Menu

चमचम गोष्ट

image By Wayam Magazine 14 November 2022

By Sonali Nawaangule,  On 24th July 2020, Children Magazine

परीच्या जगातील एक परीकथा....

एक होती परी. तिचं नाव जरू. जरूचा एक मित्र होता, त्याचं नाव हिमान. जरू जशी परी होती तसा हिमान परा होता. त्यांची गंतच चालायची. दोघं आपल्या रंगीबेरंगी पंखांनी उड उड उडायचे. खेळायचे. वेगवेगळ्या आकाराच्या ढगांना शिवायचे. त्यांच्यावर बसायचे. त्यांच्याशी स्पर्धा सुद्धा खेळायचे. पाऊस भरलेल्या ढगांध्ये गेल्यावर मज्जा यायची. त्यातलं पाणी जमिनीवर पडायच्या आता जरू आणि हिमान त्यात खेळायचे. सकाळ होत आली, फुलं उमलली की दोघं आपल्या ‘सिक्रेट’ जागी जाऊन बसायचे. त्यानंतर ते काय करायचे कोणास ठाऊक!

जरू आणि हिमान कुणाला दिसायचे नाहीत. पण त्यांना जर का वाटलं की आपल्याला कुणी पाहावं तर मात्र ते दिसू शकायचे.

‘‘जरू, बघ ना, ती झाडाखालची मुलगी किती मस्तंय. ”

‘‘हं, पण मळकी आहे. आणि तिचं तोंड बघ कसं काळंकाळं झालंय.”

‘‘ती रडलीय बहुतेक. अगं माणसं रडतात नं! विसरलीस?”

‘‘हो हो. आपण वाचलंय की! आपल्या लायब्ररीतल्या माणसांच्या गोष्टींचं कपाट आठवतंय तुला? मला खूप आवडायच्या माणसांच्या गोष्टी. आपल्या पèयांच्या गोष्टी ठाऊकच असतात की आपल्याला. त्यांचं सगळं तेच तेच असतं. माणसांचं किती वेगळं असतंय. म्हणून आवडतात मला त्यांच्या गोष्टी.”

‘‘अगं, गोष्टींचं जाऊदे आत्ता. तू ती मुलगी बघ. तिला बहुतेक थंडी वाजतेय. आपण तिला पांघरूण देऊया.”

‘‘ओके. तू म्हणतोस तर देते.” असं म्हणत जरूनं कमरेला हात लावून एक चमचमती दोरीउडी काढली. ती दोरी हवेत

पसल्यावरही त्यातून चंदेरी चांदण्या बाहेर पडल्या नि हवेत विरल्या. जरूनं दोरीउडी घेतली. दोन्ही पाय एकावेळेला वर करून उडी मारली. डोळे मिचकावले. निळ्या आभाळासारख्या रंगाचं गुबगुबीत पांघरूण त्या मुलीवर आपोआप पांघरलं गेलं. जरू नि हिमान एकमेकांकडं पाहून हसले आणि हवेत उडी घेत त्यांनी हळूच एकमेकांच्या कपाळावर एकमेकांचं कपाळ आपटलं. अगदी हळूच. त्यानंतरही चंदेरी चांदण्या तयार झाल्या नि हवेत विरून गेल्या. ती मुलगी उठेपर्यंत काही ते थांबणार नव्हते. फुलं उमलायला लागली आणि जरू-हिमान आपल्या गुप्त जगात निघून गेले. दुसऱ्या रात्री पुन्हा कालच्या त्याच झाडाखाली येतात तो काय, तिथं निळं पांघरूण नीट घडी करून ठेवलेलं दिसलं आणि एक इटुकलं पत्र पण.

परीराणी,

मला माहितीए तूच असणारेस मला पांघरूण घालणारी. पांघरूण खूप छान होतं. थँक्यू. ते परत हवं असेल म्हणून ठेवलंय. त्या पांघरूणात झोपल्यावर मला छान स्वप्नं पडलीत. माझा आवडता केक आणि आजी करायची तो गरम शिरा खाल्ला मी स्वप्नात. आत्ता पण तोंडाला पाणी सुटलंय. पुन्हा थँक्यू!

