Menu

चिवचिवाट

image By Wayam Magazine 19 March 2024

आज काही परीचा मूड सकाळपासूनच ठीक नव्हता. रोजच्यासारखी परी आजी-आजोबांबरोबर फिरायलाही गेली नव्हती. आईने तिच्या आवडीचा नाश्ता केला, तरी परी नेहमीसारखी आवडीने खातही नव्हती. कोणाशी बोलत नव्हती. मोठ्या माणसांप्रमाणे कसल्या तरी विचारात होती. 

आईने परीला बाबाला उठवायला सांगितलं. 

परी म्हणाली, “झोपूदे गं बाबाला. आज शनिवार आहे. मला शाळेला सुट्टी नसली तरी बाबाच्या ऑफिसला सुट्टीच आहे ना.”

आईला थोडं आश्चर्यच वाटलं. एरव्ही बाबाला सुट्टीच्या दिवशीही झोपू न देणारी परी, ‘आज बाबाला झोपू दे..’ असं म्हणतेय. काहीतरी बिनसलंय एवढं नक्की. 

परी चौथीत होती. शाळेत जाताना परीची कधीच तक्रार नसे. आईला सुट्टी असल्याने आईने तिची कामं आवरली आणि आई परीच्या खोलीत गेली. आज शाळेची वेळ झाली तरी परी तयार झाली नव्हती. 

आईने विचारलं, “काय गं परी काय झालं? आज तू गप्प गप्प का आहेस? आमची ठमा रागावलीय का आमच्यावर? का शाळेत चिमासोबत भांडण झालंय?” 

त्यावर परी म्हणाली, “आई माझ्या पोटात दुखतंय. आज मी शाळेला जात नाही, चालेल का? थोडा आराम करते.” 

आई म्हणाली, “अगं पण दर शनिवारी तुझ्या शाळेत तुम्हांला होम सायन्स शिकवतात ना. मग तुझं चुकेल ना.” 

“चूकू दे. तू शिकव मला. आजी मला काही काम करू देत नाही, पण तू गुपचूप शिकवतेस आणि करू पण देतेस ना. तसं शिकेन मी. आज भेळ बनवायला शिकवणार आहेत. मला येते भेळ बनवायला. त्यात माझ्या पोटात दुखतंय. मला भेळ खाताही येणार नाही. म्हणून मी नाही जात.”

आईला आश्चर्यच वाटलं. “बरं. नको जाऊस शाळेत. तुझ्या पोटात दुखतंय ना.. मला सांग, तू पॉटी करून आलीस का?”

त्यावर परी म्हणाली, “नाही. अजून जावंसं वाटत नाहीये गं.”

“अगं परी, म्हणूनच तुझ्या पोटात दुखत असेल. असं नाही करायचं. मी तुला द्राक्षासव देते प्यायला त्याने तुला बरं वाटेल.” 

“नको आई. मला काहीच नको. मी बाबाच्या शेजारी जाऊन झोपते.” 

“बरं.” 

११ वाजले तरी परी आणि परीचे बाबा उठले नाहीत. म्हणून आई दोघांना उठवायला गेली, तर परी उठून चटकन टॉयलेटमध्ये गेली. आईने मनात म्हटलं, ‘आता हिला बरं वाटेल.’ तेवढ्यात बाबा उठला. ब्रश करू लागला. ब्रश झाल्यावर आई, आजी, आजोबा, बाबा परीच्या शाळेला मारलेल्या दांडीविषयी बोलू लागले. त्यावर आईने, परीच्या पोटात दुखतंय, असं सांगितलं. 

बाबाने विचारलं, “आहे कुठे परी?”

आई म्हणाली, “टॉयलेटमध्ये.”

“अरे बापरे एवढा वेळ...?’’ बाबा म्हणाला.

“मला उठून अर्धा तास झालाय. माझा चहा-नाश्ताही झाला. तरी अजून परी आलीच नाही गं.”

आई तिच्या आवराआवरीच्या कामात होती, बाबाचं बोलणं ऐकल्यावर आईने टॉयलेटच्या दरवाजावर ठकठक केलं. 

“परी, किती वेळ. झोपलीस का गं आतमध्ये?” 

परी दबक्या आवजात ‘‘नाही’’ म्हणाली. 

“ये मग लवकर.”

“हो.” 

एवढ्यात चिमणीचा जोरात चिवचिवाट ऐकू आला. आजीने बाबाला हाक मारली आणि सांगितलं की, “आज तरी ते टॉयलेटच्या खिडकीतलं चिमणीचं घरटं आहे, ते काढून टाक. त्यातली पिल्लं दोन दिवसांपूर्वीच उडून गेली. चिमणी येते आणि चिवचिवाट करते. आता त्या घरट्याच्या काड्या ती पसरवून टाकतेय, त्यामुळे टॉयलेटमध्ये सगळा कचरा होतोय.” 

बाबाने परीला हाक मारली. “परी. लवकर ये बाहेर.. मला तिकडची साफसफाई करायची आहे.” 

त्यावर परी जोरात ओरडून म्हणाली, “मी नाही येणार बाहेर. मी इथेच बसून राहणार. तुला ओरडायचं तेवढं ओरड मला!” 

