Menu

दीपत्कार ! चमत्कार !

image By Wayam Magazine 08 November 2023

दिव्या दिव्या दीपत्कार, 
कानी कुंडल मोती हार

मुलांनो, हा श्लोक तर तुम्हांला माहीत असेल ना! दिवा म्हणजे तेजाचे, मांगल्याचे प्रतीक. अंधाराकडून उजेडाकडे नेणारा तेजस्वी किरण म्हणजे दिवा. आजही तुमच्या-आमच्या घरात सायंकाळी देवापुढे किंवा तुळशीसमोर दिवा लावला जातो. तिन्हीसांज सरताच घर, आवार, जिने, रस्ते दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतात. 

दिवे कितीतरी प्रकारचे असतात. पारंपरिक, आधुनिक अशा ७०० हून अधिक प्रकारच्या दिव्यांचा संग्रह करण्याचा विक्रम, अंधेरीतील मकरंद करंदीकर यांनी केला आहे. त्यांच्या या दिव्यांच्या विक्रमाविषयी जाणून घेण्याची, अनेक दिवे पाहण्याची संधी मला मिळाली. विजयनगर सोसायटी अंधेरी येथील मकरंद करंदीकर यांच्या घरात प्रवेश करताच दिव्यांनी भरलेली मोठाली दोन कपाटे दिसली. ते पाहून मी दिव्यांच्या संग्रहालयात आले आहे, असंच मला वाटलं. हे एवढे दिवे पाहतक्षणी मनात अनेक प्रश्न पडले. सुरुवातीलाच मी काकांना विचारलं- “हा छंद तुम्हांला कसा जडला ?” त्यावर मकरंद काका म्हणाले, “आपल्याकडे गटारी अमावास्या म्हणतात, ती खरंतर दिव्यांची अवस (अमावास्या). यानंतर चातुर्मास सुरू होतो. अनेक सणवार सुरू होतात. यापूर्वी घरातील पारंपरिक दिवे काढून ते स्वच्छ करून त्याची पूजा करायची, नंतर हे दिवे वापरायचे, अशी प्रथा हिंदू संस्कृतीत आहे. आमच्या घरात माझ्या लहानपणापासून गटारी अमावास्येला दिव्यांची पूजा होत असे. माझी आजी अनेक वेगवेगळे जुने दिवे काढायची ते पाहिल्यावर खूप आनंद वाटायचा. तेव्हापासून दिव्यांविषयी मनात प्रेम निर्माण झालं. सुरूवातीला दिवे जमवणं कठीण होतं. परवडायचं नाही. पण नोकरीला लागल्यानंतर मी एक-एक करुन वेगवेगळ्या प्रकारचे दिवे जमवायला लागलो.” मग मी विचारलं की ह्या दिव्यांचे प्रकार किती आहेत, कोणते आहेत आणि हे दिवे कशापासून बनवितात?  त्यावर मकरंद काका म्हणाले की ,  दिव्यांचे प्रामुख्याने चार प्रकार आहेत. 

१. अचल किंवा स्थापित दीप उदा. समई. ही आपण एकदा देवासमोर लावली की हलवत नाही. 

२. छोटे चल दीप- उदा. ओवाळण्यासाठी, आरती करतांना वापरले जाणारे निरांजन, पंचारती इत्यादी. 

३. टांगलेले दिवे- उदा. लामण दिवा, नंदादीप, राजेशाही झुंबर इत्यादी. 

४. भिंतीवर लावण्याचे दिवे- मातीचे, चीनी मातीचे व धातूचे दिवे प्रामुख्याने या प्रकारात पाहायला मिळतात. 

