Menu

गुरु ओळखावा

image By Wayam Magazine 03 July 2023

हॅलो, तुमच्यापैकी कुणाला जर असा प्रश्न विचारला की, 'तुमचा गुरू कोण?' तर येईल का उत्तर देता? मलादेखील याचं अचूक उत्तर देता येणार नाही. पण शास्त्रीय संगीत, नृत्य किंवा विशिष्ट खेळ शिकणारी मुलं याचं उत्तर चटाचट सांगू शकतील. पण ते झाले त्या त्या क्षेत्रातले गुरू. त्या त्या प्रशिक्षणात तुम्हांला मार्गदर्शन करणारे. त्यांच्या क्षेत्रातल्या अनुभवातून तुमचा यशाचा मार्ग सुकर करणारे, तुम्हांला यश मिळवण्यासाठी मदत करणारे, उत्तेजन देणारे, प्रसंगी तुम्हांला कठोरपणे वागवून तुमच्याकडून मेहनत करून घेणारे, पण तरीही आयुष्यभराला पुरणारे, कधीही, कोणत्याही प्रसंगात तुम्हांला साथ देणारे गुरू कोण; याचं चटकन उत्तर नाहीच देता येणार.
याचं महत्त्वाचं कारण असं की, ज्याच्याकडून काही शिकायला मिळेल अशी कित्येक माणसं आसपास असतातच- तुम्ही संत गाडगेबाबांचा धडा वाचला असेल पाठ्यपुस्तकात. 'स्वच्छता अभियान' सुरू करणारे ते समाजपुरुष. त्यांनीच स्वच्छतेचं महत्त्व गावागावांत जाऊन शिकवलं. ते नेहमी म्हणायचे-झाडू मारणंही शिकलं पाहिजे. उत्तम पद्धत्तीने झाडून काढणं ही एक कला आहे आणि ती शिकून आत्मसात केली पाहिजे.
आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक माणसाकडे काही ना काही असतंच शिकण्यासारखं. ते चटकन टिपता आलं पाहिजे. वाचन, उत्तम वक्त्यांचं भाषण, चर्चा, लिखाण हे सर्व काही कळत-नकळत आपल्याला घडवत असतं.
'गुरू'हा आजकालच्या जगात खूप गुंतागुंतीचा शब्द झाला आहे. शाळेत शिकवणारे शिक्षकही गुरू आणि कॉम्प्युटरही गुरू. त्याला तर महागुरू देखील म्हणता येईल. माहितीचा इतका प्रचंड मोठा स्रोत या संगणकामुळे उपलब्ध झालेला आहे की, सांगता सोय नाही. काय शिकावं अन् काय नाही अशी आपली तारांबळ उडवून देतात हे महाशय!
याखेरीज मीडिया आहेच. नानाविध मासिकं, वर्तमानपत्रं, दूरचित्रवाणी या सगûयांत आपापली कामगिरी बजावत आहेत. अतिप्रचंड ज्ञानसाठा आपल्यावर सतत आदळत आहे. त्याखेरीज आपले आईवडील, नातेवाईक, भावंडं यांचे संस्कार-अनुभव हेही एका प्रकारे आपला गुरूच असतात-'किती किती शिकावं आणि काय काय!'
खरी गंमत तर अशी आहे की, याच वयात आपल्याला खूप आकर्षित करणारे काही 'महान गुरू' देखील आजूबाजूला असतात. इतर कशातही आपलं लक्ष लागू नये अशी अनेक आकर्षणं त्यांच्याकडे असतात. व्यसनं, भलती साहसं, विचित्र लोकांची संगत, असं खूप काही. हे मात्र काळजी दूर करणारे नव्हे तर, काळजी लावणारे गुरू असतात. आणि ते बरोबर ओळखावे लागतात. स्वत:पासून त्यांना दूर ठेवावं लागते. मोहाचे-आकर्षणाचे क्षण कटाक्षाने टाळावे लागतात, नाहीतर चांगलीच फसगत होऊ शकते. संपूर्ण आयुष्य अडचणीत येऊ शकतं.
शिक्षकदिन म्हटलं की असं बरंच काही आठवतं. पाठीवर ज्यांची शाबासकीची थाप आवश्यक आहे असे वाटते, ते जन्मभर लक्षात राहणारे गुरू. आयुष्यभर त्यांच्या मार्गदर्शनाची, त्यांच्या अस्तित्वाची, जवळ असल्याची, त्यांच्या शाबासकीची आपल्याला गरज असते. हे गुरू अत्यावश्यक आणि दुस:या प्रकारचे 'महान गुरू' संपूर्णत: अनावश्यक. खड्यासारखे बाजूला काढावेत असे. आयुष्य नासवून टाकू शकतील अशी भयंकर ताकद असणारे.
शिक्षकदिनाला दोघांचीही आठवण ठेवा. 'घडवणाऱ्या' गुरूंची आणि 'बिघडवणाऱ्या' गुरूंचीही. आपल्याला आयुष्यात ताठ उभं राहायला मदत करणारे हे गुरू अत्यावश्यक आणि शिक्षा भोगायला लावणारे अनावश्यक. मला खात्री आहे, हा फरक तुम्ही पटकन ओळखाल आणि यशस्वी मार्गावरूनच वाटचाल कराल. हो ना?
-मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री 

                                                  *** 

My Cart
Empty Cart

Loading...