Menu

छोटीशी चूक - मराठी मासिकातली कथा

image By Wayam Magazine 07 October 2022

सोलापूरहून मुंबईला चाललो होतो. पहाटे पावणे पाच वाजता बस कुठल्याशा गावाजवळ थांबली. पहाटेची वेळ. मस्त गारेगार थंडी. कानाभोवती मफलर आवळून आम्ही पाच सहा माणसंच खाली उतरलो. दोन्ही हात खिशात घालून आणि अंग आखडून आम्ही इकडे तिकडे पाहात होतो.

सगळ्यांना हवा होता गरमागरम चहा.

जवळच्याच एका चहाच्या टपरीला नुकतीच जाग येत होती. मालक उठला होता. पाणी भरत होता. त्याचवेळी त्याची स्टोव्ह पेटविण्याची खटपट पण सुरू होती. आम्ही सगळे यंत्रवत सरकत त्या टपरी जवळ गेलो. त्या स्टोव्हच्या आवाजानेच आम्हाला चहाचा कप डोळ्यासमोर दिसू लागला होता.

नकळत सगळे एकदम ओरडले,“चहा।़।़ह्ण

तो मालक आमच्यावर खेंकसून म्हणाला, “थांबा. अजून पूजा जाली नाय,आनी सगले कशाला वरडताय चा।़।़ चा? तेला टैम हाय!ह्ण तो आमच्यावर चांगलाच डाफरला!

सकाळी-सकाळी वाद नको म्हणून आम्ही गप्प बसलो. (खरं सांगायचं तर, आम्हाला चहा हवा होता म्हणून आम्ही गफ्प बसलो.) मालकराव आमच्याकडे पाहात,रागाने डोळे फिरवत काहीतरी पुटपुटत होता. हात पाण्यात बुडवत त्याने आम्हाला काहीतरी खूण केली.

‘चक्रमच दिसतोय’ असं मनात म्हणत आम्ही चार पावलं जरा मागेच सरकलो. आमच्यातल्या एकाने ग्लासभर पाणी घेतलं आणि तिथेच उभं राहून तोंडावर फसाफसा मारलं. हे पाहून दुसऱयाने पण पाणी घेतलं, तोंडात खुळखूळवलं आणि आता तो तरतरून चूळ टाकणार.... इतक्यात,मालकराव पुन्हा तडतडले, “ओ सायेब इथे पाणी टाकू नका. दिसत नाय काय? लहान पोर झोपलंय इथं!! तुमा जंटलमन लोकांची पन कमाल हाय हां!ह्ण

चूळ टाकणाऱयाने घाबरुन,तोंडातलं पाणी बक्कन गिळूनच टाकलं! आम्ही सगळ्यांनी दचकून,अंधारात डोळे फाडून पाहिलं.

खरंच की! काळं-किट्ट गोणपाट पांघरुन एक मुलगा झोपला होता. मालकराव त्या मुलाजवळ गेले. अतिशय प्रेमळपणे म्हणाले, “ऊठ बाळ. पाच वाजायला आले. एव्हढा चा जाल की तुझं आंघोळीचं पाणी ठेवतो.ह्ण

मुलगा टुणकन उठला. घाबरुन इकडे तिकडे पाहिलं. गोणपाटाची घडी करुन त्याने टपरीच्या टपावर ठेवली.

मला गंमत वाटली. आमच्यावर डाफरणारा,खेंकसणारा हा मालकराव त्या मुलाशी मात्र अगदी प्रेमाने बोलत होता! शक्यतो असं होत नाही. ‘खेंकसू’ माणसं सगळ्यांवरच नेहमी खेंकसत असतात. सदोदितच ती तापलेली असतात.

कोण असेल हा मुलगा? मालकराव त्याच्याशी इतक्या प्रेमाने का वागतात? हा त्यांचाच मुलगा असेल का? नाहीतर हा त्यांचा कुणी नातेवाईक असेल का? हा शाळेत जात असेल का? असे वेगवेगळे प्रश्न माझ्या डोक्यात फिरु लागले. माझी बेचैनी वाढली. या प्रश्नांची उत्तरं शोधायचीच असं मी पक्कं ठरवलं. यावर उपाय एकच.

