Menu

कारवनी

image By Wayam Magazine 14 September 2023

शेती-मातीतला बैलांचा उत्सव म्हणजे कारवनी. मातीत राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे कारवनी. शेती बैलांच्या मेहनतीवर फुलत असते. म्हणून बैल शेतकऱ्यांना पूजनीय असतात आणि शेतकरीही बैलांची मनोभावे पूजा करतात. 
‘कारवनी’ हा ‘कारहुणवी’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. कारहुणवी म्हणजे व्रषभपूजन. कारवणी हा सण महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. आंध्रप्रदेश आणि कर्नाटकचा हा मुख्य सण आहे. महाराष्ट्रातील इतर भागात कारवणी हा सण ‘बैलपोळा’ म्हणून साजरा होतो. पण कारवनी साजरा करणारे महाराष्ट्रातील लोक बैलपोळा साजरा करीत नाहीत.
ज्येष्ठ पौर्णिमेला कारवनी साजरी केली जाते. उन्हाळ्यात उन्हाने रानं चांगली तापलेली असतात. मग जूनमध्ये पावसाला सुरुवात होते आणि तापलेली रानं पावसाने भिजून तप्त होतात. शेतकरी पेरणीसाठी सज्ज होतात. एवढ्यात येते कारवनी. कारवनीला बैलांची पूजा करतात. आणि पेरणीला सुरुवात करतात. वटपौर्णिमेदिवशीच कारवनी असते.
या दिवशी बैल आणि शेतकऱ्यांकडे असणाऱ्या सर्वच पशूंची यादिवशी पूजा केली जाते. आदल्या दिवसापासूनच कारवनीची तयारी सुरू होते. पाऊस पडल्याने आधीच शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आणि कारवनीनंतर पेरणीला सुरुवात करायची असते म्हणून लगबगही असते. बैलांना सजवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आदल्यादिवशीच आणून ठेवले जाते. 
कारवनीदिवशी सकाळी लवकर नदीवर, ओढ्यावर किंवा विहिरीवर बैलांना आणले जाते. त्यांना स्वच्छ आंघोळ घातली जाते. मुलं या दिवशी मोठ्या उत्साहात असतात. एखादं वासरू घरी असेल तर त्याला अंघोळ घालण्याची जबाबदारी मुलं आनंदाने पार पाडतात. स्वतः त्यांना सजवतातही. बैलांना अंघोळ घालून घराकडे आणले जाते. घरापुढे अंगणात मग बैलांना सजवण्याचे काम सुरू होते. गावातील प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे आपल्या बैलांना मस्त सजवत असतो.
बैलांच्या खांद्यावर जिथे जू ठेवला जातो तिथे हळद व तूप किंवा तेलाने चोळले जाते. याला खंडमळण्या (खांदेमळणी) म्हणतात. या दिवशी बैलांना कसलेही काम लावले जात नाही. त्यांना रागावले किंवा मारलेही जात नाही. 
छान रंगाने बैलांची शिंगे रंगवली जातात. त्यावर रंगीबेरंगी बेगडही लावले जाते. शिंगाच्या टोकाला गोल गोंडे बांधले जातात. गळ्यात घुंगुरमाळा, कवड्याच्या माळा घातल्या जातात. गळ्यात गोल गोंड्याची दोरीही बांधली जाते. डोक्याला बाशिंग बांधले जाते. नवीन वेसण घातली जाते. बैलांचे अंग वेगवेगळ्या रंगाने रंगवले जाते. वेगवेगळी नक्षी काढली जाते. वरून रंगीबेरंगी नक्षीदार झूल घातली जाते. पायात चांदीचे अथवा पंचधातूचे व तसेच करदोऱ्याचे तोडे घातले जातात. शिंगाला, झूलीला, पायाला फुगे बांधले जातात. 
बैलांसोबतच घरातील गाय, म्हैस, वासरू, शेळी यांनाही या दिवशी सजवले जाते. सजवल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलांसह सर्वांचीच पूजा केली जाते. पूजा करताना सर्वांना ओळीने एकाच दावणीला बांधले जाते. घरातील स्त्रिया आरती ओवाळून सर्वांची यथासांग पूजा करतात. पुरणपोळी खायला घालतात. गव्हाच्या पिठात गूळ घालून केलेले गोड कडबोळे शिंगांमध्ये घालतात. यावेळी शेतात काम करणाऱ्या सालगड्यास नवीन कपडे दिले जातात.
दुपारनंतर सजलेल्या बैलांची गावातून मिरवणूक काढली जाते. मिरवणूक गावच्या वेशीपासून किंवा मारुतीच्या मंदिरापासून काढली जाते. सर्व बैलजोड्या वेशीपाशी जमा होतात. गावातील मानकऱ्याची बैलजोडी सगळ्यात पुढे असते. वेशीला आंब्यांच्या पानांचे मोठे तोरण बांधले जाते. मानाचे बैल शिंगांनी तोरण तोडतात आणि मिरवणुकीला सुरुवात होते. 
ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघते. सजलेल्या बैलांची मिरवणूक बघण्यासाठी सारा गाव आलेला असतो. मिरवणुकीत बैलांवर चुरमुरे, गूळ-खोबरे यांची उधळण केली जाते. पैसेही उधळले जातात. सर्वात जास्त कोणाची बैलजोडी शोभून दिसते आहे, हे दाखवण्याची चढाओढ लागलेली असते. आपापल्या बैलजोडीच्या समोर छोटी मुलं, तरुण मुलं ढोल-ताशाच्या तालावर नाचत असतात. गुलाल उधळत असतात. 
मातीत राबताना आपल्याला साथ देणाऱ्या बैलांचा हा उत्सव शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. बैलांच्या उपकाराची जाणीव ठेवतात. वर्षातील एक दिवस का होईना, बैलांना गोडधोड खाऊ घालून त्यांचा सन्मान करतात आणि त्याच्या सोबतीनं वर्षभर काळ्या रानात सोनं पिकवत असतात आणि दोघं मिळून जगाची भूक भागवत असतात.

- बालाजी मदन इंगळे

                                  ***
My Cart
Empty Cart

Loading...