टांगलेल्या दिव्यांमुळे जास्त प्रकाश पडतो आणि या प्रकारात अनेकविध सुंदर दिवे पहायला मिळतात. तसेच गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये नानाविध दिव्यांची एक परंपराच पहायला मिळते. यामध्ये विविध कलात्मक आकार, रचना पाहण्यासारख्या असतात. पितळ, तांबे, चांदी, दगड, माती, लाकूड इत्यादी गोष्टी दिवे बनविण्यासाठी प्रामुख्याने वापरल्या जातात. त्याचप्रमाणे गरुड, मोर व पोपट हे पक्षी तर गाय, बैल, उंदीर, कासव, नाग इत्यादी आकार दिवे बनविण्यासाठी प्रामुख्याने वापरले जातात. काही प्रसंगी तर पीठाचे दिवे बनविण्याची पद्धतही आहे. मकरंद काकांकडे ह्या सर्व प्रकारचे दिवे आहेत बरं. 

त्यांच्याकडील दिवे पाहताना एक वेगळाच दिवा माझ्या नजरेस पडला तो म्हणजे उंदीरमामा गाडीवरून गणपतीला घेऊन जात आहेत आणि पुढे त्याला दिव्याचा आकार. मी विचारलं की हा दिवा आहे का ? त्यावर काका म्हणाले असे आकर्षक, कल्पक, नाविन्यपूर्ण असे अनेक दिवे आहेत. गणपतीचे वाहन उंदीर आणि उंदराला रात्री गाडी चालवताना दिसावं म्हणून हा समोर हेडलाईट म्हणून दिवा. किती मजेशीर दिवा आहे ना. असे अनेक नाविन्यपूर्ण दिवे दाखविण्यास काकांनी सुरुवात केली. त्यात त्यांनी प्रथम 'विष परीक्षा दीप' दाखवला. पूर्वी म्हणे राजावर अन्नातून विषप्रयोग केले जाण्याची दाट शक्यता असायची. म्हणून समईच्या आकाराच्या या दिव्यावर अन्नपदार्थ धरल्यावर ते अन्न जर विषयुक्त असेल तर दिव्याच्या ज्योतीचा रंग पालटत असे. त्यामुळे अन्नात विष आहे की नाही हे कळायचे. असा हा दीप शिवाजी महाराज आणि माधवराव पेशव्यांच्या दरबारात होता. त्यानंतर त्यांनी केरळमधला एकोणिसाव्या शतकातला ‘गुरु-शिष्य’ दीप दाखविला. यात एका समईला खाली एक आणि वितभर उंचीवर दुसरा असे दोन दिवे असतात. यातील वरचा दिवा म्हणजे गुरु आणि खालचा दिवा म्हणजे शिष्य. थोडक्यात गुरु-शिष्य परंपरेचे तत्कालीन दर्शन घडविणारा हा आगळाच दिवा होता. 

यानंतर पाहिला तो विज्ञानावर आधारलेला दिवा. याला हम्फ्रे डेव्हीचा ‘संरक्षक दीप’ म्हणतात. पूर्वी खाणीमध्ये काम करताना सतत स्फोट व्हायचे, असंख्य खाणकामगारांचा जीव जायचा. परंतु या दिव्यामुळे अनेक खाणकामगारांचे प्राण वाचण्यास मदत झाली. हा दिवा खाणीत उतरण्याअगोदर खाणीमध्ये सोडला जायचा. दिवा विझला तर खाण धोकादायक आहे आणि दिवा पेटत राहिला तर खाणीमध्ये काम करण्यास धोका नाही. अशा प्रकारचा हा संरक्षक दीप. त्यांनी मला ज्यू लोकांच्या संस्कृतीतील 'मेनोरा' नावाचा दिवा दाखवला. सात ज्योतींचा हा दिवा असतो. आपल्याकडे निरांजन, पणती, समई कशी पवित्र मानतात तसा हा ज्यू लोकांमध्ये पवित्र दिवा मानला जातो. नंतर माझी नजर ‘अल्लाउद्दिन’च्या जादूच्या दिव्यावर गेली. हा दिवा आजही सर्वांना हवाहवासा वाटतो. 