जरू आणि हिमानला आश्चर्यच वाटलं की हे कसं काय म्हणून. आत्तापर्यंत त्यांनी बèयाच जणांना न कळता बरंच काय काय दिलं होतं, पण कुणी काही परत दिलं नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे परीदेशातल्या कुणी दिलं असेल असंही कुणाला कळलं नव्हतं. कोण ही मुलगी? अशी कशी ही? गिफ्ट कुणी परत करतं का? बरं विचारावं तर दिसतंही नव्हती. कुठं राहाते कसं कळेल?

जरू नि हिमान गोंधळात पडले... पण तोंडाला पाणी सुटलं म्हणजे ती मुलगी आजारी आहे का? त्यांना कळेना.

त्या दिवसापासून जरू आणि हिमान रोज संध्याकाळीनंतर त्या झाडाकडे येऊन पाहायचे ती मुलगी आहे का... कुठेच दिसायची नाही. जरू आणि हिमान अजूनही लहान होते. परीदेशातल्या शाळेत आत्ता कुठं त्यांची तिसरी झाली होती. त्यातही जरूला हिमानपेक्षा जास्त मार्क पडले होते, म्हणून तर हेडपरीनी त्याला जरूबरोबर राहून जादूची प्रॅक्टिस करायला पाठवलं होतं. हवी असलेली मुलगी कशी शोधायची याचा पोर्शन अजून झाला नव्हता. इतर मोठ्या पऱ्यांची मदत घेतली तर पुन्हा मागच्याच वर्गात बसावं लागणार. हळूच मदत घ्यायची ठरवली तरी हेडपरीचे जादूचे कॅमेरे सगळीकडे नजर ठेवून असतात त्यामुळं ते शक्य नव्हतं. आता काय करायचं याच्या चिंतेत दोघंही जण होते. तोंडातून पाणी येणाऱ्या मुलीची काळजी त्यांना वाटत होती. ती आजारी आहे तर मदत केली पाहिजे असं वाटत होतं.

अशाच एका संध्याकाळी एका वेगळ्याच बागेतल्या बाकावर अचानकच ती मुलगी दिसली. ती मन लावून काहीतरी करत होती. तिच्या हातात एक वही होती. बहुतेक ती चित्रं काढत होती. हळूच जाऊन बघितलं तर तिनं चक्क जरूसारखं चित्र काढलं होतं. जरूच्या पंखांना वेगवेगळे रंग नि टिकल्या तिनं लावल्या होत्या. चित्रात जरूचे केस लांबच लांब सोनेरी होते.

जरूला खूप मजा वाटली, पण हिमान थोडा नाराज झाला.

‘‘बघ, बघ... आपण दोघांनी तिला पांघरूण दिलं, मीच दाखवलं होतं तुला की ती कशी कुडकुडतेय म्हणून. आणि चित्रं मात्र तुझं एकटीचं! ज्जा तुझी तू. मी नाही येणार.” , हिमान घुश्श्यात म्हणाला.

‘‘हिमूड्या... असं नको म्हणू. हेडपरीनी काय सांगितलंय, की पèयांच्या देशातल्यांनी खूप रागवूरूसू नये, नाहीतर मग माणसांच्या देशात बदली होईल. तुला हवीय का इथं बदली? माणसं रागावतात, रूसतात. पऱ्या नाही काही!” , जरूनं समजूत काढली. हिमानला ती पुरली.

दोघांनीही ठरवलं की या मुलीला आपण दिसायचं. चकित करायचं. दोघंही

‘टिमटिमचंदेरीचकोरीलालालालाटुबुकङ्क’ असं काही म्हणाले नि चटकन चित्रं काढणाèया मुलीपुढे आले. चांदण्या चमचमल्या नि हवेत विरून गेल्या. त्या मुलीनं चटकन डोकं वर काढलं नि हसली. म्हणाली, ‘‘वा, आलीस तू परी... ये ना. पण हा कोण?”

जरूच्या येण्याचं मुलीला काहीच आश्चर्य वाटलं नाही, पण हिमानला बघून मात्र नवल वाटलं. यानं हिमान खूष झाला.

म्हणाला, ‘‘ही जरू. ती परी. मी हिमान. मी परा.”

‘‘अय्यो, परा पण असतो. मला माहितीच नव्हतं. मी आमच्या शाळेतल्या लायब्ररीत परीची खूप पुस्तकं वाचलीत, पण त्यात कुठंच परा नव्हता. सरप्राईज आहे मला हा!”

