
विंदांच्या बालकविता भन्नाटच आहेत. कारण त्या दोन पातळ्यांवर आहेत. जेव्हा त्या कविता मुलं वाचतात तेव्हा त्या त्यांना त्यांच्या वाटतात. आणि जेव्हा मोठी माणसं त्या बालकविता वाचतात तेव्हा त्या कविता त्यांना मुलांकडे पाहण्याचा, मूल समजून घेण्याचा नवीन दृष्टिकोन देतात.
मुलांसोबत विंदांच्या बालकविता वाचताना तर मी अनेकवेळा थरार अनुभवला आहे. त्यांची 'सर्कसवाला’ ही दीर्घ कविता तर मास्टरपीस आहे. या कवितेची शैली इतकी चित्रमय आहे की, वाचता वाचता आपल्या डोळ्यांसमोरून एक चित्रपटच सरकू लागतो. दोस्ती, प्रेम, असूया, जिव्हाळा आणि असाहाय्यता या भावभावनांचा गोफ या कवितेत असा घट्ट विणला आहे की, कवितेचा शेवट जसजसा जवळ येऊ लागतो तेव्हा व्याकूळ होणारी मुले मी पाहिली आहेत.
'अजबखाना’ या कविता संग्रहातील दोन अगदी लहान कवितांमधल्या महान गमती मी तुम्हांला सांगणार आहे. या कविता आहेत फक्त १५ व १९ शब्दांच्या. पण या कवितांमधले अर्थ जेव्हा मला उलगडले तेव्हा मी पार बदलून गेलो.
या दोन कवितांसाठी मी विंदांचा आजन्म ऋणी आहे.
सही
विठोबापुढे
ठेवून वही
उदयने मागितली त्याची सही.
विठोबा म्हणाला
त्याला मजेत,
'देवांना नसते
लिहायला येत!’
ही १५ शब्दांची कविता ऐकताना मुले खळखळून हसतात. पण 'देवांना का लिहायला येत नसेल?’ या प्रश्नावर मुलांशी बोलताना मजा येऊ लागली. मुलांसाठी देव हा 'देवबाप्पा’ असल्याने ती त्या'याविषयी एकेरीतच बोलत होती. अचानक एका मुलाने मला प्रश्न विचारला, 'पण आपण का लिहितो?’ मी त्यावेळी त्या मुलाला काहीबाही उत्तर दिलं. पण त्या प्रश्नाचा भुंगा माझ्यामागे लागला. मी कविता पुन्हा पुन्हा वाचत राहिलो. आणि असं वाटलं, आपण हिशेबी असतो म्हणून लिहितो. काही हिशेब ठेवण्यासाठी म्हणून लिहितो. मग पुढचा प्रश्न ओघाने आलाच. 'देव का लिहीत नाही?’ आणि या कविते'या संदर्भात त्याचं उत्तरही मिळालं.
'देवाचं मुलांवर बेहिशेबी प्रेम असतं, अपार प्रेम असतं म्हणून देवाला 'किती प्रेम आहे’ हे लिहिता येत नाही. आपलं प्रेम ही व्यक्त करण्याची गोष्ट आहे, प्रेम ही अविरत सुरू असणारी कृती आहे. आणि प्रेमाचा हिशेबही ठेवता येत नाही. खरं म्हणजे, प्रेम ही काही फक्त लिहिण्याची गोष्ट नाही. म्हणूनच विठोबा उदयला हे सारं 'मजेत’ म्हणाला आहे, गंभीरपणे नव्हे, हेही लक्षात घेतलं पाहिजे.
मी मुलांवर अपार, अमर्याद प्रेम करायला पाहिजे. माझं मन मोठं करून मी समोर'या मुलाला समजून घेतलं पाहिजे. माझ्या प्रेमाची जाणीव मी मुलांना मजेत करून दिली पाहिजे, असं मला ही 'सही’ कविता सतत सांगत असते.
विंदांची दुसरी अगदी इटुकली कविता आहे, 'मावशी’. १९ शब्दांची!
