इचलकरंजीच्या प्रथमेश दाते याला राष्ट्रपतींकडून केंद्रीय ‘सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालया’चा ‘राष्ट्रीय दिव्यांग रोल मॉडेल’ पुरस्कार मिळाला. राष्ट्रपतींकडून पुरस्कार घेण्याची ही त्याची तिसरी वेळ होती. प्रथमेश दाते याचं कर्तृत्व जाणून घेऊ या.
खरं तर जन्माला येताना ह्या प्रथमेशवर खूप अन्याय झाला होता. खूप अशक्त, विळविळीत मांसाचा गोळा होता तो! राठ केस, बुद्धी कमी असलेला हा मंगोलबेबी. बाळ असताना त्याला कापूस दुधात भिजवून त्यातलं दूध थेंबाथेंबाने पाजावं लागे, तेव्हा कुठे चमचाभर दूध पोटात जाई. एक ग्रॅम वजन वाढलं तरी खूप समाधान वाटायचं त्याच्या पालकांना. शेजारचे त्याच्या आईला म्हणत, ‘डाऊन सिंड्रोम, मतिमंद असलेल्या अशा या बाळाला जगवता तरी कशाला?’
मग आईला खूप दु:ख वाटायचं, रडू यायचं.
आईबाबांनी ठरवलं की आपण याच्या जगण्यासाठी खूप प्रयत्न करायचे, मागे हटायचं नाही.
छोट्या वयात त्याला अनेकदा डॉक्टरकडे न्यावं लागलं, तेही इचलकरंजीहून पुण्याला. कमकुवत हाडं, नाजूक प्रकृती त्यामुळे खूप वेळा शस्त्रक्रियाही झाल्या. पण शरीराला ताठपणा येत नव्हता. जे कोणी सांगतील ते प्रयत्न आईबाबा करायचे. पाठीच्या कण्याच्या ताठपणासाठी लाकडी खोक्यात त्याचे पाय अडकवून त्याला खांबाला बांधून ठेवत. छोटा प्रथमेश सुटकेसाठी जिवाच्या आकांतानं रडायचा. मनावर दगड ठेवून आईबाबांना हे करावं लागायचं. शिवाय नीट बोलण्यासाठी स्पीच थेरपी, जिभेचे व्यायाम... अगदी संस्कृतची शिकवणीही सुरू केली.
सर्वसामान्य मुलांसारखा प्रथमेशही शाळेत गेला. सुरुवातीला तो वर्गात खूप मुलं पाहिली की गांगरून जायचा. कुणी मोठ्यानं बोललं किंवा वेगवगळे रंग पाहिले तरी त्याला भीती वाटायची, आणि घाबरून त्याची चड्डी ओली व्हायची. त्याची आई वर्गाबाहेरच बसून राहायची. वर्गातून हाक आली की जमीन स्वच्छ करून त्याची चड्डी बदलायची. दिवसभरात डझनभर तरी चड्ड्या शाळेच्या कुंपणावर वाळत पडायच्या. आईची ही तपश्चर्या वर्षभर चालली नि कसंबसं त्याचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं.
पुढे माध्यमिक शाळेत आणखी खडतर काळ होता. प्रथमेश अशक्त आणि प्रत्येक अवयवात दोष, त्याचे पाय सपाट असल्यामुळे त्याला कवायत नीट येत नाही, म्हणून एकदा शिक्षकांनी मारलंदेखील! त्याचं दिसणं, वागणं वेगळं असल्यानं मुलं चेष्टा करायची, कोणी त्याला चिमटे काढायचे, कोणी केस ओढायचे, कधीतरी कोणी खट्याळ मुलं त्याचा डबासुद्धा मातीत फेकून देत. कुणीही यावं आणि याला त्रास द्यावा, असं वातावरणही त्याला अनुभवायला मिळालं. अशा वेळी प्रथमेशला घायाळ झालेलं पाहून आईबाबा खूप दुःखी होत.
