Menu

किशोरवयीन मुलांसाठी मनोरंजक कथा - दे आर जीनियस

image By Wayam Magazine 20 October 2022

विहान शाळेतून घरी आला ते उड्या मारतच. आईला कळेना की आज एवढा कसला आनंद झाला आहे. त्याच्या आनंदाचं कारण जेव्हा तिला समजलं तेव्हा तिला आनंदही झाला आणी काळजीही वाटली. विहानच्या आनंदाचं कारण होतं शाळेची सहल जाणार होती रायगडला. रायगड, प्रतापगड, पाचगणी आणि महाबळेश्वर आणि आपल्याला रायगडावर जायला मिळणार या बातमीतच विहानच्या आनंदाला पारावार नव्हता.

तसा गेल्या वर्षी तो चौथ्या इयत्तेत होता तेव्हा त्याला छ. शिवाजी राजांचा इतिहास सांगितला होता तो त्याच्या इतिहासाच्या पुस्तकापेक्षा कितीतरी भारी होता. त्याच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी राजे हे नुसतेच ‘शिवाजी भोसला- द किंग ऑफ मराठा’ होते. पण मामानं सांगितले त्या इतिहासात ते छत्रपती होते. गो ब्राह्मण प्रतिपालक होते, महाराज होते, क्षत्रिय कुलवतंस होते, आणि रायगड हा त्यांचा राजधानीचा किल्ला होता. जो भरभक्कम होता, बेदाग होता. त्या रायगडावरच त्यांचा राज्यभिषेक झाला होता. त्या रायगडलाच स्वराज्याच्या राजधानीचं तोरण बांधलं होतं. त्या रायगडावरच ते छत्रपती झाले होते. स्वराज्य वाढविण्याच्या, शत्रूला नामोहरम करण्याच्या मोहिमा त्यांनी तिथंच आखल्या होत्या. आणि हे सगळं ज्या रायगडानं पाहिले. अनुभवलं होतं, जो रायगडावर या सगळ्याचा साक्षीदार आणि भागिदार होता. तोच रायगड बघायला विहान चालला होता. या सहलीतील इतर ठिकाणं म्हणजे महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड त्यानं पाहिलेली होती. बघितला नव्हता तो फक्त रायगड. आणि आता तो बघायला, चाटायला, अनुभवायला मिळणार होता. तेही मामानं सांगितलेला शिवरायांचा इतिहास मनात ताजा ताजा असतानाच. नुसत्या या विचारानेच विहान रोमांचित झाला होता. कधी एकदा शनिवार उजाडतोय आणि कधी एकदा आपण सहलीला जातोय असं त्याला वाटत होतं.

शाळेतून घरी आल्यापासून ते पुढचे दोन/ तीन दिवस विहान सतत रायगडाबद्दलच बोलत होता. आणि रायगडावर गेल्यावर आपण काय काय करणार याचे बेत आईला सांगत होता आणि याच कारणानं विहानची आई काळजीत पडली होती. रायगडसारखा किल्ला, अवघड वाट, खोल दरी आणि विहानची उत्तेजित अवस्था. आईला काळजी वाटली नसती तरच नवल. तिनं विहानला आत्तापासून सूचना द्यायला सुरुवात केली. पण विहान मात्र आपल्या कल्पनेच्या राज्यातच होता.

आणि सहलीचा दिवस उजाडला. एरवी दहा हाक मारूनही न उठणारा विहान त्या दिवशी हाक मारायच्या आधीच उठला. आईनं दहा वेळा सांगण्याची वेळ न आणता त्यानं पटापट ब्रश करुन आंघोळही केली. कपडे घालून तो तयार झाला आणि बाबांना उठण्यासाठी त्यानं भुणभुण लावली.

बाबा उठल्यावर तो लगेचच गाडीजवळ जाऊन उभा राहिला. बाबांनी त्याला शाळेत नेऊन सोडलं. सगळी मुलं जमल्यावर सहलीची बस निघाली. सरांनी सांगितलं की आपलं पहिलं ठिकाण आहे रायगड. ते ऐकलं आणि विहानला काहीच सुचेना. सर रायगडची माहिती मुलांना सांगत होते पण विहान मात्र मनानं कधीच तिथं पोहचला होता. चार तास प्रवास केल्यावर बस रायगडच्या पायथ्याला असलेल्या पाचाड गावात पोहचली. तिथं शिवरायांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची समाधी आहे. त्या समाधीचं दर्शन घेऊन बस पुढं निघाली. आणि रायगडाजवळ पायथ्याशी येऊन थांबली.

