Menu

गोळीला कसं कळतं?

image By Wayam Magazine 01 July 2023

गोळीला फक्त गिळल्यावर पोटात पोचायचं कळतं

गोळी म्हणजे केवळ एक गाठोडं असतं, औषधाच्या इवल्याइवल्या कणांचं. तसली बहुतेक गाठोडी जठरात (stomach) सुटतात. काही औषधांना जठरातलं अॅसिड सोसत नाही. म्हणून त्यांची गाठोडी लहान आतड्यात (small intestine) पोचल्यावरच सुटावी अशा बेताने बांधलेली असतात. काही गाठोड्यांतले कप्पे टप्प्याटप्प्याने उघडतात आणि एकामागोमाग एक वेगवेगळी औषधं वेगवेगळ्या वेळी, काही जठरात, काही लहान आतड्यात तर काही मोठ्या आतड्यात अशी मोकळी सोडतात. तशा नेमक्या जागी नेमकं औषध पोचवायच्या पद्धतीला targeted drug delivery म्हणतात. मोकळे झालेले औषधकण आतड्याच्या अस्तरापाशी (lining) जातात. व्हिटॅमिन बीसारख्या औषधकणांना तिथून रक्तापर्यंत पोचवायचं काम करायला खास वाटाडे असतात. इतर औषधांचे कण आपल्याआपणच ते अस्तर पार करून रक्तात पोचतात. भरल्या पोटी अन्नाच्या कणांनाही त्याच मार्गाने रक्तात पोचायचं असतं. मग तिथे स्पर्धा होते. कमी औषध रक्तात पोचतं. म्हणून अनेक औषधं रिकाम्या पोटीच घ्यायची असतात

 रक्तात पोचल्यावर औषधकणांच्या पुढच्या प्रवासातला पहिला स्टॉप असतो लिव्हरचा. आतड्यातून येणाऱ्या प्रत्येक कणाचा घातकपणा तपासून त्याची तिथे सफाई होते. काही औषधांचं लिव्हरमध्ये शिक्षण होतं. कोडीन हे वेदनाशामक औषध लिव्हर युनिव्हर्सिटीत शिकून कामसू मॉर्फीन बनतं. गोळीतून आलेल्या डी व्हिटॅमिनला तर लिव्हर आणि किडनी या दोन युनिव्हर्सिट्यांतून शिक्षण घ्यावं लागतं. तसं डबल ग्रॅज्युएट झाल्यावरच त्याला हाडांवर काम करायला जमतं.  

लिव्हर सोडल्यावर काही कण स्वतंत्रपणे प्रवास सुरू करतात, तर काही औषधांना पकडून त्यांच्यावर वचक ठेवायला प्रोटीनचे किंवा चरबीचे कण पुढे सरसावतात. कुठेही औषधकणांचा अतिरेक होऊ नये म्हणून ते वेळेला थोड्याथोड्याच औषधकणांना मोकळे सोडतात

 रक्तातून जाताना औषधकण आपले रासायनिक हात पुढे पसरून जातात. त्यांना हृदय, फुप्फुसं, मेंदू, किडनी, स्नायू वगैरे अनेक स्टॉप्स लागतात. तिथल्या दारांतून रासायनिक दरवानांचे हात बाहेर येतात. कधी कामगार-प्रोटीन्स हात पुढे करून स्वागताला उभी असतात. त्या स्वागताच्या हातांशी औषधकणांच्या हातांचं माप बरोब्बर जुळलं की तिथे औषध कामाला रुजू होतं. ब्लडप्रेशरची औषधं रक्तवाहिन्यांमध्ये कामाला लागतात. हृदयावर काम करणारी औषधं तिथे जातात. काही औषधं किडनीकडे थांबतात आणि तिथल्या गाळण्याची भोकं लहानमोठी करतात. मेंदूभोवती कडेकोट तटबंदी असते. काही अगदी लहान औषधकणच त्या तटबंदीतून जाऊ शकतात. पण तिथे मॉर्फीनबरोबरच्या चरबीवाल्या गाइडचा रासायनिक वशिला लागतो. तो मॉर्फीनला मेंदूतल्या वेदनाकेंद्रापर्यंत पोचवतो. तिथे वेदनाकेंद्राबरोबरच शेजारचं उलटीचं केंद्रही मॉर्फीनशी हात मिळवतं. मॉर्फीनच्या करामतीने वेदना शमतात, पण त्याचसोबत ओकाऱ्यांनी जीव बेजार होतो

