मित्रांनो, गुढीपाडवा म्हणजे
चैत्र महिन्याचा पहिला दिवस. वसंतऋतूची सुरुवात. बघता बघता आता आपल्या भोवतालची
लहान-मोठी झाडं-झुडपं-वेली एकदम नवीनच दिसायला लागतील. हिरव्यागार तेजानं चमकायला
लागतील. आपल्याबरोबर सारा भवताल सुंदर करून टाकणा ऱ्या निसर्गाचा आल्हाददायक उत्सवच सुरू होईल. तो महोत्सव प्रसन्नतेचा
शिडकावा करत राहणारा आणि त्यामध्ये सा र्यांना चिंब करून टाकणारा असतो...
वातावरण असं छान होत असतानाच उन्हं
तापायला लागतात. रानातल्या करवंदांना इवलाली करवंदं धरलेली दिसायला लागतात.
नव्यानं आलेल्या हिरव्यागार पानांमुळं पळस देखणा दिसायला लागतो. आंब्याच्या
झाडांची ऐट तर काय विचारायलाच नको, अशी होऊन जाते. हे सगळं होत असतानाच
पौर्णिमा येते. चैत्र महिन्यातल्या या पौर्णिमेलाच हनुमान जयंती असते. हनुमानाच्या
जन्माचा उत्सव अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. विशेषतः ठाणे, रायगड आणि
रत्नागिरी या तीन जिल्ह्यांत हा उत्सव दणक्यात होतो. या उत्सवाची ओढ आताच्या
काळातसुद्धा लागते, कारण त्या निमित्तानं वर्षभर न दिसणा र्यांच्या भेटी
होतात. वर्षभर दृष्टीसही न पडणारे आपले भाऊ आणि बहिणी, मित्र आणि
मैत्रिणी, ओळखीपाळखीचे असे सारेच भेटतात. आणि मग भरपूर गप्पाटप्पा होतात.
हास्य-विनोदाला पूर येतो. चेष्टा-मस्करीला ऊत येतो. टिंगलटवाळीला तर सीमाच राहात
नाही. मीसुद्धा माझ्या आजोळी, म्हणजे शिरढोणला, जातो. पनवेल
तालुक्यातलं हे शिरढोण म्हणजे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं गाव.
त्या गावात फडक्यांचा वाडा होता. अलीकडच्या काळात तो जीर्ण झालेला वाडा सरकारनं
ताब्यात घेतला आणि एकेकाळी तो जसा होता, तसाच्या तसा पुन्हा बांधला. माझ्या
डोळ्यांसमोर मात्र तो जुनाच वाडा येतो. त्या वाड्यात लहानपणी आम्ही सगळेच खेळायचो. हुंदडायचो. बागडायचो. गावात फडक्यांचं स्मारकही
आहे. त्या स्मारकात वासुदेव बळवंतांच्या आजोबांना वासुदेवांना दिलेली बोकडाची गाडी
अजूनही ठेवलेली आहे.
स्मारकपासून हाकेच्या अंतरावर दोन
देवळं आहेत. त्यातलं पहिलं देऊळ वाघोबाचं आणि त्यानंतरचं मारुतीचं. मारुतीच्या
देवळात मुख्य मूर्ती हनुमानाची. हातात खंजिर असलेला हा वीर मारुती आहे. त्याच्या
शेजारी शंकराची पिंडी आहे. हनुमानाच्या पुढे, आपल्या उजव्या
अंगाला, गणेशाची मूर्ती आहे. या देवळात हनुमान जयंतीचा उत्सव होतो. पाच
दिवस चालणा र्या या उत्सवाला गावातल्या लोकांचे अनेक नातलग आवर्जून येतात.
शेजारच्या चिंचवण वगैरे गावांतही हनुमान जयंतीचा उत्सव दणक्यात होतो. पनवेलमध्येही
तो होतोच. पनवेल शहराची हद्द संपता संपता असणा र्या पंचमुखी मारुतीच्या देवळात तर अलोट गर्दी जमते. हमरस्त्यावरच्या
वाहनांची कोंडी होईल इतक्या मोठ्या संख्येनं तिथं लोक जमतात. शिरढोणलाही अशीच
गर्दी जमते, ती गावातल्या लोकांच्या नातलगांची. उन्हाच्या वाढत्या झळांना दाद न
देता ही सारी मंडळी पाच दिवस चालणा र्या कीर्तनाचा आनंद घेतात. तो घेत असताना तळ्याकाठच्या देवळात
भावभक्तीचा जसा काही पूर उसळतो.
असाच पूर महाराष्ट्रातल्या अनेक
गावांमध्ये उसळतो. कोकणात तर त्या भक्तीचा महापूर येतो. चैत्रपौर्णिमेच्या दिवशी
सूर्योदयालाच हनुमानाचा जन्म झाला, असं मानलं जातं. त्यामुळं त्या दिवशी
भल्या पहाटे सारेजण आंघोळी करून मंदिरात जमतात. तिथं हनुमानाच्या जन्माचं कीर्तन
चालू असतं. बरोबर सूर्योदयाच्या क्षणाला ते टिपेला पोचतं. हनुमानाचा जन्म होतो.
