Menu

बळ

image By Wayam Magazine 21 March 2023

       बाल-कुमार साहित्यासाठी असणारा साहित्य अकादमी पुरस्कार सलीम मुल्ला यांना मिळाला हे समजल्यावर या नव्या लेखकाचा शोध घेतला. त्यांच्याशी गप्पा मारल्या. वनरक्षक असलेले सलीम मुल्ला स्वानुभवावर आधारित साहित्य लिहीत आहेत. त्यांनी आपल्यासाठी लिहिलेली ही अनुभव-कथा वाचा. एरवी आपण कथेवर कल्पनाचित्र काढून घेतो, मात्र ही अनुभव-कथा असल्याने मुद्दाम लेखकाने पाठवलेले संदर्भ-फोटो लेखात वापरले आहेत.

खुरटय़ा जंगलात वैशाखी उन्हाची धग पसरली होती. घरटय़ात चुप्प बसलेल्या पोसव्याच्या मादीची टळटळीत उन्हामुळे नुसती घुसमट होत होती.(हरियल किंवा यलो फुटेड पिजन नावाच्या पक्ष्याला पश्चिम महाराष्ट्रातपोसवाया नावाने ओळखतात.) पंखाखाली अंगास बिलगलेल्या पिलांच्या चिकट अन् उबदार स्पर्शाने तिला आंतल्याआत उकडल्यासारखे झाले होते. तशात मध्येच किंजळीच्या निष्पर्ण फांदोर्या वार्याने ढाळढाळ चळवळल्या की, उन्हाची झळ थर्रकावत थेट घरटय़ात उतरत होती. उन्हाची तिडीक लागली की, तिचे एक पिलू सारखे चिरचिरत (पिरपिर करत) होते. उन्हाला पंखाचा आडोसा धरून त्या अशक्त पिलाला चोचीने सारखे गोंजारताना मादी दमून गेली होती. पघळलेल्या पंखामुळे उन्हाचे चटके तिला जास्त बसू लागले.

वार्याची एक लांबसडक झुळूक झुरझुरत गेली. गुंजेच्या बियांसारखे लालेलाल डोळे गरगर फिरवत पोसव्याच्या मादीने सभोवार पाहिले. मानगुटीवरील विस्कटलेल्या पिसांतून झोंबलेल्या वार्यामुळे तिला खूप बरे वाटले. तिने ऊर भरुन श्वास घेत नजीकच्या पिंपळाकडे पाहिले. नव्या हिरव्यालुस्स पानांनी गजगजीत भरुन आलेल्या त्या झाडावर तिला सारे कसे चिडीचिप्प दिसले. तिथेच जांभळीचे झाड फुलाफळांनी डवरले होते. त्याच्या फुलोर्यावर मधमाशा घुटमळत होत्या. काळेठिक्क् पंख पसरून हबशी फुलपाखरे त्यावर लटकली होती. तसेच पिकल्या फळांसाठी पाखरांचा कलकलाट जोरात सुरू होता.

पिंपळाच्या आकबंद झाडाकडे पाहत मादी स्वतःशीच पुटपुटली, “शिशिरात पिंपळ फळांनी लहडला होता तेव्हा कोकिळ, तांबट, बोचुर्डे, शिंगचोचे, सुभग, किंकुडर्य़ा या सार्या पाखरांची या झाडावर लगबग असायची. आता त्यांची झिम्मड जांभळीवर..! झाडं फुल्लारुन येतात तेव्हाच तर त्यांना जगण्यातला खरा स्वानंद वाटत असेल. बहरून येईपर्यंत मिणमिण वाट पाहत बसणार्या झाडाला तोवर कितीसे उगीमुगी वाटत असेल! आमचेही थवे पिंपळावर रोज सकाळ-सायंकाळ उतरायचे. सोबतीणीच्या संगट खेळाखेळीत तेव्हा किती धम्माल व्हायची? सळसळणारी पिंपळपाने कुठली नि लुटपुटत्या मैत्रिणी कुठल्या! हे चटदिशी कळूनच यायचं नाही! नजरेला नकळत कशी चकवायची! पुन्हा आता या पिंपळावर फळांचा बहर येईल तेव्हा थव्यात माझ्यासोबत ही माझी कुकुलीबाळंही असतील. तेव्हा किनई किती मज्जा येईल!” या विचारात मादीने मायेने पिलांना कवटाळले.

