By Wayam Magazine, On 28th August 2020, Children Magazine
रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘वयम्’ मासिकाने घरातील गोष्टींपासून राख्या कशा बनवता येऊ शकतील, याच्या काही कलाकृती उदाहरणादाखल पाठवल्या होत्या. मुलांनी स्वतः घरच्या घरी बनवलेल्या राख्यांचे फोटो आणि दोन ओळीत कृती लिहून ‘वयम्’कडे पाठवण्याचे आवाहनही केले होते. या आवाहनाला मुलांनी छान प्रतिसाद दिला. आपल्या काही वाचक मुलांनी घरातील साहित्यापासून कितीतरी कल्पक राख्या बनवल्या. बघा, कल्पक वयम् वाचकांच्या या राख्या!
घाटकोपर येथील विराज माने या दुसरीच्या विद्यार्थ्याने घरी असलेल्या वेगवेगळ्या रंगाचे घोटीव पेपर दुमडून गोलाकार राखी केली. ती जुन्या राखीच्या धाग्याला चिकटवली.
निगडी येथील त्रिशा राजपूत या ६ वर्षांच्या मुलीने कागदावर मोराचे चित्र काढून घेतले. त्यावर रंगीत पेन्सिलच्या सहाय्याने मोरपीस बनवले. पेन्सिलीला टोक काढताना होणाऱ्या चुऱ्यापासून मोराचे बाकी शरीर साकारले. मागे रेशमी दोरा बांधला आणि छानशी राखी तयार केली.
इअर बड्स, कापूस आणि कडधान्यापासून बनवलेल्या राख्या! वेगळी कल्पना आहे ही. पुण्यातील पहिलीतल्या अद्वैत शिरोरे याने इअर बड्स कापून घेतले. ते वॉटर कलरने रंगवले. राखीच्या आकारात गोल चिकटवून त्याला धागा जोडला. शिवाय त्याने कापूस मोकळा करून घेतला, त्यावर दोन डोळे चिकटवले, पेपरची टोपी लावली आणि त्याला धागा जोडला. तीन रंगाची कडधान्य वापरूनही सुंदर राखी बनवली त्याने! किती विविध कलाकृती बनवल्या अद्वैतने!!
डोंबिवली येथील पाचवीत शिकणाऱ्या हर्षवर्धन नयन पाटीलनेही धान्यापासून राखी बनवली. जुन्या वहीचा पुट्ठा गोल कापून त्यावर काळा पेपरा लावला. त्यावर मधोमध मोहरी चिकटवली. मग तांदूळ, उडीदडाळ व तूरडाळ चिकटवून, रिबिन बांधून राखी तयार केली.
केशर कापडे हिने जुन्या लग्नपत्रिकेपासून सुंदर राखी बनवली आहे.
औरंगाबाद येथील श्रुती महाजन या दहा वर्षाच्या मुलीने जुन्या वहीचा पुठ्ठा कापूस, दोरा आणि चमकता कागद वापरून सुरेख राखी बनवली.
अनघा किरण वर्तक हिने घरात असलेला पुजेचा नाडा आणि काही मणी, रिंगस् यापासून आकर्षक राखी बनवली. तसेच तिने समुद्र किनाऱ्यावरून गोळा केलेल्या शिंपल्यांचाही वापर केला. जणू शिंपल्याच्या आत मोती आहे असे दाखविले आहे तिने. मोती म्हणून जुन्या बॉलमधील LED बल्ब ग्लोइंग system वापरली आहे... कित्ती कल्पकता!
आदित्य लिमये (वय वर्ष ६) याने सर्व राख्या कापसाच्या सहाय्याने बनवलेल्या आहेत आणि त्याची सजावट घोटीव पेपर, धागा आणि लेस वापरून केली आहे.
खुशी गोयल या दहा वर्षाच्या मुलीने घरातील मणी, रिबिन यापासून सुंदर राख्या बनवल्या.
अर्चना चिलगरे हिने घरी असलेले दोरे, मणी, फुलं, लोकर, चुरमुरे यांपासून राख्या बनवल्या. याच राख्या तिने तिच्या भावाला, पप्पाना वय आजोबांना बांधल्या, असेही तिने कळवले आहे.
परमेश्वरी निकम सहावीतील मुलीने टाकाऊ वस्तूंपासून देखणी राखी बनवली. त्यासाठी पिस्ता टरफले, रंगीत रिबीन, सोनेरी कागद, वेलीची पाने, टिकल्या हे घरातील साहित्य वापरले.
साक्षी मोहन धाडवे या आठवीतील विद्यार्थिनीने लोकरीचा दोरा वापरून छानशी राखी तयार केली. ज्ञानेश्वरी विनायक निकम या चौथीतील मुलीने झटपट राखी तयार केली. तिने लोकरीचे फूल केले. ते आणि देवाच्या हारातले साहित्य रिबिनीला चिकटवून राखी केली.
वेदांत गणपत धुमाळ या पाचवीतील विद्यार्थ्यांनेसुद्धा घरातली लोकर, शिंपला, ओढणीचे मणी, फेविकॉल, चॉकलेटमधला सोनेरी कागद, पुठ्ठा आणि टिकल्या वापरून बिनखर्चात राखी केली. केशर कापडे हिने लग्न पत्रिकेच्या जास कागदापासून सुंदरशी राखी तयार केली.
प्रशांत जनार्दन गोरे (इयत्ता नववी) या विद्यार्थ्याने आगपेटीच्या काड्यांपासून सुंदर राखी तयार केली. द्वीप तांबे (इ. दुसरी) आणि दीक्षा तांबे (इ. पाचवी) या भाऊ-बहिणीने इअर बड्स आणि कार्डपेपरपासून आकर्षक राख्या बनवल्या, तर सागरिका कांबळे (इ. पाचवी) हिनेही इअर बड्स आणि टिकल्या हे साहित्य वापरून राखी बनवली.
सुशील व्ह्त्ते आणि वेदांत व्ह्त्ते यांनी पूजेला वापरतो त्या फुलांपासून राखी तयार केली. नैसर्गिक राखीचा हा सुरेख नमुना!
ऑगस्ट २०२० ‘वयम्’
(ग्रंथपाल, भारत विद्यालय-बुलडाणा)