
14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते. अस्पृश्यतानिवारणाचं थोर कार्य हाती घेऊन दलितांचा खऱ्या अर्थाने उध्दारक ठरलेला महामानव म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर. भारताची अतुलनीय राज्यघटना त्यांनी लिहिली. अभ्यासातील सातत्य आणि तल्लख बुध्दिमत्ता लाभलेला हा ज्ञानयोगी. ते उत्तम कायदेपंडित तर होतेच, परंतु त्याचबरोबर ते उत्कृष्ट भाषातज्ज्ञही होते. संस्कृत हीच भारताची राष्ट्रभाषा असावी, असा आग्रह त्यांनी धरला होता. हा मुद्दा चर्चेसाठी उपस्थित करण्यात आला,तेव्ह श्रीयुत मैत्र या विद्वानांनी त्यासंबंधीच्या अनेक शंका त्यांना संस्कृतमधून विचारल्या. आणि बाबासाहेबांनी तेवढ्याच बिनतोडपणे अस्खलित संस्कृतमधून आपल्या निश्चयी खणखणीत आवाजात या शंकांचं निरसन केलं. त्यांचा संस्कृतमधील तो संवाद तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनीच ऐकला. श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. सभागार अवाक् झालं होतं. तर असे हे बाबासाहेबांचे भाषाप्रेम.
-मंजिरी हसबनीस