
अनेक आकाराच्या, प्रकारांच्या छत्र्या आम्ही पाहिल्या. पण रंग बदलणारी छत्री एकदम हटके!
हेल्लो फ्रेंड्स, तुम्ही पाऊस मस्त एन्जॉय करत असाल. पावसाळी खरेदीही झाली असेल. शाळा आणि पाऊस दोन्हीही जोमात चालू असतील. दप्तर भिजत असेल, जोराचा वारा आल्यावर छत्रीही उडत असेल आणि यावरून एकमेकांना चिडवतही असाल ना? किती प्रकारच्या आणि रंगीबेरंगी छत्र्या तुमच्या आजूबाजूला तुम्ही पाहात असाल. पण यात रंग बदलणाऱ्या छत्रीविषयी तुम्ही ऐकलंय का? उलटा-पुलटा छत्री बघितलीय का? पारदर्शक (ट्रान्स्परंट) छत्री, डबलडेकर छत्री, दिल आकाराची छत्री अशा अनोख्या छत्र्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ठाण्याच्या ‘जैन सन्स अम्ब्रेला मॅन्युफॅक्चर’ या दुकानात विविध प्रकारच्या अनोख्या, ट्रेंडी छत्र्या आम्ही पाहिल्या.
रंग बदलणारी छत्री या दुकानात आहे हे कळल्यावर आम्ही (‘वयम्’ टीम) थेट या दुकानात पोहोचलो. नक्की ही छत्री कशी काय रंग बदलते, याबद्दल आम्ही जाणून घेतलं. त्यांच्या या दुकानाबद्दलची माहिती मालक जय सुराणा यांनी दिली. ते म्हणाले, “आमची या व्यवसायातली ही तिसरी पिढी आहे. ही छत्री थ्री फोल्डमध्ये आहे आणि तिचा आकार जम्बो आहे. त्यावर फॅब्रिक प्रिंट आहे. या प्रिंटवर पाण्याचे थेंब किंवा पाऊस पडल्यावर या प्रिंटचा रंग बदलतो. या प्रिंटमध्ये जी चित्रे किंवा नक्षी आहेत, त्यात विशिष्ट प्रकारचं केमिकल असल्याने त्यावर पाणी पडतं, तेव्हा त्या प्रिंटचा रंग बदलतो आणि छत्री वाळल्यावर ती प्रिंट पांढरी होते. लहान मुलांसाठी वाघ, गाडी, बॉल्स अशा मुलांच्या आवडत्या प्रिंट असलेल्या रंग बदलणाऱ्या छत्र्या आमच्याकडे आहेत.”
आम्ही तिथे गेलो तेव्हा ऐन पावसाळा आणि शाळा सुरू झाल्या असल्याने प्रचंड गर्दी होती. त्यामुळे तिथे त्यावेळी उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या आम्ही पाहिल्या. ‘उलटा-पुलटा छत्री’ बरेचजण खरेदी करत होते. या छत्रीची रचना आपल्या नॉर्मल छत्रीच्या अगदी विरुद्ध असते. ही छत्री बंद करताना छत्रीच्या वरच्या बाजूने बंद होते. त्यामुळे बंद करताना छत्रीवरील पाणी बाहेर फेकले जाते. त्यानंतर आम्ही पाहिली ती डबल डेकर छत्री. यामध्ये मोठ्या छत्रीच्या वर एक छोटी छत्री होती. त्यामुळे पाणी थेट आपल्या डोक्यावर पडत नाही. तसेच ही छत्री वाऱ्यामध्ये पटकन उलटीही होत नाही. ही अनोखी छत्री आम्हांला सर्वांनाच खूप आवडली. त्यानंतर आम्ही पाहिली ऑटोमेटिक छत्री. ही छत्री बटणाने उघडते आणि बटणाने बंद होते. पूर्वी ऑटोमेटिक छत्रीच्या नळीला आत बारीक बटण असायचे, पण यात ज्या बटणाने ही छत्री आपण उघडतो त्याच बटणाने ही छत्री बंद होते. यांच्या दुकानात पारदर्शक छत्रीही मिळते. त्यातून पावसाच्या सरी छान दिसतात. ३०० रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंतच्या छत्र्या इथे होत्या.
नवीन नवीन छत्र्यांच्या कल्पना कशा काय सुचतात, असं जय सुराणा यांना विचारल्यावर ते म्हणाले की, लहानपणापासून आम्ही हा व्यवसाय बघत आलो आहोत. त्यांनी स्वतः MBA, वकिली, टेक्नॉलॉजी या विषयांत शिक्षण घेतलं आहे. नवीन कल्पना सुचली की त्याप्रमाणे कारागिरांकडून करून घेऊन, त्याची चाचणी घेतली जाते. मग ती बाजारात येते. त्यांच्या छत्र्या परदेशातही विक्रीसाठी जातात.
छत्रीच्या विविध रंगांप्रमाणे जय सुराणा यांचं व्यक्तिमत्त्वही बहुरंगी आहे. “पावसाच्या सिझननंतर तुमच्याकडे कामाचा व्याप थोडा कमी असतो का?” यावर जय सुराणा म्हणाले, “वर्षभर आमच्याकडे छत्र्या बनवण्याचं काम सुरूच असतं. छत्र्या, रेनकोट, शिवाय स्टॉलला, फेरीवाल्यांना, हॉटेलवाल्यांना लागतात त्या मोठ्या छत्र्या, ट्रेकिंगचे सामान हेही आम्ही बनवतो.” एकंदरीतच एवढ्या अनोख्या आणि विविध प्रकारच्या छत्र्या पाहून खूप मजा आली.
-क्रांती गोडबोले-पाटील
***