Menu

बोलकी दिवाळी

image By Wayam Magazine 08 November 2023

रांगोळ्या, आकाशकंदील, दिव्यांची रोषणाई, नवीन कपडे, फराळ आणि ‘हॅपी दिवाली’ अशा शुभेच्छा… यांशिवाय हा सण पुराच होत नाही. दिवाळी जवळ आल्याची चाहूल सर्वांत अगोदर दुकानांना लागते, म्हणजे दुकानातल्या वस्तूंना लागते. दिवाळीच्या संदर्भातील त्यांची निरीक्षणं आणि आडाखे वेगळेच असतात. या दुकानातल्या वस्तू त्यांच्या स्वतःच्या भाषेत एकमेकांशी बोलू लागतात... आणि ‘दिवाळी’बाबतची त्यांची मतं एकमेकांशी शेअर करू लागतात. नीट लक्ष दिलंत तर तुम्हांलाही ऐकू येतील त्यांच्या गप्पा...! 

दुकानासमोर नेहमीचा टेम्पो थांबल्याचं काचेनं तर पाहिलंच, पण दुकानातल्या कपड्यांनी काचेतून पाहिलं. खणात ठेवलेला ४२ नंबरचा फुलशर्ट, ४४ नंबरच्या फुलशर्टला म्हणाला, “आता हे नवीन शर्ट येतील आणि माझ्या उरावर बसतील. इथे श्वास घ्यायला जागा नाही, तरी ही माणसं हे नवीन शर्ट इथेच कोंबतील, नाहीतर मलाच उचलून गोडाऊनला पाठवतील. आणि मिस्टर ४४, हे गोडाऊन म्हणजे आपल्यासाठी छळछावणी. आंबुस-कुंबूस वासात पडून राहायचं दिवस-रात्र! मला कुणी विकत घेत नाही, त्यामुळे माझी बटणंसुद्धा ढिली झाली आहेत.”

मिस्टर ४४ काही बोलण्याअगोदरच ४० नंबरचा टीशर्ट म्हणाला, “अहो मिस्टर ४२, ‘हात लांब असले म्हणजे अक्कल असते असं नव्हे’ असं आपल्यात म्हणतात ते उगीच नाही. जरा नीट पाहा. टेम्पोमधून कपडे नव्हे, तर तीन पुतळे आणि चार माणसं बाहेर पडली आहेत. त्या चार माणसांच्या हातात मोठ्या पाच पिशव्या आहेत. तर.. ‘उगाच उचलला हात आणि लावला कॉलरला’ असं करू नका.”

पिशवीतल्या पिशवीत मुठी आवळत मिस्टर ४२ म्हणाला, “‘एखादी गोष्ट दिसणे म्हणजे कळणे नव्हे’ हे तर तुम्हांला कळले असेलच नाही का?”

बाजूच्याच खणातली ३८ नंबरची जीन पॅण्ट म्हणाली, “अहो मिस्टर ४२, काय ते नीट लवकर सांगा. कारण एकदा का ती माणसं आत आली की, त्यांची च्याँव च्याँव सुरू होईल.”

पिशवीतल्या पिशवीत कॉलर टाइट करत मिस्टर ४२ म्हणाले, “याचा अर्थ दिवाळी जवळ आली आहे आणि आपले हाल सुरू होणार आहेत..”

“मिस्टर फुलशर्ट, तुमच्याएवढी हातभर अक्कल आम्हांला नाही. ‘आपले हाल होणार म्हणजे काय?’ ते जरा नीट सांगा ना हो..” कोपर्‍यातला सॅण्डो बनियन म्हणाला.