जेव्हा प्रथम ही कविता वाचली तेव्हा या कवितेत काही खास आहे, असं जाणवलंच नाही. या कवितेतला नाद आणि नातेवाईक मुलांना आवडत असावेत असंच वाटायचं मला. मुलेही भरभरून दाद द्यायची या कवितेला. या कवितेत काकू आहे, आत्या आहे व मावशी आहे. कविता वाचल्यानंतर सहज एकदा मुलांना विचारलं, ''या कवितेतली काकू तुम्हांला आवडली, आत्या की मावशी?” मी हा प्रश्न विचारला तेव्हा समोर किमान हजार मुलं दाटीवाटीने बसलेली होती. बाजूला दोन-तीनशे मोठी माणसं. प्रश्न ऐकताच सगळी मुले एका सुरात ओरडली, ''माऽऽऽवशी.. माऽऽवशी.. मावशी आवडली आम्हांला!”
त्यावेळी मोठ्या माणसां'च्या चेह:यावरचं मोठं प्रश्नचिन्हं वाचता येत होतं. मुलांच्या चेह:यावरून अपरंपार आनंद ओसंडून वाहत होता! मी तर अवाक् झालो होतो!! का बरं?
ही १९ शब्दांची कविता मी पुन्हा पुन्हा वाचली. मुलांसोबत अनुभवली आणि एका क्षणी मला ते कोडं सुटलं! आपण आजपर्यंत काय चूक करत होतो, हे स्वच्छपणे समजलं. आणि आता या क्षणापासून आपण काय करायला पाहिजे ते लख्खपणे उलगडलं. ही कविता मला सदैव धीर देते. मला धाकात ठेवते. मूल समजून घेण्याची माझी प्रेरणा सतत तीव्र करत राहाते.
मावशी
सोलापूरहून
येते काकू;
माझ्यासाठी
आणते चाकू.
कोल्हापूरहून
येते आते;
माझ्यासाठी आणते पत्ते.
राजापूरहून
मावशी येते;
माझा एक
पापा घेते!
'मुलांना मावशी का आवडत असावी?’ या प्रश्नाचा अक्षरश: ध्यास घेतला. कधी मुलांशी तर कधी मोठ्यांशी पण याबाबत बोलत राहिलो. पण कोडं सुटत नव्हतं. पण जेव्हा हाच प्रश्न मी मलाच विचारला तेव्हा साक्षात्कार झाल्यासारखा तो प्रश्न सुटला.
या कवितेतील काकू मुलासाठी चाकू आणते. या कवितेतील आत्ते मुलासाठी पत्ते आणते. पण या कवितेतील मावशी मुलासाठी काहीच आणत नाही. तरीही सगळ्या सगळ्या मुलांना ही मावशीच आवडली! कारण मोठ्या माणसांना असं वाटतं की आपण मुलांना काही दिलं तर आपण मुलांना आवडू, मुलांना खाऊ दिला, खेळणी दिली किंवा महाग वस्तू दिल्या तर आपण त्यांना नक्कीच आवडू, पण नाही! काकू चाकू आणते, आत्ते पत्ते आणते, पण या दोघी जणी मुलाशी बोलत नाहीत. त्याला जवळ घेत नाहीत. मावशी काही आणत नाही, तर ती मुलाकडून घेते. मुलाचा मायेने, प्रेमाने पापा घेते. त्याला जवळ घेते. मावशी तिचं प्रेम तिच्या कृतीतून, तिच्या स्पर्शातून व्यक्त करते. मुलाचा आत्मसन्मान उंचावते. 'आपल्याला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून किंमत असावी, प्रेम मिळावं,’ इतकीच मुलांची माफक अपेक्षा असते.
आपण मुलांना 'देणारे’ नव्हे तर मुलांकडून 'घेणारे’ व्हायला पाहिजे, तरच आपण मुलांचे होऊ, असं मला ही कविता सांगत असते.
'ओळखी'या किंवा अनोळखी मुलांना भेटल्यावर आपली कृती ही प्रेममयच असली पाहिजे, मी अधिकाधिक मन मोठं करून समोर'या मुलाला समजून घेतलं पाहिजे,’ असं जणू मला हे विंदांचे १५ व १९ शब्द सतत बजावत असतात.
-राजीव तांबे
***