रंगपंचमी म्हणजे रंगांचा उत्सव.यानिमित्त तुमच्या शाळेतील, परिसरातील सर्वांनाच रंगोत्सवात सामील करून घेणारा उपक्रम म्हणजे भिंत रंगवणे.तुमच्या परिसराला कायम रंगांत रंगवून टाकणारा हा प्रयोग करून बघा!तुमच्या सोसायटीतील, वस्तीतील,आसपासची एखादी भिंत तुम्ही सारे मिळून रंगवायचे ठरवा. बघा, कशी मजा येईल! तुमची रंगपंचमी अगदी हटके होईल...
"कोणाकोणाला चित्र काढता येतात?" असं विचारलं तर चाळिसातले दहाच हात वर होतात. वय वर्षे १०-११ पर्यंत असलेली मुले बिनधास्त चित्रं काढतात, पण अकराव्या वर्षापुढे अशी कित्येक मुलं असतात ज्यांना काही कारणांनी चित्रकला आपल्याला येतच नाही असं वाटू लागतं.कारण चित्र म्हणजे काय,याची एक विशिष्ठ व्याख्या असते,असं त्यांना वाटतं.
त्यापलीकडे जायला त्यांना कोणीच प्रोत्साहन दिलेलं नसतं.चित्र म्हणजे नेमकं काय? फक्त दिसतं तसं काढता येणं? की रेघेबाहेर रंग न जाऊ देता रंगवणं? एखादा विषय त्यातून मांडणं? की मन प्रसन्न होईल अशा रंगांची रचना करणं? हे सर्व आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला जे काढता येतं आणि जे काढावंसं वाटतं ते काढणं म्हणजे सुद्धा चित्रच आहेत.चित्र ही दुसऱ्यांना दाखवण्यासाठी असलीच पाहिजेत असं नाही.
बाकीच्यांना आपली चित्र आवडलीच पाहिजेत असंही नाही. पण मुलानो,एक मात्र लक्षात ठेवायचं हं, कोणाच्याही चित्राला आपण नावं ठेवून त्यांचं खच्चीकरण करायचं नाही.असं मोकलं, प्रोत्साहन देणारं वातावरण जेव्हा मिळत, तेव्हा आपल्याला चित्रकलेतली खरी मौज कळते.चित्रं काढण्यातील मजा आपण बिनधास्त अनुभवू शकतो.
चित्र काढण्याचं स्वातंत्र्य देणारा एक सुंदर मार्ग म्हणजे भिंतीवरची चित्र. छोट्या कागदावर हाताची बोटं आणि मनगट वापरून चित्र काढण्यासाठी वेगळं कौशल्य लागतं,जे फारच कमी जण आत्मसात करू शकतात.पण भिंतीवरच्या चित्रांसाठी खांद्यापासून हात हलवावा लागतो, संपूर्ण शरीर वापरून चित्र काढावं लागतं.हे कौशल्य जवळ जवळ सर्वांमध्ये असतं. त्यासाठी हात खूप कुशल नसला तरी चालतं.त्यामुळे सर्व वयाची मुलं सहज भिंतीवर चित्र काढू शकतात.
या महिन्यात रंगांचा उत्सव आहे.तो साजरा करण्यासाठी तुमच्या आसपासची एखादी भिंत निवडा. तुमच्या गंगला बरोबर घ्या आणि भिंत रंगवण्याचा प्लान आखा.भिंतीवर चित्रं कसं साकारायचं बरं? -एखादं सोपं चित्र निवडायचं, ज्यात रंगसंगती आकर्षक असेल,रंग मिश्रणं करणं सोपं असेल, आकार फार आखीव रेखीव नसतील, थोडेसे ऐन वेळचे बदल ते चित्र सहज स्वीकारू शकेल आणि कमीत कमी क्लिष्टता असूनही पूर्ण झालेलं चित्र प्रसन्न वाटेल. यात आपण तीन भाग करू शकतो - पहिला भाग पार्श्वभूमी किंवा background, दुसरा मुख्य चित्राचा भाग किंवा foreground, ज्यात निवडलेला विषय दिसतो...
उदाहरणार्थ - झाडं, पानं इ., आणि तिसरा त्यातील बारकावे म्हणजे details जसं - आकारांच्या outlines, झाडांवरची फुलं, पक्षी इत्यादी.आपलं स्केच हे या तीन भागांत विभागलेलं असलं तर रंगकाम सुटसुटीत होतं.चित्र काढताना सहसा आधी background रंगवून घ्यावी, त्यावर foreground ची बाह्यरेखा काढून नंतर त्यात रंग भरावेत.रेषा काढताना काही चुका झाल्यास रंगवताना त्या झाकून टाकाव्यात. यासाठी तुमची कल्पकता (क्रिएटिव्हिटी) कामी येईल.आणि शेवटी बारकावे रंगवावेत.रंगकाम करताना पुरेसे विरोधी रंग वापरल्याने चित्र आकर्षक होतं.