मालकरावांच्या नकळत,ह्या मुलाशी बोललं पाहिजे. त्याच्याशी गफ्पा मारल्या पाहिजेत.

त्या मुलाचे कपडे चांगले-बिंगले होते. निळी टेरिलीनची पॅण्ट आणि पिवळा शर्ट. लग्ना-बिग्नाला जाताना घालतात ना,तसे कपडे होते त्याचे. पण खूप दिवसात न धुतल्याने जाम मळलेले. शर्टावर काही ठिकाणी चहाचे डाग. बारीक कापलेले केस. तरतरीत नाक. बोलके पण कावरे बावरे डोळे. आणि काहीतरी हरवल्याचा चेहेऱयावर भाव. मी त्याच्या जवळ गेलो. त्याच्या खांद्यावर हात ठेवला..... अचानक भूत पाहिल्यासारखा तो प्रचंड दचकला!! संशयाने तो माझ्याकडे पाहू लागला. त्याच्या शरीरातली भीतिची थरथर माझ्या हाताला जाणवली.

“ बेटा,काय नाव तुझं?ह्ण असं मी विचारताच त्याने चुळबुळ केली. त्याच्या ओठांची हालचाल झाली,पण त्याच्या तोंडून शब्द काही फुटेना. नुकताच झोपून उठलाय. थंडीने गारठला असेल किंवा अजून झोपेत असेल म्हणून चटकन बोलता येत नसेल असं आधी वाटलं मला. पण...... कारण वेगळंच होतं.

इतक्यात मालकराव खेंकसले,“हां।़।़,चा तयार हाय.ह्ण ‘इथे गरमागरम चहा मिळतो’ असं कळल्यावर,सगळेच प्रवासी चहा फ्यायला आले.

तो मुलगा तोंड धुवायला सार्वजनिक नळाकडे निघाला आणि त्याच्या पाठोपाठ मी सुध्दा.

मला पाहताच तो थबकला. मी मोकळेपणाने हसलो. तो कसानुसा हसला! प्रथम तो माझ्याशी अजिबात बोलायला तयार नव्हता. मी खूप काही त्याला विचारत होतो,पण तो फक्त मान हलवून हो,नाही सांगायचा. पण बोलायचा मात्र नाही. मी चिकाटी सोडली नाही. मी त्याच्याशी बोलतच राहिलो. त्याला गमती सांगत राहिलो. नकळत तो गफ्पा अडकला आणि त्याची खरी गोष्ट मला समजली. त्याची बेचैनी मला उमजली. त्याचं नाव दीपक चुंबळे. वय वर्षे अकरा.

दीपकच्या घरची परीस्थिती बरी आहे. चांगली शेती आहे. त्याच्या लहान बहणीचं नाव जना. तो मोठ्या भावाला दादा म्हणतो. घरात त्याची आजी पण असते. वडील शेती करतात. आई शिवणाची लहान-सहान कामं करते.

दीपक म्हणाला,“माझी दादासोबत रोज भांडणं व्हायची. अगदी सतत भांडणं व्हायची. आमच्या त्या भांडणांचा आईला खूप त्रास व्हायचा. आई आम्हाला ओरडायची. मारायची. कधी कधी हात जोडून विनवायची! असह्य झालं तर डोकं गच्चं धरून बसायची. पण त्यामुळे आमची भांडणं काही कमी झाली नाहीत!! भांडायच्या नादात आ़म्ही कधी आईकडे लक्षच दिलं नाही. आज...खूप वाईट वाटतं! आईची माफी मागावी असं वाटतं.....ह्ण

त्याला पुढे बोलताच येईना. त्याच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागलं. त्याला खूप भरुन आलं . त्याला आवंढा गिळताना त्रास व्हायला लागला. त्याला जवळ घेऊन थोपटलं. त्याला मोकळेपणानं रडू दिलं. काही क्षणातंच तो सावरला. त्याने पुन्हा तोंड धुतलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला म्हणालो, “काळजी करू नकोस. मी तुला नक्की मदत करीन. माझ्यावर विश्वास ठेव. मला सांग तू इथे कसा आलास?ह्ण

