Menu

फेब्रुवारीच लहान का?

image By Wayam Magazine 29 February 2024

इंग्लिश कॅलेंडरमधल्या बाकीच्या महिन्यांना 30 आणि 31 दिवस दिले गेले, पण फेब्रुवारी महिन्याला मात्र 28/29 का? कोणी ठरवलं हे? कधीपासून?

फेब्रुवारी म्हटल्यावर पहिल्यांदा आठवतात ते त्याचे 28 दिवस किंवा 29 दिवस. मग आठवतात कोणाचा 29 फेब्रुवारीचा वाढदिवस कसा चार वर्षांतून एकदाच येतो, अशा गमतीजमती. पण फक्त फेब्रुवारीच लहान का? वर्षाचे 365 दिवस 12 महिन्यात विभागताना बाकीच्या महिन्यांना 30 आणि 31 दिवस दिले गेले, पण याच महिन्याला मात्र 28 का? मार्च आणि मे महिन्यांचा एक एक दिवस गुपचुप या महिन्याला देऊन त्याचे 30 का नाही करून टाकले गेले?

यामागे एक भली मोठ्ठी कहाणी आहे. सुरुवातीच्या रोमन कॅलेंडरमध्ये फक्त 10 महिने होते. रोम्युलस या रोमच्या पहिल्या सम्राटाने हे दहा महिन्यांचं कॅलेंडर करताना मार्च ते डिसेंबर असे दहा महिने धरले होते. मार्च महिन्यात सुरेखसा वसंत ऋतू आला की वर्ष सुरू झालं आणि थंडीच्या डिसेंबरमध्ये संपलं, असा तो सोपा हिशेब होता. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, आणि डिसेंबर ह्या महिन्यांची नावंसुद्धा सात, आठ, नऊ, आणि दहा असा त्यांचा कॅलेंडरमधला क्रमांक दाखवतात. या दहा महिन्यांच्या वर्षातले सहा महिने होते 30 दिवसांचे तर चार महिने होते 31 दिवसांचे. पण हे तर फक्त झाले 304 दिवस. सम्राटाच्या मनात चंद्राच्या भ्रमणाशी निगडित चांद्र वर्षं होतं. पण चांद्र वर्षाचे होतात 355 दिवस. तेव्हा हे गणित काही जुळत नव्हतं. 

न्यूमा पॉम्पीलियस या पुढच्या सम्राटाने हे काम पुन्हा हातात घेतलं. 355 दिवस एका रोमन वर्षात बसवायचे तर आणखी निदान दोन महिने हवे होते. त्याने ते वर्षाच्या शेवटी घालायचे ठरवलं. त्यावेळची संस्कृती शेतीवर अवलंबून होती. शेतीची कामं उरकून झाल्यावर नंतरच्या थंडीच्या महिन्यांना त्यांच्या दृष्टीने फार महत्त्व नव्हतं. त्यामुळे नवे दोन महिने जानेवारी आणि फेब्रुवारी गेले वर्षाच्या शेवटी. म्हणजे 12 महिन्यांचं वर्ष झालं मार्च ते फेब्रुवारी. आता फेब्रुवारी शेवटचा महिना असल्याने दिवसांचा उरलासुरला हिशेब त्याने या शेवटच्या महिन्यात टाकायचा विचार केला. 

त्या काळी सम संख्या वाईट असा एक समज होता. तो तसा का, हे कुणास ठाऊक. प्रत्येक काळात असे काहीतरी समज-गैरसमज असतात. तेव्हा 12 महिन्यांना प्रत्येकाला विषम दिवस मिळतील, अशी रचना न्यूमाला हवी होती. आता एकूण महिने 12 म्हणजे सम. त्यामुळे प्रत्येक महिन्याचे दिवस विषम असले तरी एकूण दिवस समच होणार ना? अर्थात, हे गणित त्या सम्राटालाही कळत होतं. त्यात काय, एखादा महिना करू सम दिवसाचा, असं म्हणत तो आखणी करायला बसला. एकतीस दिवसांचे चार महिने त्याने तसेच ठेवले आणि उरलेले सरसकट एकोणतीस दिवसांचे करून टाकले. आलं ना लक्षात, प्रत्येक महिन्याला विषम दिवस. त्यात एकूण झाले तीनशे छ्प्पन. पण ही तर सम संख्या. मग ही सम संख्या टाळून वर्ष तीनशे पंचावन्न दिवस करण्याच्या उलटसुलट करामतीमध्ये फेब्रुवारीला मिळाले अठ्ठावीस दिवस. 

पण या 12 महिने, 355 प्रकारात कॅलेंडरची तारीख आणि ऋतू यांचा मेळ काही बसेना. एका वर्षी मार्चमध्ये वसंत ऋतू सुरू झाला, तर काही वर्षांनी तो मे महिन्यात यायला लागला. माणसं गोंधळून गेली. साहजिकच आहे. ऋतू  होतात ते पृथ्वी कलत्या आसावर सूर्याभोवती प्रदक्षिणा करते म्हणून. आणि या प्रदक्षिणेला लागतात तीनशे पासष्ट आणि पाव दिवस. हा तर तब्बल दहा दिवसांहून जास्त फरक झाला. मग ऋतू आणि महिन्यांचा गोंधळ होणार नाही तर काय! 

या सगळ्या गोष्टी जुळवून घेण्यासाठी रोमन मंडळींनी दर दोन वर्षांनी एक अधिकचा महिना घ्यायचं ठरवलं. नवे महिने वर्षाच्या शेवटी टाकायची सवय पुन्हा वर आली, आणि हा तेरावा महिना गेला फेब्रुवारीच्या नंतर. पुढे फेब्रुवारीचे दिवस किती करायचे, आणि त्या नव्या तेराव्या महिन्याला किती दिवस द्यायचे हे ठरवताना रोमनांच्या नाकी नऊ आले. त्यातच हे वर्षाचं शेपूट आणखी लहान झालं आणि फेब्रुवारी झाला चक्क २३ दिवसांचा! उगीच नाही वेल्श भाषेत फेब्रुवारीला ‘लिटल मंथ’ म्हणतात! 

