Menu

आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन

image By Wayam Magazine 15 March 2023

रंग! आपल्या भोवती नेहमीच असणारे. विविध छटांचे, वस्तूंचे, निसर्गातले आणि बोलण्यातले-गाण्यातले-खेळातले रंग! सामना रंगतदार असतो आणि बुवा रंगून जाऊन गातात. भांडण झाल्यामुळे रंगांचा बेरंग होतो आणि ‘चूक झाली’ असं लक्षात आलं की चेहऱ्याचा रंग उतरतो. पाहा ना ! भाषेमध्ये आपण रंग कसा कसा मुखून टाकलाय. याचं कारण म्हणजे तो आहे आपल्या परिसराचा आणि हs आपल्या स्वतः चा सुद्धा महत्त्वाचा अंश! म्हणजे कसा, तर केसांचा रंग, डोळ्यांचा रंग इ. इ. तर असे हे विविध रंग आपल्या जेवणा-खाण्याचासुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहेत बरं का! वनस्पतींना विविध रंग कसे प्राप्त होतात वगैरे वगैरे तुमच्या विज्ञानाच्या, वनस्पतीशास्त्र विषयाच्या अभ्यासातून तुम्हांला काळत असतंच. शिवाय चौरस आहारामध्ये ‘हिरव्या पालेभाज्या’ हव्यात असं घरी-दारी सारखं सांगितलं जातंच.

आता आमच्या बऱ्याच बालमित्रांना त्या आवडत नाहीत. म्हणून मग घरोघरी त्यांच्या नाना परी करून पहिल्या जातात. मेथी- पालक इ. चे ठेपले, भजी, बोंडं असं काय काय! पण समजा आईनं मेथी-मलई-मटर बनवलं तर ते दरवेळी अगदी तस्सच दिसत नाही. कधी जास्त हिरवं तर कधी कमी. तीच गत टोमेटोच्या सुपाची. कधी त्याचा रंग असा मस्त दिसतो की पाहतक्षणी तोंडाला पाणी सुटावं. कधी मात्र ते फिकट दिसतं मग आई म्हणते, ‘टोमेटोच्या जातीवर असतो त्याचा लालपणा. निसर्ग आहे, कमी-जास्त होणारच! आता आंब्याचे दिवस येताहेत, सगळे आंबे असतात का कधी एकसारख्या रंगाचे?

अगदी खरं आहे. पण मग हॉटेलमधलं टोमेटो सूप नेहमी अगदी तशाच रंगाचं कसं असतं, आणि टोमेटो सूपच नाही, तर पालक-पनीर, मेथी-मलई-मटर, पाव भाजीची भाजी सगळं नेहमी एकाच रंगाचं कसं करू शकतात? आणि आंबे तर कापले आणि शेजारी फोडी ठेवल्या की कळतोच त्यांचा वेगळा रंग, मग मँगो फ्रुट किंवा कॅनमधला आंब्याचा रस ह्यांचा रंग नेहमी तोच, काही फरक नाही. कुठले आंबे घेतात हे फॅक्टरीवाले, सारख्या रंगाचे? इतकच काय, तर मोठ्या मोठ्या मॉल्समधून जे हॅम किंवा सॉसेस असतात, फ्रोजन सेक्शनमध्ये ते पण सगळे सारख्या रंगाचे कसे काय बुवा ?

खूप छान, व्हेरी गुड! असे प्रश्न आपल्याला पडायला हवेत आणि आपण ते विचारायलासुद्धा हवेत. जर निसर्गात इतके बारीक बारीक बारीक रंग छटांचे नर्तन आपण सर्वत्र पाहतो तर हे तयार खाद्यपदार्थ नेहमी आपल्यासारख्या रंगाचे कसे, तर त्यात घालण्यात येणाऱ्या खाद्यरंग नावाच्या घटकामुळे. 

घरची, स्वयंपाक घरातील रंगाची दुनिया सर्वसामान्यपणे नैसर्गिक रंगांनीच घडते. हळदीचा पिवळा, तिखटाचा लाल, आटवलेल्या बासुंदीचा बदामी, गजर हलव्याचा केशरी मिश्रित लालट तर बीटाचा लालचुटुक. श्रीखंड घरी करून त्याला केशर लावलं तर त्याचा एक मंद पिवळसर झाक असणारा रंग श्रीखंडाला येतो. मात्र त्याबरोबर केशराचा गंध, स्वादपण उतरतो. पण पॅकबंद श्रीखंड बारा महिने एका चवीचे आणि दोन-तीन महिने टिकणारे ! आइसक्रीमवरच्या स्ट्रोबेऱ्या आणि चेऱ्या सगळ्या एकजात एक सारख्या लालचुटूक !