अंगाला सतत चिटकून राहिलेल्या अशक्त पिलांना पोसव्याच्या मादीने पायाने हलका झटका देऊन बाजूला केले. अंगाची पिसे फुलवून शेपटीला झोके देत तिने घरटय़ातच बसून घु  घुव्व असा घुमरडा समोरच्या झाडीकडे पाहत केला. तिच्या दबक्या आवाजाची चाहूल लागताच झाडीतून नर पोसवा घाईने घरटय़ापासच्या हाळूच्या झाडावर आला. शेंडय़ावरच्या फांदीवर उतरताच त्याच्या भाराने टिक्कीवरचे पिकलेले हाळू धप्प्दिशी सुक्या पाचोळयात पडले. अचानक झालेल्या त्या आवाजाने अशक्त पिलू दचकले. किंचाळून आईला खेटून बसले. धडधाकट असलेले पिलू मात्र चाचपडत उठून पंख झाडू लागले. चिरमुटल्या पंखातून पिसुडलेली कोवळी पिसे फर्रकन् घरटय़ातून उडाली. हेलकावे खात खाली जाणार्या पिसांकडे धडधाकट पिलू टक लावून बघू लागले.

पोसव्याच्या मादीने डोळे वाटारून अशक्त पिलाच्या मानेला चोचीने चिमकुरा काढत म्हटले, “चिघुरमुगूर आवाजालाही अस्सा घाबरतोस! अजून लयी ऋतुनक्षत्रांचे फेरे तुला बघायचे आहेत बाळा! मन झाडासारखं मजबूत अन चिवट हवं रे... भितरट कुठला!” तिने पिंपळाकडे पुन्हा लक्ष दिले.

अंगावरची पिसे, चोच, पायांच्या नख्या यांची साफसुफी करत नर पोसवा अजून हाळूच्या ढाप्यावर बसूनच होता. टकामका मादीकडे पाहत होता. हिरवस हळदीगत तिचे पिवळेधम्म अंग अन् पंखावर आमसुली रंगाचे धब्बे मानेवर करडी झळाळी यामुळे ती झगझगीत उन्हात खूपच उठावदार दिसत होती. थोडय़ा वेळाने इकडे तिकडे पाहत, ‘कुणाचे लक्ष आपल्या घरटय़ाकडेतर नाही! कुठला धोका नाही ना!’ असा कानोसा घेत तो घरटय़ाजवळ आला. शेपटीचे पंख पिसारून वर उचलली. मग घु. घु.. घव्व्.. असा घुमावदार आवाज करत एका पायाभोवतीने गिरकी घेत घरटय़ाकडेच्या जाडजूड काटकीवर बसला. धडधाकट पिलू चोच उघडून त्याच्याशी लगट करू लागले.

नर पोसव्याने चोचीतली खाद त्याला लाडाने भरवली. अधाशीपणे घुट्ट करुन खात असलेल्या धडधाकट पिलाकडे पाहत मादीने पोसव्याला म्हटले, “थोरला म्हणून सदानकदा त्याचंच कौतुक नको! धाकल्यालाही लाडप्यार द्या म्हटलं!” असं म्हणत अशक्त पिलाला जवळ घेत ती परत म्हणाली, “ह्ये, माझं खेडमं पोर दाणापाणीसाठी कधी धडपडायचं? मोठ्ठधाटं कधी व्हायचं? नुस्ती मला हुरहूर लागली आहे!”

अगं, होईल सारं ठीक! तू नको ती काळजी उगाच करत्येस आणि बाप म्हणून दोन्ही पोरांवर माझा तितकाच जीव आहे. उगाच भलतसलतं पोरांच्या मनांत आतापासूनच भरवू नकोस!”

मादी मघाच्याच विचारात पिंपळाच्या झाडाकडे झेपावत गेली. तिला निवांतपणे त्या झाडावर थोडा वेळ आता बसावंसं वाटलं.