आता इथून रायगड पायी चढायचा होता. बसमधून खाली उतरल्यावर इतर मुलं आळोखे-विळोखे देत तिथं विकायला बसलेली बोरं, चिक्की घ्यायला धावली. पण विहान मात्र रायगड्याच्या त्या बुलंद रुपाकडे पहातच राहिला. केवढा प्रचंड गड दिसत होता तो ! नुसता बघूनच धडकी भरावी. विहान एकटक पहात होत तोच सरांची हाक ऐकायला आली आता रायगड चढायचा होता. मुलांची सुरुवात केली. काही ठिकाणी रुंद तर काही ठिकाणी अरुंद पायऱ्या होत्या. काही ठिकाणी छोटीशी पायवाट वळणावळणानं जाणारी, तर काही ठिकाणी पायवाटेवर आडवे येणारे छोटे-छोटे, निर्झर, ज्यातून झुळूझुळू पाणी वाहत होतं.

चढायला सुरुवात केल्यावर सरांनी एक विशेष गोष्ट निदर्शनाला आणून दिली ती म्हणजे रायगडावर वाट पश्चिमेकडं होती. त्यामुळं तोंडावर येणारे सूर्याचे किरण रायगडाच्या प्रचंडतेमुळे अडत होते. आणि किल्ला चढताना उन्हाचा त्रास होता नव्हता. एकदा मुलांनी पायऱ्या चढायला सुरुवात केल्यावर माकडांसारखी पटापट उद्या मारत चढायला लागली. आणि तासाभरात रायगडाच्या माथ्यावर पोचलीसुद्धा. विहान त्यांच्यात होताच. वाटेत त्याच्याच वयाची दोन-तीन मुलं त्याला खाली उतरताना दिसली. त्यांचा हातात तोंड बांधलेले मातीचे घडे होते. त्या प्रत्येक मुलाच्या हातात ३/३ घडे होते. दोन खांद्यावर दोन आणि कोपराजवळ हातात अडकवलेला एक.

ती तीघंजण चांगली हसत खेळत मजा करत गड उतरत होती. विहान आणि त्याच्या मित्रांना ओलांडून ती खाली गेली सुद्धा. सहलीतली सगळी मुलं वर चढली. वर चढल्यावर सरांनी रायगडाची महिती सांगायला सुरुवात केली. धान्याचं भलं मोठं कोठार, आणि तेही कड्याच्या पोटात दडलेलं, तिथं जायला वाटही अगदी चिंचोळी, हत्तींना पाणी पिण्यासाठीचं -माणसांच्यासाठी गंगासागर तलाव, सात राण्यांचे सात महाल, अंधार कोठड्या, टकमक टोक जिथून गुन्हेगारांचा कडेलोट केला जायचा, त्या टोकावरून खाली नजर टाकली तर भोवळ येत होती, इतकी खोल दरी होती खाली. हे सगळं पाहताना छ. शिवाजी राजांची दूरदृष्टी, त्यांचं द्रष्टेपण, सावधपणा या सगळ्याचा प्रत्यय पुनःपुन्हा येत होता.

रायगड चढत असताना सरांनी गडाच्या कडेकपारीतून वर चढत आलेली, आणि खाली उतरताना अत्यंत धोकादायक दिसणारी एक वाट दाखवली. त्याही वाटेवरून राजांचे मावळे घोडे फेकित गड चढत होते आणि उतरत होते. हे ऐकून विहानच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ‘कसले जबरदस्त साहसी वीर असतील ना महाराजांचे सैनिक !’ विहानच्या मनात आलं. आधी त्याला छ. शिवरायांच्याबद्दल आदर होताच, मामानं त्यांचा सगळा इतिहास समजा पाहताना, ऐकताना आणि तो इतिहास नजरेसमोर उभा करून अनुभवताना आपणही या इतिहासाचे पाईक, या स्वराज्याचे वंशज आहोत, आपणही रायगडावर प्रत्येक ठिकाणी पाऊल ठेवताना इथं राजांची पावलं पडली असतील इथं राजे उभे राहिले असतील असं मनाशी म्हणत तो प्रत्येक ठिकाणी मनोमन नमस्कार करत होता. ‘हा एवढा प्रचंड गड महाराज आणि त्यांचे सैनिक दिवसातून कितीदा तरी चढत उतरत असतील!’ त्याच्या मनात आलं. तोच ‘ही सदर, इथंच राजांचा दरबार भारत असे, आणि इथं या ठिकाणी राजांचं सिंहासन होतं.’

