Menu

गेमिंगचे व्यसन

image By Wayam Magazine 11 May 2023नमस्कार मित्रांनो, ‘स्मार्ट नेटिझन’च्या पहिल्या दोन भागात आपण मोबाइल गेमिंग आणि रेटिंग्ज याविषयी माहिती घेतली. आज आपण जी माहिती घेणार आहोत ना, तो विषय जरा गंभीर आहे बरं का!  

‘व्यसन’ हा शब्द तर तुम्ही यापूर्वी अनेकदा ऐकला असेल.‘बापरे! व्यसन?’ असे भीतिदायक उद्गारही ऐकले असतील. इंटरनेटचेसुद्धा व्यसन लागू शकते आणि तेही तितकेच धोकादायक आहे. 

हायवे-वर, एक्स्प्रेसवे-वर प्रवास करताना तुम्ही एक पाटी वाचली असेल ती म्हणजे, ‘पुढे धोकादायक वळण आहे, वाहने जपून चालवा.’ ही सूचना वाचली की, गाडीचा चालक सावध होतो. इंटरनेटच्या मार्गातही असे अनेक धोके आहेत, अनेक धोकादायक वळणे आहेत. 

उन्मेष काका सांगतात की, इंटरनेटवर तुम्ही जे गेम खेळता ते सगळे आभासी जग आहे, ते खरे मानून चालायचे नाही- हे लक्षात घ्या. आभासी जग आणि प्रत्यक्षातील जग यात प्रचंड फरक आहे. आभासी जगातील गोष्टी या तात्पुरत्या असतात.  त्याच्या आहारी गेलात तर तुमची गाडी भरकटली म्हणून समजा! तुम्ही म्हणाल की, ताई तू घाबरवते आहेस. पण फ्रेण्ड्स, सध्या आपण सगळेच इंटरनेटवर खूप अवलंबून आहोत. इंटरनेटचे फायदेही अनेक आहेत. पण तुम्ही सावधपणे आणि हुशारीने हे माध्यम हाताळावे म्हणून युक्तीच्या चार गोष्टी सांगणार आहोत. एकदा तुम्हांला यातील खाचाखोचा कळल्या की, मग तुम्हीच तुमच्या इतर मित्रांना सावध कराल, याची मला खात्री आहे. 

तुमचे मित्र, तुमची शाळा, तुमचे नातेवाइक, तुमचा अभ्यास, करिअर हे तुमचे खरे जग आहे. मोबाइलवर गेम खेळायला काहीच हरकत नाही पण त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा याचे नियोजन तुमच्याकडे असले पाहिजे. जर ते असेल तर तुम्ही सगळ्याचा उत्तम पद्धतीने समतोल साधू शकता. अभ्यासाला किती वेळ द्यायचा आहे, छंदासाठी किती वेळ द्यायचा आहे आणि गेमिंगसाठी किती वेळ द्यायचा आहे याचे नियोजन आवश्यक आहे. 

तुम्हांला हे माहिती आहे का, जगातील जे प्रसिद्ध गेमर आहेत, जे वेगवेगळ्या गेमिंग स्पर्धांमध्ये भाग घेतात, त्यांनीसुद्धा अनेकदा सांगितलेले आहे की, ते स्वतः कधीही दिवसातील दोन-चार तास गेम खेळत नाहीत, तर जास्तीतजास्त अर्धा तास गेम खेळतात. म्हणजे जिथे गेमिंग क्षेत्रातील निष्णात लोक जर स्वतः अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ गेम खेळत नसतील तर आपण जास्त वेळ गेम खेळण्याचा मोह टाळला पाहिजे ना! कुठलाही गेम सलग २५ मिनिटे किंवा जास्त खेळू नये. लॉकडाऊन काळात अनेकांचे चष्म्याचे नंबर वाढले आहेत. अनेकांचे  कान, डोळे, मान, खांद्याचे स्नायू दुखावले आहेत. याला काही प्रमाणात गेमिंगसुद्धा कारणीभूत आहे. म्हणूनच वेळ ठरवून घेणे आणि ती मर्यादा पाळणे गरजेचे आहे असे उन्मेष काका सांगतात.

जर तुम्हांला वेळेचे भान राहत नसेल किंवा थांबता येत नसेल तर आजकाल Digital elDigital Wellbeing Appsng Appsआलेले आहेत किंवा मोबाइलमध्ये स्क्रीन टाइम ब्रेक करण्याचे ‘ऑप्शन’ असतात, ते सुरू करा म्हणजे ठरावीक वेळेनंतर आपोआप गेम बंद होतील. Digital Wellbeing Application मोबाइल मध्येच Inbuild असतात. जर नसतील तर प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. ती तुम्ही डाऊनलोड करा आणि तुमचा स्क्रीन टाइम ठरवून घ्या. 

पालकांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मुलांच्या वागणुकीचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. मुलांच्या वर्तणुकीत जर बदल दिसत असेल, उदा. मोबाइलवर जास्त वेळ घालवत आहेत, अंघोळीकडे दुर्लक्ष करत आहेत, हाक मारल्यावर लक्ष देत नाहीत, दारावरची बेल वाजली तरी उठत नाहीत, आपल्या खोलीत तासन्तास बसून मोबाइलवर खेळत असतील, टॉयलेट-बाथरूममध्ये बसून मोबाइलवर खेळतात, अशी लक्षणे दिसली तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण हे धोक्याचे सिग्नल आहेत. वागणुकीत झालेल्या या बदलांचा अर्थ असा होतो की, मुलांचे मोबाइलवर अवलंबून राहणे वाढले आहे. हे व्यसनाधीनतेच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल असू शकते. म्हणूनच मुलांशी त्या दृष्टीने बोलणे गरजेचे आहे. कारण व्यसनाधीनता एक-दोन दिवसांत येत नाही. आज थोडा वेळ, उद्या आणखी थोडा वेळ, परवा त्याहून जास्त वेळ असे करत करत हा स्क्रीन टाइम वाढत जातो. म्हणूनच जेव्हा मुलं तासाभरापेक्षा अधिक वेळ मोबाइलवर खेळतात तेव्हा एवढा वेळ ते काय खेळतात, त्यावर काय बघताहेत हे पालकांनी माहिती करून घेणे गरजेचे आहे. पालकांनी चिडणे, मुलांच्या अंगावर धावून जाणे, हातातून मोबाइल हिसकावून घेणे हा जो आविर्भाव असतो, तो घातक ठरू शकतो. मग परिणाम असा होतो, मुले बोलत नाहीत, काहीच सांगत नाहीत. त्यापेक्षा थोडी चौकशी करा. तुम्ही त्यांना विचारा,  “कुठला गेम खेळतो आहेस रे? चल, आपण दोघे खेळू.” जर तो गेम खरंच चांगला असेल आणि पालकांबरोबर खेळण्यासारखा असेल तर मुलं आनंदाने तयार होतील. पण तसे नसेल तर मुलं कारणे सांगायला सुरुवात करतात. यातून मुलांचं नक्की काय चालू आहे याचा पालकांना अंदाज येऊ शकतो. म्हणून संवाद साधणे गरजेचे आहे. बरेचदा पालक मुलांच्या सारखे मागे-मागे फिरतात, आम्ही त्याला ‘हेलिकॉप्टर पॅरेंटिंग’ म्हणतो. पण त्यामुळे मुलं लपवाछपवी करायला लागतात. म्हणून मुलांशी गप्पांमधून बोलत राहा. पालकांनीही काही गेम मुलांबरोबर खेळून बघायला काही हरकत नसते. सगळेच गेम वाईट नसतात. जसे आपण पत्त्यांचे डाव खेळतो, तसा एखादा डाव तुम्ही मुलांबरोबर खेळू शकता. ऑनलाइन मल्टीप्लेअर गेम्स असतातच, जे तुम्ही मुलांबरोबर खेळू शकता. उन्मेष काकांचे पालकांना सांगणे आहे की, जर तुम्हांला मुलांबरोबर खेळायला जमणार नसेल तर किमान त्या गेमची माहिती घ्या. पालक जर एकांगीपणे फक्त टीकाच करत राहिले आणि माझेच म्हणणे खरे असे म्हणत असतील तर संवाद होऊ शकत नाही. आपण मुलांच्या जवळ राहिलो तर मुले मोबाइलपासून दूर जाणार आहेत. मुलांनाही त्यांचे म्हणणे मांडू द्या. मुलांनाच उपाय विचारा. 

मुलं प्रामाणिकपणे सांगतात की, हो मी खूप वेळ मोबाइल बघितला. याचे उपाय मुलांना विचारले ना की, ते चांगले उपाय सुचवतात आणि त्यांच्याकडूनच उत्तर आले की ते त्या उत्तराशी प्रामाणिक राहतात, असे उन्मेष काकांचे निरीक्षण आहे. त्यांनाच उपाय शोधायला सांगितला की, त्यांना जबाबदारीची जाणीवसुद्धा होते. मुलांना मोबाइलच्या व्यसनापासून दूर ठेवायचे असेल तर पालकांनाही थोडी मेहनत करावी लागणार आहे. 

मुलांच्या मोबाइल वापरावर नुसती टीका करण्यापेक्षा मोबाइल गेमिंगमधील करिअरबद्दल त्यांना माहिती द्यावी. मुलांनीसुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, फक्त गेम खेळण्यात नाही तर त्याच्या निर्मितीत जास्त आनंद असतो.

परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच या बाबतीत न लाजता, स्वतःला दोष न देता तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. आज अशा अनेक संस्था आहेत, ज्या संस्था अशा समस्यांमध्ये पालकांची आणि मुलांची मदत करतात. उन्मेष सरांची ‘Responsible Netism’ किंवा ‘Institute for Psychological Health’ (IPHIPH) सारख्या संस्था मदत करू शकतात. एवढी काळजी घेतली की, इंटरनेटचे व्यसन न लागता या माध्यमाचा सकारात्मक वापर करायला मुले शिकतील हे निश्चित. 

          -(शब्दांकन : मनीषा नित्सुरे-जोशी)

    

              ***


My Cart
Empty Cart

Loading...