‘‘तुझं नाव तरी सांग. आपण मैत्री करूया,” हिमान म्हणाला.

‘‘माझं नाव चिऊ.”

जरू व हिमान दोघांनाही चिऊ आवडली. चिऊसुद्धा या दोघांना बघून फार खूष झाली होती. इतके दिवस ती का दिसली नाही हा प्रश्नही होताच, पण चिऊ म्हणाली की ती गावाला गेली होती. मग सहलीला. ज्या दिवशी ती बाहेर झोपली त्या दिवशी आजीवर रागावलेली होती... आजी म्हणाली, काही लाड नकोत, घरात नाही तर बागेत झोप. थंडी वाजली की आपोआप आत येशील. बाकीचं ठीकाय, पण जरू- हिमानला काळजी वाटत होती तशी चिऊ काही आजारी दिसत नव्हती. म्हणून त्यांनी

विचारलं, ‘‘तुला बरं नव्हतं ना?”

‘‘हँ! मला काय होणारे. मी वेळच्यावेळी जेवते. हात पण स्वच्छ धुते. झोपताना दात घासते. शेपू, कारलं पण खाते. वेळेवर झोपते. आज्जी म्हणते, असं केलं की तब्येतीला काही होत नाही.”

‘‘मग त्या दिवशी तू का लिहिलं होतंस की तोंडाला पाणी सुटलंय? पाणी तर दिसत नाहीये.” त्यांचा प्रश्न ऐकून चिऊ लागली खो खो हसायला. म्हणाली, “मला नव्हतं माहिती की पèयापण थोड्या थोड्या वेड्या असतात आणि त्यांना पण सगळ्या शब्दांचे अर्थ कळत नसतात. कठीण शब्दांची वही तयार करावी ना!”

जरू आणि हिमान भुवया उंचावून आणि तोंडाचा चंबू करून चिऊकडं शून्य मार्क मिळालेल्या परीपèयासारखं बघायला लागले.

चिऊ म्हणाली, ‘‘आपला आवडता पदार्थ आठवला qकवा समोर आला की तो कधी एकदा खाईन असं होतं तेव्हा तोंडात भरपूर लाळ तयार होते. त्यामुळं पदार्थ आवडीनं खाल्ला जातो व पचतो सुद्धा! तुम्ही पèया म्हणजे ना....”

जरू नि हिमाननं ठरवलं की आता कठीण शब्दांची वही घालायचीच. तशी होती म्हणा त्यांची अशी वही, पण माणसांच्या गोष्टींमधले कठीण शब्द वेगळे आणि पèयांच्या गोष्टींमधले वेगळे. खरंतर चिऊनंही असंच ठरवलं होतं.

आता प्रश्न राहिला की चिऊनं पांघरूण परत कसं काय दिलं?

चिऊ म्हणाली, ‘‘आजी म्हणते, ज्याचं त्याला देऊन टाकावं, तर त्यांना दुसऱ्यांच्या उपयोगी पडता येतं. जी वस्तू आपली नसते ती अशी घेऊन टाकून काही होत नाही. ती हरवून जाते. गुण मात्र टिकतात. म्हणून पांघरूण परत केलं. घरी आहेत ना पांघरूणं भरपूर. तुच्यासारखं लुसलुशीत नसलं तरी आजीनं शिवलेली तिच्या साडीची गोधडी आहे उबदार. आणि आजी म्हणते ते खरंय की. मी पांघरूण परत दिलं आणि ते का दिलं म्हणून तुम्ही मला शोधलं. आपली मैत्री झाली.” तिघांनी एकमेकांना टाळ्या दिल्या नि ठरवलं की एकमेकांशी बोलून नव्या गोष्टी लिहायच्या. परीदेशातल्या खऱ्या गंतीजमती चिऊला थेट कळणार होत्या आणि जरू-हिमानला माणसांच्या देशातल्या गोष्टी अवघड जाणार नव्हत्या. जरू, हिमान आणि चिऊ आता नव्या नव्या गोष्टी लिहिणारेत.

तिघांच्या पुस्तकाचं नाव मात्र एकच आहे, ‘चमचम गोष्टी’.

-सोनाली नवांगुळ


जुलै २०२० ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...