
उजळलेला रंगमंच. परीक्षक म्हणून बसलेले संगीतक्षेत्रातले नामवंत. समोर उत्सुकतेने गाणं ऐकायला बसलेले प्रेक्षक आणि या सगळ्यांच्या मध्ये उभी राहून मस्तपैकी गाणारी एक चिमुरडी! प्रत्येक बीटवर तिची तर्जनी माईकवर ठेक्यात आघात करतेय, ते दृश्य कॅमेऱ्यातही कौतुकाने टिपलं जातंय आणि ही ‘लिटिल मॉनिटर’ बिनधास्त आपलं गाणं सादर करतेय. कॅमेरा, परीक्षक, प्रेक्षक, वादक, अँकर कुणाचंच आणि कशाचंच दडपण तिच्यावर नाहीये! तुमच्यापैकी ज्यांनी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चं पहिलं पर्व बघितलंय, त्यांच्या डोळ्यांसमोर तर हे दृश्य येईलच, पण ज्यांनी हे पर्व बघितलं नाहीये त्यांनी आवर्जून यूट्यूबवर हे एपिसोड्स बघा. तुम्हांला नक्की मज्जा येईल! या दृश्यातली ही धिटुकली छोटी गायिका म्हणजे सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या पंचरत्नांपैकी एक- मुग्धा वैशंपायन! आता अर्थातच ती मोठी झालीय, गायिका म्हणूनही प्रगल्भ झालीय.
मुग्धा ‘सारेगमप’च्या स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा ती फक्त आठ वर्षांची होती, चौथीत शिकत होती. मुग्धाशी गप्पांची सुरुवात मी याच पार्श्वभूमीवर केली.
हाय मुग्धा! तू ‘सारेगमप’मध्ये भाग घेतला होतास तेव्हा चौथीत होतीस ना? तू या स्पर्धेत भाग घ्यावास असं कुणाला वाटलं होतं, तू ऑडिशन देणं, निवड होणं हा सगळा प्रवास कसा काय झाला?
-मी अलिबागच्या जानकीबाई रघुनाथ हळदवणेकर कन्याशाळेत शिकत होते. चौथीत असताना आमच्या शाळेत वेशभूषा स्पर्धेत मी एका गायिकेची वेशभूषा केली होती. मी तेव्हा गाणं शिकत नव्हते, पण पूरिया धनश्री रागातली एक छोटीशी बंदिश तयारी करून गायले होते. ती बंदिश ऐकून आमच्या वर्गशिक्षिका हळदवणेकरबाईंना वाटलं की, मी चांगली गाऊ शकेन. त्या दरम्यानच ‘सारेगमप’च्या स्पर्धेविषयी त्यांना कळलं आणि ‘मुग्धाला आपण स्पर्धेत पाठवूया’ असं त्यांनी माझ्या बाबांना सांगितलं. बाबांना तेव्हा ते फारसं पटलं नव्हतं. पण बाईंना माझ्या गाण्याविषयी खूपच खात्री वाटत होती, त्यामुळे त्यांनी बाबांना पुन्हा पुन्हा सांगितलं. बाबांच्या काकूनेही त्यांना पटवून दिलं आणि प्रवेश अर्ज देण्याची अंतिम मुदत संपता संपता माझं नाव दिलं गेलं. माझी स्पर्धेसाठी निवड झाली आणि पुढचा इतिहास तर सगळ्यांना माहितीच आहे!
सारेगमपचा आवाका एवढा मोठा होता आणि तू तर जेमतेम आठ वर्षांची होतीस. मान्यवर परीक्षक, वादक, प्रेक्षक, कॅमेरा या सगळ्याची भीती वाटायची नाही का?
-नाही. अजिबातच नाही. कारण मी एवढी लहान होते की, स्टेजची भीती म्हणजे काय किंवा संगीतक्षेत्रातली मोठी माणसं म्हणजे काय ते माहीतच नव्हतं! त्यामुळे मी एकदम बिनधास्त असायचे. स्टेजवर जाऊन आपलं गाणं छान गायचं, एवढंच कळत होतं मला.
तुला इतक्या लहान वयात मोठं व्यासपीठ मिळालं. कसा होता तुझा तिथला अनुभव?
-खूपच छान होता. तिथे पल्लवीताई, अवधूतदादा, वैशालीताई, सगळे म्युझिशिअयन दादा आणि बाकीची टीममधली मंडळी यांच्याशी छान नातं निर्माण झालं. संगीतक्षेत्रातले खूप मोठे लोक भेटले. मला एक आठवण सांगावीशी वाटतेय. आम्ही एकदा लतादीदींना भेटायला गेलो होतो! आधी आमचं खूप दिवस सलग शूटिंग चाललं होतं. नंतर आम्हांला ‘फिरायला जाऊया’ असं सांगून बाहेर घेऊन गेले ते थेट लतादीदींच्या घरीच! आम्हांला कुणालाच हा प्लॅन माहीत नव्हता. एक मस्त सरप्राइझ होतं ते. लतादीदींकडे आम्ही सगळे जण एक-दीड तास होतो. त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. एक अगदी अविस्मरणीय अनुभव ठरला तो आमच्यासाठी. आमचा एक स्टेज प्रोग्रॅम होता. आमचा परफॉर्मन्स झाल्यावर आम्ही विंगेत उभे होतो. तेवढ्यात तिथे लतादीदी आल्या. आम्हां प्रत्येकाला अगदी नावानिशी ओळखलं त्यांनी आणि आमची विचारपूस केली. खूप ग्रॅण्ड वाटलं!