चित्र तयार करण्याची प्रक्रिया जर आनंददायी झाली तर अंतिम चित्रही सुंदर होतं.त्यामुळे चित्र काढताना रुसवाफुगावी, रागवारागवी, दुसऱ्याच्या चित्राला किंवा चित्रपद्धतीला नावं ठेवणं, इतरांना चित्र काढू न देता फक्त स्वतःच चित्र काढत बसणं या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.तरच सगळ्यांनी मिळून चित्र तयार करण्यामधली ताकद आणि समाधान समजतं.टीमवर्क छान झालं की चित्रंही प्रसन्न होतं.
एरवी आपण एकेकटे चित्र काढतोच,पण इतरांना सामावून घेऊन, सर्वांच्या योगदानाला न्याय देऊन भिंतीवरची चित्र काढता येतात. त्यातली मजा वेगळी असते.जसं समूहगान असतं,समूहनृत्य असतं ना, तसंच हे समूहचित्र असतं. त्याची जादू,त्यातला जोष वेगळाच आहे.स्पर्धेच्या जगापासून दूर नेणारा हा अनुभव आहे.इथे कोणाशीच स्पर्धा नाही.उलट सर्वांनी एकमेकांचे हात धरून बरोबरीनं पुढे जायचं आहे आणि काहीतरी सुंदर निर्माण करायचं आहे. इतरांनाही आपल्याबरोबर प्रेरित करायचं आहे.
वेळेचं नियोजन योग्य पद्धतीने केलं तर ११ ते १६ वयोगटाचा साधारण ८ ते १० जणांचा गट एक मोठी भिंत- साधारण १० X १२ फूटांची भिंत, एका दिवसात पूर्ण रंगवू शकेल. जर बाहेरची ४ फुटी कंपाउंड वॉल असेल तर १५-२० फुटांहून जास्त लांबीही एका दिवसात पूर्ण होऊ शकते. एस्थेटिक म्हणजे सौंदर्यशास्त्राची जाण असणारं कोणी मार्गदर्शन करु शकलं तर चित्राला विशिष्ट दिशा मिळू शकते.पण मला असं वाटतं की प्रत्येक सामान्य माणसाचा स्वतःचा असा एक एस्थेटिक सेन्स असतो, जो शिक्षणामध्ये मागे पडतो. तो शोधून काढायलाही भित्तीचित्रांची मदत होऊ शकते.
हाताला व्यंग असणाऱ्या एका मुलानी तीन तास न कंटाळता भिंतीवरचं चित्र काढलं होतं.हात दुखला तरी त्याला थांबायचं नव्हतं.एका चित्रात हिरवळ, घर,झाडं काढायची ठरली, पण एका मुलीला मांजर काढावसं वाटलं आणि वेगळा विचार केला म्हणून आम्हीही तिचं कौतुक केलं.एका चित्रात ६ मुलींनी पिवळे, केशरी, गुलाबी आणि निळे आकाशाचे पट्टे रंगवून भिंत एकदम जिवंत केली.एकदा उंचावर हात पोचेना म्हणून लांब काठीला ब्रश लावून रंगकाम केलं.मोठ्यांनी मुलांवर आणि मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवला, तर खूप प्रभावी चित्रकाम होऊ शकतं.
दोन वर्षांपूर्वी पुण्यातील‘अक्षरनंदन’ शाळेत अशीच एक भिंत मुलांनी माझ्यासोबत रंगवली. भिंतीवर काय चित्र काढायला आवडेल याचं आपल्या आवडीचं स्केच प्रत्येकाने A4 कागदावर आधी काढलं.त्यात नवीन textures शोधायला सांगितली. ६ X ८ फुटी भिंतीवर काय चांगलं दिसेल याची पहिल्यांदाच कल्पना करत होते सगळे. त्यामुळे एकच मोठा रंगीत पक्षी, समुद्र किनारा, हिरवेगार डोंगर, विमान, निसर्गाचा देखावा अशी बरीच स्केचेस तयार झाली.
छोट्या कागदावर जे चांगलं दिसतं ते मोठ्या भिंतीवर चांगलं दिसेलच असं नाही, याचा प्रत्यक्ष अनुभव मुलांनी घेतला.सर्वसंमतीने एक स्केच पक्कं केलं आणि कागदावरच्या स्केचवर १ X १ इंचाच्या चौकटी काढल्या.भिंतीवर १ X १ फुटाच्या चौकटी काढल्या आणि प्रत्येक १ इंच चौकटीतील चित्र १ फुट चौकोनात enlarge केलं.गरजेप्रमाणे थोडे बदलही केले.आठ मुलं साधारण तासभर सलग काम करायची आणि मग पुढची आठ मुलं यायची, त्यामुळे चित्राजवळ गर्दी न होता सर्वांना चित्र काढायला वाव मिळाला.टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करताना फक्त बोटं वापरून काहीजणींनी पाच वेगवेगळ्या प्रकारची textures शोधून काढली.कुठे रंगाचे ओघळ आले, कुठे वेगळ्या रंगाची बोटं लागली तर त्याचंच रुपांतर texture मध्ये केलं. कुठलेही रंग एकमेकांशेजारी सुंदर दिसू शकतात, या निष्कर्षाला मुलं आली.
