आंबा पिकितो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो’ ..परीक्षा आटोपल्या, निकाल लागलेत आणि बच्चेकंपनी पुढच्या वर्गात जाण्याची तयारी करणार आहे. पण त्या अगोदर हातात असलेल्या लाडक्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा मनमुराद आनंद लुटून ताजंतवानं व्हायचं आहे. मगच पुढच्या तयारीचा विचार, होय ना ? अर्थातच. काय मग. गावाला जायचा बेत आहे की घरीच पाहुणेमंडळी जमणार आहेत ? गावाला जा, नाहीतर मुंबईतल्या घरातच थांबा. पण एक नक्की आहे की, दंगामस्ती, धम्माल आणि आंब्याची चंगळ यांच्या साथीनेच तुम्ही सुट्टीची मजा अनुभवणार. आपली ही एप्रिल-मेची सुट्टी मँगो आईसक्रीम, मँगो लस्सी, मँगो कुल्फी यांनी गारेगार होते. आमरसाच्या काठोकाठ भरलेल्या वाट्यांनी जेवण चविष्ट व स्वादिष्ट बनते. या लेखात आपण केशरी रंगाने, मधुमधुर सुवासाने, आंबटगोड चवीने आणि रसाळ अशा आम्र, आंबा, आम या व त्यांच्याशी संबंधित शब्दांचा व कथांचा आपण आस्वाद घेणार आहोत.
आंबा हा कोकणचा राजा, फळांचा राजा आहे. याचं आम्र हे नाव त्याच्या आंबटसर चवीशी ईमान राखणारं आहे आणि या दिमाखदार फळाला संस्कृतमध्ये तर असंख्य नावं आहेत. त्यातली काही नावं अशी - वसन्तद्रुम, अम्लफल, राजफल, सहकार, मधूली, चूल, रसाल, प्रियाम्बु, सुमदन , स्त्रीप्रिय. यातली अम्लफल आणि मधूली ही नावं त्यांच्या आंबटगोड अवीट चवीमुळे त्याला प्राप्त झाली आहेत. वसन्तद्रुम हे त्याचं नाव अर्थातच तो वसंत ऋतूत हे झाड बहरत असल्यामुळे त्याला मिळालं आहे. त्याला राजफल म्हणतात, ते त्याच्या राजेशाही थाटामुळे. रसाल आणि प्रियाम्बु ही त्याची नावं त्याच्या रसरशीत सुरेख चवदार अमृततुल्य रसामुळे त्याला प्राप्त झाली आहेत. आणि त्याचं चूत हे नाव आपल्या भारोपीय भाषांशी झिम्मा खेळत थेट sweet - मधुर या शब्दाशी जोडी जमवून टाकतं. आहे की नाही गंमत. (भारोपीय भाषा म्हणजे काय, हे तुम्ही गेल्या महिन्यातील ‘शब्दांच्या जन्मकथा’ मध्ये वाचलंय ना? )
दोस्तांनो, आंब्याशी शत्रुत्वाने वागणारा क्वचितच कुणी अवलिया असू शकेल. याची सर्वांशीच गट्टी. म्हणून बहुधा त्याला ‘सहकार’ म्हणत असावेत. यासंबंधी एक छानशी गोष्ट आहे. एकदा एका ठिकाणी एक मोठी फळबाग होती. नाना तऱ्हेची, नाना परीची फळझाडं गुण्यागोविंदाने तिथे वाढत होती. फणसाच्या गऱ्यांचा घमघमाट, काळीशार झालेली करवंदाची जाळी, टपटप टपटप गळणारी गर्द जांभळी रसदार जांभळं, थंडावा देणारे मधुर जांब, आंबट असले, तरी हवेहवेसे असे आवळे नि रायआवळे, उन्हाळ्याची तहान भागवणारे ताडगोळे नि नारळ-शहाळी यांची रेलचेल या बागेत होती. नव्हता तो फक्त आंबा. पण