Menu

अग्नि-उत्सव!

image By Wayam Magazine 11 November 2022

By Prof. Manjiri Hasbanis,  On 9th March 2020, Children Magazine

शब्दांनाही नाती असतात. ती समजून घेण्यात मजा असते. या लेखात ‘होळी’ आणि ‘अग्नी’ या शब्दांची नातीगोती जाणून घेऊया. 

`होळी रे होळी पुरणाची पोळी’, `आयी होली आयी, सब रंग लायी’ या अशा ओळी वाचून गेल्या वर्षी साजऱ्या केलेल्या होळी या सणाच्या कितीतरी आठवणी मनात जाग्या झाल्या असतील ना तुमच्या ? आणि आता तुम्हाला होळी पेटल्यावर तडतडतडतड वाजत आसमंताला भिडणाऱ्या आगीच्या ज्वाळा, होळीच्या गरम गरम हाळा, होळीत टाकलेल्या नारळाच्या खमंग भाजक्या खुरड्या मस्त स्वादिष्ट पुरणपोळी तुमच्या बरोबरीने काकामामांनी ठोकलेल्या आरोळ्या आणि मारलेल्या बोंबा आणि दुसऱ्या दिवशी होळीच्या रंगांनी रंगवलेली बाळगोपाळ दोस्त मंडळी. या सगळ्याची आठवण झाली असेल, होय ना.

काय मग लागले का तुम्हाला होळीचे वेध ? फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत साजरी होणारी ही होळी कुठे होलिकोत्सव या नावाने तर कुठे होलिकादहन, हुताशनी महोत्सव अशा नावांनी ओळखली जाते. कोकण गोमंतकात तिला शिग्मो म्हणजेच शिमगा असं म्हणतात. या नावाचीही एक जन्मकथा आहे, बरं का. पूर्वी फाल्गुन मासातील या कालखंडाला सुगिम्हअ म्हणजे `सुग्रीष्म’ असं म्हटलं जाई. कारण हा काळ म्हणजे ग्रीष्म ऋतूचा काळ. या सुग्रीष्मपासून शिग्मो शब्द तयार झाला व पुढे वर्णविपर्यययोग म्हणजे अक्षरांच्या अदलाबदलीने शिमगा असा शब्द रुढ झाला. होळी पेटवण्याच्या परंपरेचीही एक जन्मकथा आहे. पूर्वी म्हणे फाल्गुन मासातील या काळात एक राक्षसीण गावागावात हिंडत असे. लहान मुलांना त्रास देणारी ही राक्षसीण महाभयंकर होती. हिंस्र, अक्राळविक्राळ असं तिचं स्वरुप होतं. ती लहान मुलांना घाबरवत असे. त्यांचा पाठलाग करत असे. होलिका, होलाका, ढूंढा, पूतना अशी अनेक नावं तिला होती. मग लोकांनी आणि लहान मुलांनी एक डाव रचला. कर्कश्श बोंबा मारून, आरडाओरडा करून आणि ठिकठिकाणी जाळ पेटवून त्यांनी तिला बेजार करून टाकलं आणि गावागावातून तिची हकालपट्टी केली. मग तिनेही शेवटी या आकांताला कंटाळून काढता पाय घेतला. या घटनेचं स्मरण म्हणून ही होळी पेटवण्यात येते. त्यावेळी शिवीगाळ करतात, बोंबा ठोकतात आणि आरडाओरडा करतात. अशा पीडादायक शक्ती कुटुंबवत्सल वसाहतींच्या आसपास फिरकू नयेत, अशी धारणा यामागे आहे. म्हणूनच या सणाला तुम्हा बाळगोपाळांचं फार महत्त्व आहे. गावागावात लहान मुलं सोंगं रंगवतात, खेळ्ये नाचतात, राधा नाच सादर करतात आणि धम्माल उडवून देतात. शहरातही कॉलनीकॉलनींमध्ये होळ्या पेटवतात. आता बेसुमार वृक्षतोड होऊ नये म्हणून अनेक पर्यावरणप्रेमी एकत्र येऊन टाकाऊ गोष्टी जाळून आगळ्यावेगळ्या प्रकारचं होलिकादहन करतात. बंगाली लोकांमध्ये हा सण दोलायात्रा म्हणून प्रसिध्द आहे. मुळात फाल्गुनमधल्या फल्गू शब्दाचा बंगाली अर्थ आहे गुलाल, तर हा गुलाल कृष्णमूर्तीला लावून पाळण्यात ठेवून कृष्णाला आंदोळण्यात येतं. म्हणून हा त्यांचा सण म्हणजे दोलायात्रा. मद्रासमध्ये ही होळी शिवालयाच्या बाहेर पेटवण्यात येते. आणि तिथे तिचा संबंध कामदहनाच्या कथेशी जोडतात. दोस्तांनो, ही कथा तुम्हाला आवडते का पहा.