असं सरांनी सांगितल्यावर मान वाकवून विहाननं त्या काळी अधिष्टीत असलेल्या आणि आता दगडी चौथरा असलेला त्या सिंहासनाला वाकून त्रिवार मुजरा केला. त्याचं बघून बाकीच्यांनी पण केला आणि सर म्हणाले, “शाब्बास!” आता मुलं इतरस्र हिंडत होती. विहाननं पाहिलं काही ठिकाणी भिंतीवर कुणी-कुणी आपापली नावं लिहून काढली होती. कुणी काही चित्रही काढली होती. विहानला वाईट वाटलं. त्यानं आपल्या मित्रांना हाक मारली. आणि पाठीवरच्या सॅकमधून एक छोटा टॉवेल काढला. वॉटर बॅग मधल्या पाण्यानं तो ओला केला आणि ते ठिकठिकाणी कुणीतरी लिहिलेलं, खरडलेले पुसायला सुरुवात केली. आपल्यातले दोन-तीन जण हे करताहेत म्हटल्यावर मग प्रत्येकजण मदतीला धावला आणि जिथपर्यंत मुलांचा हात पोचत होता तिथपर्यंतचा सगळा भिंतीचा भाग स्वच्छ झाला.

सरांनी जवळ येऊन विहानला शाबासकी दिली, त्याची पाठ थोपटली. म्हणाले, “आहेस खरा तू स्वराज्याचा शिलेदार!” विहानचा आनंद अख्खा रायगडानं पाहिला. आपण इथं येऊन काय-काय केलं हे आई-बाबांना सांगायचंच पण मामाला आधी सांगायचं विहाननं ठरवलं. त्याला आता तहान लागली होती. वॉटर बॅगमध्ये पाणी आहे का हे तो पाहत होता तोच पाठीमागून आवाज आला. “दादा, ताक घेता का ? लयी गोड आहे !” विहाननं पाहिलं. गड चढत असताना जी तीन मुलं भेटली होती त्यातला तो एक होता. ‘अरे हा गड उतरून गेला कधी आणि पुन्हा गड चढून वर आला कधी?’ आणि जराही दमलेला दिसत नाही. विहाननं पाहिलं त्याच्या एवढाच त्याच्या वयाचाच मुलगा तो मुलगा होता. अंगात एक फाटका सदरा, घसरणारी चड्डी आणि पायात चपलासुद्धा नाहीत. पण हसरा चेहरा, आणि ताक घेण्याबद्दलच्या विनवणी बरोबरच ताक चांगलं असण्याची ग्वाही. विहाननं त्याच्याकडून ताक घेतलं. खरच ते छान होतं.

अगदी जिरं घातलेलं. विहाननं त्याला पाच रुपये दिले. विहानच्या इतर मित्रांनीही ताक घेतलं. खूप छान वाटलं सगळ्यांना. सगळ्यांकडून ताकाचे पैसे घेऊन तो मुलगा निघाला. तोच “तुझं नाव काय रे?” विहाननं विचारलं. “माझं नाव धनाजी चव्हाण, मी गडाच्या पायथ्याला राहतो !” त्यानं सांगितलं. “शाळेला जात नाहीस?” विहाननं पुन्हा विचारलं. “जातो ना ! आज शनिवार, आज सकाळची शाळा असतीया, शाळा सुटली की ताक इकायला गडावर येतो !” त्या मुलानं धनाजीनं उत्तर दिलं. “अरे पण मगाशी आम्ही गड चढत होतो तेव्हा तू गड उतरत होतास ना ? नाग एवढ्यात खाली जाऊन लगेच वरपण आलास?” विहानच्या मनातील उत्सुकता त्याला गप्प बसू देत नव्हती. “त्यात काय एवढं ? बारका असल्यापासून गडावर येतोय. सोमवार ते शुक्रवार आये येते ताक घेऊन इकायला. शनिवार-रविवार मी येतो. सकाळी एकदा येतो ताक घिऊन ! संपलं की पुन्हा खाली जातो. घरी जाऊन घडे भरून घेतो, पुन्हा गडावर येतो. ताक विकतो. संपलं की परत खाली जाऊन घेऊन येतो. दिवसभरात चार-पाच वेळा गड चढतो-उतरतो.