मिस्टर ४४ म्हणाला, “मी सांगतो. दिवाळी जवळ आली की, आपला मालक असे तीन पुतळे मागवतो. त्यांना दुकानाबाहेर ठेवतो. त्यांना छान छान कपडे घालतो. दिवसातून पाच वेळा त्यांना पुसतो आणि चार वेळा या तीन पुतळ्यांचे कपडे बदलतो. खरं सांगतो, आपल्या मुलांचे लाड करत नाही इतके तो त्या निर्जीव पुतळ्यांचे खूप म्हणजे खूपच लाड करतो.”

सॅण्डो बनियन कळवळून म्हणाला, “अहो मिस्टर ४४, हे सर्व ठीक आहे. पण मला सांगा, यामुळे आपले हाल कसे होणार?” 

मिस्टर ४२ गळ्यातल्या गळ्यात हसत म्हणाले, “तर आता ऐका. आता दिवाळी आली म्हणजे आपल्या उरावर आणखी कपडे येऊन बसणार. ते पण नवीन फॅशनचे झॅकपॅक कपडे. मग खूप लोकं कपडे घ्यायला येणार. “हे दाखवा, ते दाखवा. हे बघू, ते बघू.” असं त्यांचं सुरू होणार. मग आपल्याला छपन्न्वेळा पिशवीतून बाहेर काढणार आणि शंभरवेळा आत खुपसणार. काहीजणं आपल्याकडे पाहून नाकं मुरडणार. काहीजण, “यॅक. शीट. बकवास.” असं बोलून आपला अपमान करणार, तर काही जण फक्त पाहणार. या सगळ्याचा त्रास होतोच ना?”

मिस्टर हाफशर्ट ३८ म्हणाले, “अहो, हा त्रास परवडला. पण आपल्याला त्या पिशवीतून आत-बाहेर करताना, आपला गळा सोलपटतो, टाचण्या टोचतात, कधीकधी तर ते आपल्या तोडांत प्लॅस्टिक कोंबतात आणि जीव घुसमटतो. काय करणार? लोकांची बोलणी आणि दुकानदाराच्या थपडा खात दिवस काढावे लागतात. आपल्यात म्हणतात ना, ‘जेव्हा माणसांची दिवाळी तेव्हा आपली बोंबाबोंब होळी!’’

४६ नंबरची जीन पॅण्ट म्हणाली, “अहो तुम्ही तरी सगळे तसे नवीनच आहात. एक मुख्य गोष्ट तुम्हांला कळलेलीच नाहीए..”

“आँ.. कुठली गोष्ट? आणि तुम्हांला कशी माहीत?” सगळेच शर्ट एकदम ओरडले.

“अहो गेले दोन वर्षं मी इथेच पडून आहे. एखादा जाडजूड माणूस येईल किंवा एखादा ढेरपोट्‍या माणूस येईल आणि मला आनंदाने घेऊन जाईल, म्हणून मी वाट पाहते आहे. पण काही योग नाही..”

बाजूचीच ३८ नंबरची जीन्स म्हणाली, “अगं परवा आला होता ना.. एक ४६! तुला हातात घेऊन किती कौतुकाने पाहात होता. तेव्हा मला वाटलं होतं, आता तू चाललीस आम्हांला सोडून.”

“अगं मलाही तसंच वाटलं होतं. पण त्याची बायको भारीच कंजूष. माझ्याकडे पाहात तोंड वेंगाडून म्हणाली, “पॅण्टीपेक्षा लेबलच भारी आहे. आपण पाहू दुसरीकडे..”

मिस्टर ४८ वैतागून म्हणाला, “ए पॅण्टॉनो, उगाच आपापसात फडफडू नका. आम्हांला माहीत नसलेली गोष्ट सांग लवकर. कारण एकदा का ती नवीन मंडळी आली की, आपली बोलतीच बंद होणारे.”

कंबर हलवत ४६ नंबरची जीन्स म्हणाली, “सांगते.. सांगते. आता त्या चार माणसांनी त्या पाच पिशव्या उघडल्या की, आपण आंधळे होणार आहोत..”

