गांधी तेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते. वकिलीचं काम करीत होते. ‘महात्मा’ म्हणून जगन्मान्य होण्याच्या फार पूर्वीची ही लहानशी गोष्ट आहे. घरातला संडास साफ करण्यासाठी पहाटे एक भंगी येत असे. तो आफ्रिकन होता. थंडीचे दिवस होते. पहाटे अंगावरची ऊबदार पांघरूणं बाजूला करणं हेदेखील कठीण काम होतं. गांधींच्या मनात विचार आला, ‘इतक्या थंडीत पहाटे येऊन हा भंगी आपला संडास साफ करतो. किती त्रासाचं काम असेल हे!’ दुस-या दिवशी गांधींना पहाटे झोपून राहणं अशक्यच झालं. ते गुपचूप उठले. त्यांनी गरम चहा करून त्या भंग्याला दिला. स्वत: गांधी चहा पीत नसत. आता त्या कडाक्याच्या थंडीत गांधी रोज पहाटे उठून त्या भंग्याला चहा करून देऊ लागले. त्यालाही संकोच वाटू लागला. एक दिवस तो म्हणाला, “नको मी क्षुद्र माणूस. मला चहा करून देऊ नका.” गांधींनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते नुसते निर्मळ हसले. दुस-या दिवशी पहाटे कडाक्याच्या थंडीत उठून गांधी नेहमीप्रमाणे चहाचा पेला घेऊन उभे होते. त्या भंग्याचे डोळे भरून आले. आपल्या आफ्रिकन भाषेत थरथरत्या स्वरात तो गांधींना म्हणाला, “देव तुमचं भलं करो.”
गांधीजी सेवाग्रामच्या आश्रमात असताना अशीच एक गोष्ट घडली. गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वावर, जीवनदृष्टीवर प्रकाश टाकणारी गोष्ट.
एक विधवा स्त्री आपल्या मुलाला घेऊन सेवाग्रामच्या आश्रमात राहायला आली होती. तिचा मुलगा हुशार होता. आश्रमातल्या मूलोद्योगी शिक्षणाच्या शाळेत त्या मुलाचं नाव घालायचं असं ठरलं. शाळेच्या वसतिगृहातच त्याने राहायचं होतं. तिथे राहायचं त्या मुलाच्या मनात नव्हतं. तो प्रथम तयार होईना. शेवटी एका अटीवर तो मुलगा शाळेत जायला तयार झाला -गांधीजींनी एकदा आपल्याला वसतिगृहात येऊन भेटलं पाहिजे, ही त्याची अट होती. त्याचा तो बालहट्ट गांधीजींनी मान्य केला आणि ठरल्याप्रमाणे गांधीजींनी अकस्मात त्या वसतिगृहाला भेट दिली. तो मुलगा राहत होता त्या खोलीत गांधीजींनी प्रवेश केला. खोलीत मध्यभागी शाईची दौत आणि लेखणी तशीच पडली होती. काम संपल्यानंतर त्या मुलाने ती उचलून जागच्या जागी ठेवून दिली नव्हती. गादीतून कापूस बाहेर डोकावत होता. वरची फाटलेली चादर व्यवस्थितपणे शिवलेली नव्हती. वसतिगृहाला फक्त पाचच मिनिटं भेट द्यायची असं ठरवून गांधीजी आले होते; परंतु त्या वसतिगृहाचं हे अचानक ‘इन्स्पेक्शन’ ते पंचेचाळीस मिनिटं करीत होते; प्रत्येक लहानसहान गोष्टीकडे कोणत्या दृष्टीने पाहायला पाहिजे हे मुलांना समजावून सांगत होते; स्वच्छतेचं, टापटीपीचं महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवत होते. ते त्या मुलांना म्हणाले, “तुमच्यापैकी काही मुलांकडे थंडीचे कपडे आवश्यकतेहून अधिक आहेत; तर काही मुलांकडे ते आवश्यकतेहून कमी आहेत. ज्यांच्याकडे अधिक कपडे आहेत त्यांनी ते कमी कपडे असलेल्या मुलांना का बरं दिले नाहीत? खरं म्हणजे, एकमेकांना मदत कशी करावी याचं शिक्षण घेण्याची अतिशय चांगली संधी तुम्हांला इथे लाभलेली आहे.” वसतिगृहाच्या व्यवस्थापकांना त्यांनी कळवलं. “या सर्व गोष्टी अतिशय क्षुल्लक आहेत, त्यांची इतकी दखल घ्यायला नको असं तुम्हांला वाटेल; परंतु या गोष्टी तुम्ही समजता तितक्या लहान नाहीत- या लहान, क्षुल्लक भासणा-या गोष्टींवरच माझं सगळं जीवन उभं आहे. या क्षुल्लक भासणा-या गोष्टींचं महत्त्व किती आहे ही गोष्ट जर लहान मुलांच्या मनावर मी बिंबवू शकलो नाही तर माझं काहीतरी चुकलं असं मी समजेन. ‘नवी तालीम’चा शिक्षणप्रयोग मीच सुरू केला, परंतु तिथे लक्ष द्यायला मला पुरेसा वेळ मिळाला नाही तेव्हा मी ते काम इतरांवर सोपवलं. स्वच्छतेची, टापटीपीची जाणीव हा ‘नवी तालीम’ शिक्षणपद्धतीचा गाभा आहे असं मला वाटतं. ही जाणीव मुलांच्या मनात वडीलधा-यांनी, शिक्षकांनी निर्माण केली पाहिजे. ही जाणीव निर्माण करण्यासाठी कसलाही खर्च येत नाही. तीक्ष्ण नजर आणि कलात्मक दृष्टी इतक्या गोष्टी जवळ असल्या म्हणजे झालं…’
***