ही सगळी किमया असते सर्वसामान्य कृत्रिम खाद्यरंगांची. ह्यापैकी काही काही खाद्यरंग हे ‘कोलटार’पासून बनवतात. मात्र आंतरराष्ट्रीय मानकांच्या चाचणीस तोंड देऊन, अतिशय कठोर अशा चाचण्यांमधून तावून सुलाखून निघाल्यावरच त्यांना ‘माणसांच्या अन्नामध्ये घालण्यास योग्य’ असा शेरा मिळतो. तसेच प्रक्रियाकृत अन्नामध्ये ते किती प्रमाणात ( Parts per million = ppm)  वापरावेत ह्याचे दंडक घालून दिलेले असतात. ह्या खाद्यरंगाना आंतरराष्ट्रीय क्रमांकसुद्धा आहेत. ते घटकपदार्थांच्या यादीत, वेष्टणावर (E-No) असे दर्शविलेले असतात. 

मात्र बाजारात मिळणाऱ्या, विशेषतः मिठायांमध्ये नेहमी हे प्रमाणित व दर्जेदार खाद्यरंगच घातले जातात असे नाही. आपल्या देशामध्ये गावोगावी खेडोपाडी, जत्रांमध्ये अनेक पिवळेधम्मक, लालचुटुक खाद्यपदार्थ मिळतात. तिखट पदार्थ, भाज्यांमधले रस (ग्रेव्ही) ह्यांमध्ये ही लाल / हिरव्या रंगांचा मुक्त वापर होत असतो. हे रंग, रूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भुरळ पाडतो, तर थोरांना हिरव्यागार चटणीचा. Toxicology Research Center जे लखनऊ इथे आहे, तिथे अशा रंगांचे परीक्षण केले गेले. त्यावेळी ह्या पदार्थांमधले खाद्यरंग दर्जेदार नाहीत इतकेच नव्हे तर परवानगी नसणारे आहेत, असे स्पष्ट झाले आहे. 

प्रक्रियाकृत पॅकेज्ड खाद्यांमध्ये मात्र प्रमाणित दर्जेदार खाद्यरंग वापरणे व वेष्टणावर त्यांची नोंद करणे अनिवार्यच आहे. (Processed Packaged food and its label declaration ).  ह्या बाबतही अपवाद आहेत व आपणा सगळ्यांनाच ते माहीत हवेत. दूध, खवा, दही, मिल्क पावडर, बेबी फूड, क्रीम, चहा, कॉफी, कोको-माल्टयुक्त खाद्यानं ह्या सगळ्या पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे खाद्यरंग वापरायचे नाहीत.

codex सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जा नियमकाने (JECFA)  ह्या रंगांना मान्यता दिली खरी, पण अखेर हे रंग कृत्रिमच निसर्गात तयार झालेले नव्हते. ते वापरल्याने सगळ्या भारतभर मिळणारी मँगो फ्रुटी एकाच रंगाची, सगळी आईस्क्रीम्स त्या त्या ब्रॅण्डनुसार तश्शीच, अशी बनवतात. जेम्सच्या रंगी बेरंगी गोळ्यांसाठी त्यांचा वापर होतो. पण...

जगात सर्वत्र हे रंग इतक्या सरसकट नाही येत वापरता. खास करून बारा वर्षापर्यन्तच्या मुलांसाठी जी उत्पादने बनतात त्यांमध्ये हे कृत्रिम रंग वापरायला युरोपियन युनियनच्या अन्न सुरक्षा नियमांनुसार मनाई आहे. त्यामुळे तिथल्या ‘जेम्सच्या’ गोळ्यांचे रंग वेगळे असतात, त्या कमी रंगबिरांग्या असतात आणि हो, वेष्टणावर जाहीर करावे लागते ‘Contains No Artificial Food Colours’
आता असे कृत्रिम रंग वापरतात ते का? आणि नाही वापरायचे, तर ते का?