यानंतर त्यांनी ज्ञानदीप, दिशा दाखविणारा दीपगृहातील दिवा, उलट-सुलट फिरवूनही जमिनीला समांतर राहणारा ‘कंदुक दीप’, दिवे पेटवल्यावर भिंतीवर छाया पडणारा ‘छायादीप’, वेगवेगळ्या आकारचे दिवे, समई, दीपमाळ असे त्यांच्या संग्रही असलेले अनेक दिवे दाखविले. 

त्याचबरोबर पेशव्यांची एक गमतीदार आठवणही मला सांगितली की, उत्तररात्री पेशवे बुद्धिबळ खेळत होते, खेळ रंगत आला होता आणि त्याचवेळी दिव्यातील तेल संपले. यावेळी पेशव्यांनी अन्य कोणतेच तेल उपलब्ध नसल्याने चक्क सुगंधी अत्तर दिव्यात ओतून दिवे पेटवले. अशा सुगंधी प्रकाशात त्यांनी आपला खेळ पूर्ण केला. असे सुगंधी दिवेही पाहता आले. हे पाहत असताना, जाणून घेत असताना मी त्यांना विचारलं की, धर्मानुसार-जातीनुसार-कार्यानुसार दिवे बदलतात का ? त्यावर काका म्हणाले, नक्कीच. प्रत्येक धर्मात दिवे आहेत, फक्त त्यांचे प्रकार, आकार आणि पद्धती वेगळ्या आहेत. आपल्या धर्मात आपण मातीचे, धातूचे दिवे लावतो, ख्रिश्चन धर्मात मेणबत्त्या लावतात. तसेच कार्यानुसार दिवेही बदललात. पवित्र प्रसंगी आपण भरपूर दिवे लावतो तर वाईट प्रसंगी एक वात लावतो. त्यामुळे जाती-धर्म-कार्यानुसार दिवे बदलतात. 

दिव्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांना धर्म, साहित्य, काव्य-शेरोशायरी, शौर्य, शृंगार, विज्ञान, अध्यात्म अशा सर्व प्रांतात महत्त्वाचे स्थान आहे. पुढे मी त्यांना विचारलं की, काका नाणी, तिकिटे, फोटो जमविण्याचा छंद असणाऱ्या लोकांचे क्लब असतात तसे दिवे जमविण्याचा छंद असणाऱ्या लोकांचा क्लब आहे का ? आणि आपापसात तुम्ही दिव्यांची देवाण-घेवाण करता का ? त्यावर काकांनी आपले अनेक मजेशीर आणि माहितीपूर्ण अनुभव सांगितले. ते म्हणाले की, दिवे जमविण्याचा छंद असणाऱ्या लोकांचा क्लब नाही, परंतु पुण्याच्या केळकर संग्रहालयाशी मात्र मी जोडलेला आहे. तिथे वेगळे दिवे दिसले की मी पाहायला जातो, काही दिवे विकत घेतो, काही माझाकडचे दिवे मी देतो. माझा हा छंद जोपासण्यासाठी मला या केळकर संग्रहालयाची मोठी साथ मिळाली आहे. आता माझी प्रसिद्धी बरेच ठिकाणी असल्याने काही व्यक्ती माझ्याकडे वेगळ्या प्रकारचे दिवे संग्रही रहावे म्हणून आणून देतात. तर भंगारवाले मला फोन करून कळवतात की आमच्याकडे मोठे दिवे आले आहेत, मग मी जाऊन ते दिवे पाहतो आणि घेऊन येतो. 

दिवे जमा करताना काय काय अनुभव आले त्याचे काही किस्से त्यांनी ऐकवले. त्यांनी मला एक चित्तथरारक अनुभव सांगितला- 