दरम्यान असं झालं की, प्राचीन रोमन देवता जेनसवरून दिलेलं ‘जानेवारी’ हे नाव रोमन लोकांना वर्षाच्या सुरुवातीला हवं झालं. कोणत्याही कामाला सुरुवात करताना या देवतेचं स्मरण आधी करायचं, अशी तिथे पद्धत होती. म्हणून मार्चमध्ये वसंत ऋतू कायम ठेवताना वर्ष जानेवारीला सुरू होऊन डिसेंबरला संपायला लागलं. अगदी सुरुवातीला डिसेंबर शेवटचा महिना होता ना, तशीच स्थिती पुन्हा आली. या नव्या वर्षात फेब्रुवारी झाला वर्षाचा दुसरा महिना. पण हा बदल वरवरचा होता. त्याने ऋतूंचं गणित काही सुटेना. 

मात्र नक्की गडबड कशाने होते आहे, हे ज्युलियस सीझर या सम्राटाच्या बरोब्बर लक्षात आलं. एकीकडे चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या भ्रमणावरून वर्ष, तर दुसरीकडे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे ऋतू. मग दोघांचा ताळमेळ कसा राहणार? तेव्हा त्याने चांद्र वर्ष सोडून फक्त सौर वर्षाचा आधार घ्यायचं ठरवलं. त्यातूनच तयार झालं ज्युलियन कॅलेंडर, इ. स. पूर्व 46मध्ये. अर्थात नुसतं केलं नि झालं एवढं सोपं नव्हतं ते. त्यातल्या प्रत्येक महिन्यात 30 की 31 दिवस बसवायचे याचा भरपूर काथ्याकूट झाला. त्यातच फेब्रुवारीला पुन्हा एकदा 28 दिवस मिळाले. आता तेवीसचे अठ्ठावीस झालेले बरं मानायचं, की अजूनही आपण पिटुकलेच हे बघायचं, यात तो फेब्रुवारी चक्रावून गेला असेल!

ग्रेगोरी या धर्मगुरूने ज्युलियन कॅलेंडरमध्ये पुढे आणखी सुधारणा केल्या. आज आपण हे ग्रेगोरियन कॅलेंडर वापरतो. 365 दिवसांना 12 महिन्यात बसवलं तरी सौर वर्षाचा पाव दिवस उरतो. म्हणून ज्युलियस सीझरने दर चार वर्षांनी एक जादा दिवस फेब्रुवारीला बहाल केला. या वर्षी जरी फेब्रुवारी 28 दिवसांचा असला, तरी दोन वर्षांनंतर येणार्‍या 2024च्या लीप वर्षात फेब्रुवारी 29 दिवसांचा असेल. या लीप दिवशी वाढदिवस असणारे तो मोठ्या झोकात साजरा करतात. चार वर्षांमधून एकदाच मजा करायला मिळते म्हणून!

पण गंमत सांगू का, या इटुकल्या महिन्याला इतिहासात दोन वेळा 30 दिवस मिळालेले आहेत. कसे माहीत आहे? स्वीडन या देशाने इ. स. 1700 मध्ये ज्युलियन कॅलेंडर सोडून ग्रेगोरियन कॅलेंडर पाळायला सुरुवात केली. पण काहीतरी गडबड झाल्याने स्वीडनचं कॅलेंडर बाकीच्या देशांच्या ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा दोन दिवस मागे पडलं. आज जसे आपण सतत इतरांच्या संपर्कात राहू शकतो तसं त्या काळात नव्हतं ना. हे लक्षात आल्यावर स्वीडनने फेब्रुवारी 1712ला चक्क 30 दिवसांचा करून टाकला! मग मार्चपासून त्यांचंही कॅलेंडर बाकीच्या जगाशी सुसंगत झालं.

अलिकडे रशियातही एक वेगळं कॅलेंडर पाळण्याचा प्रयत्न झाला. कामाच्या पाच दिवसांचा आठवडा आणि 30 दिवसांचा महिना, असं ठरवताना तिथे फेब्रुवारीदेखील 30 दिवसांचा झाला. अर्थात 1930-31 मध्ये झालेला हा प्रयोग नंतर बारगळला आणि फेब्रुवारी पुन्हा आपल्या नेहमीच्या 28-29 दिवसांवर आला! 

फेब्रुवारीचे 28 दिवस म्हणजे पूर्ण चार आठवडे होत असल्याने एक फेब्रुवारीला जो वार येतो, तोच वार एक मार्चला येतो. उत्तरेकडच्या प्रांतात फेब्रुवारीत बर्फ कधी वितळतो आणि पुन्हा बर्फात रूपांतर होतो. असे लहानमोठे बर्फकण मोत्यांसारखे दिसतात म्हणून फिनीश भाषेत फेब्रुवारीला हेल्मिकू, मोत्यांचा महिना असं नाव आहे. फेब्रुवारीच्या अशा गमतीजमती खूप आहेत. याच महिन्यात आपण ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी 27 फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करतो; तर सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांच्या रामन इफेक्ट संशोधनाच्या गौरवासाठी 28 फेब्रुवारीला ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा करतो. महिना लहान असला म्हणून काय झालं, कीर्ती तर महान आहे ना?

-डॉ. मेघश्री दळवी

***


My Cart
Empty Cart

Loading...