सगळेच किंचाळले, “ओह माय गॉड!.. ”

पांढरा फॉर्मल शर्ट म्हणाला, “आम्हांला समजेल असं सांगाल का जीन ताई.”

“हं. त्या पाच पिशव्यांमधे डेकोरेशनचं साहित्य आहे..”

टीशर्ट करवादला, “अहो त्या डेकोरेशनचा आणि आपल्या आंधळेपणाचा काय संबंध आहे?”

“तुम्ही जरा आपापली बटणं बंद ठेवा आणि मला बोलू द्या”, असं म्हणत ४६ नंबरची जीन्स बोलू लागली. 

“आता हे डेकोरेशनवाले त्या काचेला थर्मोकोलची चित्र, कापसाचे गोळे, फटाक्यांची चित्र आतून चिकटवतील. आणि एक मोठं पोस्टर लावतील ‘दिवाळी धमाका. भव्य सेल’ आणि मग आपल्याला आजपासून किमान महिनाभर तरी दुकानाबाहेरचं काहीही दिसणार नाही..”

इतक्यात ती काचच म्हणाली, “खरंय जीन ताई तुमचं. आता ही माणसं माझे हाल-हाल करतील..”

“आँ..? ते कसे काय?”

“मी किती स्वच्छ असते, तुम्हांला माहीतच आहे. माझ्यावर बोटांचे ठसे उमटलेलेसुद्धा मला आवडत नाहीत. दुकानदाराचा मुलगा मला रोज दोन्ही बाजूंनी आंघोळ घालतो, नीट पुसून घेतो. पण आता दिवाळी आली म्हणजे आता माझ्या आंघोळीचे तीनतेरा! आजपासून फक्त एकाच बाजूने आंघोळ.. त्यामुळे आता बाहेरच्या बाजूने चकचकीत आणि आतल्या बाजूने बुळबुळीत..”

“आँ..? ते कसे काय?”

“आता ही चार दुष्ट माणसं माझ्या मागच्या बाजूला चिकट बुळबुळीत गोंद लावतील. माझ्यावर चिकटपट्ट्या चिकटवतील, पोस्टर लावतील, चित्र काढतील, थर्मोकोलचे, कापसाचे तुकडे चिकटवतील. आणि हे सगळं मी उघड्या तोंडाने पाहात बसायचं. म्हणजे दिवाळीला सगळी माणसं करणार अभ्यंगस्नान आणि मी मात्र महिनाभर पारोशी..”

इतक्यात ती चार माणसं दुकानात आली. दुकानातले सगळे पॅण्ट, शर्ट, टीशर्ट आणि सॅण्डो बनियन श्वास रोखून पाहू लागले. तीन माणसांनी पिशव्या उघडल्या आणि ते कामाला लागले. चौथा माणूस दुकानाच्या बाहेर उभा राहून आतल्या तिघांना काहीतरी खुणा करत होता. आतले तिघे काचेवर चिकटवाचिकटवी, फासाफासी, रंगवारंगवी आणि घासाघासी करत होते.

थोड्याचवेळात त्या सगळ्यांनी मिळून काचेची पुरती वाट लावून टाकली. मालकाने बाहेर जाऊन काच पाहिली आणि भलताच खूश झाला. त्याने त्या चौघांना भरपूर पैसे दिले.

आता तर त्या काचेकडे आतून बघवत नव्हतं. सॅण्डो बनियन जीन्सच्या कंबरेत कुजबुजला, “पाहिलंत का? त्यांनी पैसे घेतले! म्हणजे त्यांनी काचेचं दिवाळं काढलं आणि त्यांची दिवाळी सुरू झाली..”

सगळे कपडे इतक्या जोरजोरात फडफडून हसले की दुकानदार दचकलाच!

या दिवाळीत तुम्हांला आणखी कोणाकोणाचं काय काय बोलणं समजलं, ते मला कळवाल? 

-राजीव तांबे

***

My Cart
Empty Cart

Loading...