Menu

चिन्ह-भाषेचा अर्थ-अनर्थ

image By Wayam Magazine 17 July 2023

हाय! कसे आहात?

आज मज्जाच झाली. मी टेकडीवर चालायला गेले होते तर चक्क पाऊस आला. मग काय भिजले मस्त. आल्यावर गरमागरम चहा घेतला आणि आता तुमच्याशी गप्पा मारायला आले आहे.

अरे हे काय? आपण वयम् अंकातला लेख वाचतोय की मोबाइलमधला मेसेज! असं वाटलं ना तुम्हांला? मला माहितेय की तुम्हा सर्वांना मेसेजमध्ये असे इमोजी किंवा जीआयएफ वापरून लिहायला आवडतं. कधीकधी अगदी एकही शब्द न लिहिता फक्त इमोजी वापरूनही मोबाइलवर तुमचा संवाद सुरू असतो. आणि जर इमोजी न वापरता लिहायला सांगितलं तर? तर नीट लिहिताच येणार नाही कदाचित! हो ना?

जेव्हा आपण समोरासमोर गप्पा मारतो तेव्हा आपल्याला एकमेकांचा चेहरा, हावभाव, आवाजातले चढउतार कळतात. त्यावरून आपल्या मित्रमैत्रिणी चिडल्या आहेत की शांत आहेत, आपण बोलतोय ते त्यांना समजतं आहे की नाही, त्यांना आपलं पटतंय की नाही हे लगेच दिसतं. पण जेव्हा आपण मोबाइलवरून चॅट करतो, तेव्हा ते आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे आपण जे लिहितोय ते आपल्याला हव्या त्याच अर्थाने त्यांना समजावं म्हणजेच आपल्या भावना त्यांना नीट कळाव्या म्हणून आपण इमोजी वापरतो, हो की नाही? थोडक्यात आपला संवाद अधिक चांगला व्हावा म्हणून आपण इमोजी वापरतो.

परवा असंच झालं, सौम्याच्या शाळेच्या ग्रुपवर एका प्रोजेक्टच्या चर्चेत बराच वेळ गोंधळ चालला होता. अगदी भांडणंच म्हणा ना! कारण होतं की चर्चा करताना काहीजण न वाचता भराभर फक्त अंगठ्याचे इमोजी टाकत होते, तर काहीजण वेगवेगळे चेहरे! पण त्यावरून प्रोजेक्टमध्ये कोणते मुद्दे घ्यायचे, कोणते नाही, हे कळतंच नव्हतं. चर्चा होतच नव्हती. पुन्हा पुन्हा विचारलं तरी कुणीही आपलं मत शब्दांत सविस्तर लिहून मांडत नव्हतं. शेवटी सौम्याने सर्व मुद्दे एकत्र करून गटावर टाकले, तरी परत काहीजण अंगठे टाकून मान्य आहे सांगत होते, तर काहीजण मान्य नसल्याचे वाईट चेहरे. शेवटी तिघा-चौघांनी एकमेकांशी बोलून प्रोजेक्टचा मजकूर नक्की केला. या चर्चेत फक्त इमोजी टाकणाऱ्यांचं मत शेवटपर्यंत समजलं नाही ते नाहीच.

भाषेत जशी विरामचिन्हं असतात, तसे मोबाइल मेसेजमधले हे इमोजी. कधीकधी आपला संवाद जास्त अर्थपूर्ण करतात, कधी शब्द न वापरताही अर्थ पोहोचवतात. त्यामुळे त्यांचा योग्य तो वापर नक्कीच परिणामकारक ठरतो, पण म्हणून दरवेळी पूर्णपणे इमोजींवर अवलंबून राहून आपण आपला प्रतिसाद योग्यप्रकारे देऊ शकतोच असं नाही, हेही लक्षात ठेवायला हवं.  

आपल्याला सर्वांना इमोजी आवडतात. आपण ते वापरतो, यात काहीच चूक नाही. पण आपण फक्त इमोजींचा वापर करत असलो, योग्य तिथे शाब्दिक प्रतिक्रिया लिहित नसलो, तर पुढच्या मुद्द्यांचा जरा विचार करून पाहायला हवा.

इमोजीमुळे आपल्याला तयार उत्तर मिळतं, त्यामुळे आपण आपलं उत्तर त्यातच बसवायचा प्रयत्न करतो का?