शंकर कैलास शिखरावर समाधीस्थ बसले होते. आणि त्रैलोक्यात तारकासुराने थैमान घातलं होतं. या तारकासुराचा वध करणार होता, शंकर-पार्वतीचा पुत्र कार्तिकेय. पार्वती रोज शंकराची मनोभावे सेवा करीत होती. परंतु शंकर समाधीत मग्न. मग एक दिवस देवांच्या आज्ञेने प्रेमदेवता मदन त्या स्थळी अवतरला. तो येताक्षणीच वातावरण पालटलं. मंद वारे, पक्ष्यांची गाणी, झऱ्यांची झुळझूळ आणि फुललेल्या फुलांचे मोहक गंध. क्षणभरच केवळ, क्षणभरच शंकराच्या चित्ताची एकाग्रता भंगली. समाधी मोडली. महादेवच तो. आपली समाधी मदनाने मोडली, हे त्याला कसं सहन होणार? त्याने आपला तिसरा डोळा उघडला. त्यातून निघणाऱ्या ज्वाळेने तो मदन जळून गेला. ही घटना मदनदहन किंवा कामदहन म्हणून प्रसिध्द आहे. या घटनेचं स्मरण म्हणून मद्रासमध्ये शिवालयाच्या समोर होळी पेटवतात.

या कथेतील प्रत्येक नावांनाही जन्मकथा आहेत ही मोठीच मौजेची बाब आहे. शंकरमधील शं म्हणजे कल्याण आणि त्रैलोक्याचं कल्याण करणारा तो शंकर. हिमालय पर्वताची कन्या म्हणून ती पार्वती. सहा कृत्तिकांनी शंकर पार्वतीच्या बाळाला वाढवलं. म्हणून तो कार्तिकेय. कामाचा देव तो कामदेव. पुढे त्याचं अंग जळून गेलं म्हणून त्याला अनंग असं म्हणण्यात येऊ लागलं. कथा वेगवेगळ्या असल्या, तरी होळीचा संबंध अग्नीशी आणि रंगांशी आहे, हे नक्की. काही जण या सणाचा संबंध आर्य हे अग्निपूजक होते, या वस्तुस्थितीशी लावतात. अग्नि या शब्दाचा उगम थेट लॅटिनमधील इग्निस Ignis ...या शब्दापासून झाला आहे. गेल्याच लेखात आपण जे भारोपीय भाषेशी नातं सांगणारे शब्द पाहिले, त्यांच्या जातकुळीतला हा शब्द आहे. लॅटिनमध्ये याला Ignis इग्निस म्हणतात, तर प्राचीन इंग्रजीत Ignite इग्नाइट असा शब्द प्रचलित आहे. रशियन भाषेत याला ओगोन ogon असं म्हणतात. कोणत्याही शुभ घटनेमध्ये अग्नि हा मुख्य सदस्य असतो. लग्नमुंजी, पूजा-अर्चा यात होमाच्या रुपाने, पाककृतींच्या सिध्दीसाठी स्वयंपाकघरातील अग्नीच्या लॅटिनमध्ये याला Ignis इग्निस म्हणतात, तर प्राचीन इंग्रजीत Ignite इग्नाइट असा शब्द प्रचलित आहे. रशियन भाषेत याला ओगोन असं म्हणतात. कोणत्याही शुभ घटनेमध्ये अग्नि हा मुख्य सदस्य असतो. लग्नमुंजी, पूजा-अर्चा यात होमाच्या रुपाने, पाककृतींच्या सिध्दींसाठी असलेला स्वयंपाकघरातील अग्नि किंवा आनंदी सोहळ्यात रोषणाईच्या रुपाने. म्हणून जो अग्रणी आहे, जो मुख्य आहे, तो अग्नि, असं यथायोग्य स्पष्टीकरण या शब्दाचं करतात. हा अग्नि आग विद्युत आणि सूर्याग्नी अशा तीन स्वरुपात प्रामुख्याने दिसून येतो. म्हणूनच माणसं अग्निपूजक असावीत, यात आश्चर्यकारक असं काहीच नाही.