  कृत्रिम रंग आकर्षक, टिकाऊ आणि स्वस्त असतात. नैसर्गिकरंग तयार करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची, खर्चिक आणि ते रंग कमी टिकाऊ! मात्र नैसर्गिकरंगांना मागणी वाढती आहे. कारण विशेषतः लहान मुलांचा  चळवळेपणा, एकाग्रतेचा अभाव यांना प्रक्रियाकृत अन्न्तील कृत्रिम रंग कारणीभूत ठरू शकतात, तसेच त्यांतील एखाद्या रंगाची अॅलर्जी असते, ती पटकन कळली नाही तर औषध योजना योग्य प्रकारे होऊ शकत नाही. अशा समस्या प्रदीर्घ संशोधना नंतर आल्या आहेत. म्हणून नैसर्गिक रंग वापरण्याचे बंधन येते आहे. घरामध्ये सुद्धा नैसर्गिक रंग वापरावे, असा आयांचा प्रयत्न असतो आहे.

  एक लक्षात घ्यायचे की Natural Colours and Nature Identical Colours यामध्ये फरक आहे. आपल्याला चकवणारे हे शब्द आहेत. Nature Identical हे कृत्रिमच आहेत. उदा. R (2) किंवा R (40) हे कृत्रिम लाल आहेत. उदा. R (4) हा कोचिनील या Bug पासून बनवलेला नैसर्गिक रंग आहे. हा Bug विशेषतः त्याची मादी चिरडून (crush) acidic alcohol द्रावणात (solution) टाकून तो रंग मिळवतात. मात्र ७०,००० कीटकांपासून एक पौंड रंग मिळतो. त्यासाठी या कीटकांची शेती काटेकरी निवडुंगांवर केली जाते, ब्राझीलमध्ये. आता  कळेल, की नैसर्गिक रंग महाग का असतात. त्यामुळे बीट पासुन लाल/गुलाबी, पालका पासून हिरवा इ.रंग गुंतागुंतीच्या, किचकट प्रक्रियेतून बनतात. कारण तुम्ही हिरवे सरबत बनवले, तर त्याला पालकाचा वास येऊन कसे चालेल? तर ते ही पाहावे लागते आहे  ना इंण्टरेस्टिंग?

मग गंमत म्हणून तरी घरच्या घरी खाद्यारंग बनवून पाहणार का? ह्या मे महिन्यात नीळं पन्हं आणि लाल सरबत करणार?

गुलाबी (लालसर) रंग कृती 

साहित्य : बीटरूट, पाणी 

बीट धुवून, वरून व खालून थोडा भाग कापून काढून टाका. 

बीटाचे सालीसकट तुकडे करा, साधारण २ से. मी आकाराचे क्युब्ज.

प्रेशरकुकरमध्ये पाण्यात बुडवा. ( तुकडे बुडेपर्यंत पाणी घ्या.)

तुकडे चांगले शिजवून घ्या व प्रेशर उतरल्यावर कुकर उघडा.

हे पाणी गळून घ्या व थंड होऊ द्या.

फ्रीजमधल्या आईस क्यूब ट्रेमध्ये ते पाणी ओता (हळूहळू) व ट्रे फ्रीजरमध्ये ठेवा.

लालचुटुक क्युब्ज तयार होतील. 


नैसर्गिक घरगुती निळा रंग : सरबतासाठी 

साहित्य : जांभळट रंगांचा कोबीचा छोटा गड्डा, पाणी, बेकिंग (खायचा) सोडा.

कोबी धुवून, मधला जाड देठासारखा भाग काढून टाका.

बारीक चिरा 

एका पातेल्यात चिरलेला कोबी घाला व ती बुडेपर्यंत पाणी घाला.

दहा मिनिटे मंद उकळू द्या. निवू द्या. मग गळून घ्या. 

हे पाणी तसेच वापरले तर जांभळट क्युब्ज बनतील.

निळ्या रंगासाठी ह्या पाण्यात एकावेळी फक्त अर्धा चमचा (अगर कमी) सोडा अगदी सावकाश, पाणी ढवळत धावलात मिसळा. पाणी हळूहळू निळसर होईल. मग लगेच थांबा 

पाण्याला सोड्याची चव येता कामा नये.

हे क्यूब्ज तुम्ही ज्या प्रकारच्या सरबतात घालाल, त्या बरोबर त्या त्या रंग घटकांची प्रक्रिया होऊन कधी वेगळा रंगही बनेल. कारण हा नैसर्गिक रंग आहे. 

   


 - वसुंधरा देवधर

        

My Cart
Empty Cart

Loading...