एकदा बरं का, स्वतः वनदेवी सृष्टीप्रिया त्या बागेत आली आणि तिने आंब्याचा वृक्ष तिथे लावून ती बाग परिपूर्ण करून टाकली. आंब्याचं झाड फोफावलं. पसरलं. वसंताचं आगमन झालं आणि आंब्याला मोहोर फुटला. त्याच्या मधुगंधाने वातावरण वेडं झालं. कोकीळ मुक्त कंठाने गंधार आळवू लागले. वसंतोत्सवाचा थाटमाट आल्यागेल्याचं मन आकर्षित करू लागला. देव, गंधर्व, राजे, सरदार सर्वजण त्या फलोद्यानात येऊ लागले. एक दिवस ‘नारायण नारायण’ म्हणत नारदमुनीही आले. थोडी कळ लावल्याशिवाय त्यांना का स्वस्थ बसवणार आहे? मग त्यांनी बोलता बोलता कुरापती काढायला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘तो आंबा पहा आला आणि डोक्यावर बसला. केवढं त्याचं कौतुक! खरंतर फणसा, तुझी गोडी नि घमघमाट काही वेगळाच आहे बरं का!! नारळा, अरे तुझी उंची आंब्याला कधी गाठता येईल का? पण पहा कसा चोहोबाजूंनी पसरत हा आम्रवृक्ष डेरेदार होत चालला आहे. जमिनीतली बरीचशी पोषक द्रव्यं तो एकटाच शोषत असेल. तुमच्यापैकी कुणीतरी फळांचा राजा व्हा आणि त्याचे उगाच वाढत चाललेले लाड थांबवा.’’
फणस आणि नारळ यांच्यात मग वादावादी सुरू झाली. आंबा रोज त्यांचे वाद ऐके नि छानसा हसे. तो म्हणे, ``अरे, तुम्ही दोघेही छानच आहात, गुणवान आहात, प्रत्येकाचे आपले वेगळे विशेष आहेत.’’
पण फणस म्हणे, मी अधिक गोड. नारळ म्हणे, मी अधिक गोड. फणस म्हणे, माझे गरे सुरेख रसरशीत. नारळ म्हणे, माझं पाणी थंड, माझी मलई लुसलुशीत. ... एकदा हे भांडण अगदी विकोपाला गेलं. फणस आणि नारळ आधी भांडत होते. मग मारामारी करायला लागले. आंबा कावराबावरा झाला. त्याने सृष्टीप्रियाचा धावा करायला सुरुवात केली. यांचं भांडण इतकं विकोपाला गेलं की, नारळ त्याच्या झावळ्यांनी फणसाला झोडपू लागला. तेव्हा मात्र सृष्टीप्रिया प्रकट झाली. सगळं फलोद्यान या दोघांच्या भांडणाने थरथऱत होतं. करवंदं जाळीतच दडली होती. तर जांभळं गळूनच जात होती. सृष्टीप्रिया रागावली. तिने समस्त देव, मुनी, गंधर्वांना पाचारण केलं. आंबा मधुर, सद्गुणी, रसदार, देखणा, स्वादिष्ट, चविष्ट आणि हृदयंगम आहे. त्याचा आकारही पहा कसा सोन्याच्या हृदयासारखा आहे. तेव्हा तोच फळांचा राजा आहे, असं सर्वानुमते ठरलं. त्याचा मान ठेवावा. तो शांतता प्रस्थापित करेल, असं ठरलं. शाप म्हणून वनदेवी सृष्टीप्रियाने फणसाला काटेरी बनवलं. तर नारळाला अतिकठीण बनवलं. नारदांनी आंब्याची सहनशीलता व सामंजस्य याबद्दल स्तुती केली. तेव्हा मुलांनो, आपण फणसासारखे काटेरी शब्द वापरायचे नाहीत की, नारळासारखं कठोर व्हायचं नाही. आंब्यासारखं सुमधुर, समजूतदार व गुणी व्हायचं, हे नक्की.
