Menu

छोट्या गब्बू ची गोष्ट लहान मुलांसाठी

image By Wayam Magazine 20 October 2022

गब्बूचा चेहरा विचित्र आहे. त्याचं डोकं म्हणजे त्याला अगदी दुस-याच मुलाचं चिकटवल्यासारखं. हात, पाय चांगले गोरे गोंडस. मात्र डोळे, नाक, कपाळ, ओठ, कान काहीच कुठल्या प्रमाणात नाही... आधी विचित्र वाटलेला हा मुलगा बघता बघता आमचा मित्र झाला...  शुभंकर त्या बंगल्यात बॉल शोधायला गेला, त्याला २०-२५ मिनिटं झाली. त्याची वाट पाहत, या पायावर, त्या पायावर उभं राहून कंटाळा आला. एकेकाने फेऱ्या मारून पाहणी करून झाली. तिथे आलेला नवा माणूस भांडकुदळ असला, तर फुटलेल्या कुंड्यांवरून कटकट करेल, पण काही ऐकू येईना. शुभ्या एकटा नको पडायला म्हणून शेवटी आम्ही सगळेच निघालो. एकमेकांच्या छातीतली धडधड ऐकू येण्याइतकी मोठी झाली.

बाहेर दारात पोहोचलो तर आमच्यासारखीच अर्धी चड्डी घातलेले एक काका शुभंकरच्या खांद्यावर हात टाकून बाहेर आले. शुभंकरच्या हातात एक बॉक्स दिसत होता. त्याचा चेहरा समुद्रमंथनातून अमृताचा कुंभ मिळाल्यासारखा आनंदित. आम्ही सगळ्यांनी एकमेकांकडे प्रश्रार्थक नजरेने पाहिले. एवढ्यात त्या काकांनीच हसून आम्हांला सगळ्यांना आत बोलावले. आम्ही जरा लाजून, संकोचून आत गेलो आणि सोफ्यापाशीच दाटीवाटीने उभे राहिलो.

“शुभंकर, हे सगळे तुझे मित्र ना? त्यांच्याशी पण गब्बूची ओळख करून दे.” ते आतून चाकाची खुर्ची लोटत बाहेर घेऊन आले. त्यात एक मुलगा बसलेला. हाच असणार गब्बू. गुबगुबीत दिसत होता. शुभंकर म्हणाला, “गब्बू, हे सगळे माझे मित्र– धनू, बिट्टू, गौरव, असीम, निरंजन.” खुर्चीतल्या मुलाला ते कळले की नाही, हे त्याच्या चेह-यावर मुळीसुद्धा दिसले नाही.

खुर्चीतला तो मुलगा म्हणजे गब्बू. काहीतरी गडबड वाटली त्याच्यात. त्याचा चेहरा विचित्र आहे. गणपतीला हत्तीचं डोकं आहे, तरी त्याला कसं ते फिट्ट बसतं ना, तर याचं कसं माहितीय? हे डोकं त्याला अगदी दुस-याच मुलाचं चिकटवल्यासारखं. हात पाय चांगले गोरे गोंडस. मात्र डोळे, नाक, कपाळ, ओठ, कान काहीच कुठल्या प्रमाणात नाही. आमचे चित्रकलेचे नाडकर्णी सर सारखं सारखं घोटवून सांगतात, ‘माणसाचं चित्र काढताना प्रमाण विसरायचं नाही. डोळे, नाक, कान, हनुवटी, कपाळ यासाठी तर चेह-यावर आधी चौकोन तयार करून घ्यायचे म्हणजे प्रमाण कळतं.

हात, पाय, मान, खांदेसुद्धा प्रमाणात हवेत..’ तर, या गब्बूचं तसं काही नव्हतं. नाडकर्णी सरांची याच्याशी ओळख करून द्यायला हवी. गब्बूच्या बाबांनी आम्हांला नव्या बॉलचा अख्खा बॉक्स दिला. पहिल्याच भेटीत आम्हांला ते आवडले.

ग्राउंडवर भर उन्हात ते गब्बूला आमचा खेळ पाहायला घेऊन यायचे. हसताना त्याच्या तोंडातून खूप लाळ गळायची. ते पुसायचे. खेळताना आम्ही ओरडायचो सिक्स, फोर, आउट - की तो पण काहीतरी विचित्र आवाजात चित्कार करायचा. आम्हांला गब्बूची हळूहळू सवय झाली.

