कोकणातील खेड्यात बालपणी आईने जे काटकसरीचे, कष्टाने पैसे कमावण्याचे संस्कार केले, त्यात अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना दडल्या होत्या. त्यांचे अर्थ आज जास्त नीटपणे समजताहेत!
सध्या बजेट, गुंतवणूक, कर भरणे हे शब्द आजूबाजूला ऐकू येत आहेत. या आर्थिक गोष्टींचा विचार करताना ४५ वर्षांपूर्वीचा माझ्या बालपणीचा काळ ताजातवाना होऊन डोळ्यांसमोर उभा राहतो. कोकणातील गुहागर-अडूरचे ते खेड्यातले रम्य दिवस आठवतात. या सा-या आठवणींतून उलगडत जातं ते आईचं अर्थशास्त्र !
कुटुंब मोठं असूनही किती नेटानं संसार केला तिने! किती कष्ट करायची आणि कशी बचत करायची ती! आज अर्थशास्त्राचा अभ्यास करताना त्या वेळचं आईचं अर्थशास्त्र किती साधं, सोपं होतं ते आठवतं आणि आश्चर्य वाटतं. बचत करावी, श्रम करायला लाजू नये आणि मोकळ्या वेळेचं रूपांतर पैशात करता येतं हे सगळं आम्हांला तिनेच शिकवलं.
त्यावेळी गुहागरात वीज नव्हतीच. अडूरसारख्या खेड्यात तर ती पोहोचण्यासाठी खूप वाट पाहावी लागणार होती. खेड्यातली सायंकाळ मन कातर करणा-या भीतीच्या सावल्या सोबत घेऊनच यायची. गावभर हुंदडणारी आम्ही मुलं दिवेलागण होताच घरी परतत असू. हातपाय धुऊन ‘शुभंकरोती’ म्हणण्यासाठी सर्वांनी तिन्हीसांजेला घरी असायलाच हवं, असा दंडक होता. घरात दिवे लावण्याची प्रत्येकाची पाळी ठरलेली असे. त्याने बिनबोभाटपणे काम पूर्ण करायचं. मागीलदारी आईने भाताची तुसं जाळून गोल ढीग केलेला असे. त्याच्या वरच्या थरातली शुभ्र रांगोळी अलगद डब्यात भरून आणायची. ही सकाळी राखुंडी म्हणून दात घासायला वापरायची. तिनेच दारासमोर रांगोळी काढायची आणि तीच रांगोळी सायंकाळी दिव्यांच्या काचा पुसायलाही वापरायची. कंदील, चिमण्या अगदी सगळ्या दिव्यांच्या काळवंडलेल्या काचा त्या रांगोळीनं लख्ख घासायच्या. कंदिलाची काच नीट स्वच्छ करायचीच, कारण कंदिलाच्या उजेडातच उद्याचा अभ्यास करायचा असे. कोप-यात ठेवलेल्या रॉकेलच्या डब्यातील रॉकेल नळीच्या पंपानं बाटलीत काढून घ्यायचं, मग ते फनेलचा वापर करून सगळ्या दिव्यांमध्ये भरायचं.
दिव्यांच्या काळ्या पडलेल्या वाती कात्रीने कापून टाकायच्या, नाहीतर तेल जास्त जळतं आणि काजळी धरते, असं आई सांगायची. रॉकेलची बचत करण्यासाठी दिवेही नेमक्या ठिकाणी ठेवायचे, म्हणजे सारं घर उजळून जायचं. देवाजवळ मात्र गोडेतेलाचा दिवा लावायचा. ती समईदेखील पंचरसी धातूची होती. कारण पितळेपेक्षा पंचरसी धातूच्या समईत तेल कमी लागतं व ज्योत मंद गतीने दीर्घकाळ जळत राहाते, असं आईचं म्हणणं! दिवे लावून झाले की मग पाढे, परवचा, अभ्यास आणि गप्पागोष्टी; की मग आईची हाक ऐकू येई-
‘चला, पानं लावा, पाटपाणी घ्या.’
