आपला समुद्र, आपली जहाजं
By Wayam Magazine 29 September 2023
गेट वे ऑफ इंडियाच्या सागर किनार्यावरून केलेली ही एक काल्पनिक सफर... या सफरीत लाँचमधून वर खात प्रवास करताना कॅटमरान भेटतील, बार्ज दिसतील, युद्धनौका, सरफेस शीप्स, मर्चन्ट शीप्स याही दिसतील. मोठाली टँकर जहाजंसुद्धा पहायला मिळतील... आपल्या या सागरी वाहतूक क्षेत्राशी ओळख करून देणारा ही रम्य प्रवासानुभव!
लहानपणी कागदाची बोट तयार करण्याचा नाद होता ना तुम्हला? प्रत्यक्शाताही सागरप्रवासाचा किंवा बोटीत बसण्याचा आनंद, थरार वेगळाच असतो. अहो, म्हणून तर आपल्या नौदलातले कमांडर दिलिप दोंदे आणि अभिलाष टॉमी यांनी म्हादेई या शिडाच्या नौकेतून एकट्याने अख्ख्या जगाची सागरपरिक्रमा केली. आणि हो, त्यांची म्हादेई बोटही आपल्या भारतातच बांधण्यात आली होती, बरं का.
थोडक्यात काय, तर असं भन्नाट साहस असो की आपला साधा किनारपट्टीलगतचा आनंददायी जलप्रवास, तुमची बोट उत्तमरीत्या बांधायला हवी. पण त्यासाठी तुम्हाला तुमची बोट कशासाठी वापरायची, ते ठरवायला हवं. युध्दासाठी असेल, तर त्यावर शस्त्रांची सोय हवी, अजस्त्र कंटेनरमधून माल आणण्यासाठी असेल, तर तो उतरविण्यासाठी चांगली क्रेन हवी, लक्षद्वीपच्या चौपाट्यांवरून पुन्हा समुद्रात घुसण्यासाठी असेल, तर खाली रबर असलेली हॉवरक्राफ्ट हवी, पाण्याखाली जाणारी पाणबुडी असेल, तर तिचा आकार शार्क किंवा डॉलफिनसारखा गोलाकार हवा... असं बरंच काही. हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर चला मग आपण गेटवे ऑफ इंडियावरून एक छोटी सागरसफरच करू या. चला माझ्याबरोबर... कल्पना करा की आपण समुद्रावर स्वार झालोय.
गेट वे ऑफ इंडियापाशी सध्या चार धक्के आहेत. पहिल्या धक्क्यावर समोरच्या घारापुरी लेण्यांसाठी जाणाऱ्या लाँच उभ्या असतात, दुसरीकडे न्हावाशेवा-उरण इथल्या जेएनपीटी बंदराकडे (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लाँचसेवा असते. शिवाय अलिबागच्या मांडवा बंदराकडे जाण्यासाठी लाँच, कॅटमरान यासुध्दा इथे असतात. आपली लाँच सुटणार आहे गेटवेच्या वास्तूबाहेरील धक्क्यावरून.
‘सांभाळून चढा लाँचमध्ये.’ लाँचच्या कडेने जे टायर बांधलेत, ते लाँच धक्क्यावर आपटू नये, यासाठी. मुंबईत जलप्रवासाची अत्यंत बसलेली घडी म्हणजे या लाँचसेवा. चला, आता आपण लाँचच्या टपावरच्या केबिनमध्ये जाऊ या. इथे सारंग बसतात. सारंग म्हणजे लाँचचे कप्तान. त्यांच्या हाती स्टिअरिंग आहे आणि वर एक दोरी आहे, ती खेचल्यावर खालच्या डेकवर घंटा तुम्हाला ऐकू येईल. ही घंटा लाँचच्या तळाशी असलेल्या इंजिनरुममध्ये वाजते. या घंटेच्या इशाऱ्यानुसार इंजिनरुममधले कर्मचारी इंजिन स्लो-फास्ट किंवा पुढे-मागे करतात. सारंग आपल्या स्टिअरिंगने लाँचचा सुकाणू फिरवायचं किंवा लाँचला दिशा देण्याचं काम करतात. बोटींना चाकं नसतात, त्यामुळे त्या वळवण्याचं काम सर्वात शेवटी असलेल्या सुकाणूद्वारे होत असतं. चला तर मग आता आपली लाँच सुरू होतेय.
