Menu

हसायचं कशासाठी?

image By Wayam Magazine 01 July 2023

शाळेत दोन नवी मुलं आली. विहान तिरसट. तो एकलकोंडा होता. रिया हसरी. तिच्या हसर्‍या चेहर्‍यामुळे तिची सगळ्यांशी दोस्ती झाली.

अशी काय जादू असते हसण्यात? 

मनापासून हसताना चेहऱ्याच्या प्रत्येक बाजूचे दोन मुख्य स्नायू काम करतात. गालफडाच्या हाडांपासून जिवणीच्या कोपऱ्यापर्यंत जाणाऱ्या स्नायूमुळे ओठांचे कोपरे वर उचलले जातात, दंतपंक्ती चमकतात, गालांचा वरचा भाग उचलला जातो. त्याच स्नायूच्या जिवणीच्या वर आणि खाली जाणाऱ्या दोन भागांत थोडं अंतर असलं तर तिथे खळी पडते. डोळ्याभोवतालच्या वर्तुळाकार स्नायूच्या आकुंचनामुळे डोळे थोडेसे बारीक होतात आणि त्यांच्या कोपऱ्यापाशी हसर्‍या चुण्या पडतात. तशा हसण्यातून मनाचा सच्चेपणा, दिलदारपणा आणि आपुलकी दिसून येते.

आपल्याशी कुणी तसं मनापासून हसलं की, आपल्या मेंदूच्या पुढच्या भागातल्या, दाद देणाऱ्या मज्जापेशी (Mirror neurons) उत्स्फूर्तपणे आपल्याही चेहऱ्यावर तसंच हसू फुलवतात.

हसण्याशी संबंध असलेलं मज्जाकेंद्र मेंदूच्या मधल्या पृष्ठभागावरच्या वळकटीत असतं.  त्या वळकटीतल्या करड्या पेशी सगळ्या भावनाकेंद्रांशी जोडलेल्या असतात. भावभावनांचं संतुलन साधणं हे त्यांचं काम आहे. उदास असताना कुणी आपल्याशी हसलं, किंवा आपणच ठरवून चेहरा हसरा केला की, चेहरा हसरा असल्याचा दिलासा त्या पेशींपर्यंत पोचतो आणि त्या पेशी नकारात्मक भावनांवर मात करतात. 

तशा खुशहाल स्थितीमुळे मज्जासंस्थेतल्या डोपामीन, सीरोटोनिन, एन्डॉर्फिन्स वगैरे आनंदरसायनांचे पाझर वाढतात. औदासीन्य पळून जातं, मन आनंदी होतं. पुन्हापुन्हा हसण्याची, त्या खुशहालीची चटक लागते. मित्राचा हसरा चेहरा जेव्हाजेव्हा आठवतो, तेव्हातेव्हा त्या आनंदचक्राला प्रोत्साहनच मिळतं. 

मज्जासंस्थेतल्या त्या आनंदरसायनांमुळे हृदयाची धडधड कमी होते, रक्तदाब घटतो. आजार बरे व्हायला मदत होते. त्यांच्यामुळे शारीरिक वेदनाही कमी होतात. शिवाय त्या दुःखदबाव रसायनांना दुष्परिणामही नाहीत! त्यांच्या सोबतीने व्यसनांच्या तावडीतून सुटणं सुकर होतं. आयुष्य किमान सात वर्षांनी वाढतं.

आईच्या पोटात असल्यापासून बाळं हसायला लागतात. माकडं दात विचकतात ती धाक दाखवायला. पण त्यांचं एक सलोख्याचं ‘हसू’ही असतं. कुत्रे माणसाला खूश करायला हसरा चेहरा करतात. वेगवेगळ्या मानवी संस्कृतींमध्ये आनंद-प्रेम-अभिमान-आपुलकी-ओशाळलेपण आणि कधीकधी श्रेष्ठत्व दाखवायलाही स्मितरेषा वापरली गेली. स्मितहास्याने शाबासकी देता येते, मैत्रीचा इशारा करता येतो, देश-धर्म-भाषा या साऱ्याच्या पार जाऊन आपुलकीचा संदेश देता येतो. 

म्हणून स्वतःशी, इतरांशी हसत राहावं, आनंदी कथा वाचाव्या, मजेचे चित्रपट पाहावे आणि हसऱ्या गोतावळ्यात राहावं. स्वतःसोबत इतरांनाही खुशीची खिरापत लुटत राहावं.

-डॉ. उज्ज्वला दळवी


                ***

My Cart
Empty Cart

Loading...