“सहा दिवस झाले. मी ,जना,दादा आणि आई मामाच्या गावाला जात होतो. जाताना आमची भांडणं मस्ती सुरूच होती. आईचा जीव अगदी मेटाकुटीला आला होता. गावाला जायला आम्ही सर्व बसमधे चढलो. ‘खिडकीत कुणी बसायचं?’ यावरुन आमच्यात खूप भांडण झालं. मी दादाचा शर्ट ओढला. तो टर्रकन फाटला! आई प्रचंड कावली. आम्हा दोघांना धपाटे मारले तरी आमची भांडणं सुरुच! आई कपाळावर हात मारत मला म्हणाली,“चल चालता हो.ह्ण मी रागाच्या भरात चालता झालो. वाट फुटेल तिथे चालत सुटलो. कुठल्याशा बसमधे बसलो. तिकीटासाठी पैसे नव्हते. कंडक्टरने इथे उतरवलं. इथे आलो.

आज...आज मला वाईट वाटतं. आईची आठवण येते.घराची आठवण येते. शाळेची, शाळेतल्या मित्रांची आठवण येते. म..म..माझं चुकलंय ..म..मला माहित्यै....ह्ण “मग घरी का जात नाहीस? मालक सोडत नाही का? तिकिटासाठी पैसे हवेत का?ह्ण

हाताने खूण करुनच त्याने माझं बोलणं थांबवलं. त्याने कसाबसा आवंढा गिळला. शर्टाच्या बाहीला डोळे पुसले आणि मोठ्या कष्टाने म्हणाला, “पण..पण..मला घरी जायला भीती वाटते. लाज वाटते......... मी परत गेलो तर बाबा मला बेदम मारतील. मला चिडवायला,माझ्याशी भांडण करायला दादाला एक नवीनच कारण मिळेल...आणि आमच्या भांडणामुळे माझी आई पुन्हा कावेल! मग छोटी जनासुध्दा माझ्या जवळ येणार नाही.

आईचं ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं?

इथे राहिलो तरी मला सारखी आईचीच आठवण येते हो. मला..मला स्वफ्नात सुध्दा रडणारी,काळजी करणारी आईच दिसते. माझं इथे कशात लक्ष लागत नाही आणि घरी जाण्याची काही हिंमत होत नाही. मी का।़।़य करू? मला काहीच कळत नाही हो.ह्ण दीपक पुढे बोलूच शकला नाही. त्याला खूप दाटून आलं. तो हुंदके देऊ लागला. मी त्याला हलकेच थोपटलं.

अजून दीपक का आला नाही? हे पाहण्यासाठी मालकराव आमच्याबाजूला येताना मी पाहिलं. मी अंधारात मिसळलो. चहा न पिताच बस मधे चढलो. माझी पिशवी घेऊन खाली उतरलो.

घरी फोन करून माझ्या मुलीला सांगितलं, “रागावू नकोस,पण महत्वाच्या कामामुळे मला घरी यायला एक दिवस ऊशीर होईल.ह्ण यायला उशीर होईल म्हंटल्यावर तिने थोडीशी कुरकुर केली खरी,पण मला खात्री होती,जेव्हा मी तिला ही गोष्ट सांगेन तेव्हा उशीरा आल्याबद्दल ती मला रागावणार तर नाहीच पण तिला खूप आनंद होईल!! मी घरी फोन केला खरा,पण ह्या गोष्टीचा नेमका काय शेवट होणार आहे? हे मला त्यावेळी तरी कुठे माहित होतं?

संध्याकाळी एकलपूरला मी दीपकच्या घरी गेलो.

आई,ताई,दादा,बाबा सगळेच काळजीत! आजीबाई जपमाळ घेऊन बसलेल्या. एक विचित्र शांतता घरभर पसरलेली. सगळ्यांचेच चेहरे काळजीने,चिंतेने ओढलेले. सगळेच शून्यात नजर लावून बसलेले. कुणीच कुणाकडे पाहात नाही. ह्याला अपवाद फक्त छोटी जना. भाऊ कुठे गेला? का गेला? हे तिला कुणी सांगितलंच नव्हतं. (आणि त्या छोट्याशा मुलीला सांगणार तरी काय?)