आणखी एक आठवण आहे ती पंडित हृदयनाथ मंगेशकरांची. ते या स्पर्धेमध्ये पाहुणे परीक्षक म्हणून आले होते. तेव्हा मी 'विसरू नको श्रीरामा मला' हे गाणं सादर केलं होतं. माझं गाणं झाल्यावर 'दीदी तुझ्याएवढी असताना अशीच गायची' असं म्हणाले ते! खूप छान वाटलं होतं तेव्हा मला!!
क्या बात हैं! पण हे सगळं कौतुक किंवा लहान वयातच मिळालेली प्रसिद्धी तू आणि तुझ्या आई-बाबांनी कशी हाताळलीत?
-माझ्या आई-बाबांनी कधी माझ्या डोक्यात हवा जाऊ दिली नाही आणि नेहमी माझे पाय जमिनीवरच राहतील याची काळजी घेतली. 'झी'ने सुद्धा आम्हा सगळ्यांना कधी वाहवत जाऊ दिलं नाही. बाकी अलिबागकरांसाठी तर मी घरचीच आहे. त्यामुळे अलिबागमध्ये मी मोकळेपणाने वावरायचे. आमचं ‘लिट्ल चॅम्प्स’चं पर्व सुरू होतं तेव्हा आमचा कुठे स्टेज प्रोग्रॅम असला की, आमच्यासाठी गाडी बॅकस्टेजला तयारच ठेवलेली असायची. कार्यक्रम संपला रे संपला की आम्ही लगेच गाडीत बसायचो आणि निघायचो. तरीही अनेकदा लोक आमच्या गाडीमागे धावत यायचे!
तुमची शूटिंग शेड्यूल्स बरीच मोठी असायची ना? त्यावेळी खूप दिवस घरापासून लांब राहावं लागलं असेल, शाळा बुडाली असेल.. हे कसं संभाळलंस?
-आमचं शेड्युल आठ महिने चाललं होतं. मला आठवड्यातले दोन दिवसच शाळेत जायला मिळायचं. पण आमच्या क्लास टीचर, प्रिन्सिपल यांनी खूप सांभाळून घेतलं. कधी कधी शूटिंगमुळे माझी परीक्षा बुडायची. अशा वेळी मला नंतर परीक्षा देण्याची परवानगी त्यांनी दिली होती. पण परीक्षा देणं मात्र अनिवार्य होतं. तिथे कुठलीच तडजोड नव्हती. मला मुळात शाळेत जायला खूप आवडायचं. आठवड्यातले जे दोन दिवस मला शाळेत जायला मिळायचं ते मी खूप एन्जॉय करायचे. विज्ञान आणि गणित हे माझे शाळेत असताना आवडते विषय होते, अजूनही हे विषय मला आवडतातच.
‘सारेगमप’मध्ये तुम्ही पाच विजेते झाला होतात- तू, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, रोहित राऊत आणि प्रथमेश लघाटे. तुम्हांला 'पंचरत्न' म्हणून उल्लेखलं जायचं. अजूनही तुम्ही संपर्कात आहात का?
-हो हो. आम्ही पाचही जण आजही संपर्कात असतो. आमचे एकत्र कार्यक्रम होतात. आमच्यातलं बॉण्डिंग आजही तसंच आहे. ही मैत्री आम्हा सगळ्यांसाठीच खूप मोलाची आहे!
गाण्यात करियर करायचं हे लहान वयात ठरलं ना? तुला हेच करायचं होतं, की आणखी काही करायला आवडलं असतं?
-गाण्यात करियर करायचं हे अचानकपणेच ठरलं. म्हणजे करियर वगैरे शब्द माहीतही नसण्याच्या वयात माझ्या बाबतीत हे ठरून गेलं. पण त्यात मला खूप आनंद आहे. मी लहान असताना माझे बाबा निषाद बाकरेंकडे गाणं शिकायचे. मग मीही त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. आता शुभदा पराडकर यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकतेय. शास्त्रीय संगीताच्या जोडीलाच सुगम संगीताचा रियाजही आवश्यक असतो, त्यामुळे मी तोही करते. मी जर गाण्यात करियर केलं नसतं तर मी ऍस्ट्रॉनॉमीकडे वळले असते. मला खगोलशास्त्रामध्ये खूप रुची आहे. आताही मी सायन्स स्ट्रीममध्ये आहे. प्रॅक्टिकल्स, जर्नल्स, अभ्यास, गाण्याच्या तालमी, रेकॉर्डिंग्ज हे सगळं कधीकधी खूप धावपळीचं होतं, पण आता मला ते सवयीचं झालंय. कितीही धावपळ असली तरी मी रोज सकाळ-संध्याकाळ रियाज करतेच.
