Menu

आगळे गुरुपूजन

image By Wayam Magazine 14 November 2022

By Alkananda Paadhye Magazine,  On 4th September 2020, Children Magazine

आईला अभ्यासाला लावून तिला परीक्षा द्यायला लावणाऱ्या मुलीची गोष्ट-

तास संपल्यावर कामतबाई टीचर्सरूममधे गेल्या तेव्हा त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या वर्गातील पल्लवी दबकतच त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली.
“बाई एक विचारू?”.....पल्लवीने हळूच विचारले.
“अगं विचार की.” बाई

“बाई शाळेत येऊ न शकणाऱ्याना १०वीची परीक्षा कशी देता येईल? त्यासाठी काय करावे लागेल?” पल्लवीने विचारले.
“का ग... अजून १०ची वर्ष सुरू झाले नाही तोच हा प्रश्न कुठून आला तुझ्या मनात? कुणाला बसायचेय परीक्षेला? बाईनी विचारले.
“माझ्या आईला १०वीच्या परीक्षेला बसायचंय” ...तिच्या उत्तराने बाई क्षणभर चकित होऊन तिच्याकडे बघतच बसल्या.

“हो बाई खरंच सांगते.” पल्लवीने गळ्याकडे हात नेऊन सांगितले.
“अरे वा छान छान... पण मला सांग. तुझी आई सध्या काय करतेय?” बाईंनी विचारले. “माझी आई कचरा वेचते.” पल्लवीच्या उत्तराने बाई एकदम अवाक.
कामत बाईंची अलीकडे या विभागातील महापालिकेच्या शाळेत बदली झाली होती. शाळेतील बहुतेक मुले गरीब परिस्थितीतील होती. शाळेच्या जवळपासच्या बकाल वस्तीत राहणारी होती. पण त्यांच्या पालकांचे व्यवसाय किंवा इतर कुठल्याच गोष्टींची बाईंना नीटशी कल्पना नव्हती. पल्लवी १०वीच्या वर्गातील चुणचुणीत आणि हुशार मुलगी होती, म्हणून बाईंचे तिच्यावर विशेष लक्ष होते, पण तिच्याही कुटुंबाबद्दल त्यांना आजवर काहीच माहिती नव्हती. भानावर येऊन बाईंनी विचारले- “तुझे वडील काय करतात?”


“माझे वडील मी पाचवीत असताना बांधकामावरच्या अपघातात वारले. बांधकाम-मजूर होते ते. तेव्हापासून घरची आणि माझ्या शिक्षणाची सगळी जबाबदारी आईवरच येऊन पडली. आम्ही दोघीच घरी असतो. बाबा होते तोपर्यंत माझ्या आईला बाहेर जायची किंवा कसलीच माहिती नव्हती, पण त्यानंतर मात्र पैसे कमावण्यासाठी आई वस्तीतल्या आजूबाजूच्या मावशांबरोबर कचरा वेचायला जाऊ लागली. गेली कित्येक वर्षे ती पहाटे उठून आमचे जेवण बनवून कचरा वेचायच्या कामाला जाते. तो विकते आणि त्या पैशातूनच आमचे घर चालते बाई.”

“हो... पण मग आता एकदमच १०वीची परीक्षा देऊ शकेल ती?” बाई

“हो...नक्की. माझ्या आईला ना, शिक्षणाचे खूप कौतुक आहे. एकदा ती आजारी पडली होती तेव्हा समोरच्या सोसायटीतल्या २-३ जणांनी मला घरकामाला ठेवण्यासाठी आईकडे विचारले होते. तिची तब्येत पाहून मलासुद्धा कधीकधी वाटे की, मी असे काम करून आईला पैशाची थोडी मदत करावी. पण आईला तसे सांगितल्यावर ती रागाने दोन दिवस माझ्याशी बोलली नाही. ती म्हणाली, मी बचतगटातून कर्ज घेईन. वाटेल तितके कष्ट करीन, पण तू शिक्षण सोडायचे नाही. मी मोठ्ठं ऑफिसर व्हावं, अशी तिची इच्छा आहे.” पल्लवी आईचे कौतुक सांगण्यात रंगून गेली. “अगं हो, ते खरंय. पण तिला शिकायचंय हे कुणी सांगितलं तुला?” बाईंनी विचारले.

“एकदा मी तिच्याबरोबर तिच्या बचतगटाच्या मिटींगला गेले होते. तिथल्या मॅडमनी सगळ्यांना ‘तुमची काय काय स्वप्न आहेत?’ असे विचारले. तेव्हा ‘मला शाळेतल्या मुलांना शिकवायचे होते, असे म्हणाली माझी आई. तेव्हा त्या मॅडमनी सर्वांसमोर तिचे खूप कौतुक केले. तिला बाहेरून परीक्षा देऊन मॅट्रीक व्हायचा सल्ला दिला. ते पाहून मी घरी आल्यावर तिला त्याबद्दल विचारले. तेव्हा आई म्हणाली की, तिच्या लहानपणी गावात दुष्काळ पडला म्हणून तिच्या घरातले सगळेजण मुंबईला आले. नंतर इथे तिचे लग्नच करून दिले गेले. त्यात तिचे शिक्षण राहूनच गेले. मी बरेचदा बघितलंय की, ती माझी पुस्तके नुसतीच हातात घेऊन तंद्री लावून बसते... सामानाच्या कागदाच्या पुड्यांचे कागद सरळ करून त्यावरचे काहीतरी वाचते...” पल्लवीचे बोलणे ऐकताना बाईंच्या गळ्याशी दाटून आले. स्वत:ला सावरत त्या म्हणाल्या, “तू आईला नक्की विचारून घे. आपण काहीतरी करूया.”