हेही काम भावंडांमध्ये वाटून दिलेलं असायचं. अशी सगळीच कामं प्रत्येकाला वाटून दिली होती. त्यामुळे आमच्या घरात पैसे देऊन कुणी गडीमाणसं ठेवली नव्हतीच. कामाचा कंटाळा करायचा नाही, कामात आनंद शोधायला शिका - हा आईचा उपदेश. मग पाट मांडतानाही मजा वाटायची. मोठा, चारही कोप-यात पितळी बिल्ले लावलेला चौकोनी पाट बाबांचा. त्यानंतर क्रमाक्रमाने आमचे पाट मांडले जायचे. पुढ्यात चकचकीत कल्हई लावलेली पितळी ताटं, नाहीतर केळीची पानं. आमटीसाठी वाट्या (त्यातच नंतर ताक ओतून प्यायचं.) आणि कडेला पाण्याचे तांबे आणि भांडी. मग आई एकेकाला वाढू लागायची.
आईनं स्वत: वेगवेगळी लोणची घातलेली असत. ताटातल्या मेन्यूप्रमाणं कधी फोडणीची मिरची, कधी लसणाचं तिखट, तर कधी आंब्याचं, लिंबाचं तिखट-गोड लोणचं. पापड, फेण्या, कुरडयाही असायच्या. आणि हे सगळं वर्षभर पुरेल इतकं आईने स्वत:च मे महिन्यात खपून तयार केलेलं असायचं. तेही मे महिन्यातल्या प्रखर उन्हाची ऊर्जा वापरून वाळवण घालून केलेलं असायचं. ऊनही वाया नाही घालवायचं! असे पदार्थ आम्हांला कधी विकत आणायला लागले नाहीत.
जेवणं झाली की अंगणातल्या लाकडी कॉटवर बसून रंगायच्या भूता-खेतांच्या गोष्टी, अगदी डोळ्यात पेंग येईपर्यंत!
पहाटे जाग यायची ती कोंबड्याची बांग ऐकून. घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका खोपटात आईने काही कोंबड्या पाळलेल्या होत्या. आईच्या संसाराला त्यांचा मोठा हातभार लागला होता. आईच्या या गृहोद्योगातून तिला फायदाच होई. २०-२५ कोंबड्या तिने पाळल्या होत्या. त्यांच्या अंड्यांची विक्री केली जायची. कुटुंबासाठी काही अंडी ठेवून बाकी सगळी विकली जात. पाऊस उजाडला की, कोंबडी रवणास बसवायची. २९ दिवस अंडी पोटाखाली घेऊन कोंबडी अंडी उबवण्यास बसे. एकविसाव्या दिवशी तिच्या पोटाखालून पिल्लांचा चिवचिवाट ऐकू येई.
आम्ही पळत घरात जाऊन आईला ही बातमी सांगायचो. मग अर्धवट फुटलेल्या अंड्यातून ती अलगदपणे पिल्लाची सुटका करीत पिल्लू बाहेर काढायची. अंडं फोडून बाहेर येणारं पिल्लू मी ज्यावेळी प्रथम पाहिलं तेव्हा निसर्गाची ही अजब किमया पाहून भारावलो होतो. पिल्लांना आम्ही कण्या, बाजरी, नाचणी असं धान्य खायला घालायचो. ती भराभरा मोठी व्हायची आणि मग त्यातल्या काही कोंबड्यांची विक्री करून आई रोख रक्कम मिळवायची.
त्या खोपटाच्या एका बाजूला वर्षभर जळणासाठी लागणा-या लाकडाचा साठा केलेला असे. उन्हाळ्यात त्यासाठी आई मुलांकडून लाकडं गोळा करून घ्यायची. मग वर्षभर चुलीसाठी लाकडं पुरायची. याच खोपटावर पावसाळ्यात काळा भोपळा, दुधी भोपळा, चिबूड, पडवळ यांचे वेल चढवले जायचे. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात भाज्यांचं मोठं उत्पन्न त्यापासून मिळायचं. मोठमोठे भोपळे वासुअण्णांच्या दुकानात विक्रीला ठेवले की, पुन्हा त्याचे रोख पैसे मिळत. काही भोपळे व भाज्या शेजारपाजा-यांकडे पाठवत जायचे. त्या बदल्यात तेही आमच्याकडे नारळ, कोकम अशा काही वस्तू पाठवीत. वस्तू-विनिमयाच्या या पद्धतीमुळे आमच्या घरात सगळ्या वस्तू उपलब्ध असत. फारसं काही बाजारातून विकत आणावं लागायचं नाही.