एकाच रंगाच्या दोन छटा वापरणं,रंग मिश्रणं तयार करणं,डब्यात रंग कालवताना तयार होणारे आकार बघणं,केवढा आकार रंगवायला किती रंग कालवला पाहिजे याचा अंदाज घेणं,या सर्वांतून मुलांचा आत्मविश्वास वाढत होता.ठरवलेल्या स्केचपेक्षा अंतिम चित्र थोडं वेगळं झालं,तरीही ते सुंदर होऊ शकतं,हा महत्त्वाचा धडा आम्ही घेतला.
रंगपंचमीला रंग अंगाला लावून पाण्याची नासाडी करण्यापेक्षा भिंती रंगवल्या तर? हा उपक्रम तुमच्या घरामध्ये,सोसायटीमध्ये किंवा शाळेमध्येही घेता येईल. शाळेतल्या भिंती केवढ्या जिवंत,तजेलदार होतील मुलांच्या चित्रांनी!यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स-
एक अट- मोठ्या माणसांनी मुलांना भिंतीवर कुठली चित्र आवडतात याचे निर्णय परस्पर घ्यायचे नाहीत. चित्राच्या निवडीचं स्वातंत्र्य त्यांनी तुम्हा मुलांना दिलं पाहिजे.
आखीव-रेखीव, प्रमाणबद्ध, वास्तववादी आणि आदर्श चित्रांचे धडे देणारी ठराविक आकाराची झाडं,प्राणी,पक्षी,कार्टून्स काढायची नाहीत.
काय वेगळ काढता येई आणि कसं,याचा नीट विचार करायचा.
सोपी चित्र निवडायची.रंगवण्यासाठी मुलांनी स्वतःचं कौशल्य वापरायचं.
रंगवण्याच्या प्रक्रियेचा आस्वाद घेता येईल अशी चित्रनिर्मिती भिंतींवर झाली पाहिजे.त्यामुळे हे असंच हवं,असा अट्टहास धरायचा नाही.
Background साठी निळ्या रंगाच्या ४ ते ५ छटा वापरून सुंदर रचना करता येऊ शकते.झाड हा एक इतका विलक्षण स्वातंत्र्य देणारा आकार आहे की ते कसंही काढलं तरी सुंदर दिसतंच.कधी पानं चौकोनी, कधी त्रिकोणी,कधी गोल काढायची ठरवली तरी ते झाड सुंदरच दिसणार.
बिनधास्त रंगवा.पणे म्हणजे हिरवीच,अशी शिस्त पाळलीच पाहिजे असं नाही.पानाचे रंग कुठलेही असू शकतात- हिरवे,पिवळे,लाल,केशरी अगदी निळेसुद्धा.मोठ्या ब्रशचा चपटा भाग,त्याची कड,कधी पुढची बाजू, कधी फक्त टोक असे विविध भाग कुशलतेने वापरले तर कितीतरी प्रकारची चित्र तयार होऊ शकतात.
आतील भिंतीवर चित्र काढण्यासाठी emulsion तर बाहेरील भिंतीवर चित्र काढण्यासाठी apex रंग वापरावेत. हे रंग एक लिटरच्या डब्यात विकत घ्यावे लागतात.त्यातून रंगछटा तयार करायच्या. Hardware च्या किंवा रंगाच्याच दुकानात एक इंची,दोन इंची चपटे ब्रश मिळतात ते मोठ्या रंगलेपनासाठी वापरायचे आणि छोटे ८ किंवा १० नंबरचे साधे स्वस्त ब्रश बारीक कामासाठी.या रंगांत पाणी फार मिसळायचं नाही.
पाचवी ते दहावीतील मुलांना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायची उत्सुकता असते.न पटलेली गोष्ट व्यक्त करायची इच्छा असते.न बिचकता नवीन काही अजमावण्याच धाडस त्यांना करायचं असतं.सामाजिक भान येऊ लागलेलं असतं.मोठेपणी काय करायचं आहे,याचा विचार सुरू झालेला असतो.विरोध व्यक्त करून प्रश्न विचारायची गरज भासत असते.एकावेळी जास्त जबाबदाऱ्या उचलण्यासाठी तयारी होऊ लागलेली असते.या वयातील आवेग आणि उर्जा यांना योग्य दिशा देण्यासाठी अशी भित्तीचित्र खूप काही देऊ बघतात.
मग,बघणार ना करून भिंतीवरचं चित्र?
-आभा भागवत