Menu

हिंस्र पशूंची माया, ममता!

image By Wayam Magazine 03 March 2023

कोण म्हणतं, जंगली प्राणी हिंस्रच असतात? सिंहीण हीही एक जंगली प्राणी. पण सिंहिणीने भक्ष्य म्हणून पकडलेल्या पिल्लाला बघून तिचं मन हळवं झालं आणि तिने चक्क दुसऱ्या प्राण्याच्या पिल्लाचा सांभाळ केला, अशा घटना घडल्या आहेत. कशामुळे होत असेल हे? 

चांगुलपणा प्रत्येकात असतो. कधी फाशीची शिक्षा झालेला खुनी माणूस आपली किडनी दान करतो; तर कधी एखाद्या क्रूर दरोडेखोराला त्यानं पळवून नेलेल्या लहान मुलाची दया येऊन तो त्याची मुक्तता करतो; अशा बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पाषाणहृदयी माणसाच्या काळजालाही काही वेळा पाझर फुटतो. हे जसं माणसांच्या बाबतीत होतं, तसंच कधीकधी जंगली प्राण्यांच्या बाबतीतही होतं! 

बोट्सवाना हा आफ्रिकेतला एक लहानसा देश. सृष्टिसौंदर्यानं नटलेला. वाघ, सिंह, हत्ती, जिराफ, झेब्रा, हरणं यासारख्या प्राण्यांनी गजबजलेला. २०१३ च्या नोव्हेंबरमध्ये इवान शिलर हा फोटोग्राफर आणि त्याची पत्नी या देशातल्या जंगलात वन्यप्राण्यांचं छायाचित्रण करण्यासाठी गेले होते. तेव्हा जीपमध्ये बसून प्राण्यांचे फोटो काढताना त्यांना एक विलक्षण अनुभव आला. बबून या जातीच्या माकडांचा एक कळप त्यांच्या अगदी जवळून पळत जाताना त्यांना दिसला. त्यात ३०-४० बबुन्स असतील. ते सगळेजण प्रचंड घाबरलेले होते. जिवाच्या आकांताने धावत होते. पाच-सहा सिंहांची एक टोळी त्यांच्या पाठलाग करत होती. बबुन ही माकडांची एक जात. आपल्याकडच्या माकडांपेक्षा हे थोडे मोठे असतात. कळपातल्या एका मादीच्या पोटाशी तिचं चिमुकलं पिल्लू बिलगलेलं होतं. त्यामुळे तिला वेगानं पळता येत नव्हतं. एका सिंहिणीनं तिला गाठलं आणि झडप घालून क्षणार्धात तिच्या नरड्याचा घोट घेतला. बाकीचे बबून्स मात्र जवळच्या उंच झाडावर चढून बसले. त्यांचा पाठलाग करणारे सिंह गर्जना करत, झाडावर चढायचा अयशस्वी प्रयत्न करत, झाडाखाली थांबून राहिले.

दरम्यान, काहीतरी गडबड झालीय, हे सिंहिणीनं मारलेल्या बबूनच्या पोटाला घट्ट धरून बसलेल्या पिलाच्या लक्षात आलं. मेलेल्या आईला सोडून त्यानं जवळच्या एका झाडाकडे धूम ठोकली. आपली शिकार टाकून ती सिंहीण त्याच्या पाठीमागे गेली. पिल्लू झाडावर चढायचा प्रयत्न करत असतानाच तिनं त्याला गाठलं आणि पंजानं अडवून तोंडात पकडलं.


सिंहीण आणि बबूनचं पिल्लू (शिलरने काढलेल्या फोटोंपैकी काही फोटो)

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सिंहिणीनं पिलाचा घास घेतला नाही. मांजर जशी आपल्या पिलाला तोंडात धरून उचलते, तसं तिनं पिलाला हळुवारपणे उचलून घेतलं आणि त्याला ती चक्क चाटू लागली. पिलानं आधी थोडा विरोध केला, त्याच्या चिमुकल्या पंजानं तिच्या नाकावर ठोसे मारले! पण मग ते तिच्या छातीला चिकटलं आणि तिचा नसलेला पान्हा प्यायचा प्रयत्न करू लागलं. शिलर आणि त्याच्या पत्नीचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. बबूनचं पिल्लू त्या सिंहिणीला आता आपली आई समजू लागलं होतं. पण ती सिंहीण त्याला कुशीत घेऊन प्रेमानं कशी काय कुरवाळत होती?

