Menu

हार्ट सर्जरीचा जनक

image By Wayam Magazine 05 April 2024

हृदय-प्रत्यारोपणाची पहिलीवहिली शस्त्रक्रिया कशी झाली, त्याची ही थरारक गोष्ट! एकाचे हृदय दुसऱ्याला बसवण्याची किमया अद्भुत होती. त्या किमयेमुळे आज अनेकांना नव-संजीवन मिळत आहे!  


लोकसत्तात एक बातमी होती- “डॉ. अन्वय मुळे- पाच वर्षांत शंभराहून अधिक हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया!” ती बातमी वाचताच दक्षिण आफ्रिकन संशोधक डॉ ख्रिश्चन बर्नार्ड याची आठवण झाली. हृदयरोपणाची मानवावरील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया त्याने ३ डिसेंबर १९६७ला केली. त्या वेळी या घटनेचे वर्णन करताना ‘टाइम’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाने त्याला मेडिकल सायन्समधील एव्हरेस्ट शिखर जिंकल्याची उपमा दिली होती. डॉ. बर्नार्डने पहिली मानवावरील यशस्वी हृदयारोपण शस्त्रक्रिया केलीच, शिवाय त्यांनी इतरही विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करून नवीन पायंडे पाडले.

८ नोव्हेंबर १९२२ रोजी बोफां वेस्ट या दक्षिण आफ्रिकेतील छोट्याशा गावी ख्रिश्चन नाथलिंग बर्नार्डचा जन्म झाला. जेमतेम २५-३० हजार वस्तीच्या त्या गावात हायस्कूलपर्यंत शिक्षणाची सोय होती. ख्रिसचं शालेय शिक्षण गावच्या ह्याच शाळेत झालं. ख्रिस टेनिस उत्तम खेळत असे. खेळाप्रमाणे अभ्यासातही तो हुशार होता. अभ्यासाबाबत त्याची आई अत्यंत जागरूक होती. मुलांनी नुसते पास न होता अव्वल नंबर मिळवला पाहिजे, याबाबत ती आग्रही होती.

शालेय शिक्षण पहिल्या क्रमांकाने पूर्ण केल्यावर केपटाऊनच्या विद्यापीठात जाऊन वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्याचा विचार त्याने घरच्यांना सांगितला. “युनिव्हर्सिटीत एक वर्ष काढल्यावर, उत्तम मार्क मिळाले तरच तुला ग्रुट शूर मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळेल,” असे त्याच्या भावाने त्याला बजावले. पहिल्या वर्षी त्याला फिजिक्स व झूऑलॉजी जमेना. पण जिद्दीने अभ्यास करून तो परीक्षेला सामोरा गेला आणि उत्तम मार्क मिळवून पास झाला. आता पुढील पाच वर्षं त्याला हॉस्पिटल व कॉलेजमध्येच काढायची होती.

मेडिकलचे शेवटचे वर्ष आटोपले  व ख्रिसला ग्रुट शूर इस्पितळातच इन्टर्नशिप मिळाली. इन्टर्नशिप संपल्यावर त्याने मित्रासोबत वर्षभर प्रॅक्टिस केली. त्यात त्याचे मन रमेना. त्याला तर मनोमन सर्जन बनायचे  होते. ‘ग्रुट शूर हॉस्पिटल’ गाठल्याशिवाय हे शक्य नाही, हे उमगून तो केपटाऊनला परतला. आल्या आल्या त्याला ‘ग्रुट शूर’मध्ये  नोकरी मिळाली नाही, म्हणून त्याने दोन वर्षं सिटी हॉस्पिटलच्या सांसर्गिक रोगांच्या विभागात काम केले. तेथे केलेल्या मूलभूत संशोधनावर त्याला एम्.डी.ची पदवी मिळाली. आता ‘ग्रुट शूर हॉस्पिटल’चा दरवाजा त्याच्यासाठी उघडला गेला. सर्जरी विभागात ‘रजिस्ट्रार सर्जन’ची पोस्ट त्याला मिळाली. येथे सुद्धा त्याने अर्भकांच्या आतड्यांतील अडथळ्यांमुळे होणारे मृत्यूचे मूळ कारण शोधून त्यावर उपयोगी पडेल अशी शस्त्रक्रिया प्रो.डॉ. जॅनी लॉवच्या बरोबरीने प्रस्थापित केली. वैद्यकीय विश्वात ह्या उपचार पद्धतीस ‘लॉव – बर्नार्ड’ पद्धत म्हणून मान्यता मिळाली.

