‘किती
गं बाई मी हुशार, किती
गं बाई मी हुशार..’ असं
म्हणत सगळ्यांनाच भुरळ पाडली आहे ती चिंची चेटकिणीनं...
‘अलबत्या-गलबत्या’ नाटकातली ही चिंची चेटकीण
सध्या मुलांच्या चर्चेतला आवडता विषय आहे. ही चिंची चेटकीण
उत्तम अभिनयाने मुलांपर्यंत पोहोचवली आहे ती वैभव मांगले
काकांनी. चतुरस्र अशा वैभवकाकाशी म्हणजेच चिंची चेटकिणीशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा-
बालपण-
‘बाळाचे
पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीला साजेसा
असा वैभवकाका. बालपणापासून नकला करणं, अभिनय करणं हे वैभवकाकाच्या रक्तातच
होतं. वैभवकाकाचं बालपण हे कोकणातील रत्नागिरी
जिल्ह्यातील देवरुखमधील कासारकोळवण या निसर्गरम्य अशा
गावात गेलं. कॉलेजपर्यंतचं सर्व शिक्षण कोकणातच झालं. निसर्गाच्या सान्निध्यात जेवढं राहाल तेवढ्या माणसाच्या जाणिवा अधिक समृद्ध होतात, असं वैभवकाका सांगतो. “बालपणी आम्ही मुलं विटी दांडू फार आवडीने खेळत असू. शेतीची कामं करण्याचा उत्साहही भरपूर असायचा. आम्ही चार भावंडं, वडील नोकरी करायचे आणि आई गृहिणी होती.
मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंब होतं आमचं.”
बालपणीच्या
आठवणी-
वैभवकाका
सांगतो की, गावात जेव्हा मृगातला पाऊस पडायचा तेव्हा माळरानावर छोटं छोटं गवत उगवायचं. त्यावर मृगाचे लाल किडे पुंजक्यांनी दिसायचे. ते किडे पाहताना
हिरव्या गवतावर जणू लाल मखमली गोंडे लावल्यासारखं वाटायचं. ते मखमली किडे
त्यानंतर मला कधीच दिसले नाहीत. पाण्याच्या वाहणाऱ्या शांत लहरी एखाद्या वाटेवर दिसायच्या. त्यात आम्ही मुलं होड्या सोडायचो, अळवाच्या पानावर छोटे छोटे बेडूक ठेवून ती पानं आम्ही
पाण्यात सोडायचो. मुलांनी ज्या गमती-जमती केल्या पाहिजेत त्या सर्व गमती-जमती मी करायचो. मात्र नकला
करण्यात मी पटाईत होतो.
याबद्दलचा
एक किस्सा वैभवकाकाने सांगितला - “गावी शाळेत बहुतांश विषय एकच शिक्षक शिकवायचे. सहावीत असताना आम्हांला भिडेबाई इतिहास शिकवायच्या. इतिहासातल्या सनावळ्या माझ्या कधीच लक्षात राहायच्या नाहीत. वर्गात भिडेबाई या सनावळ्या विचारायच्या,
तेव्हा समूहासोबत मी नुसता पुटपुटत
राहायचो. समूहाचा ध्वनी निघतो, त्यात माझा आवाज मिसळायचा. माझी ही युक्ती माझ्या
बाजूला बसणाऱ्या मकसूदच्या लक्षात आली. त्याने बाईंकडे चुगली केली. मग बाईंनी मला
एकट्याला सनावळ्या विचारल्या, तेव्हा माझी चांगलीच तंतरली. मला चांगलाच चोप मिळाला. अर्थात तरीही माझ्या सनावळ्या काही पाठ झाल्याच नाहीत.
सातवीला असताना पुस्तकातील ‘एक आँख की
दृष्टी’ या
धड्यावर आम्ही नाटक बसवलं. यात मी पहिल्यांदा स्टेजवर
राजा रणजीत सिंहची भूमिका साकारली. यातील राजा रणजीत सिंह एका डोळ्याने आंधळा होता. नाटक करतेवेळी माझ्या एका डोळ्याला पट्टी चिकटवली होती. ती पट्टी स्टेजवर
गेल्या गेल्याच पडली. आता एका डोळ्याने दिसत नाही हे कसं दाखवायचं,
म्हणून एका डोळ्यावर एक हात ठेवला
आणि नाटक पार पाडलं. मी अभ्यासात फार
हुशार नव्हतो पण ढ सुद्धा
नव्हतो.