त्याचे बाबा आम्हांला आमच्याच बरोबरीचे वाटू लागले. गब्बूची आई नोकरी करायची. तिला रजा मिळाली नाही म्हणून त्याच्या बाबांनी रजा घेतली होती. हा इन्कमटॅक्स ऑफिसर आमचा खूप छान मित्र झाला. त्यांच्यामुळे आम्हांला गब्बूविषयी बरेच काही कळले होते. तो स्वतःचे स्वतः काहीच करू शकत नसे. जन्मल्यापासून तो असाच होता. आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना मदत करायची ठरवलं. ते आमच्या भागात नव्याने राहायला आल्यामुळे त्यांच्या फारशा ओळखी नव्हत्या. आमच्यामुळे आमच्या पालकांशीही त्यांची ओळख झाली. मग कोणाच्यातरी ओळखीतून गब्बूच्या शिक्षणासाठी एक संस्था मिळाली. सांभाळायला माणूसही मिळाला.

काकांची रजा संपत आली होती. ते दोन दिवसांनी हजर होणार आणि आज रविवारमुळे काकू घरीच होत्या. त्या दिवशी गब्बूचा वाढदिवस होता. गब्बूच्या घरी आम्ही सगळे जमलो. आमचे आईवडीलही पहिल्यांदाच त्यांच्याकडे आले होते. “आता बर्थडे बॉयला मी हॉलमधे घेउन येत आहे ssss” ...राजा दरबारात येताना जशी घोषणा द्यावी तशा सुरात काका मोठमोठ्याने घोषणा करत गब्बूला खुर्चीवरून हॉलमध्ये घेऊन आले.

गब्बू घर..घर..घर आवाज काढत हसला. आम्हांला सवयीने ते माहीत झाले होते. “आणि आता गब्बूची परीक्षा आहे. गब्बूला तुम्ही सगळ्यांनी शिकवलेली गंमत तो करून दाखवणार. गब्बू हुशार आहे. त्याला सगळं येतं.” गब्बूच्या खांद्यावर काकांनी एक हाफ शर्ट टाकला. त्याची सगळी बटणे उघडलेली होती. गब्बूचे डोळे चमकले. त्याने तो शर्ट वाकडा तिरका सरळ वेगवेगळ्या कोनातून पाहिला. आधी ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे जण कॉलरवाले आणि बटणांचे हाफ शर्ट घालून आलो होतो. गब्बूने आम्हा प्रत्येकाकडे निरखून पाहिले. मग शर्टात दोन्ही हात घातले. कॉलर हनुवटीखाली मानेवर समोर आली. मग त्याने शर्ट परत काढला. तो स्वतःशीच गालातल्या गालात हसला. त्याने शर्टाची कॉलर मानेवर मागे येईल असा धरला. त्यातून आधी डावा हात घातला. मग खूप वेळ उजवा हात जाईचना. त्याची नुसती धडपड चालली होती.

आम्ही कबड्डीच्या मॅच पाहायला जातो तेव्हा आमचेच हात-पाय कसे वळायला लागतात ना, तसेच काहीसे त्याचे हात शिवशिवू लागले. आणि एकदाचे त्याचे दोन्ही हात बरोबर गेले शर्टात. आता बटणं म्हणजे मोठंच दिव्य. आम्ही त्याला रोज दाखवायचो. पहिल्यांदा कसं मानेजवळचं पहिलं बटण लावायचं. मग सगळ्यात शेवटचं. मग मधली. पण त्याने पहिल्यांदा मधलं बटण लावलं. ते चुकीचं. मग सगळी चुकत गेली.

आमच्या चेह-यांकडे बघून त्याला कळलं, की चुकलंय सगळं. त्याने सगळी बटणं सोडवली आणि तो घर.. घर.. घर.. आवाज करत रडायला लागला. आम्हांला खूप वाईट वाटत होतं. आपणच सगळी नीट लावून द्यावी का त्याला? त्याची परीक्षा नको. पण काकांनी नजरेने दटावलं. “आता परत करणार हं आपला गब्बू.” गब्बूने तोंडाचा चंबू करून एक मोठा गंभीर हुंकार दिला. मग चुकत माकत त्याने सगळी बटणे नीट लावली.

आमच्याकडे बघून ताठ मानेने परत घर..घर..घर.. आवाज काढत तो मोठ्यांदा चित्कारला. “अँड दॅट इज सिक्स”... आम्ही सगळ्यांनी एका आवाजात ओरडून कल्ला केला. गब्बूला सगळ्यांनी मिळून एक मोठ्ठी मिठी मारली. काका-काकू एकाएकी हमसाहमशी रडायलाच का लागले, काय माहीत!

-माधुरी माटे
My Cart
Empty Cart

Loading...