त्यानंतर बाईंनी एस.एस.सी. होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींची चौकशी केली. त्यानंतर मंगलताईंना, म्हणजेच पल्लवीच्या आईला, शाळेत बोलावले. १०वीची परीक्षा देण्यासाठी त्यांची तयारी आहे का, हे विचारून घेतले. तुम्ही शिकावे अशी तुमच्या मुलीची मनापासून इच्छा आहे, हेही समजावले.

“बाई, ते सगळं खरंय, पन खूप वर्सात बुक हातात घेतली न्हाईत. तवा मला कस जमनार?” ...मंगलताई गोंधळून बोलल्या.
“अहो... तुम्हांला शिक्षणाची आवड आहे ना, मग तुम्हांला सगळं जमेल. तुमचे फॉर्म, पुस्तके सगळी तयारी आम्ही करून देऊ आणि अभ्यासात काही अडचण आली तर तुमची पल्लवी आहे ना सांगायला.” बाईंनी कौतुकाने पल्लवीकडे पाहात त्यांना धीर दिला.

वर्षभर या मायलेकींच्या १०वीच्या अभ्यासाकडे कामतबाई जातीने लक्ष ठेवून होत्या. आई पहाटे उठून भराभर जेवणखाण बनवून कचराकुंडीवर कचरा वेचायला जायची. तिथून काटेवाल्याकडे तो विकून घरी यायची. पल्लवीही आईच्या पाठोपाठ उठून राहिलेली कामे करून शाळेत जायची. दुपारी घरी आल्यावर दोघीजणी आपापल्या अभ्यासाला बसत. कचराकुंडीवरच्या दुर्गंधीने मंगलताईंना कायमची डोकेदुखी जडली होती. कचरा वेचताना बरेचदा त्यातील काच किवा पत्रा हातात घुसून जखम होई. दिवसभर खाली वाकायचे काम असल्याने त्यांची कंबर ठणकायची. अभ्यासाला बसल्या की, दिवसभराच्या थकव्याने हातातील पुस्तक बरेचदा गळून पडायचे. असे काही झाले की, त्यांचा परीक्षा द्यायचा उत्साह मावळायचा. पण अशावेळी न बोलता पल्लवी आईची पाठ, कंबर चेपून द्यायची. डोक्याला अलगद बाम चोळायची. त्यांचा अभ्यासाचा उत्साह वाढवायचे काम करायची. आईला अभ्यासात हजार अडचणी यायच्या. तिच्या अडचणी सोडवता सोडवता पल्लवीचा अभ्यासही रेंगाळायचा. ती वस्तीतल्या क्लासमधे जायची, पण त्याआधी आईला काहीतरी गृहपाठ देऊन! आपल्यापेक्षाही आईच्या अभ्यासाबद्दल ती विशेष दक्ष होती.

वर्षभर त्यांच्या घराला अभ्यासिकेचे स्वरूप आले होते. होता होता परीक्षेचा दिवस येऊन ठेपला. बचतगटाकडून घेतलेल्या कर्जामुळे त्यांची घरखर्चाची सोय झाली होती. दोघींना वेगवेगळी परीक्षाकेंद्रे आली होती. आपापल्या परीने दोघींनीही आपले पेपर्स सोडवले. घरी येऊन दोघींची त्यावर चर्चा चाले. कामतबाईही त्यात सहभागी होत. चुकण्याची शक्यता जास्ती करून मंगलताईंच्याच बाबतीत होती. पण पास होणार याची मात्र त्यांना पक्की खात्री होती. झालेही तसेच. जात्याच हुशार असलेली पल्लवी उत्तम मार्कांनी पास होऊन तिच्या शाळेत पहिली आली आणि तिची आईसुद्धा पास झाली. दोघींचा आनंद गगनात मावत नव्हता. लेक पहिली आली म्हणून तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असे आईला झाले होते, तर आईची जिद्द पाहून लेकीला आईचा अभिमान वाटत होता.

शाळेतून पहिल्या आलेल्या पल्लवीच्या कौतुकसमारंभात तिच्या आईला तर खासच आमंत्रण होते. पल्लवीला मुख्याध्यापकांच्या हस्ते बक्षीस देतेवेळी कामतबाईंनी मंगलताईंना स्टेजवर बोलावून घेतले. आभारप्रदर्शन करताना पल्लवीने शाळेतील गुरुजनांचे आभार मानतानाच आपली आई पहिली गुरू आहे आणि तिच्या कष्टामुळेच आपल्याला हे यश मिळाले, असे सांगितले, तेव्हा त्या आईचे डोळे भरून आले. कामतबाईंनी मंगलताईंच्या विशेष यशाबद्दल त्यांचाही सत्कार केला. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मंगलताई या अनपेक्षित कौतुकाने संकोचून गेल्या. पण दुसऱ्या क्षणी पुढे येऊन धीर करून म्हणाल्या- “तुमी सगळे माझ्यापेक्षा लई मोठे आहात... शिकलेले आहात. मला बी तुमच्यासारकच शिकायच हुतं... माझे ते स्वप्न या वयात माझ्या लेकीने माजा अभ्यास घेऊन मला शिकवून पूर केलंय, तेवा माजी पहिली गुरू माझी लेकच हाये. तवा तुमच्या सगळ्यांसमोर मी तिच्याच पाया पडते.” ते ऐकल्याबरोबर पल्लवीने झटकन आईला अडवत घट्ट मिठी मारली. मायलेकींची ती गळाभेट पाहून कामतबाईंसह सगळ्यांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या. त्या आगळ्यावेगळ्या गुरुपूजनाला सर्वांनी उभे राहून मानवंदना दिली.
सप्टेंबर २०२० ‘वयम्’
पूर्वप्रसिद्धी मे- 2018 ''वयम्''


My Cart
Empty Cart

Loading...