अभिनेता
म्हणून नावारूपास येण्यापूर्वी वैभवकाका शिक्षक म्हणून नोकरी करत होता. वैभवकाका शिक्षक म्हणून कसा होता?
यावर
वैभवकाका सांगतो की, मी मुलांचा आवडता
शिक्षक होतो. मुलं खोडकर असायलाच हवीत, कारण मुलं जेवढी खोडकर तेवढी ती क्रिएटिव्ह असतात.
मी शिक्षक म्हणून नोकरी करताना माझ्याकडे पाचवी ते सातवीचे वर्ग
होते. या वयातली मुलं
कशी वागतात, काय खोड्या करतात, याचा अंदाज मला होता. त्यामुळे खोडकर मुलांवर मी जबाबदाऱ्या टाकायचो.
माझ्या तासाला मुलांनी कधी गडबड केली नाही. याचं कारण अभिनय ही कला माझ्याकडे
होती. मी एखादी साधी
गोष्टसुद्धा मुलांना एवढी रंगवून, अभिनय करून सांगायचो की, ती ऐकताना मुलं
तल्लीन होऊन जायची. मराठीतल्या धड्यातील पात्रांप्रमाणे अभिनय करत करत धडा शिकवला की, त्याची मुलांना गमंत वाटे आणि त्यामुळे मुलांच्या या गोष्टी अधिक
लक्षात राहात.
वैभवकाकाने
त्याच्या मनातली एक खंत बोलून
दाखवली. ती म्हणजे पालक
मुलांना पुरेसा वेळ देत नाहीत. आपल्याला त्रास नको, म्हणून मोबाइल, टीव्ही यामध्ये अडकवून ठेवतात. त्यामुळे आज अनेक मुलांना
वाचन करण्याची, नाटक पाहण्याची आणि मुख्य म्हणजे कल्पनाशक्तीने काही करण्याची संधी मिळत नाहीये.
अभिनय
क्षेत्र हे अस्थिर असतं.
कधी तुमच्याकडे खूप काम असतं आणि कधी कधी काहीच काम नसतं.
शिक्षक
म्हणून स्थिर नोकरी असताना अभिनयाच्या क्षेत्राकडे वैभवकाका कसा काय वळला, हा प्रश्न माझ्या
डोक्यात घिरट्या घालत होता. वैभवकाकाने एका शब्दात मला याचं उत्तर दिलं, ते म्हणजे पॅशन!
अभिनय
क्षेत्रात प्रवेश-
मी
शिक्षण सेवक म्हणून थोडक्या पगारावर काम करत होतो. शिक्षकाची नोकरी सोडून अभिनय क्षेत्राकडे जाण्याचा निग्रह केला आणि मुंबईची वाट धरली. खिशात फार काही पैसे नव्हते, ना ओळखी, ना
राहण्याची सोय. पण माझ्यामध्ये प्रेरणा
आणि जिद्द होती. जोवर काहीतरी करून दाखवण्याची ठिणगी तुमच्यामध्ये धगधगत असते, तोवर माणूस धोका पत्करून आपले साध्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. मला अभिनय जमतो हे माहीत होतं.
रत्नागिरीत जेव्हा नाटकं यायची, ती मी बघायचो;
तेव्हा वाटायचं की अमुक एका
नाटकातलं अमुक पात्र मी त्या कलाकाराहून
उत्तम केलं असतं. त्यासाठी मला मुंबईत येऊन स्ट्रगल करण्याशिवाय पर्याय नव्हता. परेश मोकाशी यांचा नंबर माझ्याकडे होता. मी त्यांना फोन
करून भेटायला गेलो. तेव्हा ते एक नवीन
नाटक बसवत आहेत, ही माहिती मिळाली.
मला त्या नाटकात काम मिळेल ह्या आशेने गेलो, पण तत्पूर्वी त्यांच्या
नाटकाचं कास्टिंग झालं होतं. परेश मोकाशी एक माणूस म्हणून
खूपच चांगला आहे. त्याला माझी सर्व परिस्थिती माहीत झाली. त्याने मला असिस्टंटगिरी करशील का असं विचारलं...