मुंबईत गेटवे ऑफ इंडिया आणि भाऊचा धक्का इथून ६ दशकांहूनही अधिक काळापासून लाँचसेवा सुरू आहे. या लाँच प्रामुख्याने लाकडाच्या बांधलेल्या असतात. त्यात खाली साग आणि वरच्या भागात ऐनाचं लाकूड असतं. साधारण ४० ते १५० प्रवासी वाहून नेण्याची त्यांची क्षमता आहे. या लाँचवरचे सारंग, खलाशी, तंत्रज्ञ हे कर्मचारी रत्नागिरीतील बाणकोट, वेश्वी, वेळास तसंच रायगडचं मुरुड, दिघी, श्रीवर्धन या गावांमधून येतात. खास करून कोकणी मुस्लिम कष्टकरी समाज त्यात आहे. फार पूर्वी बाणकोटच्या करमरकर कुटुंबाने एक प्रवासी लाँच बांधली. त्यावर तिथले कामगार काम करू लागले. नंतरच्या काळात कित्येक कामगार कष्टाने मालक बनले आणि त्यांनीही स्वतःच्या लाँच बांधल्या. पावसाळ्यात बऱ्याच लाँचसेवा बंद असतात, तेव्हा ते आपापल्या घरी जातात आणि लाँचची डागडुजीची कामंही त्याचवेळी करतात. लाँचवर लाकूड असल्याने ते टिकविण्यासाठी दरवर्षी रंगकाम करावंच लागतं. कोकण-रायगडमध्ये लाँच बांधूनही इथे आणल्या गेल्या आहेत. आज गेटवे ऑफ इंडियावर ९० लाँच तर भाऊच्या धक्क्यावर ४० लाँच आहेत. त्यापैकी काही बैठ्या स्वरुपाच्या म्हणजे ज्याचा सारंग खालच्या डेकवरच आहे आणि ज्यांच्यात बसून आपला हातही पाण्यात जाऊ शकतो, अशा आहेत. तर बाकी आता बऱ्याचशा त्यापेक्षा उंच, ज्याला वरच्या डेकवर सारंग आहे, अशा. थोडं पुढे गेल्यावर आपल्याला दिसतोय तो भाऊचा धक्का किंवा फेरी व्हार्फ. लक्ष्मणभाऊ हरिश्चंद्र अजिंक्य यांनी १८३९ साली तो बांधला, त्यावरून त्यास हे नाव पडलं. फेरीव्हार्फ म्हणजे फेरीबोटींचा धक्का. इथून समोरच उरण दिसतं. तिथे ओएनजीसीचा तेलशुध्दीकरण कारखाना आहे आणि मच्छिमार बांधवांची लोकवस्ती आहे. तिथल्या मोरा नावाच्या बंदरासाठी इथून बारमाही लाँचसेवा असते. तसंच उरण ओलांडून अलिबाग तालुक्यातल्या रेवस बंदरासाठी १ सप्टेंबर ते ३१ मेपर्यंत लाँचसेवा असते. पूर्वी अलिबाग तालुक्यात इथूनच लाँचने जाता यायचं. आता गेटवेवरूनही दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बोटसेवा सुटतात. त्यापैकी एक म्हणजे या लाँचसेवा. दुसरी म्हणजे मोठी कॅटमरान किंवा एअरकंडिशन्ड बोट. ही एअरकंडिशन्ड बोट लोखंडाची आहे, तिचा वेगही अधिक आहे. पीएनपी कंपनीची कॅटमरान सेवा १९९५च्या सुमारास सुरू झाली. त्यावर संपर्कयंत्रणा, कम्पास यांची अत्याधुनिक सामग्री आहे. शिवाय मालदार कंपनीचीही एक्स्टसी नावाची लाल कॅटमरान तुम्हाला समोर दिसतेय पहा. ही तब्बल २५० प्रवाशांना घेऊन जाते. कॅटमरान म्हणजे दोन बोटी एकमेकांना जोडून त्यावर प्लॅटफार्म टाकल्यास कसं होईल, तसा प्रकार. म्हणजे दोन बोटींच्या दोन इंजिनांची शक्ती या बोटीला मिळते, शिवाय मधल्या भागातून पाणी जायला वाव असल्यामुळे बोटीला स्थैर्यही प्राप्त होतं. तुम्ही कोकणात मालवणला गेलात आणि तिथून सिंधुदुर्ग या शिवरायांनी बांधलेल्या जलदुर्गावर गेलात, तर तिथल्या छोट्या नौकांना डाव्या-उजव्या बाजूला काही बांबू जोडलेले असतात. तो कॅटमरानसारखाच प्रकार, पण त्यावर दुसरी नाव आणि प्लॅटफॉर्म नसतो. मुंबईतली लाँचसेवा भरपूर जुनी. पण आता अशाच लाँचसेवा तुम्हाला रायगड, रत्नागिरीच्या बंदरांमध्येही पहायला मिळतात. रस्तामार्गे एक जिल्हा ओलांडायला कितीतरी वेळ लागेल, पण जलमार्गे तुम्ही १५ मिनिटांत हे अंतर पार करता. दाभोळच्या खाडीत किंवा गोव्यातही ठिकठिकाणी बार्जमधून टेम्पो, व्हॅन, बस अशी मोठी वाहनं टाकून खाडी ओलांडता येते.