ख्रिसचा धाकटा भाऊ लहानपणी हृदयरोगाने मरण पावल्यापासून त्याच्या मनाने ध्यास घेतलेला होता की, आपण हृदयरोगावर उपाय शोधायचा. ती ऊर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. हॉस्पिटलमधील रोजचे काम संपल्यावर तो प्राणिशास्त्र प्रयोगशाळेत, प्राण्यांच्या हृदयावर वेगवेगळे प्रयोग करी. त्याची जिद्द पाहून हॉस्पिटलच्या डीनने त्याला हृदय शस्त्रक्रियेत विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी अमेरिकेत मिनियापोलिस युनिव्हर्सिटीत प्रो. वॅंगनस्टीनबरोबर काम करण्याबाबत विचारणा केली. अर्थातच ख्रिसने ती लाखातील एक संधी घेतली.

अमेरिकेच्या अडीच वर्षांच्या वास्तव्यात तो हार्ट-लंग मशीनचा प्रत्यक्ष वापर करून ओपनहार्ट सर्जरी करायला शिकला. हृदयाच्या बिघडलेल्या झडपांवर उपाय म्हणून प्लास्टिकच्या कृत्रिम झडपा वापरण्याचे प्रयोगही त्याने केले. त्याच्या ह्या संशोधनासाठी त्याला पीएच्.डी. मिळाली. हा सगळा अनुभव व सोबत ‘हार्ट-लंग’ मशीन घेऊन तो त्याच्या कर्मभूमीत, केपटाऊनला परतला.

प्रो. लॉवबरोबर चर्चा करून त्यांनी हार्ट लंग मशीन चालवण्यासाठी डॉक्टरांच्या टीमची निवड केली. टीमला ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांनी पहिले प्रयोग प्राण्यांवर सुरू केले. मशीन व टीमचे काम सफाईदारपणे होऊ लागल्यावर त्यांनी ते मशीन ऑपरेशन थिएटरमध्ये वापरण्याचा निर्णय घेतला. परीक्षेचा क्षण आता अगदी जवळ आला होता, फक्त तशा पेशंटची वाट बघायची होती.

आता सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे प्रत्यक्ष हृदय-प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रो. श्रायरनी हृदय-रोपणासाठी एक पेशंट निवडल्याची बातमी ख्रिसला दिली. पेशंट लुई वॉश्कान्स्की हा हृदयविकार विकोपाला गेलेला एक हौशी कुस्तीपटू होता. त्याच्याबाबत एकच शेवटची आशा होती, ती म्हणजे खराब हृदयाच्या जागी दुसऱ्या निरोगी हृदयाचे प्रत्यारोपण करणे.

ख्रिसने आपल्या वॉर्डात लुईला आणून सगळ्या तपासण्या केल्या. आता हृदय देणारी व्यक्ती हवी होती. 

दोनच दिवसांनी अॅक्सिडेंटची एक केस हॉस्पिटलमध्ये आली. ही डेनिस डॉर्व्हाल नावाची तरुण मुलगी होती, तिचा मेंदू निकामी झालेला, पण हृदय मात्र शाबूत होते. डेनिसच्या पालकांची परवानगी लगेच मिळाली व पुढची चक्रे सुरू झाली. 

डेनिसचा मृत्यू अटळ होता. ऑटोमॅटिक व्हेंटिलेटर बंद करून तिला मुक्त करायचे होते. श्वास थांबल्यावरही हृदय, यकृत, मूत्रपिंड, डोळे यांसारखे अवयव शाबूत राहण्याची अल्प मुदत निसर्गाने दिली आहे. त्याचा एक मोठा फायदा असा होई की, मृत शरीरातून हे अवयव काढून त्यांचे आरोपण इतर गरजवंत रुग्णांच्या शरीरात करण्याइतकी सवड डॉक्टरांना मिळे.

ख्रिसच्या वॉर्डातील शस्त्रक्रिया दालनात लुईला टेबलवर झोपवण्यात आले. डॉक्टरने ऑक्सिजनचा मास्क त्याच्या तोंडावर बसवला. गुंगी यावी म्हणून थिओपेंटिनचे एक इंजेक्शन दिले. दिल्याने लुईला गुंगी आली. स्नायूंना शिथिल करणारे स्कोलिनचे दुसरे इंजेक्शनही त्याला दिले. लुईच्या तोंडात एन्डोट्रॅकिअल ट्यूब घालून घशाखाली सरकवत फुप्फुसाकडे जाणाऱ्या ज्या दोन नळ्या असतात, त्याच्या सांध्यावर ती आणून ठेवली. या नळीचे दुसरे टोक भात्याला जोडले आणि कृत्रिम श्वासोच्छ्वासाला सुरुवात केली. ऑक्सिजनचा पुरवठा लुईच्या शरीराला होऊ लागला.