तरी त्या छोटया वयात प्रथमेशला आईबाबांनी काय-काय शिकवलं सांगू?- तबला, पेटी, बासरी, सायकल, चित्रकला, क्रिकेट, लेझीम, बुद्धिबळ, अभिनय, संगणक नि खूप काही. शिवाय स्वावलंबनासाठी पांघरुणाची घडी घालणं, बूटपॉलिश, चहा करणं, कूकर लावणं अशा अनेक गोष्टी प्रथमेशला शिकवल्या. केवळ शिकवून त्याला पुरायचं नाही, सरावपण करून घ्यावा लागे.
संगणकावर डीटीपी करता येत असल्यामुळे त्याला एका दैनिकात नोकरी लागली. मात्र रात्रपाळीचं काम असल्याने त्याला ते झेपेना. मग ‘आयुका’च्या उच्चाधिकाऱ्यांनी ग्रंथालयाचं सोपं सोफ्टवेअर प्रथमेशला शिकवलं आणि मग त्याचे दिवस बदलले.
इचलकरंजीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या D.K.T.E. संस्थेच्या टेक्स्टाइल इंजिनिअरींग कॉलेजमध्ये ‘ग्रंथपाल-साहाय्यक’ म्हणून प्रथमेशला नोकरी मिळाली. पुस्तकाच्या नोंदी, देवाण-घेवाण, लेट-फी हे सर्व कामं प्रथमेश करतो.
गेली १३ वर्ष तो ही नोकरी करत आहे. वाचनाच्या वेळेत प्राध्यापक ग्रंथालयात यायला विसरले तर त्यांना आठवण करून द्यायचं काम प्रथमेशचं असतं. मुलाचं बौद्धिक दिव्यांगत्व आईबाबांनी स्वीकारून त्याला घडवण्यासाठी खूप कष्ट केले आणि ते सार्थकी लागले. २०१०साली त्याला ‘दिव्यांग असूनही कर्तबगार’ म्हणून पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे अनेक सन्मान मिळत गेले.
एकत्र कुटुंबात राहणारा प्रथमेश, काका, चुलत भावंडं, त्यांची बाळं या सर्वांवर प्रेम करतो. तसेच विचार सात्त्विक असल्यामुळे प्रथमेश दरमहा काही पैसे समाजकार्यासाठी देतो. अगदी आईबाबांसाठी त्याने मोटारही घेतली आहे.
वयाने थकलेले आईबाबा जरा कुठे आनंदाचे क्षण अनुभवत असताना आईला कॅन्सरचं निदान झालं. शारीरिक यातनांची भर पडली. सारं सहन करून ती बरी झाली. नंतर त्याच्या आईने घरात दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी समुपदेशन केंद्र सुरू केलं. महाराष्ट्रातल्या विविध भागांतून पालक यायला लागले. त्यांना यांच्या अनुभवाचा फायदा व्हायला लागला. प्रथमेशची प्रगती ऐकून सारे पालक अवाक होतात.
दरवर्षी जगातील डाऊन सिंड्रोम मुलांची व पालकांची आंतरराष्ट्रीय परिषद भरते. २०१२ साली हा मान भारताकडे होता. परिषद चेन्नईला झाली. त्यात २५ देशांचे ४०० प्रतिनिधी होते. तिथे प्रथमेशने सर्व सहभागी अभ्यागतांचे स्वागत केले. सर्वांशी छान संवाद साधला! त्याच्या कार्यकर्तृत्वावर दहा भाषांत मिळून ८० लेख प्रसिद्ध झाले आहेत. २०१२ सालचा आंतराष्ट्रीय ‘डाऊन सिंड्रोम’ पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय.
दरवर्षी भारतातल्या एका मातेला ‘वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता’ म्हणून राष्ट्रपती पुरस्कारानं गौरवलं जातं. २०१९ सालच्या मानकरी होत्या, शारदा यशवंत दाते म्हणजेच प्रथमेशची आई!
‘माझ्याच बाळाबाबत अन्याय का?’ असं सुरुवातीला म्हणणाऱ्या शारदा यशवंत दाते आज अभिमानाने मातृत्व मिरवताना म्हणतात की मला माझ्या प्रश्नाचे उत्तर केव्हाच मिळालंय. “माझ्या सक्षम हातात नियतीनं आपलं नाजूक अपत्य विश्वासानं सोपवलं. आज त्याला म्हणावंसं वाटतं- ‘बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई!”
-शोभा नाखरे
***