पण मी नाही म्हणून
सांगितलं कारण मला अभिनेता म्हणूनच काम करायचं होतं. माझ्या मते आपला फोकस हलला तर आपण आपलं
स्वप्न, ध्येय पूर्ण करू शकत नाही. माझं म्हणणं ऐकल्यावर त्यांनी मला रोल नाही दिला, पण नाटकाच्या तालमीला
यायला सांगितलं. मी पहिल्यापासूनच वेळेचा
पक्का होतो. दिलेली वेळ मी आजही पाळतो.
मी रोज तालमींना वेळेत हजर राहून रोज निरीक्षण करायचो. तालमी झाल्या, नाटकाच्या शुभारंभाची तारीख ठरली. पण त्यातील एक
भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या तारखा क्लॅश होऊ लागल्या. त्या अभिनेत्याने तालीम करूनही शुभारंभाच्या वेळी येता येणार नसल्याचं कळवलं. शुभारंभाला अगदी मोजकेच दिवस उरले होते. मी सर्व तालमींना
होतो, त्यामुळे कोणाची भूमिका काय आहे, हे मला माहीत
होतं. परेश मोकाशींनी मला ही भूमिका तू
करशील का, असं विचारल्यावर माझा आनंदाला उधाण आलं. माझं मु. पोस्ट बोंबीलवाडी या नाटकाने अभिनय
क्षेत्रात पदार्पण झालं. त्यानंतर फुबाईफु, टाईमपास १, २ हे
चित्रपट याने माझं करियर बहरत गेलं. आता मी या क्षेत्रात
पूर्णपणे स्थिरावलो आहे.
आतापर्यंत वैभवकाकाने अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहे. कधी प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसवलंय तर कधी तेवढंच
भावुकही केलंय. ‘माझे पती सौभाग्यवती’मध्ये
तर स्त्रीपात्र साकारून महिलांच्या मनातही आपलं स्थान पक्कं केलंय. तर ‘टाईमपास’मधील शाकाल मुलांच्याही व्यवस्थित लक्षात आहे.
अभिनयाचा
अभ्यास-
अभिनयासाठी
लागणारा सर्वांत महत्वाचा गुण म्हणजे निरीक्षण. मी सतत निरीक्षण
करत असतो. तेही सामान्य माणसांच्या बोलण्याचं, चालण्याचं, त्याच्या लकबींचं... जेवढ्या जास्त माणसांना तुम्ही न्याहाळाल, तेवढे तुमचे अभिनयकौशल्य, क्षमताही वाढत जाते, यावर माझा गाढा विश्वास आहे. म्हाताऱ्या माणसाची भूमिका साकारतोय, तर त्यावेळी फक्त
आवाजाला कंप दिला म्हणजे म्हातारा माणूस होत नाही; तर त्या म्हाताऱ्या
माणसाचं दिसणं, देहबोली, आवाज या सर्व बाजूंचा
विचार करून त्या भूमिकेमध्ये शिरावं लागतं. यासाठी आधी अनेक म्हातारी माणसं निरीक्षण करून पहिली असतील तर ते पात्र
तुमच्या मनात ठसतं तोच खरा अभिनय असतो.
चेटकीण
साकारताना-
जेव्हा
मला या ‘चिंची चेटकिणी’ची भूमिका करशील
का, असं विचारलं तेव्हा माझ्यासमोर हे आव्हान होतं.
कारण चिंची चेटकीण यापूर्वी दिलीप प्रभावळकरांनी साकारली होती. मी ती भूमिका
पाहिली नव्हती आणि ती इंटरनेटवरही उपलब्ध
नाहीये. मात्र लहापणापासून अनेक गोष्टी ऐकून, वाचनातून आणि माझ्या कल्पनेतून चेटकीण कशी असते याचा अंदाज मला होता. चिंची चेटकिणीचा मेकअप ही गोष्ट महत्त्वाची
आहे. चिंची चेटकीण साकारताना मी माझा मेकअप
अवघ्या २० मिनिटांत करतो.
कारण मी त्या मेकअपचं
तंत्र व्यवस्थित शिकून घेतलंय. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यातील तांत्रिक गोष्टी आपणाला माहीत असाव्या, असं मला वाटतं.
