Menu

नावात काय ( काय ) आहे!

image By Wayam Magazine 03 March 2024

आपला सगळ्यांचा आवडता छंद म्हणजे दुसऱ्याला नावं ठेवणं. तसं तर माणसांमध्ये जन्मलेल्या प्रत्येकाला काही ना काही नाव ठेवलेलं असतंच, पण पाळण्यात ठेवलेल्या त्या नावाने बाकीच्यांचं समाधान होतंच असं नाही, मग पाळणातल्या ‘मकरंद’चं ‘मक्या’ आणि ‘संगीताचं’ ‘संगी’ अगदी हमखास होऊन जातं. एखाद्याशी भांडण झालं किंवा कोणाचा राग आला तर लगेच चिडवण्यासाठी त्याच्या किंवा तिच्या शारीरिक ठेवणीवरून ‘झिपरी’ नाहीतर ‘काळतोंड्या’ म्हणायला आपण कमी करत नाही. शिवाय आई-वडिलांनी कौतुकाने नाव ठेवलं तरी पुढे मोठेपणी ‘शालिनी’ कजागपणे वागणारच नाही आणि ‘हसमुख’ कायम रडणारच नाही याची खात्री कोण देणार? त्यामुळेच बहुधा शेक्सपियरने ‘नावात काय आहे?’ म्हटलं असावं. पण प्राणिसृष्टीत मात्र असं नसतं. किंबहुना प्राणिसृष्टीतील नावं ही त्या त्या जीवाची ओळख असतात, कारण ती अनेकदा त्याच्या रंगरुपावरून पडलेली असतात. मात्र तिथेही माणसाचा ‘नाव ठेवण्याचा’ गुण उफाळून आलेला पाहायला मिळतो. त्यामुळे काही वेळा पक्ष्यांच्या गटातल्या सभासदांना प्राण्यांची नावं मिळतात किंवा काहीवेळा चक्क त्या प्राण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक ठेवणीवरून कुत्सित वाटेल असंही नाव ठेवलं जातं. 

याचं मस्त उदाहरण म्हणजे ‘जिराफ विव्हिल’ हा लहानसा कीटक. आता ‘विव्हिल’ म्हणजे कोण? तर धान्यांमध्ये, विशेषतः गव्हामध्ये सापडणारे ‘पोरकिडे’. हे किडे बिटल्स म्हणजे ढालकिडे या गटाचे सभासद आहेत. कीटकांच्या गटातील हा सर्वांत मोठी संख्या असलेला सभासद आहे. जगभरात मिळून बिटल्सचे सुमारे चार लाख प्रकार सापडतात. त्यातील ‘जिराफ विव्हिल’ हा कीटक आकाराने जेमतेम एक सेंटिमीटरसुद्धा नसतो, पण या कीटकांमधील नराची मान मात्र चांगलीच लांबलचक असते. अगदी जिराफाच्या लांबमानेची आठवण करून देणारी! म्हणून याला नाव आहे ‘जिराफ विव्हिल’. याच्या काही जातींमध्ये मादीचा आकार मात्र अगदी सर्वसाधारण असतो. लांबुळक्या मानेमुळे हा कीटक उडतानाही अगदी विनोदी दिसतो. पानाची सुरळी वळून त्यात आपली अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी जिराफ विव्हिल प्रसिद्ध आहे. मादागास्कर या बेटावरचा मूळचा असलेला हा कीटक भारतातही पाहायला मिळतो.

पक्ष्यांच्या बहुरंगी दुनियेत आपल्या रंगीबेरंगी रुपाने आकर्षित करून घेणारे पक्षी जसे आहेत, तसेच काहिसे दचकवणारे, विचित्र चेहऱ्यामोहऱ्याचेही आहेत. त्यातलाच एक म्हणजे ‘फ्रॉग माऊथ’. खरोखरच या पक्ष्याच्या तोंडाची ठेवण बेडकाच्या तोंडासारखी पसरट, फताडी असते. भारतामध्ये सह्याद्रीच्या रानात ‘सिलोन फ्रॉगमाऊथ’चे वास्तव्य आहे. रानातील वाळक्या पानांच्या रंगाची पिसे असलेला हा पक्षी निशाचर आहे. दिवसा झाडाच्या एखाद्या फांदीवर गुपचूप बसून राहतो आणि रंगसंगतीमुळे भोवतालच्या रानात मिसळून जातो. जानेवारी ते एप्रिल हा विणीचा हंगाम असतो. या काळात झाडाच्या फांदीवर नरम पिसे आणि शेवाळे यांची गादी तयार करून त्यावर फ्रॉगमाऊथ अंडे घालतो. या घरट्याला बाहेरून झाडाच्या खोडावर उगवणाऱ्या दगडफूलाचे (लायकेन)चे आवरण असते, त्यामुळे पटकन घरटे दिसत नाही. महाराष्ट्रातल्या फणसाडपासून ते केरळातील थत्तेकाडपर्यंत अनेक ठिकाणी ‘फ्रॉग माऊथ’ दिसू शकतो, मात्र त्यासाठी तुमची नजर तरबेज हवी.

आपल्या विचित्र शरीरामुळे लक्ष वेधून घेणारा जलचर म्हणजे ‘हॅमर हेडेड शार्क’. खरोखरच हातोड्यासारखं तोंड असलेला हा शार्क सुमारे १९ फुटांपर्यंत वाढतो आणि त्याचं वजन साधारणतः ५५० किलो असतं. जगातील सगळ्या महासागरांमध्ये किनाऱ्याजवळ हे शार्क मासे आढळतात. दिवसा अनेकदा कळपाने राहणारे हे शार्क संध्याकाळनंतर मात्र इतर शार्क माशांप्रमाणे एकट्यानेच शिकार करून पोट भरतात. या शार्कच्या हातोड्यासारख्या डोक्यामुळे त्याचे डोळे अशा ठिकाणी असतात की, ज्यामुळे त्याला एकाचवेळी आपल्या शरीराच्या वरचे आणि खालचे दृश्य बघता येते. शिवाय या पसरट डोक्यामुळे हॅमरहेड शार्कना आपलं भक्ष्य शोधायला मदत होते, कारण पसरट डोक्यावर विखुरलेल्या ‘इलेक्ट्रोरिसेप्टरी सेन्सर्स’मुळे त्यांचा  शोधायचा आवाका वाढतो. त्यामुळे दिसायला बोजड असलेल्या डोक्यामुळे हे शार्क अधिक प्रभावीपणे आपलं अन्न शोधू शकतात. थोडक्यात, निसर्गातील प्रत्येक गोष्टीमागे काही योजना असते, मग दिसताना ती गोष्ट कितीही विचित्र दिसो!

- मकरंद जोशी                   

***

My Cart
Empty Cart

Loading...