Menu

काय फरक पडतो व्यायामाने?

image By Wayam Magazine 21 June 2023

 “अरे मधू, कुठे पळतोयस? हा मुलगा जरा एकाजागी बसत नाही! सतत दोस्तांबरोबर धावपळ करायला पाहिजे!” आजोबा लहान होते तेव्हा पणजी वैतागून म्हणायची! त्या काळातली मुलं शाळा-अभ्यास-परवचा आणि अंघोळ-जेवण इतकं सोडलं तर एरवी जागेपणीचा सगळा वेळ लंगडी, लगोरी, पकडापकडी वगैरे धावपळीचे खेळ खेळायला  घराबाहेरच असायची. दिवसभरात चारपाच तास सहज भरपूर शारीरिक श्रमांचा व्यायाम घडायचा. सगळी आजी-आजोबामंडळी छान काटक होती आणि म्हातारपणीसुद्धा ठणठणीत राहिली

तीस वर्षांपूर्वी कॉम्प्युटरचे बैठे खेळ आले आणि आताची डॅडी, पप्पा, बाबा वगैरे मंडळी बालपणातच खुर्चीला खिळली. आजीआजोबांनी कौतुकाने त्यांना टेनिस-बॅडमिंटनला, पोहायला पाठवलं. पण त्यातून फारतर तासभर व्यायाम, तोसुद्धा आठवड्यातून दोन-तीनच दिवस पदरात पडला. घरात बसल्याबसल्या खाणंही वाढलं. आजोबांच्या पिढीच्या मानाने बाबांची पिढी अधिक गुटगुटीत झाली. मोठेपणी त्यांना मधुमेह, ब्लड प्रेशर, हार्टचे आजार यांनी अधिक त्रास दिला.     

इतका फरक पडतो का व्यायामाने

लहान वयात केलेला व्यायाम ही पुढच्या आयुष्यासाठी आपल्याच शरीरात, बुद्धीत, व्यक्तिमत्त्वात केलेली इनव्हेस्टमेंट असते

व्यायामामुळे शरीराची वाढ उत्तम होते. स्नायू आणि हाडं यांची जडणघडण जशी हवी तशी होते. प्रत्येकाच्या उंचीला आनुवांशिक मर्यादा असते. व्यायाम केल्याने आपली उंची त्या जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत वाढू शकते. वजनं उचलून, उठाबशा-दंड काढून सगळे स्नायू बळकट आणि हाडं मजबूत होतात. लहानपणी दंडावर बेटकुळी येत नाही. पण हाडांतलं कॅल्शियमचं वाढलेलं प्रमाण मोठेपणीही टिकून राहातं, फ्रॅक्चर व्हायची शक्यता कमी होते

धावणं, पळणं, पोहणं वगैरे एरोबिक व्यायामांमुळे अन्नातला बराचसा भाग व्यायामासाठी वापरला जातो, त्याचं चरबीत रूपांतर होत नाही आणि लठ्ठपणा टळतो. त्यामुळे मधुमेह, ब्लड प्रेशर आणि हार्टच्या कटकटी कमी होतात किंवा टळतातइतकंच नाही तर हृदयाला, फुप्फुसांना रक्त आणि प्राणवायूसुद्धा अधिक प्रमाणात पोचतो. कुठलंही काम करायची आपली ताकद वाढते

सूर्यनमस्कार,योगासनं वगैरेंनी लवचिकपणा वाढतो, स्नायू ताणले जातात, बरं वाटतं. ताडासनासारख्या व्यायामांनी तोल सावरणं, कणा ताठ ठेवणं सोपं होतं. मग शरीर अधिक डौलदार दिसतं. त्याने आत्मविश्वासही वाढतो. शिवाय तसे व्यायाम करणाऱ्यांना कॉम्प्युटरसमोर काम करताना पाठीची, मानेची दुखणी, थकवा, डोकेदुखी त्रास देत नाहीत. एकाग्रतेने काम करता येतं.  