डेनिसला जिथे ठेवले होते, त्या थिएटरमध्ये ख्रिस गेला. तिची हृदयक्रिया समाधानकारक नव्हती. हृदयरोपणासाठी लुईला तयार करण्यापूर्वीच डेनिसचे हृदय बंद पडण्याचा धोका उत्पन्न झाला होता. तो धोका टाळण्यासाठी एक मार्ग ख्रिसला सुचला. डेनिसच्या हृदयाची क्रिया नवीन हार्ट-लंग मशीनने चालू ठेवायची. तशा सूचना देऊन ख्रिस व त्याचा मुख्य मदतनीस डॉ. रॉडनी ह्युविटसन मग लुईकडे गेले. तेथे लुईवर प्रथम एक छोटीशी शस्त्रक्रिया केली गेली. लुईच्या उजव्या जांघेत छेद घेऊन दोन नळ्या (कॅथेटर) आत सरकवल्या. त्यातील एक नळी, कनिष्ठ व्हेन सांध्याला जोडली गेली. त्यामुळे नीलेत निर्माण होणारा रक्तदाब मोजता येत होता. दुसरी नळी मांडीतील मुख्य शुद्ध रक्तवाहिनीमध्ये सरकवली गेली. ही नळी हार्ट लंग मशिनला जोडल्यानंतर शुद्ध रक्ताचा पुरवठा हार्ट लंग मशीनकडे वळविता येणार होता. लवकरच हृदय आणि फुप्फुस यांचा परस्परसंबंध सुटणार होता. 

दुसरीकडे डेनिसच्या बायपासची तयारी झाली होती. बायपास म्हणजे डेनिसच्या शरीरापासून तिचे हृदय वेगळं काढून त्याची क्रिया मशीनकडून चालू ठेवायची. श्वासोच्छ्वास बंद केल्यानंतर तिच्या हृदयाची क्रिया थांबण्याची वाट पाहावी लागणार होती. त्याने डेनिसचा रेस्पिरेटर बंद केला. रक्तवाहिन्यांतून घातलेल्या नळ्या बंद केल्या. रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून औषध सुरू केलं. 

आता अखेरची वेळ भरत आली होती. ईसीजीच्या पडद्यावर हिरव्या रंगात पडणारी डेनिसच्या हृदयाची पावलं ऑक्सिजनशिवाय अडखळणार होती. पण हा अपेक्षित मृत्यू आलाच नाही. बोलता बोलता सहा मिनिटे गेली व नंतर मात्र त्या चिमुकल्या हृदयाचे बळ संपले. कायद्याप्रमाणे हृदयक्रिया बंद पडल्याशिवाय त्यांना पुढची कार्यवाही करता येणार नव्हती. पुढच्या सूचना देऊन ख्रिस लुईकडे परतला. तिथे लुईच्या बायपासला सुरुवात केलेली होती. अॅन्टिरिजेक्शन (परका अवयव झिडकारणे) साठी ‘कॉर्टिझोन’ सुरू करण्यास सांगून तो परत डेनिसकडे आला.

तिथे बायपासचीच तयारी चालू होती. डेनिसचे लहान, लोळागोळा झालेले निळे हृदय पाहून त्याला वाईट वाटले. ‘पंप सुरू करा’ त्याने सांगितले. हार्ट लंग मशीनने थंड रक्तपुरवठा तिच्या हृदयाला सुरू झाला. पंप सुरू करताक्षणी हृदयाचा निळा रंग ओसरला व ते परत सुंदर गुलाबी दिसू लागले. लोळागोळा पडलेले हृदय  आता पूर्ववत दिसू लागले. आता तिचे हृदय तिच्या शरीरातून काढून लुई वॉश्कान्स्कीच्या शरीरात त्याचे पुनर्वसन करायचे होते. 

हृदय बंद पडण्यासाठी लागलेला वेळ व वाढलेले तापमान लक्षात घेऊन हार्ट लंग मशीनला जोडलेल्या व रूधिराभिसरण चालू असलेल्या स्थितीत ‘डेनिसच्या हृदयाची’ वरात लवाजम्यासह तिच्या माहेराहून सासरी ‘लुई वॉश्कान्स्की’कडे निघाली. ते अंतर ३१ पावलांचे होते. ही ३१ पावलं टाकताना सगळीकडे विलक्षण शांतता पसरली होती.

