असे वाटते पुन्हा एकदा बालवायचे होऊन जावे
आजीच्या कंपित हाताला लगडून पुन्हा कृतार्थ व्हावे
पुन्हा एकदा बोक्या, चिंटू कुठे हरवली साद दिसावी
टवकारून मग कान दिशेने काम हातचे सोडून द्यावे
बाबाच्या बळकट बाहुवर पुन्हा एकदा झोकून आणिक
कोकणच्या त्या निळ्या सागरी हवे तेव्हढे मी डुंबावे
कथा अपुरी ठेवून गेले कुठे कळेना अण्णा अमुचे
अधुऱ्या गोष्टीतील राजासम पुन्हा एकदा ढुंडित जावे
आई येई, पहाट घाई, उठवाया परी मी न उठावे
शाळेची ती टमटम जाता, पुन्हा एकदा सुखी निजावे
खेळ असावे मैदानी ते, अन् काढावी खोड मिनेची
रडता रडता ती जाता, मी पुन्हा एकदा विजयी हसावे
पुन्हा एकदा 'शुभंकरोती कल्याणम्' मी गात रहावे
प्रसाद येता गोड शिऱ्याचा दोन्ही हातांनी तो खावे
कपिलेचे ते शुभ्र वासरु येता मी का मान डुलवते?
मामाला हे प्रश्न विचारून कोड्यामध्ये पुन्हा पडावे
शेणाचाही वास सुखावा देऊन जातो अंगणात या
सदाफुलीचे फुल पसरले पुन्हा एकदा मी वेचावे
कसे कळेना रस्ता भटकत मी आलो या भयाण जागी
शहर बापडे म्हणता याला गाव असे का संथ दुरावे
-आदित्य दवणे
***