Menu

भारताचे ‘चांद्रयान-३’ सज्ज!

image By Wayam Magazine 07 July 2023

भारत आता पुन्हा चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचे ‘चांद्रयान-३’ १४ जुलैला चंद्राकडे झेपावेल, असे ‘इस्रो’ने जाहीर केले आहे.  

चांद्रयान-२ संदर्भात ‘वयम्’ मासिकात श्रीराम शिधये यांची लेखमाला २०१९ मध्ये प्रसिद्ध झाली होती.  त्याची थोडक्यात उजळणी करूया. चांद्रयान-२ ने २२ जुलै २०१९ ला अवकाशात झेप घेतली होती. भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) आपलं यान चंद्राच्या मार्गावर सोडण्यासाठी लांब वळणाचा मार्ग निवडला होता. त्यामुळे यानाला हव्या त्या दिशेनं मार्गस्थ करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा उपयोग करून घेता येणार होता. यान चंद्राजवळ पोचल्यानंतरसुद्धा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून यान चंद्राच्या कक्षेत नेण्यात येईल, अशी ‘इस्रो’ची योजना होती. यान चंद्रावर पोचताच ऑर्बिटरसोबतच विक्रम नावाचं लँडर यान चंद्रावर उतरेल आणि त्या यानातला ‘प्रज्ञान रोव्हर’ चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करेल, अशी योजना होती. पण ६ सप्टेंबर २०१९ रोजी चंद्रावर उलगद उतरण्याच्या प्रयत्नात असतानाच विक्रम लँडर सोबतचा संपर्क तुटला. अनपेक्षितपणे त्याची स्थिती 'खाली डोकं, वर पाय’अशी झाली. परिणामी, प्रज्वलित केलेल्या बूस्टरने त्याचा वेग कमी होण्याच्या ऐवजी वाढला आणि चंद्रावर अलगदपणे उतरण्याच्या ऐवजी तो वेगाने जाऊन आदळला. त्यामुळे चांद्रयान-२ ही मोहीम अयशस्वी ठरली.

ज्यांनी तेव्हा ही घटना स्क्रीनवर पाहिली असेल, त्यांना आठवत असेल की भारतीय शास्त्रज्ञ किती दु:खी झाले होते त्या क्षणी आणि आपल्यालाही किती वाईट वाटले होते! अर्थात, एवढ्या मोठ्ठ्या मोहिमांत कसून प्रयत्न करूनही असे अपयश येऊ शकते. मात्र त्या अपयशाने खचून न जाता ‘इस्रो’ने पुन्हा नव्या मोहिमेची तयारी केली.   

चंद्रावर पाणी आहे का, तिथल्या भूमीमध्ये कोणती रासायनिक मूलद्रव्यं आहेत, चंद्राचा अंतर्भाग कशाचा बनला आहे, तिथं हिलियम-३चे एकस्थ (आयसोटोप्स) आहेत का, असे अनेक शोध आता नव्याने घेतले जाणार आहेत. हिलियम-३ हा भविष्यातील ऊर्जा तयार करण्यासाठी महत्त्वाचा आहे. चंद्राचं स्वरूप अधिक स्पष्ट करण्याचं काम या मोहिमेमधून होणार आहे. चांद्रयान-३ मुळे आपल्याला नवीन माहिती काय मिळणार, याची आपण उत्सुकतेनं वाट पाहू या. त्याबद्दल तुम्हाला 'वयम्' मासिकात वेळोवेळी वाचायला मिळेलच.  

My Cart
Empty Cart

Loading...