एव्हाना बाकीचे सिंह काही गप्प बसले नव्हते. ते त्या सिंहिणीनं मारलेल्या पिलाच्या आईकडे वळले आणि तिचा फन्ना उडवला. मग  त्यांनी पिलाकडे मोर्चा वळवला. पिलाला जवळ घेऊन बसलेली सिंहीण त्यांना येताना बघून चवताळली. गुरगुराट करत ती त्यांच्या अंगावर धावून गेली. त्यांची आपापसात चांगलीच जुंपली. इकडे ते पिल्लू थरथरत जागच्या जागी बसून होतं. झाडावर चढून बसलेला त्या पिलाचा बाप हा सगळा प्रसंग वरून बघत होता. सगळे सिंह आपापसात भांडताहेत, पिलाकडं कुणाचं लक्ष नाही, हे बघून तो हळूच झाडावरून खाली उतरला आणि पिलाला घेऊन सरसर झाडावर गेला. 


एखाद्या सिंहिणीनं दुसर्‍या कुठल्यातरी प्राण्याच्या पिल्लाला न मारता जवळ घ्यायचा हा काही पहिलाच प्रसंग नाही. शिलरनं चित्रित केलेल्या या प्रसंगाच्या वर्षभर आधी युगांडातल्या क्वीन एलिझाबेथ नॅशनल पार्कमध्ये अशीच एक घटना घडली होती. तिथं एका जखमी सिंहिणीनं एका हरिणीची शिकार केल्यावर तिच्या पाडसाशी दोस्ती केली होती. 

१९१६ मध्ये घडलेली घटना! टांझानियातल्या सेरेंगेटीच्या अभयारण्यातल्या एका सिंहिणीनं वाइल्डबीस्ट या म्हशीसारख्या दिसणार्‍या प्राण्याचं पिल्लू पकडलं. पण त्याला न खाता ती नुसतीच त्याच्या शेजारी बसून त्याला हुंगत राहिली. पिल्लू नुकतंच जन्मलेलं होतं. त्याला सिंहिणीची जराही भीती वाटली नाही. ते तिच्याजवळ जाऊन तिला ढुशा मारू लागलं. सिंहिणीला काय करावं ते कळेना. थोडा वेळ त्याच्या ढुशा सहन केल्यावर ती उठून तिथून निघून गेली. पिल्लाची आई थोड्या अंतरावर उभं राहून हे सगळं बघत होती. तिनं येऊन पिल्लाला ताब्यात घेतलं. 

दोन वर्षांपूर्वी टांझानियातल्या गोरोंगोरो अभयारण्यातल्या एका सिंहिणीचा छावा मेला. तेव्हा तिनं चक्क एका बिबट्याच्या पिलाला जवळ केलं. इतकंच नव्हे ती त्याला स्वतःचं दूधही पाजत असे. अगदी अलीकडे म्हणजे गेल्याच वर्षी नामीबियातल्या एटोशा नॅशनल पार्कमधल्या सिंहिणीनं तिचा छावा मेल्यावर स्प्रिंगबॉक जातीच्या एका हरणाच्या पाडसाला काही काळ स्वतः जवळ ठेवून घेतलं होतं. त्याला खायला टपलेल्या सिंहांपासून त्याला वाचवलं होतं आणि शेवटी त्याला त्याच्या कळपात जाऊ दिलं होतं. 

    या सगळ्या घटना आश्चर्यकारक आहेतच. पण त्यापेक्षाही २००३ साली केनियामधल्या सांबुरू अभयारण्यातल्या सिंहिणीची हकिगत फारच विलक्षण आहे. तलवारीसारखी लांब शिंगं असणार्‍या ऑरिक्स जातीच्या हरणाची पिल्लं एकापाठोपाठ एक ‘दत्तक घ्यायचा’ सपाटाच या सिंहिणीनं लावला होता. एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल सहा वेळा! जसजशी तिची ही कीर्ती आसमंतात पसरली तशी अनेक हौशी प्रवाशांनी या अनोख्या मायलेकरांच्या जोडीला पाहायला जंगलात धाव घेतली. सांबुरूतल्या आदिवासींनी त्या सिंहिणीचं नाव ‘कामुन्याक’ असं ठेवलं होतं. 


