्लागार असलेल्या मैत्री ऋषींची कन्या.दुहिता हा शब्द आपल्या भारोपीय शब्द शृंखलेतील आहे. दुहितृ, दुहिता- डॉटर अशी ही शब्दसाखळी आहे. तसेच माता हा शब्द मातृ- माता- Mother(इंग्रजी)- Mutter (जर्मन) अशा शब्दसाखळीतील आहे. तर असे हे शब्द आणि त्यांचे अर्थ.या महिन्यात स्त्रीवाचक शब्दांचा आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विचार केला.अशाच वेगवेगळ्या महत्त्वाच्या घटना आणि त्यांच्याशी निगडित शब्दांची यात्रा यापुढेही सुरूच ठेवूया

 

-मंजिरी हसबनीस

(लेखिका संस्कृत विषयाच्या अध्यापक आहेत.)

वयम्मार्च 2016-02-13 (मार्च 16)

 

My Cart
Empty Cart

Loading...