आवाजाला जपण्यासाठी म्हणे भजी, आइस्क्रीम खायला बंदी असते...
-असं काही नाही. मला तर आइस्क्रीम, वडापाव, भजी सगळंच खायला आवडतं आणि मी ते खातेही. फक्त कार्यक्रमाच्या आधी आइस्क्रीम खात नाही. वडापाव तर माझा इतका फेव्हरेट आहे की, कार्यक्रमाच्या मध्यंतरातसुद्धा मी वडापाव खाते.
कॉलेजसाठी आणि गाण्याच्या शिक्षणासाठी तू आता मुंबईत राहतेस. तुला अलिबाग आवडतं की मुंबई?
-अलिबागमधलं वातावरण खूप छान आहे. शांत, गर्दी- गोंधळ नसलेलं! अलिबागला गेल्यावर मला परत मुंबईला यायला नकोसं वाटतं. लहानपणच्या, अलिबागला असतानाच्या खूप छान आठवणी आहेत माझ्याकडे. मला एक मोठी बहीण आहे- मृदुल. आम्ही दोघीही मे महिन्याच्या सुट्टीत खूप खेळायचो. ती आणि मी दोघीही आता मुंबईत राहतो. तीसुद्धा थोडंफार गाते. ती माझी ताई असली तरी खूप चांगली मैत्रीण आहे. मला नेहमी तिचा पाठिंबा असतो. प्रत्येक गोष्टीत ताई म्हणून आणि एक त्रयस्थ व्यक्ती म्हणूनही ती मत सांगते, जे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं असतं. अलिबागपासून दहा किलोमीटर्सवर 'खानाव' म्हणून एक गाव आहे. ते आमचं मूळ गाव आहे. आमचे सणवार सगळे तिथेच साजरे होतात. गणपतीत आम्ही आवर्जून तिथे जातो. लहानपणी तर प्रत्येक सुट्टीत आम्ही तिथेच असायचो. तिथल्या विहिरीत पोहायला मला खूप आवडतं! तिथे दिवाळीतही मस्त वाटतं.
तू खानावच्या दिवाळीचा विषय काढलाच आहेस आणि दिवाळी अंकाच्या निमित्तानेच आपण बोलतोय तर मला सांग, तुझी दिवाळी कशी असते?
-‘सारेगमप’च्या आधीची दिवाळी आणि आत्ताची दिवाळी यात फरक आहे. कारण आता 'दिवाळी पहाट'चे कार्यक्रम लागलेले असतात. त्यामुळे आता दिवाळीत मी व्यग्र असते. मला फराळाचे सगळे पदार्थ खूप आवडतात. आईच्या हातचा फराळ तर फारच आवडतो. गोड, तिखट सगळा फराळ मी खाते. मात्र मी दिवाळीत फटाके अजिबात लावत नाही. म्हणजे पहिलीनंतर मी कधीच फटाके लावलेले नाहीत. मला वाटतं की, दिवाळी हा दिव्यांचा सण आहे, फटाके लावून त्या सणाचं मांगल्य कमी कशाला करायचं?
मस्तच! मुग्धा, तुझ्याशी गप्पा मारायला खूप मजा आली. पण या गप्पा तुझ्या आवडत्या गाण्यांविषयी जाणून घेतल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. तुला मराठी/हिंदीतली कोणती गाणी गायला आणि ऐकायला आवडतात, ते सांग ना.
-मला लतादीदींची सगळी गाणी ऐकायला आवडतात! ‘मोगरा फुलला’, ‘ये राते ये मौसम’ ही गाणी विशेष आवडतात. माझ्या बाबांना जुनी हिंदी गाणी ऐकायला खूप आवडतात, त्यामुळे माझ्यातही ती आवड आली आहे. लतादीदींचं 'असा बेभान हा वारा' आणि 'श्रावणात घननीळा बरसला' ही गाणी मला गायलाही आवडतात. त्यांचं 'सावर रे' हे मात्र गायला खूपच आव्हानात्मक वाटतं.
वा! जाता जाता आपल्या ‘वयम’च्या वाचक दोस्तांना काय सांगशील?
-खरं म्हणजे मी असं काही सांगण्याइतकी मोठी नाहीये. मी त्यांच्यापेक्षा वयानेही फार मोठी नाहीये. पण तरी सांगायचं झालं तर मी म्हणेन की तुम्हांला ज्या गोष्टीत मनापासून इंटरेस्ट आहे ती गोष्ट करा. जे कराल ते मन लावून म्हणजे पॅशनेटली करा. ऑल द बेस्ट!
रंगमंचावर उभी राहून आपलं गाणं धीटपणे सादर करणारी एक चिमुरडी, ते समजून उमजून पॅशनेटली गाणारी नव्या पिढीची आश्वासक गायिका हा मुग्धाचा प्रवास तिच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पांमधून उलगडला.
-अंजली कुलकर्णी-शेवडे