कीर्तनकाराच्या स्वराला आनंदाची किनार लाभते. मंदिरात आणि बाहेर जमलेल्या लोकांचे
चेहरे आनंदानं फुलून जातात. आपल्याच घरात बाळ
जन्माला आल्यानंतर व्हावा तसा आनंद आणि उत्साह प्रत्येकाच्या चेह र्यावर दिसायला
लागतो. मात्र बलाढ्य, धाडसी, धोरणी, सत्वशील, ज्ञानी हनुमानाच्या जन्माचा असा
नुसताच आनंद मानू नये, तर या दिवशी
प्रत्येकानं भल्या पहाटे उठून आंघोळ करून घरी किंवा मंदिरात हनुमानाची पूजा करावी, अशी पद्धत आहे. ती
पद्धत सर्वच गावांमध्ये आजही पाळली जाते. तशी ती पाळताना
‘नीती, सद्गुण, भक्ति, विक्रम, दया यांहीं
विभूषीत जो।
रुद्राचा अवतार ज्यासि म्हणती
श्रीमारुती वंदु तो।।
दावोनी सुपथा मनीं उपजवो सत्प्रेम
रामापदीं।
धीराचा पुतळा प्रतापि हनुमान स्थापूं
तयातें हृदीं।।’
असं मारुतीस्तवनात सांगितलेलं ध्यानी
ठेवावंच, असं लहान मुलांना सांगितलं जातं. याचं कारण मारुतीच्या एकंदर
जीवनाकडं पाहिलं तर असं लक्षात येतं की, मारुती हा कोणत्याही प्रसंगी न
डगमगणारा सेनानायक होता. त्याचा शब्द सर्व सेना मानत असे. राक्षसांच्या नगरात
जायचं आणि तिथली सारी माहिती काढून आणायची असं अत्यंत कठीण काम त्यानं फार सहजपणं
केलं. रावणाच्या सामर्थ्याचा अंदाज त्यानं बांधला आणि त्याला जेरीस कसं आणता येईल
याबाबत रामाला काही गोष्टी सुचविल्या. रावणाच्या राज्यात जाऊन त्यानं तिथल्या
एकंदर व्यवस्थेचं बारकाईनं निरीक्षण केलं होतंच, पण रावणाच्या
सवभावाचंही अवलोकन केलं होतं, असं दिसतं. एके ठिकाणी मारुती म्हणतो, ‘रावण जर सदाचारानं वागला असता, तर त्याला
राज्यावरून दूर करण्याचं काहीच कारण नव्हतं. उलट त्याचा तो स्वतंत्र राहिला असता
आणि दीर्घकाळ त्यानं राज्याचा उपभोग घेतला असता!’ या त्याच्या
बोलण्यावरून मारुती हा राजनीतिज्ज्ञ होता, असं काही
अभ्यासकांचं म्हणणं आहे. मारुतीचं भाषाज्ञान आणि अचूक व्याकरणानुरूप शब्दयोजना
लक्षात आल्यावर राम चकित झाला असल्याचं रामायणात म्हटलं आहे, हे आपण विसरता
कामा नये.
मारुती हा वानर जातीचा होता. ही वानर
जमात म्हणजे माणसंच होती. ती सात्त्विक वृत्तीची होती. त्यांच्यातील अनेक प्रमुख
नेत्यांचे विचार उदात्त होते, असं सांगणा र्या काही अभ्यासकांच्या मते हे वानर म्हणजे भारताचे मूळचे रहिवासी
असावेत. मात्र त्यांची पोषाख करण्याची आणि आपलं तोंड रंगविण्याची पद्धत, हूड स्वभाव, व्रात्यपणाचं
वागणं यावरून त्यांना ‘वानर’ असं नाव दिलं
असावं. अमेरिकेतील मूळ रहिवासी रेडइंडियन्स पशु-पक्ष्यांसारखे कवच धारण करीत आणि
वेगवेगळ्या रंगांनी आपली शरीरं रंगवित असत. त्याप्रमाणं वानरांमध्ये वानर, अस्वल, पक्षी
यांच्यासारखे पोषाख घालण्याची पद्धत असावी. जटायू हा असाच पक्ष्याप्रमाणं पंख व पिसं लावून घेत असला पाहिजे, असं हे अभ्यासक
म्हणतात. मारुती हा अशा ‘वानर’ या जमातीतला होता, असा विचार केला तर
सार्याच गोष्टींतले अर्थ उलगडू लागतात.
आजच्या काळात मारुतीच्या स्तवनातील ‘भीती, कष्ट न ज्यासि
जिंकु शकले तो वंदु या मारुती।... विद्या, ब़द्धि, सुनीती यांहिं
नटला श्रीरामलाभामुळें।... चित्ती ध्येय सदैव श्रेष्ठ असतां सत्कार्य हातीं घडे।
साधूठायिं जडे सुभक्ति पदही सन्मार्गिं नेमे पडे।’ या ओळी कायम
लक्षात ठेवाव्यात अशाच आहेत. मारुतीच्या जन्माचा उत्सव साजरा करताना त्याच्यासारखी
साहसी वृत्ती, प्रखर बुद्धी, सत्यनिष्ठ स्वभाव आणि भक्कम
शरीरसंपदा या गुणांना आपलंसं करण्याचा आपण प्रयत्न करू या.
-श्रीराम शिधये
***