आता बार्ज शब्द आलाच आहे, तर हा पहा एक बार्ज आपल्याला ओलांडून जातो आहे, तो पहा. या बार्जचा कप्तान एकदम शेवटी आहे आणि बार्ज हा जरा चौकोनी आकाराचा आहे. त्यात खाडीतून उपसलेली रेती किंवा दगडी कोळसा वगैरेची वाहतूक केली जाते. त्याचा बंदरावर उपसा करायलाही बरं पडतं. या बार्जची खोली तशी कमी असल्याने ते उथळ खाडीमधूनही प्रवास करू शकतात.
हं, आता आपली लाँच अधिकाधिक खोल समुद्रात पुढे चालली आहे. आपल्या डाव्या बाजूला भारतीय नौदलाचा पश्चिम किनारपट्टीचा मुख्य तळ दिसतोय. इथे तुम्हाला राखाडी रंगाच्या काही युध्दनौका दिसतील. यात पहा, इथे तुम्हाला एक फुटबॉलच्या ग्राऊन्डइतकं डेक असलेली अजस्त्र युध्दनौका दिसतेय. ती आहे आपली आयएनएस विराट ही युध्दनौका. हं, आयएनएस विराटवरून एक गोष्ट आठवली. प्रत्येक नौकेच्या नावाच्या आधी हे आयएनएस, एमव्ही एमटी अशी विशेष आद्याक्षरं लावलेली तुम्हाला आढळतील. तो नौकेचा प्रकार असतो. आयएनएस म्हणजे इंडियन नेव्हल शीप किंवा हिंदीत भारतीय नौसेना पोत. एमव्ही म्हणजे मोटरव्हेसल हे महाकाय मालवाहू जहाजांसाठी. एमटी म्हणजे मोटर टँकर हे व्यापारी तेलवाहू वगैरे टँकर जहाजांसाठी. छोट्या लाँचची नावं तुम्हाला दिसली असतील एमएल सदाफुली, एमएल कादिरी, एमएल सागरसरदार, एमएल जलराणी... यातलं एमएल म्हणजे मोटरलाँच.
युध्दनौकांमध्ये प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. एक सरफेस शीप म्हणजे पाण्यालगत चालणाऱ्या, दुसऱ्या पाणबुड्या किंवा सबमरीन, अर्थातच पाण्याखाली चालणाऱ्या आणि तिसऱ्या विमानवाहू युध्दनौका, या पाण्यालगतच चालतात, मात्र त्यांची मुख्य शक्ती त्यांच्यावरील विमानांमध्ये असते. त्यावरून जोरजोरात आकाशात घोंगावणारी लढाऊ विमानं टेकऑफ किंवा लँडिंग करतात आणि हेलिकॉप्टर, गस्ती विमानं असाही ताफा त्यावर असतो. ही विमानं टेकऑफ करण्यासाठी वरचा डेक रिकामा असतो आणि त्यावर दोन लिफ्ट असतात. या लिफ्टमधून ही विमानं त्याखालच्या डेकवर असलेल्या हँगरमध्ये ठेवली जातात. तिथेच त्यांची डागडुजी, मरम्मतही करावी लागते. तरंगत्या नौकेच्या डेकवरून विमानं उडवायला खूप मोठं कौशल्य लागतं. त्याचप्रमाणे तरंगत्या नौकेवर अलगदपणे विमान उतरवायलाही तितकंच धाडस आणि अचूकता लागते. काही सेकंदाचाही फरक पडल्यास तुमची रवानगी थेट समुद्रात होऊ शकते. या नौकांवर हजार-दीड हजार नौसैनिक असतात. नौकेचं रडार, नौकेचे कप्तान बसतात ती जागा उजव्या बाजूच्या एका इमारतीत असते, ज्यायोगे संपूर्ण डेक विमानांच्या ऑपरेशन्ससाठी रिकामा मिळेल. आता आपल्या नौदलाच्या ताफ्यात आयएनएस विक्रमादित्य ही रशियाकडून खरेदी केलेली विराटपेक्षा आणखी भलीमोठी विमानवाहू युध्दनौका दाखल झाली आहे आणि तिच्यावर मिग २९ ही सुपरसॉनिक विमानं आहेत. विक्रमादित्य नौका मात्र मुंबईच्या बंदरात आतपर्यंत येऊ शकत नाही, कारण तिचं वजन आणि आपल्या बंदरातली खोली. त्यामुळे ती कारवार बंदरात असते. आयएनएस विराट ही जगातली सर्वाधिक वर्ष कार्यरत असलेली विमानवाहू युध्दनौका आहे आणि पुढील वर्षी ती ताफ्यातून निवृत्त होतेय.
