Menu

‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 16

image By Wayam Magazine 20 October 2022

तीव्र संवेदनशीलता

नवनवीन पदार्थ खायला कुणाला आवडत नाही? मुलांना तर वेगवेगळं, चटकदार खायला हवच असतं ना! मात्र सध्याच्या परिस्थितीत आपण गरजा आणि चैन यांतील फरक समजून घेतला पाहिजे, याची जाणीव या मुलांनाही लख्खकन् झाली! मुलांची संवेदनशीलता किती तीव्र आहे बघा!! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा या मुलांनी करोना-काळात कित्ती गोष्टी करून पाहिल्या...

आज वाचा भाग- 16.

1. मर्यादित गरजांची जाण

नुकतीच मी ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘अपूर्वाई’ ही दोन पुस्तकं वाचली. शिवाय, पु. ल. देशपांडे यांचं अभिवाचनही ऐकलं. त्यामुळे त्यांच्या लेखनाची मजा द्विगुणीत झाली. आईला आणि मला नाटकांचा भारी नाद. यूट्यूबवर ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’, ‘यदाकदाचित’ आणि ‘बटाट्याची चाळ’ ही गाजलेली नाटकं पाहिली आणि मराठी साहित्याच्या प्रेमातच पडले.

सध्या मी ऑनलाइन वेबसाईट, यूट्यूबच्या माध्यमातून जपानी भाषा शिकत आहे. शिवाय मला पेंट प्रोग्रॅमवर चित्रं काढायला आवडतात.

या सुट्टीत काही नवीन चांगल्या सवयी लावून घेतल्या. रोज न चुकता व्यायाम आणि प्राणायाम करू लागले. दररोज तिन्हीसांजेला सहकुटुंब रामरक्षा, गणपती अथर्वशीर्ष अशी स्तोत्रं म्हटल्यामुळे मनाला अगदी प्रसन्न वाटतं.

शिवाय आईकडून आप्पे, इडली-सांबार, फ्राइड राईस, केक आणि रोजचा स्वयंपाक शिकून घेतला. आपल्या गरजा किती नाममात्र आहेत आणि आपण किती अनावश्यक गोष्टींच्या मागे लागतो, याची जाणीव झाली. घरातील कुटुंबीयांशी जवळीक वाढली.

निसर्गदेखील संधीचं सोनं करत स्वतःला झालेल्या जखमा भरून काढत आहे. ही जागतिक आपत्ती दूर झाली की, पृथ्वीचे नवे रूप कसे असेल, हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. तोवर घरीच बसून सकारात्मक राहणे हेच कर्तव्य आहे.

-अपूर्वा कुलकर्णी, १०वी,
आय.ई.एस चंद्रकांत पाटकर विद्यालय, डोंबिवली पूर्व.

२. अन्न जपून वापरावे, ही जाणीव!

सुरुवातीला प्रश्न पडला की, या आगळया सुट्टीत नेमकं करायचं तरी काय? मग मी एक वेळापत्रक तयार केलं आणि कंटाळा येणं बंद झालं. विकत घेतलेली पुस्तके, बक्षीस म्हणून मिळालेली सगळी पुस्तकं बाहेर काढली. रोज दोन तास वाचन सुरू केलं. मी मोठयाने वाचायला लागले की घरातले सगळे टक लावून पूर्ण गोष्ट ऐकतात...कधी घरात हास्याचा कल्लोळ होतो तर कधी सगळे अवाक् होऊन जातात. पुस्तकांची ही किमया आहे!

या काळात रोज एक चित्र काढायला सुरुवात केली आणि आईबाबांची शाबासकी मिळवली, हा या सुटीतला आनंद!

घरातल्या सगळ्यांना सुट्टी असली तरी आईला कामातून कधीच सुट्टी नसते, हे नव्याने जाणवलं. मग थोडीफार मदत करू लागले.

पूर्वी दररोजच्या धावपळीमुळे रात्री कुणाशीही संवाद न साधताच झोप यायची, पण आता आजीची गोष्ट ऐकल्याशिवाय झोपत नाही.

कधीकधी मनात येतं की, आपण नवनवीन पदार्थ बनवून खाऊ शकतो. पण मग डोळ्यांसमोर येतात ते जगात बळी गेलेले रुग्ण, सर्व डॉक्टर, नर्स, सफाईकामगार, पोलीस, नेते, शास्त्रज्ञ आणि त्यांची चाललेली धडपड... हे सर्व आठवल्यानंतर वाटतं की, आपण जर आता गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य वापरलं आणि त्यांना पुरेसं मिळालं नाही तर..?

करोना या महाभयंकर रोगावर लस लवकरात लवकर मिळेल, या आशेने रोज उद्याचा दिवस उजाडायची वाट पाहतेय.

-आकांक्षा संपत चिकणे,
नंदादीप विद्यालय, गोरेगाव (पू)

३. बहिणीला समजून घेतले

या सुट्टीत बुद्धिबळ, पत्त्यांचे घर करणे अशा घरगुती खेळांत रमले. असे खेळ माझ्या लहान बहिणीसोबत खेळायला खूप मजा आली. तिला चालता येत नाही. जेव्हा ती सहा-सात महिन्यांची होती, तेव्हा तिला मेंदूचा पक्षाघात झाला. तिला तिचे शरीर बॅलन्स करता येत नाही. पण तिची बुद्धी एक नंबर आहे. अशी ही माझी बहीण किरण. तिने आणि मी दोघींनी मिळून चित्रे रंगवली. तिच्यासोबत घालवलेला वेळ मला अनमोल वाटला.

४. चित्रकलेशी मैत्री

वेगवेगळे नवे अनुभव घेता आले या काळात. रोज मी पेटीवर एक गाणं वाजवायचा प्रयत्न करू लागलो. चित्रकला आणि हस्तकला हे विषय शाळेत शिकताना मला त्यामध्ये रस वाटला नव्हता, पण आता घरी बसल्या बसल्या निरनिराळी चित्रं काढून रंगवू लागलो आणि मला त्यात रस निर्माण झाला. आमच्या घरासमोर मोठी झाडी आहे, तिथे अनेक पक्षी राहतात, त्यांचे निरीक्षण करू लागलो.

मी माझ्या आजीबरोबर रोज कॅरम खेळू लागलो. आई-वडील घरीच असल्यामुळे त्यांच्या सोबत खूप गप्पा मारता आल्या. आईला घरकामात मदत करू लागलो. पण आता मात्र कधी एकदा मैदानावर जाऊन मित्रांसोबत खूप खेळता येईल, असे वाटत आहे.

-ऋषिल पाटील, सातवी,
भुवनेश किर्तने विद्यालय, माहीम


जून २०२० ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...