 तसा दोनदोन ठिकाणी हात मिळवायचा खोडसाळपणा इतरही औषधं करतात. मिनॉक्सिडिल नावाचं ब्लड प्रेशरवरचं औषध रक्तवाहिन्यांवर तर काम करतंच, पण केसांच्या मुळांनाही बळकट करतं, केस वाढवतं. बायकांना दाढी येते! काचबिंदू (glaucoma) साठी डोळ्यात घातलेले थेंब फुप्फुसांशीही हस्तांदोलन करतात, दमा चाळवतो. स्टीरॉईडसारखी औषधं त्वचा, किडनी, रक्तवाहिन्या, मेंदू अशा अनेक ठिकाणी काम करतात. एका कामासाठी दिलेलं स्टीरॉइड इतर अनेक ठिकाणी नसत्या उचापती करतं. दुष्परिणाम होतात.    

मेंदूतल्या केंद्रांवर किंवा स्नायूंना आज्ञा देणाऱ्या मज्जातंतूं (nerves) वर काम करणारी औषधं अती कामसू झाली तर अती शांतवण्यामुळे माणसाचा कुंभकर्ण होईल किंवा अतिटोचणीमुळे आकडी (epilepsy) येईल. म्हणून तिथल्या औषधांना वेळीच रोखायला, त्यांना रिटायर करायला, (त्यांचे एकलव्याचे अंगठे कापायला) जागोजागी रासायनिकद्रोणाचार्यटपलेले असतात. तशा सेवानिवृत्त औषधांचा किंवा रक्तात साचलेल्या सगळ्याच औषधांचा कचरा काढायला लिव्हर आणि किडनी तत्पर असतात. लिव्हरने आतड्यात ढकललेला औषधांचा कचरा रक्तात परत येऊ नये म्हणून त्याला रासायनिक कोटटोप्या चढवून त्याचा आकार वाढवलेला असतोतरी’, ‘डीसारखी व्हिटॅमिन्स, काही हॉर्मोन्स लिव्हरमध्ये, चरबीत साठून राहातात आणि गरज लागली की मदतीला धावून येतात.

काही गोळ्यांतली औषधं रक्तात पोचायच्या भानगडीत पडत नाहीत. जंतूंमुळे डायरिया झाला तर त्याच्यावरच्या गोळ्यांतलं अँटिबायोटिक आतड्यातच राहून तिथले जंतू मारतं. कॉन्स्टीपेशनसाठी दिलेल्या गोळ्यांतले औषधकण मोठ्या आतड्यावर, तिथल्या तिथेच काम करतात. आणि गोळी नसलेलं ते एरंडेलसुद्धा आतडं सोडून कुठ्ठेही जात नाही, पण काम फत्ते करतंच की!

 रासायनिक हातांचं गुपित समजल्यापासून शास्त्रज्ञांनी आजाराच्या गरजेप्रमाणे तसे चपखल हातवाली औषधं प्रयोगशाळेत बनवायला सुरुवात केली. कॅन्सरवरची औषधं शरीरातल्या सगळ्याच पेशींशी हातमिळवणी करू शकतात. त्यांचे अनेक दुष्परिणाम असतात. ते टाळायला त्यांना प्रोटीनचे अतिसूक्ष्म (nano) वाटाडे सोबत देतात. त्या वाटाड्यांचे हात फक्त कॅन्सरच्या पेशींशीच हातमिळवणी करायला मुद्दाम घडवलेले असतात. त्यांच्यासोबत जाऊन ती जालीम औषधंसुद्धा मॅजिक बुलेट्स बनतात आणि नेमक्या कॅन्सरच्या पेशींना हुडकून मारतात. बाकीच्या शरीराला फार त्रास होत नाही. हासुद्धा टार्गेटेड ड्रग डिलिव्हरीचाच प्रकार आहे

सध्या तशा टार्गेटेड डिलिव्हरीवर मोठं काम चालू आहे. आता प्रत्येकच आजारासाठी जर तशी खास बेतलेल्या हातांची औषधं बनवता आली तर सगळ्या गोळ्यांना खरंच कळेल, नेमकं कुठे पोचायचं ते. मग औषधं चुकता योग्य ठिकाणी पोचून बिनबोभाट काम करतील. त्यांच्या नको त्या ठिकाणच्या उचापती टळतील. सगळी औषधं आखूडदोषी बहुगुणी बनतील

डॉ. उज्ज्वला दळवी


                        ***

My Cart
Empty Cart

Loading...