चिंची
चेटकीण म्हणून लक्षात राहिलेली आठवण-
आतापर्यंत
‘अलबत्या-गलबत्या’ नाटकाचे अनेक प्रयोग झाले. नाटक संपल्यावर चिंची चेटकिणीला विंगेत भेटायला अनेक मुलं येतात. पण मी माझ्या
चेटकीण गेटअपवर कोणाला फोटो देत नाही, तर वैभव मांगले
म्हणून फोटो देतो. एकदा एका प्रयोगानंतर एका मुलीने रडून गोंधळ घातला. तिने आईला सांगितलं की, चेटकीण गर्ल होती त्यामुळे तू मला काहीही
करून त्या चेटकिणीला आताच भेटव. तिचा हा हट्ट बघून
मी तिच्या आईला सांगितलं की, पुढचा प्रयोग अमुक ठिकाणी अमुक वाजता आहे. तिथे तुम्ही तिला नाटक सुरू होण्याआधी चेटकिणीला भेटायला घेऊन या. मग मी लपून
बसलो. त्या मुलीच्या आईने फोन लावून ‘बोलावते चेटकिणीला’
असं सांगितलं आणि मी बाहेर आलो.
ती मुलगी घाबरली, पण चिंची चेटकीण
म्हणून तिने मला घट्ट मिठी मारली आणि रडत रडत सांगू लागली की, तू मला खूप
आवडतेस! हीच खरी माझ्या कामाची पोचपावती आणि माझ्या भूमिकेला मिळालेला हा खरा पुरस्कार
!!
वैभवकाका
हा स्पष्ट बोलणारा आहे. चिकित्सक वृत्ती त्याच्यात ठासून भरलीय. त्याच्या या स्वभावाबद्दल त्याला
विचारलं. त्यावर तो म्हणतो-
मला
पु. ल. देशपांडे यांची
‘अंतू बर्वा’ ही व्यक्तिरेखा खूप
आवडते. कारण अंतू बर्वा हासुद्धा कोकणातला आहे. कोकणातल्या माणसाचा अर्क या अंतू बर्वामध्ये
आहे आणि ते माझ्यामध्येसुद्धा आहे, असं
मला वाटतं. मला लोक खडूस, खोचक म्हणतात. पण मी कधी
कोणाचं नुकसान नाही करत. एखाद्याच्या मताला विरोध करणं म्हणजे तो माझा शत्रू,
ही भावना समाजात जास्त फोफावालीय. एखादी व्यक्ती असं का बोलतेय, याचा
कोणी विचार नाही करत. एखादी सूचना लोक सकारात्मकतेने घेत नाहीत. आज अनेक लोकांना
फक्त कौतुक करणारी माणसं आवडतात. चिकित्सकपणे आणि स्पष्ट बोलणारे लोक कमी झाले आहेत.
आतापर्यंत
वैभवकाकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याला वाचनाची प्रचंड आवड आहे.
वचनाचं
महत्त्व-
वैभवकाकाच्या
घरात वाचनाचं वातावरण आहे. त्याची आई, बायको, मुलं असा त्याचा छोटासा परिवार आहे. त्याची आई वृद्ध आहे,
त्यांना आता कमी दिसतं, तरी त्या वाचतात. तसंच वैभवकाकाने त्याच्या मुलीला वृत्तपत्राचं एक तरी पान
रोज वाचायचं अशी सवय लावली आहे. वैभवकाका सांगतो की, वाचनामुळे कल्पनाशक्ती वाढते. वाचनाला मी गुरू मानतो.
‘वयम्’च्या
वाचक मुलांना आणि त्यांच्या पालकांना त्याने काही खास सल्ला दिलाय.
तो
म्हणाला- पाचवीपासून आपल्याला ‘नागरिकशास्त्र’ हा
विषय सुरू होतो. पण सार्वजनिक स्वच्छतेबद्दल
आपला देश आजही उदासीन आहे. जर आपल्याला आपल्या
देशाचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल, तर ‘नागरिकशास्त्र’ या
विषयातील नियम अंगिकारले पाहिजेत. हे मुलांना करायला
पालकांनी प्रेरणा दिली पाहिजे. त्यासाठी
पालकांनी स्वत:त सुधारणा घडवली
पाहिजे. स्वतः पालकांनी स्वच्छता, पाण्याचा योग्य वापर अशा अनेक चांगल्या सवयी स्वतः पाळल्या पाहिजेत. दिवाळीत
तुम्ही पणत्या, दिवे लावा, रांगोळ्या काढा, नवीन कपडे घ्या, मात्र फटाके फोडून प्रदूषण करणे टाळा... आणि हे सर्व ऐकलं
नाहीत, तर ‘चिंची चेटकीण’ येईल तुम्हांला घाबरवायला !
-क्रांती गोडबोले-पाटील