बाकीच्या सरफेस शीप्स प्रकारात फ्रिगेट्स या प्रकारातील युध्दनौका असतात. जसं आयएनएस गंगा, गोमती, गोदावरी. त्याहून मोठ्या असतात त्यांना डिस्ट्रॉयर किंवा विनाशिका म्हणतात. या प्रकारातील आयएनएस दिल्ली, मुंबई, म्हैसूर या ६७०० टनांच्या विनाशिका आपल्या भारताच्या माझगाव गोदीने पहिल्यांदा बांधल्या आणि जगाला दाखवून दिलं की आम्ही आमच्या बळावर बलाढ्य युध्दनौकांची निर्मिती करू शकतो. त्याच श्रेणीतल्या आणखी प्रगत आयएनएस कोलकाता, कोची या अत्याधुनिक विनाशिका नुकत्याच नौदलात दाखल झाल्या आहेत. या नौकांवर जमिनीवरून जमिनीलगत किंवा जमिनीवरून हवेत डागण्याची क्षेपणास्त्र किंवा मिसाईल्स असतात. त्याचप्रमाणे पाणबुडीचा निःपात करण्यासाठीही त्यांच्याकडे विविध शस्त्रास्त्रं असतात.
बाकी यापेक्षा थोड्या छोट्या आकाराच्या युध्दनौका तुम्हाला दिसताहेत पहा. त्यात काही छोट्या युध्दनौकांचा पाठीमागचा रंग काळा आहे, त्या आहेत, मिसाइल कॉरव्हेट्स म्हणजे क्षेपणास्त्रसुसज्ज नौका. त्या केवळ क्षेपणास्त्रांच्या माऱ्यासाठीच असतात आणि त्यांचा वेग अधिक असतो. त्यांच्या बाजूला नौदलाच्याच नौकांवर क्रेन्स आहेत. त्या आहेत पाणसुरुंग निकामी करणाऱ्या माइनस्वीपर्स. इथे एक अजस्त्र क्रेन्स असलेली युध्दनौका दिसतेय, तिच्यावर शस्त्र नाहीत, पण तो आहे पाणी, तेल आणि रसदपुरवठा करणारा टँकर.
या युध्दनौकांसारख्याच पांढऱ्याशुभ्र नौका तुम्हाला दिसताहेत, त्यापैकी एकावर लिहिलंय पहा, सीजीएस सारंग आणि दुसऱ्यावर लिहिलंय सीजीएस समुद्रप्रहरी. या आहेत भारतीय तटरक्षक दलाच्या गस्तीनौका. त्याला म्हणतात ओपीव्ही म्हणजेच ऑफशोअर पेट्रोल व्हेसल (पेट्रोलिंग म्हणजे गस्त). भारतीय किनाऱ्यालगतच्या २०० सागरी मैल अंतरापर्यंतच्या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील इमारती, वास्तू, उद्योग, तेलउत्खनन फलाट या सर्वांचं संरक्षण करण्याची जबाबदारी तटरक्षक दलावर असते. किनारी भागातील तेलगळतीचं प्रदूषण रोखण्याची सामग्रीही तटरक्षक दलाकडे आहे. समुद्रात १२ सागरी मैलांपर्यंत आपला भूप्रदेश मानला जातो, त्यानंतरचं क्षेत्र मात्र आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्र समजलं जातं.
