By Hemant More, On 19th May 2020, Children Magazine
बुध व शुक्राचे सुरम्य दर्शन
श्री. हेमंत मोने
शुक्रवार दि. 22 मे 20 रोजी सायंकाळी पश्चिमेकडे बुध आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचे एकमेकांजवळ दर्शन होईल. त्या दिवशी संध्याकाळी 7.10 वा. सूर्यास्त होईल.शुक्र खूपच तेजस्वी असल्यामुळे सुर्यास्तानंतर 5 -10 मिनिटांतच दिसू लागेल. त्यानंतर 7.35 चे सुमारास संधिप्रकाशाचा प्रभाव कमी होईल आणि मग शुक्राच्या डाव्या हातास (दक्षिणेस ) सुमारे एक अंशावर बुध ग्रह व्यवस्थित दिसेल. या दोन ग्रहांची युती मृग नक्षत्रात होत आहे.मृगातील काक्षी (Betalguse) हा लाल तारा, सारथी तारका पुंजातील अग्नी (Elnath) व रोहिणी (Aldeberan) यांच्या त्रिकोणात शुक्र आणि बुधाचा मुक्काम असेल. बुध,शुक्राच्या थेट उत्तरेस सुमारे 20 अंशावर तेजस्वी ब्रह्महृदय (Capella) पाहता येईल.ज्यांना आकाश निरीक्षणाचा सराव आहे त्यांनी या तारका शोधाव्या,मात्र बुध आणि शुक्राची जोडी कोणालाही सहज दिसू शकेल. दि. 31 मे पासून शुक्र सूर्य तेजात लुप्त होणार आहे.सुमारे दहा दिवस त्याला सक्तीच्या रजेवर जावे लागेल. जूनच्या 10 तारखेनंतर शुक्र पहाटे पूर्व क्षितिजावर दिसू लागेल. रविवार दि. 24 मे रोजी संध्याकाळी ज्येष्ठ महिन्याच्या नूतन चंद्रकोरी समवेत बुध ,शुक्र पाहता येतील.चंद्र कोरीची जाडी सुमारे 1 कला (Arc minute ) असेल. म्हणजे (चंद्रबिम्बाचा 30 वा भाग) चंद्रास्त 8.45 ला होईल.
हेमंत माेने
hvmone@gmail.com
मे २०२० ‘वयम्’