लिहिणं, चित्र काढणं, कातरकाम करणं, वाळूचे, मातीचे किल्ले बांधणं हा हाताच्या छोट्या स्नायूंचा लहानपणी केलेला व्यायाम भावी कलाकार घडवायला महत्त्वाचा असतो.  

क्रिकेट, फुटबॉल, कबड्डीसारखे सांघिक खेळ खेळताना प्रतिस्पर्ध्यांचे प्रत्येक क्षणाला बदलणारे डावपेच ओळखून त्यांच्यावर मात करायला आपलं धोरण आखावं लागतं. ते धोरण संपूर्ण संघाच्या एकमताने अमलात आणताना एकदिलाने काम करायची, सहकार्याची कुवतही पणाला लागते. पटापट योग्य निर्णय घ्यायची सवय लागते. शक्ती, कौशल्य आणि बुद्धी कसाला लागते. ते सगळे गुण कुठल्याही आव्हानाला तोंड देताना, संकटाला सामोरं जाताना कामाला येतात, जिंकायला मदत करतातशिवाय एकत्र खेळल्यामुळे अनेक जिवाभावाचे दोस्त जोडले जातात ते वेगळंच!

शिकागोच्या उपनगरातल्या एका शाळेत संशोधकांनी एक अभिनव प्रयोग केला. त्यांनी लागोपाठ काही दिवस काही मुलांची वाचनाची आणि गणिताची परीक्षा घेतली. नंतरचे काही दिवस त्याच मुलांना रोज सकाळी भरपूर धावायला, पळायला लावलं आणि दर दिवशी पुन्हा तशाच परीक्षा घेतल्या. त्या व्यायामानंतर मुलांना वाचनात दुप्पट मार्क मिळाले आणि गणिताच्या मार्कांमध्ये २०% सुधारणा झाली. नुसतं ट्रेडमिलवर अर्धा तास धावलं तरी गणितं सोडवायची कुवत ३०%नी सुधारते असंही त्या प्रयोगात दिसून आलं.  

मग शास्त्रज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्याच्यामागची कारणं शोधली

व्यायाम करताना आपल्याच स्नायूंशी, सांध्यांशी आपली नव्याने ओळख होते. त्यांचं एकमेकांशी होणारं संगनमत, त्यामुळे सहज सांभाळला जाणारा तोल, सुरळीत होणाऱ्या हालचाली या सगळ्यांचं भान येतं. त्या हालचाली घडवून आणणाऱ्या मेंदूचा आकार, त्याच्यातल्या पेशींची संख्या आणि त्यांचं एकमेकींशी होणारं संभाषण वाढतं. म्हणजेच बुद्धिमत्ता वाढते. एरोबिक व्यायामामुळे मेंदूकडचा रक्तपुरवठा वाढतो. चॉकलेट खाल्ल्यानंतर ज्या  आनंददायी रसायनांचं प्रमाण मेंदूत वाढतं त्याच रसायनांची व्यायामानंतरही तिथे रेलचेल होते. मेंदूतल्या सतत तक्रारच करणाऱ्या, रडव्या केंद्राचं काम व्यायामामुळे घटतं. ताणतणाव कमी होतात. मेंदू अधिक उत्साहाने काम करतो. म्हणूनच जी मुलं नियमितपणे व्यायाम करतात त्यांना अभ्यासातही अधिक यश मिळतं

तो अभ्यासातला फायदा दरदिवशी ३० मिनिटं जोराचा व्यायाम केला तरी होतो. पण खऱ्या फायद्यासाठी रोजचा कमीत कमी तासभर तरी व्यायाम करायला हवा. त्याहून जास्त केला तर उत्तम. त्याच्यात धावपळीचे, पोहायचे एरोबिक व्यायाम हवेत, स्नायूंची, सांध्यांची ताकद वाढवणारे, वजनं उचलायचेही हवेत आणि शिवाय तोल सांभाळायला आणि लवचीकपणाला मदत करणारे प्रकारसुद्धा हवेत.  

