Menu

अक्षरबाप्पा

image By Wayam Magazine 07 November 2022

दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘वयम्’च्या मासिकातून तुम्ही वेगवगेळ्या प्रकारच्या इको-फ्रेंडली गणपतींबद्दल वाचलं असेल. यावेळी आपण ‘अक्षरगणेश’ या कलेबद्दल जाणून घेऊ या.

राज कांदळगांवकर हे जगविख्यात अक्षरगणेशकार. तीन वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत. आत्तापर्यंत २८,००० कलाकृती त्यांनी साकारल्या आहेत. लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर, अण्णा हजारे, बाळासाहेब ठाकरे अशा अनेक दिग्गज मंडळींना त्यांनी त्यांच्या नावाचे अक्षरगणेश रेखाटून भेट म्हणून दिले आहेत. काहीजण त्यांच्याकडे ऑर्डर देऊनही अक्षरगणेश साकारून घेतात. हे अक्षरगणेश रेखाटताना पाहणं हा चकित करणारा अनुभव होता.

मी या राज सरांना भेटले ते त्यांच्या नेमप्लेट बनवण्याच्या छोट्याशा गाळ्यामध्ये. दरवाजावर लावण्याच्या नेमप्लेट बनवणं हे त्यांचं अर्थार्जनाचं साधन आणि ‘अक्षरगणेश रेखाटन’ ही त्यांची आवड आणि कला. उल्हासनगर येथे राज सरांची ‘अक्षरगणेश आर्ट गॅलरी’ आहे.

त्यांनी मला प्रथमेश, वरद ही गणपतीची नावं अक्षरगणेश रूपात रेखाटून दाखवली. हे करत असताना आमच्या गप्पा सुरू होत्या.

राज सर शालेय वयापासून खूपच खोडकर. शाळेत शिकताना मागच्या बेंचवर बसून मस्ती करायची, शिक्षकांचा ओरडा खायचा, शिक्षा भोगायची हा त्यांचा नित्यक्रम असे. तास सुरू असताना राज सर सतत अक्षरातून चित्र काढायचे आणि आजूबाजूच्या मुलांचं लक्ष वेधून घ्यायचे. मधली सुट्टी असेल किंवा ऑफ पिरिएड, ते काय नवीन रेखाटतात हे बघण्यात मुलांना फार कुतूहल असायचं. मात्र त्यावेळच्या त्यांच्या शिक्षकांना त्यांच्या कलेचं जराही कौतुक नव्हतं. एकदा त्यांनी राज सरांना शिक्षा केली तेव्हा राज सरांनी त्यांच्या शिक्षकांना सांगितलं की, मला अभ्यास जमत नसला तरी मी कलेच्या क्षेत्रात नाव कमावून दाखवेन. बालवयापासून राज सरांनी त्यांच्या अक्षर-रेखाटनाकडे मनापासून लक्ष दिलं आणि त्याचा सराव सुरू ठेवला. घरातील बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे रेखाटन कलेतील शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांना घेता आलं नाही. पण त्यांनी त्यांचा सराव मात्र सुरू ठेवला.

कोणत्याही नावातून अक्षरगणेश साकारण्यामागचा उद्देश त्यांनी सांगितला. ‘देव’ म्हणजे चांगले गुण. त्यांच्या मते प्रत्येक नावात देव आहे. वाईट गुण म्हणजे दैत्यवृत्ती. आपण जे चांगलं आहे ते घ्यावं. प्रत्येकात जे जे चांगले गुण असतात त्या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हा अक्षरगणेश!

अक्षरगणेश साकारण्याबरोबर राज सर अक्षरशिल्पही साकारतात. म्हणजे अक्षरशिल्पातून ते त्या व्यक्तीचं चित्र रेखाटतात. एकदा मार्कर किंवा ब्रश उचलला की ते नाव साकारल्यावरच ते खाली ठेवतात. ते इंग्रजी भाषेतूनही अक्षरगणेश साकारतात. ते इतर भाषांतही अक्षरकला शिकत आहेत. गाण्याचा रियाज जसा रोज केला जातो, तसाच राज सरांचा सरावही रोज चालू असतो. आमच्या या गप्पा सुरू असताना ‘वयम्’ मासिक बघून ते म्हणाले की, मी सर्व मुलांना हे आवर्जून सांगेन की, अभ्यासाबरोबर कलाही जोपासा. दुसऱ्याच्या कलेचा सन्मान करा. सराव करा, मेहनत करा, मग तुमच्या कलेला नक्कीच दाद मिळेल.

ज्या शाळेच्या पटांगणावर राज सरांना मस्तीखोर मुलगा म्हणून शिक्षा झाली होती, त्याच पटांगणावर २०१८ साली शाळेने त्यांचा सत्कार केला. तो दिवस त्यांना फार सुखावून गेला. लॉकडाउनमध्ये लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी, ते घरातून अक्षरगणेश रेखाटून दाखवत होते. अशा कलाकारांना भेटल्यावर गणपतीचं हे गाणं सार्थ वाटतं-

‘तू सकलांचा भाग्यविधाता, तू विद्येचा स्वामी-दाता ज्ञानदीप उजळून आमुचा निमवी नैराश्याला...

-क्रांती गोडबोले-पाटील
My Cart
Empty Cart

Loading...