
लॉरेन्स अँटनी यांचं ‘दि एलिफंट विस्परर’ हे काही लहान मुलांसाठी लिहिलेलं पुस्तक नाही. पण मुलांनी, फक्त आणि फक्त लहान मुलांचीच पुस्तकं वाचली पाहिजेत असं थोडंच आहे? समुद्रतळ, अवकाश, जंगलं, निसर्गातल्या अद्भुत गोष्टी अशा अनेक विषयांवरची पुस्तकं, डॉक्युमेंटरीज् तर सगळ्यांनाच वाचायला, पाहायला आवडतात. त्या त्या क्षेत्रात आश्चर्यकारक काम केलेल्या लोकांचे अनुभव, त्यांचे विचार जर लहानपणीच वाचायला मिळाले, तर त्यातली उत्कंठा, त्याबद्दल वाटणारी ओढ काही आगळीच असते. अशा वाचनातूनच कधीकधी आपल्या आवडीचं क्षेत्र सापडतं. आपल्या आजूबाजूला दिसणारं आपलं छोटंसं जग सोडून हळूहळू प्रचंड मोठ्या परिसराचा विचार करायची क्षमता निर्माण होते.
लॉरेन्स अँटनी(Lawrence Anthony) हे दक्षिण आफ्रिकेचे रहिवासी. वन्यजीवांबद्दल त्यांना विलक्षण प्रेम होतं. त्यामुळेच आरामाचं शहरी जीवन सोडून त्यांनी ‘टूला टूला’ (Thula Thula) हे विस्तीर्ण संरक्षित वनक्षेत्र स्वतः चालवायला घेतलं. वनक्षेत्र चालवायचं म्हणजे तिथल्या सर्व प्राणी, पक्षी, वनस्पतींना संरक्षण द्यायचं, त्यांचा नैसर्गिक अधिवास, आहे तसा टिकवून ठेवायचा. त्या भागाचा उपयोग फक्त मर्यादित पर्यटनासाठी करता येतो. वन्यजीवांसाठी अँटनी फार आपुलकीने काम करतात, हे वनसंरक्षणाचं काम करणाऱ्या लोकांना माहीत होतं.
अँटनी यांच्या वनक्षेत्रात पांढरे गेंडे, रानरेडे, जिराफ, झेब्रे, काळवीट, बिबटे, तरस, मोठाले अजगर, मगरी, आणि कितीतरी प्राणी-पक्षी होते, पण दुर्दैवाने हत्ती मात्र तिथून शंभर वर्षांपूर्वीच नष्ट झाले होते. एक दिवस अचानक अँटनी यांना एक प्रस्ताव मिळाला – म्पुमालांगा प्रांतातील वनक्षेत्रात नऊ बिथरलेले हत्ती आहेत, खरं तर त्यांना गोळ्या घालून ठारच मारणार आहेत, पण अँटनी जर त्यांना सांभाळायला तयार असले, तर ते त्यांना नेऊ शकतात! अँटनी यांच्याकडे हत्तींना सांभाळण्याची ना काही व्यवस्था होती, ना काही अनुभव. त्यातून हे बिथरलेले रानटी हत्ती! तरीही अँटनी यांनी हे आव्हान स्वीकारलं. बाकी सर्वांनी नाकारलेल्या या अजस्र, उमद्या प्राण्यांना त्यांनी आपलं मानलं. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना हक्काचं घर दिलं. त्या क्रमात एक अद्भुत गोष्ट घडली. या हत्तींना आणि अँटनींना एकमेकांचं बोलणं, भावना समजू लागल्या. बांधून, कोंडून, टोचून ‘माणसाळवलेल्या’ हत्तींना माहूताचे हुकूम समजतात, तशी ही गोष्ट नव्हती. अँटनी यांना हत्तींवर वर्चस्व गाजवायचं नव्हतं. वन्यजीव म्हणून त्यांचा आदर राखून, त्यांचं स्वातंत्र्य, त्यांची वैशिष्ट्यं अबाधित ठेवून, त्यासाठी स्वतःच्या जिवाला असलेला धोका पत्करून हा संवाद साधायचा होता. अँटनी यांच्या या शारीरिक आणि मानसिक साहसाची कहाणी म्हणजे त्यांचं ‘दि एलिफंट विस्परर’ हे पुस्तक. त्यात अँटनी म्हणतात - हे पुस्तक माझ्याबद्दल, किंवा माझ्या काही खास क्षमतेबद्दल नाही, माझ्या हत्तींबद्दल आहे. त्यांनी मला ‘ऐकायला’ शिकवलं.
