Menu

हिरवाईत लपलेली रंगीत दुनिया

image By Wayam Magazine 15 November 2022

हिरवाईत लपलेली रंगीत दुनिया

By Jilpa Nijsure,  On 24th July 2020, Children Magazine

पाऊस पडला की अगदी आठवड्याभरातच आपल्या आजूबाजूचं चित्र हिरवंगार होतं. कवी ना. धों. महानोरांच्या भाषेत सांगायचं तर ‘आषाढाला पाणकळा, सृष्टी लावण्याचा मळा!’ मग हे सृष्टी लावण्य खुलतं कसं? हे समजून घेऊया जिल्पा निजसुरे यांच्या लेखातून! ''वयम्'' मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख वाचा आणि तुम्ही काय काय नवीन पाहिलंत ते जरूर कळवा-


पाऊस येताच निसर्गात अनेक बदल घडू लागतात. पावसाळ्यात बहरणाऱ्या वनस्पती बघितल्या तर कळतं की, निसर्गाने सभोवताली रंगांची कशी उधळण केली आहे. पहिल्या पावसात पहिला नंबर लावते रानहळद. हळदीच्या कुळातलीच ही वनस्पती. त्याच्या फुलांचा तुरा हा जमिनीतूनच बाहेर येतो. लांबून गुलाबी व पांढरा दिसणाऱ्या तुऱ्याचे जवळून निरीक्षण केल्यास आपल्याला त्याची गुलाबी-पिवळी फुले दिसतात. लांबून दिसणारी गुलाबी फुले म्हणजे खरी फुले नसून फुलांच्या


बाहेरील संरक्षक आवरण आहे. त्याला इंग्रजीत bract असे म्हणतात. या फुलाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे त्याच्या स्त्रीकेसराचा आकार हा गोमुखासारखा असतो. अशीच दुसरी वनस्पती म्हणजे भुईआवळा. साधारण अर्धा फूट वाढणाऱ्या या वनस्पतीचे निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येईल की, आवळ्यासारखी पाने आणि आवळ्यासारखीच फळे याच्या पानांच्या खाली रांगेने लागली आहेत. म्हणूनच ह्याला भुईआवळा म्हणतात. या वनस्पतीमध्ये कावीळ तसेच यकृताच्या विकारांवर उपयोगी येणारे औषधी गुणधर्म आहेत.


सर्वदूर पसरलेल्या हिरव्या गालिच्याला अजून निरखून पहिले तर अळूच्या पानांसारखी पाने असलेला रानअळू आपल्याला बघायला मिळेल. हिरवी पाने व हिरवे देठ असलेल्या या अळूच्या पानांच्यामधून एक पिवळे लांबट फूल दिसते. उमलण्यापूर्वी हे फूल हिरवे असते.


काही ठिकाणी जांभ्या दगडातून काही वनस्पती उगवताना दिसतात. त्यातली एक म्हणजे बिगोनिया. याची पाने पसरट असतात. त्यातून लांब देठ असलेली नाजूक गुलाबी फुले डुलत असतात.


हिरव्या झाडीत एक वेगळ्या प्रकारची वनस्पती आढळते. याची पाने असतात गडद हिरवी, खोड मरून रंगाचे व फुले पांढरी असतात. याचे वेगळेपण म्हणजे याचे खोड सरळ वाढण्याऐवजी गोलाकार वाढत जाते. म्हणूनच त्याला इंग्रजीत Spiral Ginger (Costus) असे नाव आहे. त्याचे मराठी नाव आहे कस्थ. नीट निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येईल की काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात पसरलेले दगड असतात, ज्यामुळे पठारे तयार होतात. या दगडांमध्ये केवढी सृष्टी निसर्गाने लपवली आहे याची कल्पना आहे तुम्हांला ? पाऊस पडला की अशा दगडांच्यामधील थोड्याशा खोलगट भागात किंवा दगडामधल्या पायवाटांमध्ये पाणी भरते. इथे पाणी भरलं की एक वेगळेच विश्व इथे फुलू लागते. अनेक प्रकारच्या वनस्पती इथे वाढतात.


अशा दगडांमध्ये वाढणारी एक वनस्पती म्हणजे `सीतेची आसवे’. या नावाचा संदर्भ माझ्या वाचनात आलेला नाही. पण याची फुले मात्र नाजूक निळ्या-जांभळ्या रंगाची असतात. ही फुलायला लागली की दगडाने जांभळी चादर अंथरल्यासारखे दिसते. तुम्हांला जाणून नवल वाटेल की एवढी सुंदर वनस्पती कीटकभक्षी आहे! पाण्यात असलेले बारीक कीटक हिच्या मुळांच्या जाळ्यात अडकतात आणि त्यावर ही वनस्पती वाढते.