आम्रवृक्षाने नारदांना एक खूपच मोठं रसाळ फळ अर्पण केलं. पण कसलं काय? पुन्हा नारद आपल्या कलागती लावण्याच्या कामगिरीवर रवाना झाले. ते थेट आले कैलासावरती. शंकरपार्वतीच्या छान गप्पा रंगल्या होत्या. तेवढ्यातच नारद अवतरले ते आम्रफल घेऊन आणि शंकराला म्हणतात कसे की, अतिशय पौष्टिक, स्वादिष्ट पृथ्वीवरील अमृतच जणू असं हे फळ केवळ तुमच्याकरिता आणलं आहे. मात्र ते ज्याने कुणी खायचं, ते एकट्यानेच सगळं खाल्लं पाहिजे. शंकराने ते पार्वतीला दिलं. पण पार्वती मानेना. स्वामींनी खाल्लं नाही, तर मीही नाही खाणार, असं तिने जाहीर केलं. तेवढ्यातच कार्तिकेय आणि गणपतीबाप्पा खेळताखेळता तिथे आले. आणि आम्रफलासाठी त्यांनी प्रचंड भांडण सुरू केलं. पार्वती मध्ये पडली. तिने सांगितलं की, तुमच्यापैकी संपूर्ण भूमंडलाला तीन प्रदक्षिणा घालून जो सर्वात आधी परतेल, त्याला हे फळ मिळेल. दोघेही पळतच आपापल्या वाहनांवर आरुढ झाले. कार्तिकेयाने आज्ञा दिली आणि त्याचा मोर आकाशात उडाला. गणपतीबाप्पाही आपली तुंदीलतनु सावरत उंदीरमामांवर विराजमान झाले. नारद पाहत होते. गणपतीबाप्पांनी उंदीरमामांच्या कानात काहीतरी सांगितलं. तुरुतुरुतुरु उंदीरमामांनी छानपैकी शंकरपार्वती बसलेल्या शिळाखंडाभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या. नंतर खूपशा वेळाने कार्तिकेय तिथे पोहोचले. गणपतीबाप्पा तिथेच होते. हा काय प्रकार आहे म्हणून कार्तिकेयांनी प्रश्न करताच, माझे मातापिता हेच माझे जग, भूमण्डल, ब्रह्मांड आहे, असं उत्तर गणपतीबाप्पांनी दिलं. नारदांनी गणपतीबाप्पांच्या बुध्दीचातुर्याची स्तुती केली आणि आम्रफळ बाप्पांना दिलं. पण मग मात्र कार्तिकेयांबरोबर बाप्पांनी त्या फळाचा आस्वाद घेतला.
हे सुवर्णवर्णी आम्रफल सूर्याच्या गोळ्यासारखं वाटतं. नाही का ? असं म्हणतात की सूर्यदेवाची सूर्या ही मुलगी त्याच्यासारखीच तेजस्वी होती. त्या राजकन्येचं पृथ्वीतलावरील राजाशी लग्न झालं. पण पृथ्वीवरच्या राजकन्यांना ते सहन झालं नाही. त्यांनी तिच्या मागे एक चेटकीण लावून दिली. ती तिला आरोळ्या ठोकून भीती दाखवून छळू लागली. तेव्हा मग सूर्यकन्येने राजवाड्यातील तलावात उडी मारली. तर तिचं एक अत्यंत तेजस्वी सुवर्णकमळ झालं. राजाला त्याचा मोह पडला. पुन्हा चेटकिणीला राग आला आणि राजा त्या कमळापर्यंत पोहोचायच्या आत तिने ते कमळ जाळून टाकलं. त्याची राख पुष्करिणीच्या काठावर टाकली. त्यापासून हा आम्रवृक्ष जन्माला आला. राजाचं मन आम्रवृक्षावर जडलं. तो स्वतः जातीने त्याची निगराणी करू लागला. त्याला फळं धरली. ती पक्व झाली. राजा ते फळ चाखण्यासाठी तिथे आला, तेव्हा एक आंबा त्याच्या पायाशी पडून फुटला व ती लावण्यवती सूर्यकन्या पुन्हा जन्माला आली. राजाला आनंद झाला. तर असं हे आम्रफल संजीवक आणि आनंददायी आहे.
