मित्रांनो, निदान पूर्वीतरी प्राथमिक शाळेत काही गोष्टी अगदी घोकून घेतल्या जात असत. त्यात ३०पर्यंतचे पाढे, पावकी, निमकी, पाऊणकी हेही पाठ करायला लागायचे. काही हुशार मुलं तरऔटकीपण पाठ करायचे. ती सगळ्यात कठीण, त्यामुळं हुशार मुलंच ती पाठ करत. पण पाढे आणि श्लोक यांच्याशिवायही काही गोष्टी सगळ्यांकडूनच पाठ करून घेतल्या जात. त्यातली एक म्हणजे ऋतुचक्र! किंवा ऋतूंचं घड्याळ!! म्हणजे चैत्र-वैशाख = वसंत ऋतू, ज्येष्ठ-आषाढ = ग्रीष्म ऋतू, श्रावण-भाद्रपद = वर्षा ऋतू, आश्विन-कार्तिक = शरद ऋतू, मार्गशीर्ष-पौष = हेमंत ऋतू आणि माघ-फाल्गुन = शिशिर ऋतू! आपलं सृष्टीचं अद्भुत चक्र कोणत्या क्रमानं चालत असतं, तेच यातून समजायचं. प्रत्येक ऋतूचं वेगळेपण अगदी प्रकर्षानं अनुभवायला यायचं; कारण त्यावेळेला आजच्या इतकं वातावरण बिघडलेलं नव्हतं. म्हणजे हवेचं प्रदूषण आता इतकं नव्हतं. त्यामुळं ऋतुचक्र अगदी अचूकपणं यायचं. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र हवेतल्या वाढत्या प्रदूषणामुळं सृष्टीच्या म्हणा किंवा निसर्गाच्या म्हणा, चक्रात थोडा बदल व्हायला लागला आहे. त्याचं अगदी चटकन पटणारं उदाहरण म्हणजे पावसाळा!
म्हणजे बघा की पूर्वी अनुभव असा यायचा की मृग नक्षत्र ७ जूनला लागलं की त्या दिवशी पावसाला सुरुवात व्हायची. त्या दिवशीसुद्धा दिवसभर उन्हाचा कडाका असायचा. अंगाची अगदी लाही लाही होऊन जायची. दुपार तर नकोशी वाटायची. पण चार-साडेचार वाजले की वातावरणात बदल होऊ लागायचा. हळूहळू वारा सुटायचा. मग तो वेगानं वहायला लागायचा. अंगणातला पालापाचेाळा त्या वाऱ्याबरोबर जणू झिम्मा-फुगडी खेळतोय असं वाटू लागायचं. त्या वाऱ्याबरोबरच पूर्वेकडचं क्षितिजाचे रंग बदलाला लागायचे. दूरवरून कोणीतरी हातातला काळा रंगच पूर्वेच्या क्षितिजावर फासतोय की काय असं वाटायचं. हळूहळू तो काळा रंग दाट व्हायचा. ढगांची फलटण आकाश व्यापून टाकायला लागायची. आकाशानं काजळ घातलंय असंच वाटायचं. मग त्या काजळ घातलेल्या आकाशातच गडगडाट व्हायला लागायचा. विजांचा नाच सुरू व्हायचा आणि मग पावसाचे थेंब पडू लागायचे. तापलेल्या जमिनीवर पडणारे ते पावसाचे थेंब जमिनीतल्या सुगंधाच्या कुप्याच उघडायचे आणि मृद्गंधानं सारं वातावरण पालटून जायचं... अंगावर गोड शिरशिरी आणणारा तो मृद्गंध आणि पावसाच्या बरसत्या धारा... मग लहान मुलं घराच्या कौलांवरून किंवा पत्र्यावरून पडणाऱ्या पांढऱ्या शुभ्र पागोळ्या बघत ‘पागोळ्या पडती झराझर किती या पांढऱ्या गोजिऱ्या...’ ही कविता म्हणायला लागत.
वर्षानुवर्षं यात काहीही बदल होत नव्हता. सारं काही अगदी ठरलेल्या वेळेप्रमाणं, ठरलेल्या दिवशी, व्हायचं. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र यात बदल झालेला आपल्याला दिसतोय. म्हणजे ७ जूनलाच पहिला पाऊस येईलच, असं क्वचितच होताना दिसतंय. हा फरक पडलाय जागतिक फातळीवर होत असलेल्या हवामानातील बदलामुळं! त्यामुळंच सारंच ऋतुचक्र बदलंतय की काय असा प्रश्न पडू लागलाय. पण तरीही ते पूर्णपणं बदललेलं नाही. म्हणजे असं बघा, हा अंक आपल्या हाती पडेल, तेव्हा फाल्गुन महिना चालू असेल. म्हणजेच शिशिर ऋतू सुरू असेल. हा ऋतू म्हणजे पानगळीचा ऋतू. झाडांची सगळी जुनी पानं गळून पडण्याचा हा काळ. सगळी पानं पडून गेल्यावर अशी झाडं म्हणजे जमिनीत उलटे रोवून ठेवलेले मोठाले खराटे आहेत की काय असं
वाटावं, असंच चित्र दिसतं. मात्र त्यासाठी आपल्याला शहराबाहेर जावं लागतं. पण शहरातही उभ्या असलेल्या झाडांचे निष्पर्ण सांगाडे असे काही दिसतात की त्यांच्यात काही जीव आहे की नाही, असं वाटावं. पण गुढी पाडवा जवळ येऊ लागला, की चित्र हळूहळू पालटू लागतं. झाडाझाडांच्या अगदी लहान लहान फांद्यांवर कोवळी पालवी फुटलेली दिसायला लागते. कालपरवापर्यंत मातकट, राखाडी, काळपट दिसणाऱ्या झाडांवर कोणीतरी हिरव्या रंगाची बरसात करावी, तशाच झपाट्यानं झाडं हिरवीगार दिसू लागतात. त्या ओल्या, कोवळ्या पानांचा एक हवाहवासा वाटणारा गंध हवेत मिसळू लागतो. सारं वातावरण आल्हाददायक करू लागतो.