कामुन्याक सिंहीण आणि तिनं पाळलेलं पहिलं पाडस 

त्यांच्या भाषेतला त्याचा अर्थ ‘देवाचा जिच्यावर वरदहस्त आहे, अशी’. तिनं बाळगलेलं हरणाचं पहिलं पिल्लू १५ दिवस जिवंत होतं. ती झोपली असताना एका सिंहानं ते खाऊन टाकलं. दुसरं पिल्लू तिनं आठ-दहा दिवस नेटानं सांभाळलं, पण ते इतकं लहान होतं की गवत खाऊ शकत नव्हतं. आईच्या दुधाअभावी बिचारं उपासमारीनं मेलं. त्यानंतर तिनं नुकत्या बाळंत झालेल्या हरिणीला हुसकावून लावून तिचं पिल्लू आपल्याकडे ठेवून घ्यायला सुरुवात केली. महिन्या - दोन महिन्याच्या अंतरानं हरणाच्या आणखी चार पिल्लांचं तिनं अपहरण केलं. त्यातली तीन पिल्लं आईचं दूध न मिळाल्यानं मरून गेली. आपल्या या दत्तक मुलांचा सांभाळ करायच्या नादात तिला स्वतःला धड शिकारही करता येत नव्हती. ती खूप अशक्त झाली. सहावं पिल्लू जेव्हा उपासमारीनं मरायला टेकलं, तेव्हा फॉरेस्ट गार्डसनी ते तिच्याकडून काढून घेतलं आणि नैरोबीच्या प्राणीसंग्रहालयात आणून ठेवलं.

आता प्रश्न असा पडतो की कामुन्याकनं आणि इतर सिंहिणींनी हे सगळं प्रेमानं केलं, की त्या वेळी भूक नव्हती म्हणून नंतर खाण्यासाठी त्यांनी पिल्लांना जिवंत ठेवलं? काही तज्ज्ञांच्या मते वन्य प्राण्यांच्या मनात भक्ष्याप्रती प्रेम, दया, करुणा अशा काही भावना अजिबात उत्पन्न होत नाहीत. आपण उगाचच त्या निर्माण झाल्या अशी समजूत करून घेतो. मांजर जसं उंदराला खेळवून खेळवून मग मारून खातं, त्यातलाच हा प्रकार आहे. 

पण मला नाही तसं वाटत. एकतर त्या सिंहिणींनी काही थोडे तास नव्हे, तर कित्येक दिवस त्या पिल्लांना जिवंत ठेवलं होतं. एक अपवाद वगळता (एक पिल्लू उपासमारीनं मेल्यावर कामुन्याकनं ते खाऊन टाकलं होतं) जवळ बाळगलेलं पिल्लू कुठल्याही सिंहिणीनं कधीच खाल्लं नाही. आणखीही एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. ती म्हणजे जेव्हा त्या सिंहिणी दत्तक पिल्लांना तोंडात पकडून इकडे-तिकडे घेऊन जात असत, तेव्हा त्या त्यांना मानेकडून पकडत असत. मांजरी आपल्या पिल्लाला हळुवारपणे तोंडात पकडते, तशा रीतीने. या उलट भक्ष्याला उचलून नेताना वन्य प्राणी बहुतेकवेळा त्याचा गळा पकडून त्याला ओढत नेतात. यावरून त्या सिंहिणींच्या मनात पिलांबद्दल वात्सल्याची भावना जागृत झाली असावी, असा तर्क करता येतो. 


सिंहिणी भक्ष्याचा गळा पकडते, आपल्या छाव्याची मात्र मान धरते 

पण हे भलतंच आहे ना? निसर्गनियमाच्या विरोधात जाणारं कृत्य कसं घडलं असेल? 

