छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं की सर्व भारतीयांचा ऊर भरून येतो. कर्तृत्व, दूरदृष्टी, धोरणीपणा आणि चातुर्य या चतुःसूत्रीवर महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि वाढवले. महाराजांच्या काळात एकाच वेळी डच, इंग्रज, मोगल हे लोक भारत पादाक्रांत करायला भारतात तळ ठोकून होते; तर पारशी आणि पठाण एक बाजारपेठ म्हणून आर्थिक सत्ता हाती घेऊ पाहत होते. तेव्हा सुरत हे बंदर खऱ्या अर्थाने आर्थिक राजधानी होती. स्वराज्य उभारणीसाठी आणि टिकवण्यासाठी किल्ल्यांची बांधणी, लढाऊ गलबतांची निर्मिती पैशांशिवाय शक्य नव्हती. स्वराज्यासाठी लढणारे मावळे वेतनावर लढणारे सैनिक नसले तरी त्यांचे व्यवसाय त्यांचे जेमतेम पोट भरेल इतपतच होते. शस्त्रे, घोडे, चिलखते याचा खर्चही बराच होता. महाराज मावळ्यांचे मनोबल राखत होते. त्यांच्यात त्यांच्यापैकीच एक होऊन शत्रूला सामोरेही जात होते. पण मोगलांनी केलेल्या पुण्याच्या लुटीनंतर धनलक्ष्मी प्रसन्न होणेही गरजेचे होते.
‘सुरतला जायचे आणि लूट करून आणायची; तो निधी हिंदवी स्वराज्यासाठी वापरायचा.’ हा बेत नक्की झाला. प्रत्यक्ष सुरतेची लूट जानेवारी १६६४ रोजी झालेली असली तरी महाराजांच्या मनात त्याचे पडघम नवरात्रातच वाजू लागले होते.
सुरतेची बित्तंबातमी काढायला बहिर्जी नाईक निघाले. हजरजबाबी, प्रसंगावधानी बहिर्जी सुरतेत दाखल झाले. सोंग घेत, बतावण्या करत सुरतेत प्रत्यक्ष किती मोगल सैन्य आहे? बाजारपेठेत कुठे कोणाचे आणि कसले दुकान आहे? सोने, रूपे, जवाहर नेमके कोणाकडे आहे? ही बातमी काढून बहिर्जी परतले. यानंतर योजनाबद्ध, शिस्तबद्ध आणि काटेकोर पूर्वतयारी करून आठ हजार सैनिकांसह महाराजांनी सुरतेकडे कूच केले. त्र्यंबकेश्वराला जाऊन कोळवणातून सुरतेवर जाण्याचा मार्ग ठरला. त्र्यंबकेश्वराची यथासांग पूजा करून, दर्शन घेऊन सैन्य सुरतेला जाण्यास निघाले. दरम्यान 'औरंगाबादवर चाल करून जाणार', ही अफवा पसरवायला मात्र ते विसरले नाहीत.
भरधाव वेगाने महाराजांचे सैन्य वीस दिवसांत सुरतेजवळ गणदेवी येथे पोहोचले. मोगलांनी पुण्याची लूट करताना घातलेला धुडगूस महाराजांच्या सैन्याला अजिबात घालायचा नव्हता; स्वराज्यासाठी धन मात्र हवे होते. त्यामुळे सुभेदार इनायत खानला वकीलामार्फत रीतसर निरोप पाठवला गेला. यामध्ये इनायत खान आणि सुरतेतील नामवंत व्यापारी सय्यद बेग, हाजी कासम आणि बहरजी बोहरा यांनी महाराज सांगतील तेवढा दंड लवकरात लवकर जमा करावा असे सांगण्यात आले होते. पण इनायत खानला महाराजांच्या योजनेची आणि मोहीम आखणीची कल्पना नव्हती. त्याने वकिलामार्फत उर्मट प्रत्युत्तर पाठवले, "आपणास आमच्याकडून दंड हवा आहे काय? बोला, कोणता दंड करू?"
मग मात्र प्रत्यक्ष शहरात घुसण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सुरतेच्या रक्षणासाठी मोगलांकडे पाच हजार सैन्य आहे अशी वदंता असली तरी प्रत्यक्षात एक हजार सैन्यच आहे ही बातमी बहिर्जींनी आधीच काढून ठेवली होती. त्यामुळे महाराजांचे सैन्य बिनदिक्कत सुरतेमध्ये दाखल झाले. 'महाराज आले' या दहशतीनेच सर्व रस्ते ओस पडले. यानंतर मराठा सैन्याने बंदरावर हल्ला केला आणि धक्क्याला आग लावून दिली. त्यामुळे तो मार्ग बंद झाला.
एकूण तीन दिवस मराठा सैन्य सोने-नाणे, जडजवाहीर याचे खजिने गोळा करत राहिले. मात्र हे गोळा करत असताना दानधर्मी आणि भारतीयांना मदत करणाऱ्या मोहनदास पारेख यांच्या वाड्याला त्यांनी अजिबात हात लावला नाही. ख्रिस्ती धर्मगुरू आणि मिशनरी यांच्यावरही हल्ला केला नाही. सुरतेच्या लुटीमध्ये एकही सामान्य माणूस मारला गेला नाही. सुरतेमधली मुलं आणि स्त्रियासुद्धा सुरक्षित होत्या.
या सगळ्या प्रकाराने हादरलेल्या इनायत खानाने वाटाघाटीसाठी वकील पाठवला. या वकिलाने थेट महाराजांवरच हल्ला चढवला. ही गोष्ट विश्वासघात करणारी तर होतीच, पण थेट महाराजांवर झालेला हल्ला खपवून घेतला जाणे शक्यच नव्हते. महाराजांच्या अंगरक्षकांनी वकिलाला तात्काळ ठार मारले. संतप्त झालेल्या सैन्याने पकडून आणलेल्या मोगलांच्या चार कैद्यांनाही कंठस्नान घातले. इतर २४ कैद्यांचे हात छाटून टाकले. मोगलांना इतर ठिकाणाहून कुमक येण्याआधीच मुबलक खजिना घेऊन महाराज संपूर्ण सैन्यासह सुखरूप राजगडावर पोहोचले.
-कांचन जोशी
***