चिमणचिटके झाले असेल तेव्हाची वेळ... पोसव्याची मादी घरटय़ाची, पिलांची साफसफाई आवरण्याच्या धांदलीत होती. अशक्त पिलू दुमडलेल्या पायांवर मान टाकून डोळयांची उघडझाप करत पडून होते. धडधाकट पिलू मात्र एकटेच घरटय़ात खेळत होते. हेल काढून बडबडत होते. मादी ध्यान देऊन ऐकत होती. तितक्यात खाद हुडकणीसाठी गेलेला नर पोसवा घरटय़ापाशी आला. त्याची चाहूल लागताच नेहमीप्रमाणे धडधाकट पिलू धसमुळेपणाने पुढे सरसावले. बाबांच्या चोचीतल्या खाऊसाठी झोंबडणी करू लागले. त्यानंतर मादी लगेचच त्याच्या उघडय़ा चोचीआड आली. तिने वाकून अशक्त पिलाला टचा..टचा.. चोची मारून जागे केले. अशक्त पिलू चीई.. चीई.. करत रडत राहिले. मग मादीने रागाने घु.. घु.. घुब्ब.. असा घुमावदार आवाज केला. तोवर नर पोसव्याने अशक्त पिलाच्या चोचीत घाईने घास भरवलापिलाने आनंदाने पंखाची हालचाल केली. धडधाकट पिलू मात्र फुरगटून बसले. त्याच्याकडे लक्ष ठेवत नर पोसव्याने घरटय़ाच्या कचकलेल्या, ढिल्या झालेल्या काटय़ाकुटक्यांची न्याहळणी करून त्या ठीकठाक केल्या. भुकेमुळे चिडीला पडलेले धडधाकट पिलू धडपडत घरटय़ाबाहेर येऊ लागले. अशक्त पिलालाही पायांनी लाथाडत त्याने ढकलाढकली केली. आईबाबा दोघांना त्याला सांभाळूस्तोवर पुरी दमछाक झाली.

घरटय़ाबाहेर पडताना धडधाकट पिल्लाला मायेने जवळ घेत त्याच्या गळचेंडीतल्या पीसांत चोचीने ओरखडत मादी म्हणाली, “बाळा, नको रे बाबा असा नाराज होऊस, मला कळतं रे माझ्या चिन्नुल्या! वाढत्या अंगामुळे तुला आता सारखी भूक लागत्ये ते!” मग ती अशक्त पिलाजवळ जात पुन्हा त्याला प्रेमाने म्हणाली, “हा तुझा छोटा भाऊ आहे किनई! काल रात्रीपास्नं त्यानं काहीच खाल्लं नव्हतं. मग त्यानं अस्सं खाल्लं नाही तर तुझ्यासारखी ताकद त्याला कुठून येणार बरं! तशात तुला ठाऊक आहे ना हा कस्सा भित्रा भागुबाई आहे! मग तू त्याच्याशी अरेरावीने वागणं ठीक नाही. होय ना!

आता थोडासा वेळ थांब हं... मी किनई छान..सा. खाऊ आणते माझ्या शान्या बांळाला! झुई  करत अश्शी जाते अन्..!” असे म्हणत तिने बसल्याजागी जोरात पंख फडफडावून त्याला दाखवले. नंतर हवेत झेप घेतली. आभाळात गिरकी घेत झेपावत गेलेल्या आईकडे धडधाकट पिलू अधाशीपणे घरटय़ाच्या काठाळीवर बसून एकटक नजरेने पाहू लागले. आईप्रमाणे उंचावरुन भरारी घ्यायला उतावीळ झालेल्या पंखांना ताण देत त्याने आपले चिमुकले पंख जोमाने झटकले. नर पोसव्याने चोचीने त्याला शेपटीला ओढून घरटय़ात गप्प बसवले.