-याचं कारण मादीची मातृत्वाची उपजत प्रेरणा, असं तुम्ही म्हणाल. ते काही अंशी बरोबर आहे. दुसर्‍या प्राण्याचं पिल्लू आपलं मानणार्‍या या सगळ्या सिंहिणी होत्या, सिंह (नर) नव्हते. वयात आल्यावर माद्यांच्या शरीरात काही बदल घडतात. शरीरात उत्पन्न होणारे काही खास हार्मोन्स त्याला कारणीभूत असतात. ह्या हार्मोन्सच्या प्रभावामुळे जसे त्यांच्या शरीरात बदल होतात,  तसेच त्यांच्या मनात, विचार करायच्या पद्धतीत, वागणुकीतही होतात. अर्थात वयात येताना नरांच्या शरीरातल्या हार्मोन्समध्येही बदल होतात. त्यांचीही वागणूक बदलते. पण ते हार्मोन्स वेगळ्या प्रकारचे असतात. त्यामुळे नर अधिक आक्रमक होतात तर माद्यांच्या मनात वात्सल्याची भावना उगम पावते. एकटं पडलेलं पिल्लू पाहून- मग ते दुसर्‍या प्राण्याचं का असेना, त्याला जवळ घ्यायचं, त्याच्यावर माया करायची ऊर्मी त्यांच्या मनात निर्माण होते. 

आपण ज्यांना क्रूर मानतो अशा जनावरांपैकी फक्त सिंहिणींच्या बाबतीतच दुसर्‍याचं पिल्लू दत्तक घेण्याचा प्रकार घडलेला आहे. इतर कुठल्या जनावरांच्या माद्यांच्या बाबतीत असं घडल्याचं ऐकिवात नाही. बिबट्याच्या एका मादीनं एका बबूनच्या पोरक्या पिल्लाचं तरसांपासून रात्रभर रक्षण केल्याची एक घटना बोट्सवानामधल्या मोंबोच्या अभयारण्यात घडल्याची नोंद आहे. पण ती तेवढीच. अपवादात्मक! 

मादीकडे असलेली वात्सल्याची नैसर्गिक प्रेरणा एवढं एकच कारण या घटनांमागे नसावं. नाहीतर वाघ, चित्ते, लांडगे, तरस अशा सगळ्याच प्राण्यांच्या माद्यांनी दुसर्‍या प्राण्यांची बछडी दत्तक घेतली असती. या सिंहिणींच्या मेंदूत काहीतरी गडबड-घोटाळा झाला असण्याचीही दाट शक्यता आहे. आपल्या मेंदूत चेहरे ओळखण्यासाठी एक खास केंद्र असतं. काही कारणानं एखाद्याच्या मेंदूतल्या त्या भागाला इजा झाली तर त्याला ओळखीच्या व्यक्तींचे चेहरे ओळखता येत नाहीत. मेंदूचं बाकी सगळं कार्य व्यवस्थित चालू असतं. बोलायला, चालायला, जगात वावरायला काही अडचण येत नाही. फक्त चेहरे ओळखायला तेवढा प्रॉब्लेम होतो. अगदी जवळच्या व्यक्तीही ओळखता येत नाहीत. हा आजार झालेल्या एका माणसाला स्वतःची आईसुद्धा ओळखता येत नव्हती. तो 

तिला दुसरीच कुणी बाई समजत असे. तसंच काहीतरी या सिंहिणींच्या बाबतीत झालं असावं. बहुतेक प्राणी आपल्या पिल्लांना वासावरून ओळखतात. प्राण्यांच्या मेंदूत त्यासाठी असलेल्या केंद्रात काही कारणानं बिघाड झाला असेल. मेंदूतल्या काही जोडण्या उलट-सुलट झाल्या असतील. त्यामुळे त्या सिंहिणींना हरणाचं पाडस हे आपलं स्वतःचं पिल्लू आहे, असं वाटत असेल.


स्प्रिंगबॉक जातीच्या हरणाच्या पाडसाला मायेनं चाटणारी सिंहीण 

म्हणजे वरवर पाहता निसर्गनियमांच्या विरोधात जाणारं वन्य प्राण्यांचं हे वर्तन एका परीनं नैसर्गिकच आहे, असं म्हणावं लागेल. नाही का?

  ***

सुबोध जावडेकर 

My Cart
Empty Cart

Loading...