थंडीच्या दिवसात मुळा, मेथी यांचे इटुकले मळे तयार केले जायचे. सांडपाण्यावर केळी, अळू, मुळा, मेथी, कोथिंबीर यांचे मळे पक्कं कुंपण घालून केले जायचे. कुंपण आणि बी-बियाणांच्या खर्चापेक्षा कितीतरी जास्त उत्पन्न त्यापासून मिळायचं.
झपाट्यानं वाढणारे मेथीचे कोंब, केळीची प्रसवणारी फुलं (कोका), शेवग्याच्या शेंगांची लगोलग वाढणारी जाडी पाहून मन आनंदित व्हायचं. आज या निसर्गशिक्षणामुळेच आम्ही पुढे कोंबडीपालन, फळभाज्या लागवड, केळी, अननस प्रकल्प यासारखे उद्योग करू शकलो.
केळवण तयार झाली की सणाच्या अगोदर ८-१० दिवस तोडायची. मग सणासुदीला पिकलेली केळी मिळायची. आधी मुलांना आणि उरलं तर विक्रीला, असा आईचा नियम असला तरी एकाच वेळी २-३ केळवणी पिकल्या की, एखादी विकून आईला ५-१० रुपये मिळत.
उन्हाळ्यात आवारातल्या फणसाच्या झाडांवरचे कच्चे फणस काढून त्यातील गरे काढायचे. त्यांचे बारीक तुकडे खोबरेल तेलात तळायचे. मग मस्त फणस वेफर्स तयार व्हायचे. हे तळलेले गरे खूप दिवस टिकायचे आणि त्याची पॅकेटस् बनवून ती मुंबई-पुण्याला पाठवायची. त्यातून आईला खूप पैसे मिळत. या मिळकतीतून मग तिच्याकडून आम्हांला वाढदिवसाच्या दिवशी सोन्याचे वळे मिळे. आईची ती आठवण अजूनही हातात आहे. सोनं हे आंतरराष्ट्रीय चलन आहे, हे तिला चांगलं ठावूक होतं. आपलं मूल कुठे लांबच्या प्रदेशात गेलं आणि जवळ पैसे नसले तर हे सोन्याचं वळं विकून पुन्हा घराकडे येऊ शकेल, हे तिचं साधंसुधं तर्कशास्त्र!
घरी शेंगा आणल्या की त्याची टरफलं फेकून द्यायची नाहीत, तर ती गायीला खाऊ घालायची. गायीनं सकस चारा खाल्ला तर आपल्यालाच चांगले दूध मिळेल हा त्यामागचा विचार.
मोठ्या, म्हणजे सातवी – आठवीतल्या मुलांनी जात्यावर दळण दळावं म्हणजे त्यांच्या दंड बेटकुळ्या आपोआप तयार होतात, शरीराला चांगला आकार येतो ही तिची शिकवण!
मे महिन्यात आंबे-फणसांची साठं वाळवायची. दिवाळीच्या सुट्टीत अन्य श्रमांची कामं करायची. आमच्या गावात पुठ्ठे बाइंडिंगचं काम करणारा एक छोटा कारखाना होता. एकदा तिने मला त्या कारखान्यात नोकरीसाठी पाठवलं. खूप दिवस भरपूर काम केल्यावर रोख तीस रुपये मिळाले. मी ते आईकडे आणून दिले. ती म्हणाली, “तुझी पहिली कमाई देवापुढे ठेव, नमस्कार कर. आयुष्यात कधीही कसलंही काम करायला लाजू नको. काम हे काम असतं, त्याला दर्जा नसतो.” आईचे हे संस्कार हीच आज माझी जमेची बाजू आहे. त्या दिवशी ३० रुपये कमवून आणल्यावर मी मोठा फुशारलो होतो. ताईबरोबर वाद घालताना मी म्हटलं, “तू कुचकामी आहेस.” आईनं मध्यस्थी करत म्हटलं, “अरे ताईने आज तुमची शाळेची दप्तरं शिवून वीस रुपये वाचवले ना? तिनं केलेली बचत ही आपली मिळकतच नाही का?’’
आईचं हे अजब अर्थशास्त्र त्या काळी काही कळत नसे. आज मात्र सारं उलगडतंय...
प्रा. सुहास द. बारटक्के
*************