Menu

एका निरागस मुलीची कथा आबली - वयम् किशोरवयीन मुलांसाठी

image By Wayam Magazine 07 October 2022

म्हात्रे गुरुजी दिसले तसं हातातील भगुलं जिथल्या तिथं टाकून आबली रानात पसार झाली. मेंढरामागे कोकरासारखी उंडारणारी ही पोर. गुरुजी कुठपर्यंत धावणार? घर म्हणावं तर तसं काहीच नव्हत तिथं. ना भिंतीचा आडोसा होता ना पालाचं झाकण होत. तीन दगडाची तेवढी चूल, कोंबड्यांचं डालंग, वागरीत बंदिस्त झालेली चार-पाच नवजात कोकरु, काही भांडीकुंडी, कंटाळ आणि बिछाना. उघड्यावर मांडलेला एवढाच काय तो पसारा होता तिथं. गाबाबाहेर भाताच्या मोकळ्या खाचरात हे बिराड पडलेलं. माणूस तर कुणीच दिसत नव्हत तिथं. गुरुजीना दिसली पोलकं नेसलेली, मनगटात वाळं घातलेली साधारण दहा वर्षांची आबली. गुरुजींची चाहूल लागताच ती तेथून गायब झाली सुद्धा! आता इथं जास्त वेळ थांबण्यात अर्थ नाही असा विचार करून गुरुजी शाळेकडे निघून गेले.

दिवाळीनंतर सह्याद्रीच्या घाटावरून कित्येक मेंधपाळांची बिराडं मेंढरांच्या चार्यासाठी शेकडो मैल पायी प्रवास करून कोकणात उतरत. दिवसभर रानोमाळ भटकून मेंढपाळाने मेंढर चारायची आणि मुक्कामाच्या जागेत येऊन विसावा घ्यायचा. बायाबापड्यानी घोड्यावर लादलेलं बिराड खाली उतरवून तिथच उघड्यावर स्वयंपाक करायचा, असा हा नित्याचाच क्रम होता. ठरलेल्या गावचा मुक्काम कधी एका रात्रीचा तर कधी तीन महिन्यांचा घडत असे. आबलीच्या बिराडाचा मुक्काम चारापाणी मुबलक असल्यामुळे तीन महिन्यांसाठी आसुफ गावाच्या खाचरात विसावलेला होता. मेंढर आणि कोकरं एवढच भावविश्व असणारी मेंढपाळांची लहानगी पोरंसोरं. मग शाळा कुठली आणि पुस्तक कुठले? आसूफ गावात म्हात्रे गुरुजींची जिल्हा परिषदेची छोटीच पण सुंदर अशी शाळा होती. गुरुजींच्या मनाला बरेच दिवस खंत लागली होती, ती म्हणजे शाळेत न येणाऱ्या आबलीची. तिनं शाळेत यावे म्हणून गुरुजी तिच्या बिराडावर पोचले. आबलीला शाळेत पाठवावं असं गुरुजींनी तिच्या आई-वडिलांना म्हणजेच बिरा व बायजाला कळकळीने सांगितलं. गुरुजींचे बोलणे म्हणजे मोठा विनोद असल्याप्रमाणे बिरा हसून म्हणाला, ““गुर्जी, मँढरामागं मेंढरू व्हऊन पळणारी आमी माणसं, आता का करायची साळा गा ? पोरीची जात ती. हुडहुड करून भाकरीच थापल ना ?””

गुरुजींनी नाना परीने बिराची समजूत घातली, तेव्हा कुठे तो एकदाचा तयार झाला. आबलीला शाळा, पुस्तके व गुरुजी या गोष्टीच खूप भीतीदायक वाटत होत्या. म्हणून तर गुरुजी बिराडावर आले, तेव्हाच तिने तिथून पुन्हा एकदा धूम ठोकली होती. आबलीला शाळेत कसं आणता येईल, याचा विचार गुरुजी करत होते. दोन दिवसानंतर शाळेतील दोन मुली माधुरी व मीरा बिराडावर आल्या. चुणचुणीत अशी माधुरी बिराला म्हणाली, “”काका, आम्ही चौथीतील मुलं गाव सर्वेक्षण करतो, आपल्या गावातील माणसांची माहिती आम्हीच गोळा करतो. तुम्ही आमच्याच गावातले आहात, आम्हांला माहिती द्याल का ?”

माधुरीच्या बोलण्याचं बिराला कौतुक वाटलं. आबली त्या मुलींभोवती घुटमळल्यासारखी करू लागली. या पोरी किती छान कपडे घालतात, किती छान बोलतात, त्या माझ्यासोबतही बोलतील का? असे विचार आबलीच्या मनात येत होते. माधुरी व मीरा छानपणे गप्पा मारत माहिती लिहित होत्या. त्यांनी आबलीसोबतही गप्पा मारायला सुरुवात केली, “ “तुझं नाव काय ?””

“ आबली”.” ““कित्ती छान नाव आहे तुझं ! आमची मैत्रीण बनशील का आबली ?”” आबलीने आनंदाने होकारार्थी मान डोलावली. “तू आमची आता मैत्रीण झालीस, म्हणून आम्ही तुला भेटवस्तू आणलीय.”

