Menu

माझा विघ्नहर्ता

image By Wayam Magazine 18 September 2023

पृथ्वीवर गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आणि कैलासावर बालगणेशाची चुळबूळ वाढली. यावेळी मातेला सांगून गणेशोत्सवात पृथ्वीवर फेरफटका मारायचाच, असा निश्चय त्याने केला होता. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आठवडाभर आधी त्याने माता पार्वतीच्या डोक्याशी भुणभुण चालू केली.

“चल ना गं आई, जरा फिरून येऊ. किती कंटाळा आलाय दररोज तेच तेच खेळ खेळून...”

सुरुवातीला मातेने फार लक्ष दिले नाही, पण मग स्वारी फुरंगटून बसली आणि कोणाशीच काही बोलेना. खेळायला जाईना. मग मात्र पार्वतीला त्याचे म्हणणे ऐकावेच लागले.

“येऊ फिरून थोडा वेळ. पण हे बघ, बाबांना किंवा दादाला आत्ताच काही सांगू नकोस. मी योग्य वेळी घालीन कानावर त्यांच्या. आणि यावेळी तुझी बॅग तू भरायची आहे. काय?”

गणेशाने लगेच जोरजोरात सोंड हलवून होकार दिला आणि उंदरावर स्वार होऊन खेळायला निघून गेला. 

यथावकाश बाबा शंकरांची परवानगी घेऊन निघाली की ती जोडी पृथ्वीवर भ्रमण करायला !

तोवर भूतलावर गणेशोत्सव धामधुमीत सुरू झाला होता. सगळीकडे नुसते जल्लोषाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. हे बघून गणेशाची स्वारी अगदी खूश होऊन गेली. 

ते खूप फिरले. देखावे बघितले. अनेक घरांतून येणारे आरत्यांचे स्वर... तिथे ते आवर्जून हजर राहिले. घरातल्या माणसांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, आनंद बघितला. अनेक सोसायट्यांतून चालणारे सांस्कृतिक कार्यक्रम बघितले. एका ठिकाणी तर लहान मुलांची निबंधस्पर्धा चालू होती. गणेश बाळाने ते बघितले आणि आईला सांगून कैलासावरही असेच करायला सांगावे असे ठरवले. कैलासावर परत आल्यावर आईच्या मागे तशी भुणभुण लावली. 

त्याच्या दररोजच्या पाठपुराव्याने कंटाळून पार्वतीने त्याच्या मनासारखे करायचे ठरवले. दादा कार्तिकेयालाही काहीबाही बोलून तयार केले. 

मग एके दिवशी तिने दोघांना एका जागी बसवले, कागद पेन दिले आणि निबंधाला विषय दिला- ‘माझा विघ्नहर्ता’. हे दोघे काय लिहितील याची तिलाही उत्सुकता होतीच.

दोघे विचार करत, डोकं खाजवत काहीबाही लिहू लागले. 

निकालाचा दिवस उजाडला. शंकर भगवान दोघांचे निबंधाचे कागद हातात घेत म्हणाले, “मी हे दोन्ही वाचले आहे आणि त्यावर मी माझा निकाल देईनच. पण मला वाटतंय तुम्ही सांगावं की तुम्ही विघ्नहर्ता म्हणून कोणाबद्दल लिहिलं आहे, आणि का?”

“दादा, तू सांग आधी. तू मोठा ना..” गणेशाने कार्तिकेयाला टोकले. कार्तिकेयाने त्याच्याकडे डोळे मोठे करून बघितले. पण बाबांनी डोळे वटारल्यावर मात्र त्याने बोलायला सुरुवात केली, ”आई-बाबा, तुम्हीच तर माझे विघ्नहर्ता. तुम्ही आत्तापर्यंत माझी किती काळजी घेतलीत. माझ्यावर कोणतेही विघ्न येऊ दिले नाही. आले तरी ते दूर केले. यापुढेही कराल याची मला खात्री आहे. म्हणून मी निबंधात तुमच्याबददलच लिहिले आहे.” असे बोलून तो थांबला व नजर त्याने मातेकडे वळवली. तिच्या डोळ्यांतले कौतुक पाहून तो सुखावला. मग गणेशाला खिजवायला त्याने त्याच्याकडे बघत एक विजयी हास्य केले. 'मागे पृथ्वीप्रदक्षिणा स्पर्धेच्या वेळी आईबाबांना प्रदक्षिणा घालून चलाखी केलीस काय? आता बघ माझे चातुर्य!' असेच जणू त्याला म्हणायचे होते.

 मग गणेश पुढे आला. आणि आई-बाबांना वंदन करून बोलू लागला, “आईबाबा, मला वाटतं, प्रत्येकाने असावं स्वतःच स्वतःचा विघ्नहर्ता. आणि म्हणूनच मी माझ्या निबंधात लिहिलं आहे की मीच आहे माझा विघ्नहर्ता. आई, तूच सारखं मला म्हणतेस ना, की बाळा आता तू मोठा झाला आहेस. तुझी जबाबदारी तू स्वतः घ्यायला पाहिजेस. मग आपली विघ्ने ही आपलीच जबाबदारी नाही का? मग ती आपणच दूर केली पाहिजेत ना? आणि माझ्या शक्तीपलीकडचे काही असेल तर तुम्ही आहातच की...” 

बोलता बोलता गणेशाने नकळत आईकडे बघितले. त्याचे बक्षीस त्याला आईच्या डोळ्यांत दाटलेले दिसले. धावत जाऊन तो आईच्या कुशीत शिरला ! 

-उमेश पटवर्धन

                         *** 

My Cart
Empty Cart

Loading...