या संपूर्ण काळात पदोपदी जे थरारक प्रसंग घडले, ते मुळातूनच वाचायला हवेत. हत्तींना बंदिस्त ट्रकमधून पहिल्यांदा ‘टूला टूला’ इथे आणलं, तेव्हा रात्र झाली होती. रानातला मिट्ट काळोख. वरून बदाबदा कोसळणारा पाऊस, सगळीकडे नुसता चिखल, निसरडं आणि डबकी. त्यातच बिथरून ट्रकला आतून धडका देणारे जंगली हत्ती. त्यांना कसंबसं उतरवून त्यांच्यासाठी केलेल्या तात्पुरत्या निवाऱ्यात नेलं खरं, पण त्याच रात्री ते वीजप्रवाह खेळवलेली भक्कम कुंपणं तोडून, तुडवून पळून गेले! त्यांना शोधून परत आणणं ही सत्त्वपरीक्षाच होती. शिवाय ते तर रोजच वाटेतल्या सगळ्या अडथळ्यांचा – आणि माणसांचाही – चेंदामेंदा करून पळून जायच्या तयारीत असायचे. त्यांना थांबवून धरण्यातच पहिला कस लागला.
वनक्षेत्रात सिंह आले तो प्रसंग, वणवा भडकला तो प्रसंग, क्वचित होणाऱ्या अतिवृष्टीने वनक्षेत्र जलमय झालं तो प्रसंग, अशा नैसर्गिक आपत्ती तर होत्याच, पण मानवी त्रासही कमी नव्हता. क्रूर, धंदेवाईक चोरटे शिकारी सतत प्राण्यांच्या मागावर असत. माणसांमधल्या अंधश्रद्धा, गैरसमज, अतिलोभ, स्वार्थाचं राजकारण, यांमुळे वनक्षेत्र आणि त्यातल्या प्राण्यांचा जीव अनेकदा धोक्यात येई. अँटनी यांनी त्या सगळ्या पेचप्रसंगातून कधी स्वतःच्या हिमतीवर मार्ग काढला, तर कधी त्यांच्या लाडक्या हत्तींनी त्यांना मार्ग दाखवला.
हत्ती बोलतात ते फक्त तोंडाने नाही. त्यांचे कान, सोंड, डोकं, पाय या सगळ्यांच्या विशिष्ट हालचालींतूनही ते बोलत असतात. माणसाच्या श्रवणेन्द्रियाच्या कक्षेत नसलेले खोल गंभीर आवाज ते पोटातून काढतात, त्यांच्या ध्वनिलहरी मैलोन्मैल दूर असलेल्या हत्तींपर्यंत पोचतात. माणसांना कळणार नाहीत, अशाही गोष्टी हत्तींना समजतात. सतत हत्तींच्या सहवासात राहून, त्यांच्या बुद्धीचा मान राखून त्यांना समजून घेता घेता अँटनींना हे उलगडत गेलं.
अँटनी यांच्या उदाहरणातून जगभरात अनेकांना असा संवाद साधण्याची प्रेरणा मिळाली. हत्तींशी बोलणारे आनंद शिंदे यांच्याबद्दल तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. (‘वयम्’ मासिकात यापूर्वी अनेकदा आनंद शिंदे यांनी लिहिलं आहे.) लॉरेन्स अँटनी आणि ‘टूला टूला’ यांच्याविषयीचे अनेक व्हिडिओज् नेटवरही पाहायला मिळतील.
अँटनी यांचं २०१२ साली अचानक निधन झालं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी, वनक्षेत्रातले सगळे हत्ती कुठून कुठून अनेक मैलांचा प्रवास करून त्यांच्या घराबाहेर एकत्र जमा झाले. काही न खातापिता दोन दिवस ते फक्त मूक उभे होते. आपल्याशी बोलणारा आपला जिवाभावाचा सोबती आपल्याला कायमचा सोडून गेला, याचं दुःख अशा रीतीने व्यक्त करून मग ते आल्या वाटेने शांतपणे निघून गेले.
-धनवंती हर्डीकर
***