सायंकाळच्या परतीच्या चकपक उन्हात झाडझुडूप धुंडाळत हिंडायला पोसव्याच्या मादीला नेहमीच खूप आवडत होते. आजदेखील सांजवेळी ती चारोळीच्या झाडावर आंबटगोड चारोळयांचा गर खात होती. चौकस नजरेने घरटय़ाचीही टेहळणी तिची सुरू होती. त्याच झाडावर काळया डोक्याचे हळद्या, तपकिरी डोक्याचे कुटूरगा, करडय़ा डोक्याचे बुलबुल, निळया दाढीचे वेडेराघू या पाखरांची जोडपी ये-जा करत होती. शिवण, उंबर, वड, खरवती, हाडंग, जांभूळ, करवंद या झाडावरची पिक्की फळे खाण्यात रानांतली कित्येक पाखरे पाक मश्गुल झाली होती. त्यांच्या कलकलाटाने अखेर रान दणाणून गेले होते. जोडीने कुजबुज करत लुटपूटणार्या पाखरांकडे बघून मादीला नर पोसव्याची आठवण येऊ लागली. विणीसाठी अहोरात्र धडपडणार्या आपल्या जोडीदाराबाबत तिला खूप आदर वाटू लागला, ‘-त्याच्यासोबत भटकण्याची मजा काही औरच आहे.’ -असा विचार येऊन तिच्या डोळ्यांसमोर जुने त्याच्या सहवासात घालवलेले सुखद क्षण आठवले अन् ती लाजून चूर झाली. मात्र मघाशी दोन्ही मुलांच्या देखभालीत दुजाभाव करत असल्याचा आपण उगाच त्याचेवर ठपका ठेवला याचे तिला वाईट वाटले.

इतक्यात सुसाट वारा सुटला. झाडाझुडपांच्या फांद्या गदागदा हलू लागल्या. पाऊसथेंब पडावेत तशा चारोळया पाल्यात टपटपू लागल्या. काटेसावर, वारसच्या शेंगा फुटून त्यातला कापूस उडू लागला. बहावाच्या फुलांचा पिवळा बहर झडू लागला. तोच बाजूच्या झाडावरचे डोमकावळ्याचे घरटे विस्कटून त्यातली पिल्ले खाली पडल्याचे पोसव्याच्या मादीने पाहिले. तिच्या पोटात एकदम भीतीचा गोळा उठला. स्वतःच्या पिलांची तिला आठवण आली. म्हणून काळजीने ती झट्दिशी घरटय़ाकडे परतली. धपापत उडत आलेल्या मादीने घरट्याजवळ येऊन पाहिले तर तिचे धडधाकट पिलू चक्क घरटय़ातून भुर्रकन बाजूच्या फांदीवर उडी मारत होते. आपल्या चिमुकल्या पंखांना फडफडावत पुन्हा ते घरटय़ात जात होते. नर पोसवा देखील जवळच्या पल्यापर्यंत उडी मारून झेप घेण्याचे कसब त्याला शिकवत होता. धडधाकट पिलाला या खेळाची खूप गंमत वाटत होती. अशक्त पिलू तोल सावरत घरटय़ाच्या काठाळीवर बसून त्या दोघांचा खेळ पाहत होते. वादळवार्यात आपले घरटे, पिल्लं सबंध कुटुंब सुरक्षित आहे हे पाहून मादीचा जीव भांडय़ात पडला. थोडावेळ समाधानाने ती गप्प्च बसली. तोच पिंपळाच्या झाडाकडून डोमकावळ्यांचा गलका वाढला. थव्यांनी गोळा झालेल्या डोमकावळ्यांच्या काव.... काव.... च्या कालव्याने पोसव्याची मादी भानावर आली.

डोमकावळ्यांच्या पिल्लांचं काय झालं असेल?” तिने भावुकपणे स्वतःशीच विचारले.

गडगच्च् काळोख रात्री जंगलात पसरला...

चक्कदिशी उजेड करत काजव्यांचे थवे चमकू लागले. त्यांच्या चक्चक्णार्या उजेडाची गंमत दाखवत मादीने पिलांना झोपवले. आभाळात अवेळी गोळा झालेल्या काळ्या ढगांकडे ती अस्वस्थ होऊन पाहू लागली. घोंघावणार्या वार्याने कावळयांचे विस्कटलेले घरटे.. लोळागोळा होऊन पडलेली त्यांची पिले.. पिंपळावर पिलांच्या आईबाबांनी केलेला गलबला.. हे सारे मघाचे नकोसे वाटलेले चित्र तिच्या डोळ्यांसमोर येऊ लागले. आभाळातून उगवतीकडे झरझर सरकणार्या ढगांकडे एकटाक पाहताना आपण.. आपली पिले... घरटं अन संपूर्ण झाडच मोठय़ा वेगाने मावळतीकडे सरकते आहे असा भास तिला होऊ लागला.

