संयमाची रुजवण
मुलांना पाहिजे तेव्हा पाहिजे ते मिळण्याची सवय बहुतांश घरांतून लागलेली असते. लॉकडाउनमुळे त्यांना जाणीव झाली की, आपल्याला जे जे हवेसे वाटतेय ते आत्ता मिळू शकणार नाही. आहे त्यात समाधान मिळवावे लागेल. कौतुक हे, की मुलांनी हाही धडा आनंदाने आत्मसात केला या काळात... ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुले लिहिती झाली. त्यांतील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा या मुलांनी करोना-काळात कित्ती गोष्टी करून पाहिल्या...
आज वाचा भाग- 15.
या विषाणूमुळे मनसोक्त भटकणे तर दूरच, पण घराबाहेर पाऊल टाकणेही अवघड झाले. खूप वाईट वाटलं, राग आला. हे सगळं आत्ताच का, असंही वाटलं. पण असं वाटून काही उपयोग होणार नाही, हेसुद्धा लक्षात आलं. घरातल्या घरात करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, याचा साक्षात्कार झाला. कपाटात बंद असलेली पुस्तके बाहेर आली. कितीतरी छान छान पुस्तके अजून उघडली नव्हती, हे ध्यानी आले. गेले वर्षभर एका कोपर्यात ठेवलेल्या पेटीकडे लक्ष गेलं. चित्रकला आणि हस्तकला हे तर माझे आवडते विषय. यावर्षी त्याकडे दुर्लक्ष झाले होते. आता मात्र चांगलीच संधी मिळाली. याशिवाय किचनमध्ये प्रयोग करता आले. काहीही वाया जाऊ नये म्हणून आईने मला काही नवीन प्रकारच्या भाज्या करायला शिकवलं, ज्यात भाजीच्या प्रत्येक भागाचा वापर झाला.
माझी आणखी एक आवडती गोष्ट म्हणजे पक्ष्यांचे निरीक्षण करणे. आमच्या इमारतीसमोरच्या झाडांवर बुलबुल, चिमणी, दयाळ, शिंजीर अशा पक्ष्यांचा सतत वावर असतो. चिंचेच्या झाडाची फांदी आमच्या घरातील खिडकीच्या गजांमधून किंचित आत येत असल्यामुळे तेथून खूप जवळून पक्षी पाहता येतात.
या सुट्टीत रामायण आणि महाभारत कथा नीट समजून घ्यायचे मी आधीपासून ठरवले होते; जणू माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी की काय, दूरदर्शनने या मालिकांचे प्रसारण सुरू केले. दररोज न चुकता मी या मालिका पाहते.
इतक्या वर्षात पहिल्यांदाच आई-बाबांबरोबर घरात एकत्र इतके दिवस राहण्याची वेळ आली. मी, आई-बाबा, माझा भाऊ मिळून बुodद्धिबळ, सापशिडी, टेबल टेनिस यासारखे खेळ खेळतो. आता वेळच वेळ असल्याने माझी व्यायाम न करण्यासाठीची नाटके बंद करून आईने मला रोज सकाळी व्यायाम करण्याची सवय लावली आहे.
या सुट्टीत दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी शिकता आल्या, त्या म्हणजे संयम आणि स्वावलंबन! शांतपणे घरातच राहिल्यामुळे संयम वाढला आणि कपडे धुण्यापासून सगळीच कामे स्वतः करायला शिकले. आता पुन्हा एकदा घराबाहेरील मोकळ्या वातावरणात मनसोक्त खेळण्याची, फिरण्याची ओढ लागली आहे, हेही तितकंच खरं.
–दुर्वा सावे, दहावी
या काळात मला घरातील काही कामे करण्याची सवय जडली. भांडी घासणे, कपडे धुणे, नाश्ता बनवणे, अंथरूण घालणे-काढणे आणि घरातील इतर छोटी-मोठी कामे नेमाने करत आहे. चुलीवरच्या भाकऱ्या बनवायला शिकले.
या काळात मी अनेक वक्त्यांची भाषणे ऐकली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या तीन राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला व तीनही स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त केले. तसेच भाषाप्रभू ह. भ. प. जगन्नाथ पाटील महाराज यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय श्लोक पाठांतर स्पर्धेसाठी मी पांडुरंगाष्टकम् पाठ केले. त्यात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. त्यामुळे माझ्या नातेवाईकांनी, शिक्षकांनी व गावकऱ्यांनी माझे कौतुक केले. तसेच हल्ली मी ‘वयम्’ लिंकवर वेगवेगळे अनुभवलेख वाचत आहे.