“अगं, परी असं बोलतात का बाबाला. आधी बाहेर ये.’’ आईही ओरडली. 

परी रडक्या सुरात आणि रागाने, ‘‘नाही येणार मी बाहेर’’ असं परत परत सांगू लागली.

परीचं हे वागणं कोणालाच कळेना. 

बाबा म्हणाला, “परी, बाळा, काय झालंय. का अशी वागतेयस? तुझ्या लाडक्या बाबाला सांगणार नाही का तू?”

“आधी मला प्रॉमिस कर की, तू चिमणीचं घरटं काढून फेकून देणार नाहीस. तरच मी बाहेर येईन, नाहीतर मी इथेच बसून राहीन.”

हे ऐकल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. बाबाने तिची अट मान्य केली. परी बाहेर आली. हात धुतले. आनंदाने उड्या मारू लागली. बाबाला किसी दिली. आईने केलेल्या वड्या खाल्ल्या.  

“बाबा, थँक्स.. तू माझं ऐकलंस. प्लीज ते घरटं नको काढूस हं. तू मला तसं पिंकी प्रॉमिस केलंयस.” 

आजोबा, आजी माझ्या पोटात दुखत नाहीये. मी आता खूप खूश आहे. परी उड्या मारत तिच्या खोलीत गेली. 

हे सगळं पाहिल्यावर आई बाबाला म्हणाली, “परी त्या घरट्यासाठी पोटात दुखायचं नाटक करत होती का? सकाळी तिने तुलाही उठवलं नाही, झोपू दे म्हणाली बाबाला.” 

आईचं हे बोलणं बाबालाही पटलं. “अगं, काल रात्री आई आणि मी या घरट्याविषयी बोललो होतो. ह्या घरट्यामुळे सगळा कचरा आत येतो. काड्या पडतात. मुंग्यापण दिसू लागल्यात. तेव्हा हे घरटं काढून टाकूया. आता त्यात अंडी, पिल्लं पण नाहीयेत. सकाळी उठलो की, पहिलं हेच काम करतो आणि अंघोळ करतो, असं म्हटलं होतं मी आईला.” 

आता परीच्या आईच्या सारा प्रकार लक्षात आला. आई परीच्या खोलीत गेली आणि परीला विचारलं, “काय गं, तुझ्या पोटात दुखत होतं ना? बरी आहेस का आता?” 

परी मिश्कीलपणे हसून आईला म्हणाली, “हो आई, मी बरी आहे.” 

“तू त्या घरट्यासाठी शाळेला दांडी मारलीस का?”

हे ऐकल्यावर परी ओशाळली. आईला मी केलेलं नाटक लक्षात आलंय, हे परीला समजलं. परीने आईला मिठी मारली आणि ‘सॉरी’ म्हणाली. 

“आई, मी रोज टॉयलेटमधील चिमणीशी आणि तिच्या पिल्लांशी बोलायचे. त्यांना रोज बघायचे. चिमणी मावशीची अंडीही मी पाहिली होती. ती जेव्हा एक एक काडी आणून घरटं बांधत होती, तेव्हापासून तिची माझी मैत्री झाली होती. मला तिला आणि तिच्या घराला काही होऊ द्यायचं नव्हतं. काल रात्री आजी आणि बाबाचं बोलणं मी ऐकलं आणि मला काय करावं ते कळेना. आपल्याकडे कामाला येणाऱ्या निशा मावशीचं घर पुरात वाहून गेलं, तेव्हा तिला खूप दुःख झालं होतं. ती खूप रडत होती. ती तेव्हा म्हणाली होती की, काडी काडी जमवून घर गोळा केलं, ते पण वाहून गेलं. मग या चिमणीनेही काडी काडी जमवून बांधलेलं घर आपण काढून टाकलं, तर तिलासुद्धा दुःख होईल. मग ती कुठे राहील. तिला किती मेहनत घ्यावी लागेल. आणि तिची माझी मैत्री तुटेल.” 

“आई, तुला माहितीय का?” 

“काय गं?”

“आई, तिची पिल्लंही तिच्या घरट्यात राहत नाहीत गं. ती उडून गेलीत. तिला भेटायलाही तिची पिल्लं येत नाहीत. ती रोज त्यांना हाका मारते आणि त्यांच्या आठवणीत रडत बसते. ती तुझ्यासारखीच आहे. मी दोन दिवस सहलीला गेले, तरी तुला माझी आठवण येते आणि तू कधी कधी रडतेससुद्धा ना. मग चिमणीमावशीने काय करावं? तिला आपण सगळ्यांनी मदत करायला हवी ना. घरात कोणी राहात नाही म्हणून माणसांची घरं कुठे फेकतात? म्हणून मी असं वागले आई.” 

आईला परीच्या वागण्यावर काय प्रतिसाद द्यावा हे कळेना. आईने परीला जवळ घेतलं आणि म्हणाली, “जा तुझ्या चिमणीमावशीला पाणी ठेवून ये जा आणि चार दाणे ठेव.

-क्रांती गोडबोले-पाटील 

*** 


My Cart
Empty Cart

Loading...