अस्मानी कुठलंही संकट कुठल्या जीवाला देऊ नकोस देवा!” ती मनातल्या मनात सारखे म्हणत होती.

भगभगीत उन्हातच आज नर पोसवा धडधाकट पिलाला घेऊन जवळच्या हाळूच्या झाडावर बसला होता. पोसव्याची मादी अशक्त पिलाबरोबर घरटय़ात खेळत होती. आईच्या धास्तीने अशक्त पिलू घरटय़ाबाहेरच्या फांदीपर्यंत थरथरत कसेबसे जात होते. मात्र कच खाऊन हवेत झेपावण्याचे धाडस त्याला अजिबात होत नव्हते. मादी आस लावून त्याच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष देत होती. तेवढय़ात कोतवाल, निलकंठ ही पाखरे मोठय़ा धांदलीत घरटय़ाजवळून जाताना तिने पाहिले. शंका आली म्हणून घरटे सोडून तिने नर पोसव्याजवळ येऊन विचारले, “ही पाखरं, एवढय़ा टिपरघाईत पळाली. काही काळंबेरं तर नसेल ना?”

नर पोसव्यानेही काही बोलता लगेच उंच अशी झेप घेऊन घिरटी घालून आसपासचा परिसर नजरेखाली घातला. मग तो घाईगडबडीने खाली उतरत मादीला म्हणाला, “अगं.... जंगलात वणवा पसरलाय! सुक्या गवतामुळे, पाचोळयामुळे आग सर्वत्र झपाटय़ाने पसरते आहे! आगीने उडणारे कीडेच टिपायला मघाशी ती हावरट पाखरं पळाली.”

हे ऐकून पोसव्याची मादी पाक हबकली. तरीही लगेच स्वतःला सावरत घरटय़ाजवळ गेली. अशक्त पिलाला जड अंतःकरणाने जवळ घेत कळकळीने म्हणाली, “बबून्या, आता हिम्मत करून घरटय़ाबाहेर तुला झेप घ्यावीच लागेल. मनात जपून ठेवलेली भीती दूर कर. तुला यावेळी तुझ्या पंखाच्या कुवतीवर विश्वास ठेवायला हवा.”

आईच्या बोलण्यातील खोलवरचा अर्थ अशक्त पिलाला बिलकूल समजलाच नाही. उलट मस्करी करत ते आईच्या गळयाला भिडू लागले. आगधाडची धास्ती घेऊन हादरलेल्या पोसव्याच्या मादीने मागचा-पुढचा विचार करता बेफामपणे चोचीने त्याच्या शेपटीचे पंख जोरजोरात ओढले. त्याच्या टक्कुर्यावर कडाडून बोचकारले. दुखरी कळ येऊन अशक्त पिलू जोराने कळवळले.

बबून्या दुखलं का रे?” असे एकदा विचारावे क्षणभर असे पोसव्याच्या मादीला वाटले. तरीही हळहळणार्या स्वतःच्या मनाकडे आनाकानी करून तिने पायांनी लाथाडत पिल्लाला अखेर घरटय़ाबाहेर पडण्यास मजबूर केले. आईच्या अशा आकस्मित कठोर वागण्याने अशक्त पिलू रडकुंडीस आले. आईच्या नजरेत शिलगलेला रागाचा निखार पहिल्या खेपेसच आज पिलाने पाहिला. घरटय़ाबाहेर आलेले अशक्त पिलू किंजळीच्या बेचक्यातील फांदीवर खुरकटत चढून बसले. पंखात चोच खुपसून नख्यांनी त्याने फांदीला घट्ट धरले. त्याच्या पंखातली थरथर वाढली. धडधाकट पिलाला घेऊन नरपोसवा त्याच्या भोवतीने घिरटय़ा घालत पंखाची उघडमीट करणेस इशारा करू लागला. कावरेबावरे झालेल्या पिलाला पंख पसरून वरती झेपावण्याचे धाडस काही केल्या जमले नाही. पोसव्याची मादी व्याकुळ होऊन घु.... घु.. धुर्र.. धुर्र..।़।़.. करत घरटय़ात येरझार्या घालत स्वतःभोवती गिरका घेऊ लागली. घरटय़ाच्या सुक्या ठिसूळ काटक्या खाली पडू लागल्या. तोवर धुराने सारा परिसर काळवंडला. आगीची धग घरटय़ाच्या जवळ येऊ लागली. धुरकटल्यामुळे सारे पुसटसे दिसू लागले.