एकदा हे काका मुंबईत सात रस्ता येथे ज्यू लोकांचा ‘मेनोरा’ प्रकारचा दिवा घेण्यासाठी ज्यू मंदिरात गेले होते. ज्यू लोकांच्या मंदिराला सिनेगॉग म्हणतात. तेथे हे काका पुजार्याला जाऊन भेटले. काकांनी त्यांना दिवा देण्याची विनंती केली. त्यावर त्या पुजार्याने गप्पा मारायला सुरुवात केली. बराच वेळ झाला. त्यांच्या गप्पा काही संपेनात. काकांना दिवा मिळून ते कधी जातात असं झालं होतं. पण करणार काय, दिवा मिळेपर्यंत चुपचाप बसण्याशिवाय पर्याय नव्हता. बऱ्याच वेळाने काका दिवा घेऊन घरी जायला निघाले. महालक्ष्मी स्टेशनला येऊन ट्रेनमध्ये बसले आणि थोड पुढे गेल्यावर ट्रेन बराच वेळ थांबली. तेव्हा असं कळलं की या आधीच्या ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाल्यामुळे ट्रेन वाहतूक मंद गतीने चालू होती. काकांना तेव्हा वाटले की, बरं झालं की ते पुजारी गप्पा मारत बसले ते! या छदामुळे त्यांचे प्राण वाचले म्हणायचे!! 

त्यांनी मला दिव्यांच्या संदर्भातील एक हृदयस्पर्शी अनुभवसुद्धा सांगितला. एकदा अंधेरीतील एक वयस्कर आजोबा त्यांच्याकडील परंपरागत दिवा घेऊन काकांकडे आले. त्या दिव्यावर म्हणे ते आजोबा मुलीसारखं प्रेम करत. आपल्यानंतर हा दिवा सुखरूप राहावा, म्हणून ते काकांकडे आले होते. काकांना त्यांनी त्या दिव्याविषयी सांगितलं, आणि ते आजोबा काकांना म्हणाले, ‘ही माझी मुलगी मी तुला देतोय, तिचा तू नीट सांभाळ कर. मला खात्री आहे हा दिवा तुझ्याकडे नीट राहील.’ त्या आजोबांचा विश्वास पाहून काकांना खूप बरं वाटलं. त्यांच्या या छंदामुळे अनेक गोष्टी काकांना अनुभवता आल्या, अनेक माणसं जोडता आली. 

मजा म्हणजे या काकांना दिव्यांशिवाय अजूनही बरेच छंद आहेत, बरं का! पुरातन काळातल्या विविध वस्तू, वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांच्या वाती आणि पोस्टाची तिकिटे जमविणे, असे बरेच छंद त्यांना आहेत. 

दिव्यांची ही दुनिया फारच मनमोहक आहे. विजेच्या दिव्यांच्या झगमगाटापुढे पारंपरिक दिव्यांचे महत्त्व कमी झाले आहे. परंतु मकरंद काकांचा हा संग्रह पाहता आजही पारंपरिक दिवे तेवत आहेत, हे पाहून खूप आनंद वाटला. तांबे, पितळ, चांदी याचबरोबर जर्मन सिल्व्हर, चीनी माती, काच, लाकूड, लोखंड, कागदाचा लगदा, पंचधातू, अल्युमिनियम, कासे अशा अनेक धातूंचे, प्रकारचे दिवे त्यांच्याकडे पाहताना अजब वाटत होत. छोट्याशा पणतीपासून ते मोठया माणसाच्या उंचीइतके दिवे त्यांच्याकडे पाहायला मिळतात. ७०० हून अधिक दिवे त्यांच्याकडे आहेत. याची दखल लिम्का बुक रेकोर्डने घेतली आहे. 

`भारतीय पारंपरिक दिव्यांचा संपूर्ण भारतातील विक्रमी संग्रह’ अशी नोंद ‘लिम्का बुक’ने केली आहे. अशा तऱ्हेने आपले पारंपारिक दिवे लिम्का बुक रेकॉर्ड मध्ये तेवले त्यांच्या संग्रहाची प्रदर्शने अधूनमधून असतात, तेव्हा जरूर भेट द्या.  त्यांच्या दूरध्वनीवर संपर्क साधून, त्यांना भेटून त्यांच्या दिव्यांच्या जगात जाऊन या. आणि तेजस्वी अनुभव घ्या!  

-क्रांती गोडबोले-पाटील 

***

My Cart
Empty Cart

Loading...