एकदा अशाच कुठल्याशा राजाने एक पोपट पाळला होता. त्या निष्ठावान पोपटाने फार दुरून हे संजीवक आम्रफल राजाला आणून दिलं आणि त्याला सांगितलं की हे फळ खाणारा पुन्हा तरुण होतो. राजाने त्वरित ते न खाता त्याची कोय जमिनीत पुरली. त्याची निगराणी केली. आम्रवृक्ष बहरला. आंबे लगडले, पिकले. राजाने एक फळ त्याच्या ९० वर्षांच्या सरदाराला दिलं. पण अरेरे, तो सरदार मरूनच गेला. कारण ते फळ विषारी होतं. राजाने पोपटाला शिक्षा म्हणून ठार केलं. मग ते झाड विषारी म्हणून प्रसिध्द झालं. एका म्हातारीला तिचं जीवन नकोसं झालं होतं. तिने जीवन संपवण्यासाठी त्या आम्रवृक्षाचं फळ खाल्लं. तर काय आश्चर्य, ती 16 वर्षांची तरुणी झाली. राजाला आश्चर्य वाटलं. त्याने संशोधन केलं, तेव्हा आढळलं की त्या आम्रवृक्षावर एक सर्पकुटुंब राहत होतं. राजाने जे फळ आपल्या वृध्द सरदाराला दिलं होतं, त्यावर सर्पाचं विष सांडलं होतं. राजाला पश्चात्ताप झाला. पण राजा इतका सदाचरणी की त्याने आपण पोपटाला वृथाच मारलं म्हणून स्वतः ते आम्रफल कधी चाखलं नाही. मात्र आल्यागेल्याला तो संजीवक वृक्ष आपल्या फळांनी तरुण बनवत राहिला.
मुळात आंब्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं आणि शरीरातील लोहाचं महत्त्व आपण जाणतोच. असं हे फळ 3 हजार वर्षांपासून भारतात प्रचलित आहे. Mango हे नाव पोर्तुगीजांनी आंब्याला दिलं. आंब्याच्या जाती-प्रजातीही पुष्कळ आहेत. एकट्या पश्चिम महाराष्ट्रात छोट्या पर्यावरण सैनिकांनी आंब्याच्या 200 हून अधिक प्रकारच्या जाती शोधल्या आहेत. पर्यावरण शिक्षण केंद्रातर्फे हा उपक्रम राबवला जात आहे. त्यासाठी 250 इकोक्लब्स काम करत आहेत. जवळच्या जंगलात फिरून माहिती गोळा करण्यासाठी अनेक विद्यार्थी कार्यरत आहेत. यामध्ये हापूस, पायरी, केशर अशा नेहमीच्या जातींचे आंबे आढळून आले आहेत. आणि भोपऴ्या, ढोब्या, मधगोटी असेही. या प्रत्येक आंब्याच्या नावामागे एक रंजक इतिहासही आहे. अशा विविध जातींच्या आंब्याची रोपं तयार करून त्याची नर्सरी सांगवी येथे सुरू करण्यात आली आहे. मग काय दोस्तांनो, आवडेल का तुम्हालाही अशी माहिती गोळा करण्याचं एखादं काम ? आंब्याच्या जातींची आणखीही काही मनोरंजक नावं आहेत. ती अशी दसेरी आंबा, लंगडा आंबा, भागमभाग आंबा, मल्लिका आंबा, आम्रपाली आंबा, सुवर्णरेखा आंबा, नागीण आंबा, भोपळी आंबा, बोरशा आंबा, इत्यादी. आहे की नाही मज्जा?
मुलांनो, म्हणता म्हणता आपल्याजवळ आंब्याचे प्रतिशब्द, त्याच्याविषयीच्या कथा, त्याच्या जातींची मनोरंजक नावं अशी बरीच माहिती गोळा झाली की. आता या मोसमामध्ये आंबे खाताना इतरांनाही ही माहिती द्या आणि त्यांचंही ज्ञान वाढवा. भेटू पुढच्या महिन्यात आणखी नवे शब्द घेऊन.
प्रा. मंजिरी हसबनीस