तटरक्षक दलाच्या गस्तीनौकांप्रमाणेच इथे राखाडी आणि पांढऱ्या रंगाच्या छोट्या स्पीडबोटीही दिसत आहेत. त्यापैकी काहींना म्हणतात इंटरसेप्टर बोटी. त्यावर आयसी ४०१, ४२१ अशी अक्षरं लिहिलेली तुम्हाला दिसतील. इंटरसेप्टर म्हणजे शत्रूला अटकाव करणं. जिथे मोठ्या युध्दनौका शत्रूच्या छोट्या बोटींचा पाठलाग करू शकत नाहीत, तिथे या इंटरसेप्टर बोटींची कामगिरी असते. याच प्रकारात तेलविहिरींच्या सुरक्षेसाठी इमजिएट सपोर्ट व्हेसल या ४० टनांच्या आणि ताशी ४० सागरी मैल अंतर कापू शकणाऱ्या २३ बोटीही अलीकडेच नौदलाने घेतल्या आहेत.
आता नौदल तळावरच त्या गोलाकार काळ्या मोठ्या कॅप्सूल वर आलेल्या दिसाताहेत ना, त्या आहेत पाणबुड्या. आता माझगाव गोदीतच फ्रेन्च डिझाइनच्या पाणबुड्यांची निर्मितीही आपण करू लागलो आहोत. त्यापैकी आयएनएस कलवरी ही पहिली पाणबुडी लवकरच नौदलात दाखल होईल. या पाणबुड्यांवरचं शस्त्र म्हणजे पाणतीर.
मित्रांनो, आता नौदलाचा तळ आपण मागे टाकतोय आणि समोर पूर्वेकडे एक बूचर आयलंड नावाचं बेट तुम्हाला दिसतंय. या बेटावर तेल साठवण्याच्या भल्यामोठ्या टाक्या आहेत. तुम्हाला माहितेय की आपल्या मोटारींचं इंधन असो किंवा आपले अनेक कारखाने, त्यासाठी तेल महत्त्वाचं आणि बरंचसं तेल आपल्याला आखाती देशांमधून आयात करावं लागतं. या कच्च्या तेलाचं शुध्दीकरण करून त्यापासून पेट्रोल, डिझेल वगैरे बनवलं जातं. तेल वाहून आणणारी टँकर जहाजं भलीमोठी असतात आणि ती उथळ पाण्यात येऊ शकत नाहीत. उरणच्या जेएनपीटी बंदराच्या धक्क्यांवर ती लागतात किंवा या बूचर आयलंडवर त्यातलं तेल रिकामं केलं जातं. मग बूचर आयलंडवर साठवून तिथून समुद्राखालून गेलेल्या पाइपलाइनद्वारे हे तेल तेलशुध्दीकरण कारखान्यात पाठवलं जातं. त्याचप्रमाणे तुर्भ्याजवळ पीरपाव नावाचं एक बंदर आहे. तिथे जहाजातील तेल बाहेर काढण्यासाठी मोठ्या क्रेन आणि पंप आहेत. तिथूनही हे तेल थेट चेंबूर किंवा माहुलच्या शुध्दीकरण कारखान्यात पाठवलं जातं.
आता काही कंटेनर वाहून नेणारी महाकाय जहाजं तुम्हाला दिसताहेत पहा. कंटेनर्समध्ये अन्नधान्यापासून औषधे, जीवनावश्यक वस्तूंपर्यंत विविध प्रकारचा माल त्यातून वाहून नेतात. ही कंटेनरवाहू जहाजं अधिककरून जेएनपीटी बंदरात येतात, तेव्हा त्यावरील कंटेनर तीन दिवसात उतरवून घेण्याचं आव्हान इथल्या यंत्रणांपुढे असतं.