पण त्याचं काय वाटतं न्हायी. अगदी लहान असल्यापासनं गडावर येतोय. पायाखालची वाट हाय. डोळं बांधलं तरी चढता येईल. आणि गड बघायला येणाऱ्यांची आणि महाराजांची आठवण काढणाऱ्यांची तेवढीच सेवा घडती हातून. लयी बरं वाटतं !” धनाजी सांगत होता. तोच त्याचे दोन मित्रही तिथे आले. “आमी तिघंभी संगसंगच येतो. हा सोनू आणि हा भीमा. हे पण माझासोबत ताक विकतात. आम्ही अंधार पडेस्तोवर गडावर ये-जा करीत असतो !” धनाजी बोलत होता आणि सगळी मुलं आश्चर्यानं ऐकत होती. विहानच्या नजरेत आश्चर्याबरोबर कौतुकही होतं. आपण एकदा गड चढून आलो तर पाय भरून आले. दमही लागला. आणि ही तिघंजण दिवसभरात तीन-चार वेळा गड चढतात आणि उतरतात. ते सुद्धा ताकाचे भरलेले घडे घेऊन आणि ते ही मातीचे ! आणि तीन-तीन ? ते ही खांद्यावर घेऊन ? असेच असतील महाराजांचे सैनिक ! असेच दमदार, उत्साही आणि चपळ. असेच तर असती मावळे !

गड- किल्ल्यातून, दऱ्या-खोऱ्यातून, डोंगरावरून, कडेकपारीतून चपळाईंन, बिनधास्त चढणारे, उतरणे. म्हणूनच अफजल खानासारख्या बलाढ्य शत्रूला नामोहरम केलं शिवजीराजांनी !” विहानच्या मनात असे विचार दाटून आले. त्याला अतिशय आनंद झाला. शिवराजांच्या जाणतेपणाचं जणू रहस्यच त्याला उलगडत होतं. इतक्या दाट जंगल-झाडीतून, दऱ्या-खोऱ्यातून, डोंगर कपारीवर त्यांनी राज्य कसं केलं असेल याचं प्रात्यक्षिकच जणू त्याच्या समोर उभं होतं धनाजी, सोमू आणि भीमाच्या रुपात. त्या तिघांच्याही घड्यातलं ताक भरून घेऊन पुन्हा गडावर येण्याची भाषा करत होते. त्या तिघांनी घडे उचलले. दोन खांदयावर दोन ठेवले. एका हातात एक अडकवला आणि जायला वळले. विहाननं पाहिलं. धनाजीची पाठ विहानकडं झाली. त्याचा सदरा पाठीवर सगळा फाटला होता. विहानला वाईट वाटलं. त्यानं धनाजीला हाक मारली. “धनाजी थांब!” धनाजी थांबला. विहाननं पाठीवरनं सॅक काढली. त्यातला एक टी-शर्ट काढला. आणि धनाजी समोर धरला आणि म्हणाला, “घे! हा अंगात घाल ! तू माझ्या एवढाच आहेस. तुला बरोबर होईल. घाल. तोच आदित्यनं म्हणजे विहानच्या मित्रानं विचारलं, अरे विहान, तू उद्या काय घालणार?” “अरे माझ्याकडे आहे आणखी. भिजला तर असावा म्हणून आईनं एक एक्स्ट्रा दिलाय!” म्हणत विहानानं तो टी-शर्ट धनाजीच्या हातात दिला. धनाजीनं खांद्यावरचे घडे खाली ठेवले. विहानकडं एकदा संकोचानं पाहिलं. म्हणाला, “नको! हाय माझ्याकडं आनी एक शाळेचा गणवेश पन हाय की!” पण विहाननं त्याला आग्रह केला. म्हणाला, “अरे गणवेश शाळेत घालायचा ! हा घे. घाल तू ! तुला बसेल नीट. घाल !”

धनाजीनं संकोचत तो टी-शर्ट घेतला. फाटका सदरा अंगातून काढून तो टी-शर्ट घातला. तो त्याला एकदम मापात बसला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. टी-शर्ट वरून तो पुन्हा-पुन्हा हात फिरवत होता. विहानकडं बघत तो प्रसन्न हसला आणि दुसऱ्या घड्यातलं ताक त्यानं विहानला दिलं. चांगला ग्लास भरून. पैसे पण घेतले नाहीत. मुलांनी टाळ्या वाजवल्या. धनाजी आणि त्याचे मित्र आनंदानं उड्या मारत निघून गेले. विहाननं त्या सिंहासनाच्या चौथऱ्याकडं नजर टाकली. राजांचे तेजस्वी डोळे आपल्याकडं बघून हसताहेत. आपल्याला शाबासकी देताहेत असा त्याचा भास झाला. “दे आर जीनियस ना?” त्यानं जणू राजानाच विचारलं आणि राजानीही चक्क होकारार्थी मान हलवली. विहानला वाटलं आपण राजांचे सरदार आहोत. त्याला प्रचंड आनंद झाला आणि हा आनंद मस्तच होता. अगदी वर्गाचा सेक्रेटरी झाल्यावरही झालेल्या आनंदापेक्षा.

-मंजुश्री गोखले
My Cart
Empty Cart

Loading...