आंब्याच्या झाडांची तर आणखीनच गंमत असते. वसंत ऋतूला सुरुवात होण्यापूर्वीच झाडाला मोहोर आलेला असतो. त्याच्या गंधानं वातावरण आल्हाददायक झालेलंच असतं. त्या आनंदात भर पडते, ती झाडांच्या झपाट्यानं बदलणाऱ्या रूपाच्या गारुडाची! आणि त्या गारुडानं सारी सृष्टीच नवी वस्त्रं ल्यायल्यासारखी दिसायला लागते. आंब्याच्या झाडावर तर कोवळ्या, चमकदार गुलाबी पानांबरोबरच बाळकैऱ्याही दिसायला लागतात. गुलाबी पानांच्या फांदीवर हिरव्या बाळकैऱ्या! नजर बांधून ठेवणारं हे चित्र कितीही वेळा पाहिलं तरी तृप्ती कशी ती होतच नाही. हळूहळू ती गुलाबी पानं हिरवा रंग घेऊ लागतात. त्या हिरव्या रंगामध्ये बाळकैऱ्या त्यांच्या वेगळ्याच छटेच्या हिरव्या रंगानं लक्ष वेधून घेतात.
कडूच्या झाडांची (या झाडांना शेंगा लागतात आणि त्यातल्या बियांपासून निघणारं तेल दिव्यासाठी वापरायची पूर्वी, म्हणजे घरोघरी वीज जाण्यापूर्वीच्या काळात बरं! अर्थात काही लहान लहान खेड्यांमध्ये ते अजूनही वापरलं जात असेलसुद्धा.) तर आणखीनच वेगळी गंमत आहे. ही झाडं पूर्वी शेताच्या बांधावर हमखासपणं दिसत. कडाडत्या उन्हातही गार सावली देणारे हे वृक्ष अनेकदा सावलीसाठी म्हणूनही लावले जायचे. तर शिशिराची सुरुवात होताच ही कडूची झाडं अगदी घाई झाल्यासारखी वागतात. म्हणजे आताआतापर्यंत हिरवीगार असणारी त्याची पानं झपाट्यानं पिवळी पडतात आणि लगेच गळूनही जातात. सारं झाड अगदी पर्णहिन झालं की पुन्हा ते लागलीच हिरवा रंग ल्यायला लागतं. त्याला नवीन कोवळी पानं फुटतात. उन्हामध्ये चमकून आपलं लक्ष वेधून घेतात. ती जराशी मोठी होत नाहीत तोच फांदीफांदीवर पांढरट-जांभळट रंगाची फुलं धरतात. नवीन पानं आणि त्यामागोमाग येणारी ही फुलं पाहिली की असं वाटतं या झाडाला सृजनाची, नवीन ते धारण करण्याची अगदी घाईच झाली आहे. इतकी घाई की ती फुलंही झपाझप गळून पडतात. जमिनीवर एक मऊमुलायम असा गालिचाच तयार होतो. असा गालिचा होत असतानाच झाझावर अगदी लहान लहान शेंगा धरू लागतात. त्या चटकन दिसतही नाहीत. पण बारकाईन पाह्यलं तर लक्षात येतं की त्यांचं हिरवेपण तर आणखीनच वेगळं आहे...
हिरव्या रंगाचा असा उत्सव प्रत्येक झाडानुसार वेगवेगळा असतो. ऊन हळूहळू तापत असतं. हवा गरम होत असते. आणि त्याचवेळी वसंत ऋतू आपल्याबरोबर साऱ्या सृष्टीसाठी नवीन हिरवाई घेऊन येत असतो. वृक्षराजीला नवं रंगरूप देत असतो. हे नवं रंगरूप दोन महिने आपली नवलाई दाखवत राहतं. ग्रीष्माचा तडाखा सुसह्य करतं आणि तो तडाखा अगदी नकोसा नकोसा होऊ लागला, हिरव्या पानांवरही धुळीची पुटं चढून त्यांची हिरवाई झाकोळली जाऊ लागली की पावसाच्या धारा पडून पुन्हा सारा भवताल हिरवाकंच होऊ लागतो. याच महिन्यात येणारा गुढीपाडवा हा चैत्र महिन्याचा पहिला दिवस. म्हणजेच वसंत ऋतूचा पहिला दिवस. हा ऋतू सृष्टीला नवजीवन देणारा, म्हणून महत्त्वाचा आहेच, पण आपल्या रंग आणि गंध जाणिवा समृद्ध करणारा म्हणूनही तो महत्त्वाचा आणि हवाहवासा वाटणारा आहे. त्यानिमित्तानं ‘... हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ असं सांगावंसं वाटतं.
श्रीराम शिधये