मीराने चित्रांचं पुस्तक आणि रंगपेनांचा पुडा आबलीला भेट म्हणून दिला. आबलीच्या चेहऱ्यावर असंख्य फुलं फुलली. माधुरी व मीराने तिचा निरोप घेतला. आपल्याला मैत्रीण समजणाऱ्या आणि भेटवस्तू देणाऱ्या या दोघीजणी तिला खासच वाटू लागल्या.

कधी एकदाचं ते पुस्तक उघडू असं तिला झालं होतं. एक रंगवलेलं चित्र आणि दुसरं तसेच पण बिनरंगाचं चित्र, अशी त्या पुस्तकाची रचना होती. रंगांची दुनिया किती अदभूत ! फुललेलं इंद्रधनुष्य, खळखळ वाहणारी नदी, आखीव-रेखीव कौलारू घरं, हिरवागार डोंगर आणि हे काय ? चक्क माणसांचे कपडे घातलेले ऐटदार उंदीर व मांजर ! आबली जोरजोराने हसू लागली. तिच्या आईने तिला दरडावलं, तेव्हा ती म्हणाली, “”आये, या चित्रात बग, मांजार आन उंदीरपण कापडं मागत्याल!””

कोऱ्या चित्रात रंगपेनांनी जसेच्या तसे रंग भरण्यास तिचे हात शिवशिवू लागले. इंद्रधनुष्याचे रंग साऱ्या आकाशात पसरत गेले ! कौलाचा रंग पार भिंतीपर्यंत उतरला आणि निळ्या रंगाची नदी पात्र सोडून अस्ताव्यस्त झाल्यासारखी वाटू लागली! पहिल्याच पुस्तकाची आणि पेनांची मजा अशी काही बहरास आली की, तिचे तिलाच हसू आले. आणि पेनांची मज्जा अशी काही बहरास आली की तिचे तिलाच हसू आले. रंगवलेली चित्रं ती आई-वडिलांना आणि कोकरं-मेंढरांनाही दाखवत सुटली !

माधुरी व मीराला आपणसुद्धा काहीतरी द्यावे असे आबलीला वाटू लागलं. याबाबत तिने आपल्या वडिलांसोबत चर्चा केली, तेव्हा बिरा म्हणाला, “”त्या पोरींना आपून मेंढीचं दुदू आन त्वूप देऊ, आवडन त्यांना”
“ “दादा, त्यांच्या घरला दुदू आन त्वूप आसलंच.””
“ “मंग बाजाराला गिलू की आनू कायतरी.””
“ “नगं दादा, बाजारात आस्त त्येपण त्यांच्या घरला आसल.” “आबले, त्वाच सांग, द्यायचं तरी काय ?””

बराच वेळ विचार केल्यानंतर आबलीला एक गंमत सुचली. तिने ती गंमत बिराला सांगितली, तेव्हा त्यानेदेखील आनंदाने मान डोलावली. सकाळच्या प्रहरी आबली गावात गेली आणि माधुरी व मीराला घेऊन बिराडावर आली. आबलीच्या गमतीची उत्सुकता त्यांना वाटत होती. बायजानं गाडग्यात तापवलेलं मेंढीचं खरपूस दूध त्यांना दिल. दूध पिताना आलेल्या पांढऱ्या मिशा पुसत त्या दोघीजणी हसू लागल्या. बिरानं घोड्याच्या पाठीवर घोंगडं टाकून छानपैकी सवारी तयार केली. त्या सवारीवर माधुरी व मीराला बसवलं. घोड्याच्या वेसणीचं दावं हातात धरून त्याने खाचराभोवती फेरा मारायला सुरुवात केली. पहिल्यांदाच घोड्यावर बसायला मिळाल्यामुळे त्या दोघी खूपच खूश झाल्या. आबलीने दिलेली घोडेसवारीची ही भेट त्या दोघींना खूपच आवडली. पायी चालणाऱ्या आबलीने टाळ्या वाजवत घोड्याभोवती पिंगा धरला होता. शनिवारची सकाळची शाळा. सर्व मुलं व गुरुजी मुंग्यांच्या रांगेप्रमाणे चालत-चालत आबलीच्या बिराडाच्या दिशेने निघाले. दप्तर तर कुणाकडेच दिसत नव्हते. रांग जसजशी जवळ येऊ लागली तसतशी आबलीच्या जिवाची घालमेल वाढू लागली. मुलं व गुरुजी मला शाळेत नेण्यासाठीच इकडं आलेत असे तिला वाटू लागलं; म्हणून ती ताडपत्रीच्या कागदाखाली दडून बसली! रांग मात्र बिराडाकडे न येता खाचराच्या बांधावरून शेजारच्या आमराईकडे झुकली.