मला दारात पाहाताच बाबांचे डोळे मोठे झाले! भुवया वर झाल्या! बहुधा त्यांना वाटलं असावं, पोलीसातला माणूस आला असावा. दादा,ताई आई जवळ सरकले. आई डोळ्याला सारखा पदर लावत होती. आजीची जपमाळ थांबली.

मी दोन-तीन मिनीटं काही बोललोच नाही! एकदम शांत!! माझ्या शांततेमुळे सगळेच अस्वस्थ!! मी हसून म्हणालो,“मी दीपकचा मित्र! दीपकचा निरोप घेऊन आलोय.ह्ण एका क्षणात घरातलं वातावरण बदललं! बाजूल्या बसलेल्या मुलांना ढकलून,शॉक लागल्यासारखी आई उठली. धडपडत आजीबाई उठल्या. बाबा जवळ आले. सर्वांचा एकच प्रश्न, “आमचा दीपक कुठाय?ह्ण “दीपक कुठाय? हे सांगायलाच तर मी आलोय. काळजी करू नका. दीपक अगदी सुखरुप आहे. निवांत आहे.ह्ण ह्या एका वाक्याने आईचा काळवंडलेला चेहरा थोडासा उजळला. दादाला चापटी मारत म्हणालो,“बरं झालं दीपक गेला ते! आता प्रत्येक वेळी तुलाच खिडकीत बसायला मिळेल. मोठी गोष्ट पण तुलाच मिळेल. सगळ्या गोष्टी सगळ्यात आधी तुलाच मिळतील. आणि पुन्हा भंडण-बिंडण काहीच नाही!! मज्जाच आहे बुवा तुझी!! का।़।़य?ह्ण दादाचा चेहरा रडवेला झाला. “माझं चुकलं काका. मी आता भाऊशी कध्धी-कध्धी भांडणार नाही काका. खरंच नाही भांडणार! भांडण आमचं व्हायचं पण त्रास आईला व्हायचा.आणि आज....आज तर सगळ्या घराला....म..मला माझी चूक कळली..ह्ण दादाला पुढे बोलताच आलं नाही. तो हमसून हमसून हुंदके देऊ लागला. मी त्याला पोटाशी धरलं. त्याने मला घट्टं मिठी मारली. मला त्याच्या स्पर्शातूनच समजलं ‘दादा बदलला आहे.’ “अहो माझंच चुकलं म्हणा! त्यांच्या सारख्या-सारख्या भांडणाने माझा जीव कातावून जायचा. काय बी सूचायचं नाय. प्रत्येक गोष्टीत भांडण. परवा वैतागून म्हणाले,चालता हो. अहो रागाच्या भरात चुकून म्हणाले,पण त्याचं एव्हढं रामायण होईल असं वाटलं नव्हतं. माझंच चुकलं. दीपक गेल्यापासून दोन घास काही पोटात जात नाहीत की रात्री डोळा लागत नाही. कसा आहे दीपक? कुठे राहतो? काय खातो? काय करतो?....ह्णआईला पुढे बोलताच येईना. तिला हुंदके अनावर झाले. आजी म्हणाली,“देव पावला! आमच्या चुका पोटात घाला पण भाऊला आत्ता घेऊन या.ह्ण छोट्या जनाला,हे काय चाललंय ते नीटसं कळतंच नव्हतं. तिचा समज होता भाऊ मामाकडे गेलाय. खूप दिवस राहिलाय,म्हणून आई डोळ्याला सारखा पदर लावतेय.

दीपकच्या वडिलांचा मला काही केल्या अंदाज येत नव्हता. पांढरा लेंगा,अंगात पैरण,बारीक केस,कपाळावर गंध आणि गळ्यात तुळशीची जाड माळ. चेहरा शांत आणि प्रसन्न!