इमोजी न वापरता आपण जे उत्तर दिलं असतं ते यापेक्षा वेगळं आहे का?

लिहिण्याचा कंटाळा म्हणून इमोजी वापरतो?

इमोजी न वापरता आपल्या भाषेतले वेगवेगळे शब्द, वाक्यरचना वापरून आपण आपलं म्हणणं मांडू शकतो का?

या मुद्द्यांचा विचार केलात की तुम्ही अधिक जागरूकपणे इमोजींचा वापर करू लागाल.

आपण जेव्हा शाब्दिक प्रतिक्रिया लिहितो तेव्हा आपोआप आपण वेगवेगळे शब्द, उद्गार वापरतो. आपलं मत सविस्तरपणे मांडण्याची सवय आपल्या विचारांना दिशा देते. यामुळे आपल्या विचारांना एक शिस्त येते. उदा. एखाद्या मैत्रिणीने काढलेल्या चित्रावर प्रतिक्रिया म्हणून फक्त इमोजी टाकण्यापेक्षा त्याबरोबर छान काढलं आहेस, रंगसंगती उत्तम, शेडिंग चांगलं झालं आहे, अशा एखाद्या विचारपूर्वक प्रतिसादातून आपल्याला काय आवडलं किंवा क्वचित काय आवडलं नाही हेही सांगू शकतो. आणि मग अशी प्रतिक्रिया सर्वांना नक्कीच आवडते.

भविष्यात ही इमोजी भाषा एक स्वतंत्र भाषा होऊ शकेलही. पण आजतरी इमोजींची भाषा आपल्या शब्दभाषेइतकी समृद्ध नाहीये. इमोजींमधून ठरावीक आणि मर्यादित अर्थच व्यक्त होत असल्याने आपण शब्दांतून व्यक्त होणे थांबवून चालणार नाही. 

आपण वापरतो ते सगळे इमोजी तुम्ही बारकाईने पाहिले आहेत का? चेहऱ्यावरचे वेगवेगळे भाव, चालणे, धावणे, पोहणे यांसारख्या वेगवेगळ्या क्रिया, प्राणी, पक्षी, फुले, फळे, खाद्यपदार्थ, खेळ, गाड्या अशा अनेक गोष्टींसाठी सुंदर इमोजी आपल्या मोबाइलमध्ये आहेत. याशिवाय वेगवेगळ्या प्रतिक्रिया दाखवणारे जीआयएफसुद्धा आहेतच. एखादी विशिष्ट भावना किंवा संदेश डोळ्य़ांसमोर ठेवून चित्रकारांनी या इमोजींची चित्रं आणि जीआयएफ तयार केले आहेत. इंटरनेटवर तुम्हांला या इमोजींचे अर्थही पाहता येतील. त्यातून तुम्हांला काही मजेशीर गोष्टी कळतील. उदा. दोन हात जोडलेला इमोजी हा ‘हाय फाईव्ह’ या परदेशातल्या संकल्पनेचं मूळ चित्र असलं तरी तो आपल्या आभार किंवा नमस्कार यासाठी अगदी योग्य वाटल्याने आपण तो तसा वापरतो. अंगठा आणि त्याच्याशेजारचं पहिलं बोट दुमडलं की त्याचा अर्थ आपण सुंदर असा घेतो. पण त्या खुणेच्या इमोजीचा मूळ अर्थ मात्र ‘ओके’ म्हणजे ठीक असा आहे. लालचुटुक ‘हार्ट’ आपल्या जवळच्या, विश्वासातल्या मित्रमैत्रिणींसाठी वापरायला हरकत नाही, पण जास्त ओळख नसलेल्यांना पाठवताना जपूनच. 

कधीकधी या इमोजींचा मूळ अर्थ वेगळा असला तरी आपण ज्यांच्याशी संवाद साधतो, त्यांना त्याचा योग्य तो अर्थ समजतो आहे तोपर्यंत काहीच अडचण येत नाही. आपल्या मित्रगटात किंवा वर्तुळात ठरावीक इमोजी वापरून वापरून अशी एखादी इमोजीभाषा तयार होऊनही जाते. पण जास्त ओळख नसलेल्या व्यक्तींना इमोजी पाठवताना अर्थाचा नक्कीच विचार करायला हवा.

एकूण काय, इमोजी जरूर वापरा पण समजून-उमजून आणि योग्य तिथेच.

-वैशाली कार्लेकर 

                                  ***

My Cart
Empty Cart

Loading...