अग्नि या शब्दापासून आग हा शब्द तयार झाला. या आगीशी संबंधित कितीतरी वाक्प्रचार प्रचलित आहेत. आग असणं म्हणजे तीव्र इच्छा असणं, पोटात आग पडणं म्हणजे अतिशय भूक लागणं, आग लावणं म्हणजे भांडण उपस्थित करणं, आगीत तेल ओतणं म्हणजे लागलेलं भांडण विकोपास नेणं, आगीवाचून धूर निघत नाही म्हणजे पापी कृत्याशिवाय बभ्रा होत नाही, आगीतून उठून फोफाट्यात पडणं म्हणजे एका संकटातून दुसऱ्या अधिक वाईट संकटात पडणं. आग पाखडणं म्हणजे एखाद्यावर अतिदोषारोप करणं. हा अग्नि आहुती भक्षण करतो. म्हणून त्याला हुताशन असं म्हणतात आणि म्हणून होळीला हुताशनी महोत्सव म्हणतात. होळी ही जशी भारतीय संस्कृतीचा भाग आहे, त्याचप्रमाणे इतरही अनेक राष्ट्रात या होळी सणाशी साधर्म्य सांगणारे अग्नि-उत्सवांचे प्रकार आढळतात. बॉनफायर युनायटेड किंगडममध्ये बॉनफायर - गाय फॉक्स नाइट म्हणून 5 नोव्हेंबरला साजरा करण्यात येणारा उत्सव अग्निशी संबंधित आहे. जपानमध्ये ओनियो नावाचा उत्सव साजरा होतो. मजेची गोष्ट म्हणजे तिथेही राक्षसी दुरात्म्यांना हुसकावून लावण्यासाठी हा उत्सव साजरा करतात. देवळातील डेव्हिल फायर राक्षसी अग्नि मोठाल्या मशालींमध्ये संक्रमित करतात आणि देदिप्यमान ज्वाळांनी आसमंत भरून जातो. कॅनडातील बॉन फायर रात्री लोक मुद्दाम नॉटी थिंग्ज म्हणजे वेडेचार करतात. आपल्याकडे होळीला बोंबा मारतात किंवा शिवीगाळ करतात, तसाच हा प्रकार आहे. थोडक्यात काय, तर मुलांनो केवळ शब्दच जगात सर्वत्र प्रवास करतात, असं नाही. तर सांस्कृतिक विचार आणि उत्सव यातही साम्य असतं. पण असं साम्य का असतं, याचा तुम्ही विचार केला आहे का? कारण जगात सर्वत्र माणसाच्या मनाची जडणघडण सारखीच असते. ज्या सूर्यशक्तीवर, विद्युतशक्तीवर आपलं जीवन अवलंबून आहे, तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटणं, हे स्वाभाविक आहे. म्हणूनच असे होळीसारखे अग्निपूजेचे सण सर्वत्र साजरे होतात. तर अशा या होळीच्या सणाला आपल्या संस्कृतीत तीन पदर आहेत. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव. होळी, धूळवड आणि रंगपंचमी. काय मग दोस्तांनो तुम्ही अधिक रंगणार की इतरांना अधिक रंगवणार?

या रंगांवरून आणखी एक मौजेची गोष्ट आठवली. या रंगांचा उल्लेख आपण वेगवेगळ्या जोडशब्दांबरोबर करतो, बरं का. कारण शब्दांना त्यांचे जोडीदार असतात आण आपणसुध्दा नाही का वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सवंगड्यांबरोबर जातो? म्हणजे नृत्याच्या क्लासला जाताना बरोबर येणारी मैत्रीण एक असते आणि अभ्यास करताना एकत्र बसणारी मैत्रीण दुसरी एक असते. तसंच शब्दांचं आणि जोडशब्दांचं. आता लाल रंगाचं बघाना. लालचुटुक डाळींबाचे दाणे, लालबुंद टोमॅटो, रक्ताचे लालभडक थारोळे आणि गणपतीच्या मस्तकी विराजमान होणारे तांबडेलाल जास्वंदीचे फूल यात प्रत्येक रंगाची छटा आणि त्यातून व्यक्त होणारी अर्थछटा वेगवेगळी आहे. प्रखर आग ओकणारा सूर्याचा पिवळाधम्म गोळा आणि पिवळीजर्द सूर्यफुलं यातही पिवळ्या रंगाच्या छटा वेगळ्या आहेत. काळाकुट्ट अंधार यातून भीती तर काळेभोर हरिणीचे डोळे यातून भावविभोर रमणीयता व्यक्त होते. पांढरेशुभ्र सरस्वतीचे वस्त्र यातून निर्मलता आणि तेज व्यक्त होते, तर तिचा चेहरा पांढराफटफटीत पडला यातून भीतीयुक्त गलितगात्रता व्यक्त होते. हिरवेगार गवत गवताचा मखमली ओलसर स्पर्श व्यक्त करते, तर निळेशार पाणी पाण्याची अथांगता व्यक्त करते. आकाशाची निळाई आकाशी निळ्या रंगाचं मिश्रण डोळ्यापुढे साकारते.

थोडक्यात आज या शब्दयात्रेतील एका नव्या सिध्दांताशी आपली ओळख झाली. शब्दांना त्यांचे भाऊबंद असतात, जन्मदाते असतात आणि विशिष्ट अर्थ व्यक्त करतांना सोबत करणारे सवंगडीही असतात. आणि अशा एका शब्दाच्या अनेक शब्दांशी जोड्या जमलेल्या असतात. प्रत्येक ठिकाणी त्यांचे अर्थ वेगवेगळे होतात. म्हणजे वेगवेगळे म्हणजे विविध आणि आगळेवेगळे म्हणजे अलौकिक,. काय आहे की नाही मज्जा? पुढच्या लेखात आणखी नव्या शब्दांची गंमत अनुभवू या.

-प्रा. मंजिरी हसबनीस


मार्च २०१५ ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...