मी त्यांच्याकडे हसून पाहिलं. मनात शब्दांची जुळवाजुळव केली. आणि भीत-भीत त्यांना विचारलं , “समजा,दीपक परत आला.तर.....तर तुम्ही काय कराल?ह्ण

ते पार गोंधळून गेले! त्यांना प्रश्नच समजला नाही. त्यांनी मलाच उलट विचारलं, “काय कराल? म्हणजे काय? आं।़ म्हणजे काय? काय करणार? उत्तर स्पष्ट आहे की. त्याला घरात घेणार! आणखी काय? आं।़ आणखी काय?ह्ण आता माझी गडबड झाली! मग मी स्पष्टच विचारलं,“घरात घेतल्यावर तुम्ही त्याला ओरडणार,शिक्षा करणार.... वडील संतापले.रागाने थरथरत,मला पूर्ण बोलू न देता,माझ्यावर उसळून म्हणाले,“शिक्षा करणार..? अहो,तो गेल्यामुळे आम्हालाच शिक्षा झालीय... ती काय कमी आहे का?

आपलं मूल असं एकाएकी पळून गेलं तर आई-बापाला काय चटका लागतो ते तुम्हाला काय कळणार हो? काळीज पिळून निघतंय आमचं! आम्हाला जेवण खाण सुचत नाही. डोळ्यात प्राण आणून आम्ही पोराची वाट पाहतोय. पोराच्या आठवणीनं काळीज तीळतीळ तुटतंय....आणि तुम्ही म्हणता,पोराला शिक्षा करणार का? काय राव,आमची थट्टा करता का? सांगा ना दीपक कुठाय? आई पुन्हा डोळ्याला पदर लावू लागली.

घरातलं वातावरण बदललं. मी क्षणभर सुन्न झालो! काय बोलावं?काय करावं? मलाच कळेना. दादा चटकन उठला. माझा हात धरून म्हणाला, “चला-चला.आपण भाऊला घेऊन येउया. मी..मी सांगितलं ना तर रुसलेला भाऊ नक्कीच घरी येईल!ह्ण

दादाने हात ओढतच मला घराबाहेर काढलं.

मी,दीपकचे वडील आणि दीपकचा दादा,दीपकला आणायला निघालो. एकलापूरच्या एसटी स्टँडवर,माझ्या एका मित्रासोबत दीपक थांबला होता. माझ्या मित्राचं नाव होतं, गणपतराव,चहा टपरीचे मालक! विश्वास ठेवा,गफ्पा मारतानाच माझी गणपतरावांशी दोस्ती झाली होती. लांबून चालत येणारे आपले बाबा आणि दादा दीपकने पाहिले. दीपकला भरुन आलं. त्याचा श्वास वाढला. त्याला आवंढा गिळताना त्रास होऊ लागला. त्याला हुंदके अनावर झाले. जसजसे दादा,बाबा जवळ येऊ लागले तसतसं त्याला बोलता ही येईना.

दादाने त्याला गच्चं धरलं आणि म्हणाला, “भाऊ..भाऊ आता मी तुझ्याशी कध्धी भांडणार नाही. पण तू असं आम्हाला सोडून कध्धी जायचं नाही! कधी ही जायचं नाही.ह्ण

बाबांनी धावतच येऊन दीपकला पोटाशी घेतलं. त्याला मायेने आंजारलं गोंजारलं. तेव्हा बाबांच्या अनवाणी पायावर,दीपकच्या डोळ्यातील आनंदाश्रू पडत होते!!

गणपतराव कळवळून म्हणाले, लई गोड आहे, ‘आपलं’ पोर!ह्ण घरी आल्यावर, ही गोष्ट माझ्या मुलीला सांगताना माझे डोळे डबडबले होते. मी डोळे पुसत मुलीकडे पाहिलं तर...... तिचे ही डोळे पाणावलेले!

मग आम्ही दोघे ही,मोठ्या आनंदाने ओल्या डोळ्यांनी हसलो! खरं सांगा,ही गोष्ट वाचताना,तुम्ही पण ओल्या डोळ्यांनी......?

-राजीव तांबे
My Cart
Empty Cart

Loading...