पण २०१९च्या मार्चपासून आपण सगळे घरकोंबडे झालोय. कसला व्यायाम आणि कसले खेळ! जगभरातल्या मुलांची आणि आईबाबांचीही वजनं वाढली आहेत, पोटं सुटली आहेत, ताकद कमी झाली आहे. घरच्या घरी कसा करायचा व्यायाम? म्हणून आता सगळ्यांनी मिळूनच तो प्रॉब्लेम सोडवायचा आहे.

इच्छा असली तर मार्ग मिळतोच! आचार्य विनोबा भावे तुरुंगाच्या लहानशा कोठडीत मागेपुढे चालून प्रकृती ठणठणीत ठेवत. आपलं घर त्याच्याहून मोठंच असतं. घरातल्या सर्वात मोठ्या खोलीतलं सामान सरकवून तिथे जमिनीचा सलग पट्टा मोकळा करून घ्यावा आणि प्रत्येकाने पाळीपाळीने तिथे शतपावली घालावी. जमेल तेवढं वेगाने चालावं. चालताचालता गप्पा मारता आल्या, पण गाणं म्हणता आलं नाही की आपला चालायचा वेग परफ़ेक्ट समजायचा! युट्यूबवर एरोबिक आणि विविध प्रकारच्या व्यायामाचे मार्गदर्शक व्हिडिओ असतात. ते वापरून व्यायाम करता येतो

तुम्ही आवडेल तो व्यायाम नियमित करायला सुरुवात करा आणि बघा काय फरक पडतो ते!

भाजी निवडणं, चिरणं, भांडी घासणं वगैरे घरातली कामं नुसत्या कष्टाची असतात. त्यांनी व्यायाम होत नाही. पण वाकून कचरा काढणं, जमीन पुसणं, जड सामानाची, पिशव्यांची  हलवाहालव करणं, लांबरुंद आणि जड चादरींच्या घड्या करणं वगैरे अंगमेहनतीची कामं मुलांनी आईबाबांच्या बरोबर गप्पा मारतामारता करावी. योगासनं तर कुठेही करता येतात

त्या साऱ्याचं वेळापत्रक ठरवावं. म्हणजे अभ्यास-ऑफिस सांभाळून नियमितपणे सगळ्या प्रकारचा पुरेसा व्यायाम केल्याचं पुण्य लाभेल

व्यायामाचा कंटाळा घालवायचे उपाय शोधावेत. ते पोरकट वाटतील, मात्र त्यांच्यामुळे व्यायाम मजेत, हसतखेळत  होईल. घरातल्या माणसांत व्यायामाची स्पर्धा ठेवावी. आठवडाभर रोज दहा हजार पावलं पुरी करणाऱ्याला एक चॉकलेट बक्षीस द्यावं. पण त्याशिवाय सगळ्यांनी मिळून गाणी म्हणावी. आवडतील त्या गाणी-कविता सगळ्यांनी मजेत एकत्र गाव्या आणि त्या तालावर झुकून-वाकून, हातपाय हालवून, सगळ्यांनी मिळून नाच करावा. मेंदूला चालना द्यायला सांघिक नाचासारखा दुसरा व्यायाम नाही. हल्ली मुली क्रिकेट, फुटबॉल खेळतात. मग मुलांनी मंगळागौरीचे, भोंडल्याचे खेळ का खेळू नयेत? झिम्मा, फुगडी, पिंगा, कोंबडा हे मजेचे खेळ मुलांसाठी देखील उत्तम व्यायाम आहेत

सगळ्यांनी मिळून तशी धम्माल केल्यामुळे व्यायाम तर होईलच, शिवाय घरकोंबडेपणाचा कंटाळा पळून जाईल आणि आईबाबांची बाळांशी मस्त नवी गट्टी होईल

-डॉ. उज्ज्वला दळवी 

My Cart
Empty Cart

Loading...