भडकत उंचावत जाणारा वणव्याचा जाळ बघून एक ठोस विचार पोसव्याच्या मादीच्या मनात चमकून गेला- ‘आता आपण घरटय़ापासून दूर व्हायला हवं. आपली माया नक्कीच या खडतर वेळी पिलाला कमकुवत करत्ये आहे. आपल्यावर विसंबून राहण्याचे त्याने सोडून द्यायला हवं! कुणाची मदत मिळेल हा त्याचा फाजिल आत्मविश्वास तुटायला हवा! त्याला त्याच्या पंखातले अफाट बळ आजमावणेसाठी हीच खरी कसोटीची वेळ आहे!...”तिने हा विचार केला नि मग घट्ट मनाने झटदिशी ती बाजूच्या उंच पिंपळाच्या झाडाकडे गेली.

किंजळीच्या बुंध्यापर्यंत आग आली. झाडाखालील पाचोळा, गवत फरफरत पेट घेऊ लागले. त्याचा उष्मा पिलाला बेजार करू लागला. नख्याने पायाखालच्या फांदीला रेटा देत पिलाने बेचक्याच्या सांद्रीतून वरच्या फांदीवर जाण्याचा खूप आटापिटा केला. त्याला ते शक्य झाले नाही. दुरून त्याची आई पोटतिडीकतेने ओरडत होती,” बबुन्या, तू आधी तुझ्या पंखातले सामर्थ्य ओळख. जिंदगानीत कधीकधी आपल्याजवळ असलेल्या सामर्थ्याची आपल्याला पुसटशीही कल्पना नसते. त्यावर भरवसा ठेव. हेच स्वसामर्थ्य आज तुला तुझ्या बचावासाठी खरा आधार आहे. बाळा हिम्मत कर! झेप घेऊन उंचावर येण्याशिवाय आता तुझ्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक नाही...!’ तिचे ह्दय पिळवटून आले होते.

अशक्त पिलू हताशपणे आईबाबा, थोरला भाऊ कुणी नजरेस पडते का याचा शोध घेऊ लागले. धुरामुळे त्याला कोणीच नजरेस पडले नाही. जमिनीवरचा आगीचा डोंब उसळी घेऊन वर येऊ लागला. आता या संकटातून आपल्याला वाचवण्यासाठी कुणीच येणार नाही याची पिलाला पक्की खात्री झाली. यामुळे भेदरलेल्या पिलाने अखेर पटकन डोळे मिटून शांतपणे आपल्या आईचे बोलणे आठवले. आईचा एकेक शब्द त्याला आता उंचावर झेप घेण्याचे धाडस करण्यासाठी प्रोत्साहन देत होता. आईचा हरेक शब्द हा त्याला संकटातून बाहेर पडण्यासाठी नेमके बळ देणारा होता. त्याने अखेर विचारपूर्वक आभाळात झेप घेण्याचा निश्चय केला. अंगात बळ आणून त्याने पंख उचलले जोर देत पिसारले. एका क्षणाला झप्प्कन त्याने उडी घेऊन पंखाची फडफड केली उघडझाप झाल्यामुळे अल्लद तरंगत तो उंचउंच जाऊ लागला. बघता बघता आई बसलेल्या पिंपळाच्या फांदीवर आला. धडधाकट पिलू आनंदाने नाचू लागले. नरपोसवा ईश्वराचे आभार मानू लागला.. पोसव्याची मादी दोन्ही पिलांना कडकडून भेटली. वणवा विझेपर्यंत तिने पिल्लांना दूर केलेच नाहीतेवढय़ात गार वार्याची एक झुळूक येऊन गेली. सळसळणारी पिंपळपाने पाहण्याचा मोह पोसव्याच्या मादीला आवरला नाही.

 

                     -सलीम सरदार मुल्ला

My Cart
Empty Cart

Loading...