तुम्हाला एक लक्षात आलं असेल की आता आपल्याला ही व्यापारी मालवाहू जहाजं किंवा मर्चन्ट शीप्स जास्त दिसू लागली आहेत. यापैकी कोणत्याही जहाजांवर शस्त्रास्त्रं नेण्याची परवानगी नसते. कारण ती व्यापारी जहाजं आहेत, युध्दनौका नव्हेत. व्यापार हा सुध्दा एकप्रकारे दोन देशांतील संबंध वाढविण्याचा किंवा शांतता-सौहार्द प्रस्थापित करण्याचा मार्ग आहे, हा विचार त्यामागे आहेच. शिवाय दोन देशात भले युध्द असतील, वाद असतील, परंतु त्याचा लोकांच्या दैनंदिन गरजा भागविण्यावर आणि उदरनिर्वाहाच्या साधनांवर परिणाम होता कामा नये. परंतु काही काळापूर्वी याचा गैरफायदा समुद्री चाच्यांनी घ्यायला सुरुवात केली. सोमालिया तसंच एडनच्या आखातात ही चाचेगिरी चार-पाच वर्षांपूर्वी फोफावली. हे चाचे म्हणजे कुणी धट्टेकट्टे शक्तिशाली राडेबाज नव्हते. ते मूळचे मच्छिमार आणि अत्यंत हडकुळे, पण काटक लोक. त्यांचं मच्छिमारीचं उदरनिर्वाहाचं साधन हिरावलं गेल्यावर ते दारिद्र्यापोटी या खंडणी उकळण्याच्या चाचेगिरीच्या व्यवसायात शिरले. मग एडनच्या आखाताजवळून चिंचोळ्या समुद्रमार्गातून गल्फकडे (आखाताकडे) जाणारी किंवा तिथून येणारी जहाजं थांबवायची, त्यांचं अपहरण करायचं, हे उद्योग ते करू लागले व त्यावर पैसा कमवू लागले. या साऱ्याचं भय या व्यापारी जहाजांना त्रासू लागलं. तेव्हा भारतीय नौदल त्यांच्या मदतीस आलं. त्यामुळे या जहाजांना एडनच्या आखाताजवळून जाताना युध्दनौकांचं संरक्षण मिळू लागलं.
अशी विविध प्रकारची व्यापारी जहाजं तुम्हाला इथे दिसताहेत. पूर्वी कुलाब्याची दांडी हे दीपगृह किंवा खांदेरीचं दीपगृह दिसल्यावर व्यापारी जहाजांना मुंबईत प्रवेश केल्याची चाहूल लागायची. आता अधिक अद्ययावत दिशादर्शक सामग्री सर्व जहाजांकडे असते. तरीही मुंबईच्या समुद्री क्षेत्रात प्रवेश केल्यावर ही जहाजं स्वतःच्या बळावर बंदराकडे मार्गक्रमणा करीत नाहीत. त्यांचं स्वागत करायला आणि त्यांना बंदरापर्यंत योग्य दिशादर्शन करण्यासाठी एक पायलट बोट येते. प्रत्यक्षात ही एक टगबोट असते. राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या मोटारींच्या ताफ्यापुढे कशी एक पायलट कार असते, त्याचप्रमाणे ही पायलट बोट मोठ्या जहाजांना मार्ग दाखवते. नवख्या जहाजाला केवळ नकाशावरून किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरून वाटेतले अडथळे समजू शकत नाहीत. त्यासाठी ही सोय असते.
चला, आपली सागरसफर तशी बरीच लांबली. वेळेअभावी आपण कुठल्या किनाऱ्यावर उतरलो नाही आणि इतिहासातही डोकावलो नाही. पण आपल्या किनारपट्टीवर अनेक छोटीछोटी सुरक्षित नैसर्गिक बंदरं आहेत, तिथे जाऊन तुम्ही मच्छिमार बोटींचं किंवा ट्रॉलर्सचं कामकाज पाहू शकता. कोळीबांधवांशी त्यांच्या दर्यावरच्या साहसाविषयी गप्पा मारू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व नौकाबांधणीला भारतात मोठा इतिहास आहे. तोही जाणून घेऊ शकता. आता आपलं गेटवे ऑफ इंडिया जवळ येतंय. अरेअरे..अरे...पाणी उडालं ना अंगावर. अरे त्या स्पीडबोटी आहेत. या स्पीडबोटी किंवा यॉट्स म्हणजे एखादी आलिशान ड्रॉइंग रुम किंवा टूबीएचकेचा तरंगता बंगलाच म्हणा ना. तशा तर या श्रीमंत लोकांनाच परवडतात. परदेशात अशा यॉट्ससाठी स्पेशल मरीना म्हणजेच वेगळी बंदरं असतात. आपल्याकडे केरळमध्ये कोची बंदराजवळ तसा मरीना आहे. मुंबईतही या योजना आहेत. तेव्हा तुम्ही दिवाळी सुट्टीनंतर भरपूर अभ्यास करून, खेळ खेळून चांगलं नाव कमवा आणि आपल्या करिअरमध्ये यश मिळाल्यावर तुम्हीही स्वतःच्या कुटुंबासाठी अशी एक यॉट घ्या. आणि हो, मला त्यावरून सागरसफरीसाठी बोलवायला विसरू नका हं. चला, तर मग. आपल्या सारंगदादांचा आणि खलाशीकाकांचा निरोप घेऊ या.
-समीर कर्वे
***