सर्व लवाजमा लुईकडे पोचला. प्रेक्षकांची गॅलरी डॉक्टर्स व मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भरली होती. डेनिसचे हृदय हार्ट लंग मशीनपासून वेगळे करून थंड केलेल्या ट्रेत काढून ठेवण्यात आले. हृदयाला वेढा घालणाऱ्या कोरोनरी रक्तवाहिन्यांत रक्त भरण्यात आले. डॉक्टरांनी हृदय  एका रिकाम्या भांड्यात काढून ठेवले आणि एओर्टामध्ये सरकवलेला कॅथेटर कोरोनरी पर्फ्युजन पंपाच्या नळीला जोडला. डेनिसच्या हृदयाची एओर्टा पंपाला जोडल्यामुळे डेनिस व लुईचे रक्ताचे नाते जोडले गेले. वॉश्कान्स्कीचे रक्त डेनिसच्या कोरोनरी रक्तवाहिन्यांत फिरू लागले. ख्रिसची बोटं आत्मविश्वासाने कात्री चालवीत होती. लुईच्या हृदयाची एओर्टा रक्तवाहिनी व फुप्फुसात रक्त नेणारी पल्मनरी रक्तवाहिनी त्याने हृदयाच्या स्नायूनजीक छाटली. आता उरल्या होत्या फक्त सहा रक्तवाहिन्या. या सहा नलिका कापताना एका विशिष्ट पद्धतीने कापल्या. नलिका व हृदयाचा स्नायू या मधला सांधा कायम ठेवून हृदयाच्या स्नायूंमध्ये वर्तुळाकार छेद घेतला. सहा नलिका असलेल्या फनेलच्या आकारात लुईचे हृदय कापले. मग डेनिसचे हृदय लुईच्या छातीच्या पोकळीत ठेवले. लुईच्या हृदयाच्या कापून ठेवलेल्या फनेलसह सहा नलिका, डेनिसच्या हृदयाच्या सहा छिद्रांवर बसवून ते शिवून टाकले. मधला पडदा जोडून घेतला. आता लुईच्या छातीच्या पोकळीत बसवलेले डेनिसचे हृदय सहा नलिका जोडल्यानंतर एकसंध दिसू लागले.  

मग पल्मनरी व्हेन व एओर्टा ह्या दोन मोठ्या नलिका जोडल्या. एओर्टा जोडल्यावर लुईच्या शरीरात खेळणारा गरम रक्ताचा प्रवाह सरळ एओर्टामधून डेनिसच्या आरोपित (रोपण केलेल्या) हृदयात शिरला. रक्ताचं तापमान हळूहळू ३७ अंश से.पर्यंत गेले. 

रक्ताभिसरण चालू होताच एक नवीन समस्या उभी राहिली. हृदय थरथर कापू लागले! बहुधा या थरथरण्यातूनच ते लयबद्ध ठोके देऊ लागेल, ह्या आशेवर सगळे डोळ्यांत प्राण आणून वाट पाहू लागले. हृदयाचा कंप अधिकच बेताल झाला. आता त्याला स्थिर व लयबद्ध करण्यासाठी विजेचा एक शॉक देण्याची गरज होती. ख्रिसने ती व्यवस्था केली. अशा वेळी हृदयाचे सर्व स्नायू निमिषार्धासाठी थबकतात आणि मग पुन्हा गती घेतात. लुईच्या नवीन हृदयाला विजेचा शॉक दिला गेला. लुईच्या शरीराने उसळी घेतली. क्षणभर त्याचे हृदय  लुळे पडले. आवळलेली मूठ हळूहळू सैल पडावी तसे लुईचे हृदय सैल पडले. मग, अचानक आरोपित हृदयात स्फुरण संचारले. लुईचे हृदय एका सुंदर लयीत डोलू लागले. 

... आणि हृदयाच्या अंतिम परीक्षेचा क्षण आला.. इतका वेळ हृदयाचे काम पंपाच्या मदतीने चालू होते. आता पंपाशिवाय त्याची परीक्षा घ्यायची होती. आरोपित हृदय पंपाशिवाय रक्त खेळवण्यास सक्षम ठरते की नाही, हे कळणार होते. पंप बंद केला गेला. हृदयाला ताण सहन होईना, त्याचे स्नायू तटतटून फुगले. पुन्हा हार्ट लंग मशीन सुरू केले गेले. पुन्हा पुन्हा तोच प्रयोग थोड्या वेळाने केला. बरेच आशादायक बदल दिसून आले. एका खेपेला पंप बंद केला आणि हृदयाच्या स्नायूंत बळ आले. ठोक्याचा ताल पकडून मोठ्या आत्मविश्वासाने लुईचे हृदय धडधडू लागले.

‘जिंकलो आपण जिंकलो!’ ख्रिश्चन बर्नार्ड ओरडला!! तो संस्मरणीय दिवस होता, ३ डिसेंबर १९६७.

-उल्हास वैशंपायन 

***

My Cart
Empty Cart

Loading...