-अनन्या सदानंद म्हात्रे, नववी
माध्यमिक विद्यालय टेमघर, भिवंडी
या सुट्टीत मी आमच्या आधीच्या इयत्तेतील विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातील काही प्रयोग केले. मी सलाइनचे पाईप, सिरींज आणि मोकळ्या बॉक्सचा वापर करून, त्यांची जोडणी करून हायड्रॉलिक जेसीबी बनवला. शिवाय आइसकूलर तयार केला. कार्डबोर्ड, डीसी मोटर, आइसक्रीम स्टिक, फेविकॉल हे सगळं वापरून केला तो! उन्हाळ्यासाठी उपयुक्त!!
-आनंद राजू बनकर, दहावी, जनता हायस्कूल, वरळी
चित्रकला हा माझा आवडता विषय. त्यामुळे चित्रं तर काढलीच, शिवाय क्लेपासून गणपती बनवला, मटका-पेंटिंगही केले.
आईलाही मदतही करतेय. घराची सफाई, भाजी चिरणे अशी कामं करू लागले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी चपात्या बनवायलाही शिकले. माझा भाऊ सहा वर्षांचा आहे, त्यालाही मी चित्र काढायला शिकवते. कधी आम्ही सापशिडी, कॅरम, राजाराणी-चोर-शिपाई हे खेळही खेळतो. आता एकच प्रार्थना आहे की, कोरोनाचे सावट लवकरात लवकर जाऊ दे.
-कल्याणी सपकाळे, सातवी,
आदर्श विद्या मंदिर
दहावीच्या परीक्षेनंतर खूप मजा करायची, असं ठरवलं होतं. पण करोनामुळे भूगोलाचा पेपर पुढे ढकलला गेला. पेपर पुढे ढकलण्याचा आनंद साजरा करू की, परीक्षा कालावधी वाढल्याचे दुःख.. द्विधा मनःस्थितीत होतो. खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा आमचा पेपर रद्द झाला. खंत वाटली, कारण भूगोल हा विषय स्कोअरिंगचा होता. मी तबला वाजवतो आणि माझी ताई पेटी, त्यामुळे या काळात तबला-पेटीच्या साथीने आम्ही गाणी वाजवली. काही कारणांमुळे सुटलेला सराव पुन्हा सुरू झाला. नवीन नवीन गाणी वाजवायला शिकलो. या कारणामुळे दिवसातील काही वेळ संगीतमय झाला. यासोबत आईबाबांना देखील थोडं थोडं संगीत शिकवलं. सुट्टी सुरू झाल्यावर मी एपीजे अब्दुल कलाम आणि सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र वाचण्यास सुरुवात केली. माझे वेगवेगळे छंद जोपासतोय. टीव्ही आणि मोबाईल तर आहेतच सोबत; त्यामुळे कंटाळा आला की त्यांचा वापर करायचा. पण सध्याच्या परिस्थितीत याचा देखील कंटाळा आला. सुट्टीनंतर गावची ओढ लागली आहे, पण ती काही लवकर पूर्ण होणार नाही. या सुट्टीत ‘बहुरंगी बहर’ शिबिर असणार होते, त्याचीही वाट बघत होतो, पण तेही होणार नसल्याचं कळलं. एक गोष्ट मात्र खरी की, ह्या सुट्टीने सगळ्यांना संयम कसा बाळगायचा, ते शिकवलं आहे. ही सुट्टी खूप सारे अनुभव देऊन गेली.
-प्रज्ञेश तुकाराम कांबळे, दहावी
अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल, गोरेगाव
या अनपेक्षित मिळालेल्या सुट्टीत मी खूप वेगवेगळे अनुभव घेतले. किचनमधे थोडे लक्ष दिले आणि इडली- डोसे असे काही पदार्थ करायला शिकले. आईला गहू, तांदूळ निवडायला, भाजी चिरायला मदत केली. झाडं कशी लावायची, त्यांची काळजी कशी घ्यायची, संगोपन कसं करायचं, हे सुद्धा शिकले.
नवनवीन चित्रं काढायला शिकले. ग्रीटिंग कार्ड, फ्लॉवर पार्ट, कागदाची फुले इत्यादी गोष्टी बनवायला शिकले. रांगोळी व मेंदी काढायला शिकले. भेंडी, बटाटा, मेथीच्या पानापासून ठसेकाम केले.
गोष्टींची पुस्तके वाचली. बहिणीचा अभ्यास घेतला. पाढे पाठ केले. शुद्धलेखन लिहिले. इंग्रजी पुस्तके व त्यातील कविता वाचल्या.
आई-बाबांसोबत खूप गप्पा केल्या. आई-बाबांचं बालपण जाणून घेतलं. त्यांचे अनुभव ऐकले.
शिक्षकांच्या आणि आई-वडिलांच्या मदतीने करोनापासून वाचवण्याचा प्रचार करणारे फलक तयार केले.
घरात बसून खूप नवीन गोष्टी करण्याची मजा अनुभवली.
-दीक्षा दत्ता ठोंबरे, पाचवी
ग. रा. पालक प्राथमिक शाळा, कॅनल रोड, पुणे
जून २०२० ‘वयम्’