ताडपत्रीचा कागद उचकटून हळूच बाहेर पाहणाऱ्या आबलीला हायसं वाटू लागलं. शाळा तर गावात मग गुरुजी आणि पोरं आमराईत काय करत आहेत, असा विचार तिच्या मनात येऊ लागला. काही वेळाने आमराईतून गाण्यांचा सूर घुमू लागला. झाडाआड लपतछपत ती आवाजाच्या दिशेने गेली. गुरुजी छानपणे पेटी वाजवत होते. टाळ्यांच्या आणि पेटीच्या ठेक्यावर मुलं गात होती, नाचत होती. आबलीला तो नजारा खूपच आवडला. त्या पोरांच्या सुरात आपलाही सूर मिसळावा असं तिला वाटू लागलं. झाडाआड दडून ती मुलांचाच ठेका धरू लागली, नाचू लागली. गुरुजींनी मुलांना रंगीबेरंगी कागद वाटले. ते सांगतील तशी कृती मुलं करू लागले. कागदापासून होडी काय, विमान काय, फुल काय अशा खूप वस्तू बनवण्यात मुलं दंग झाली. आबलीला त्या कागदी वस्तू पाहण्याची अनिवार इच्छा झाली, पण पाय पुढे टाकण्याचे धाडस तिच्यात येतच नव्हतं. गुरुजींच्या नजरेतून आबली आमराईत आल्यापासून सुटली नव्हतीच ! गुरुजींनी खुणावतच मीरा व माधुरी आबलीजवळ गेल्या. माघारी वळावं की पुढे जावं, नेमकं काय करावं ते आबलीला समजतच नव्हते. त्या दोघींसोबत ती तशीच पुढे गेली. मुलांनी टाळ्या वाजवून तिचे स्वागत केले. गुरुजी तिलादेखील कागदी वस्तू बनवायला शिकवू लागले. आबलीला छान वाटू लागलं.

गुरुजींनी शेवटी प्रश्नमंजुषेचा खेळ सुरु केला. माणसांची, फुलांची, गावांची व बैलांची नावं काय काय असतात, असे गमतीदार प्रश्न ते मुलांना विचारात होते आणि बक्षीस देत होते. आबली उत्तर देणाऱ्या मुलांकडे कौतुकाने पाहत होती. गुरुजींनी शेवटचा प्रश्न विचारला, “आता मी शेवटचा आणि अवघड असा प्रश्न विचारणार आहे, त्याचे उत्तर कोण हुशार देईल ते पाहुया. प्रश्न असा आहे की, माणसांना जशी नावे असतात तशीच नावे मेंढरांनादेखील असतात. कोण सांगेल ती नावे ?”

मुलं एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागली. कुणालाच या प्रश्नांचं उत्तर देता येईना. या प्रश्नाचं उत्तर फक्त आबलीकडेच होतं, पण ते सांगण्याचं धाडस तिच्यात येत नव्हतं. मीरा उभी राहून म्हणाली, ““गुरुजी, या प्रश्नाचं उत्तर फक्त आबालीच देईल.”” सर्व मुलांनी ‘आबली, आबली’ असा पुकारा करीत टाळ्या वाजवल्या. या टाळ्यांमुळे उभं राहण्याचं धाडस आबलीला आलं. ती भांबावलेल्या स्वरात बोलू लागली, ““चिवळी, खडली, गरगाडी, कोल्हीगुणी.” गुरुजींच्या प्रश्नाचे उत्तर देऊन आबली हुशार मुलगी बनली. मुलांच्या व गुरुजींच्या कौतुकात ती न्हाऊ लागली...

आबली आता रोज आवडीने शाळेत जाऊ लागली. शाळा हे तिचं आनंदाचं घर बनत गेलं. भटक्यांच्या कळपात पहिल्यांदाच पाटी-पुस्तक आणि अक्षरं फुलू लागली... वैशाखझळा सुरू झाल्या. घाटाकडील मूळ गावी पायी परतणाऱ्यासाठी मेंढपाळांमध्ये लगबग सुरु झाली. पाऊस सुरु होण्याआधी कोकण सोडायचं होतं. बिरा आणि बायजाने बिराडाची आवराआवर सुरु केली. आबली अस्वस्थ होऊ लागली. पाऊस झेलावा पण इथंच राहावं असं तिला वाटत होतं मात्र ते शक्य होत नव्हतं. तिला निरोप द्यायला फक्त माधुरीच आली होती. शाळेला उन्हाळी सुट्टी असल्यामुळे बाकी इतर कुणीही आलेलं नव्हतं. आबलीने भेट म्हणून माधुरीला एक चित्र व गुरुजींसाठी एक वस्तू दिली. नवजात रेषांचं चित्र तिने रेखाटलं होतं. घोड्यावर बसून शाळेत निघालेल्या तीन मुली होत्या त्या चित्रात ! गुरुजींना भेट म्हणून दिलेली वस्तू होती, मेंढीच्या लोकरीपासून तिने स्वतः बनवलेला मऊशार असा डस्टर ! पाठीवर बिराड लादलेल्या घोड्याचं दावं हातात धरून भरल्या डोळ्यांनी आबली पुढं-पुढं चालत राहिली...

-प्रमोद धायगुडे
My Cart
Empty Cart

Loading...