गेले काही दिवस पावसाने जवळपास पूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावून सगळं वातावरण गारेगार केलंय. पण पाऊस नक्की पडतो तरी कसा? आपल्याला सांगतोय थेंबू! हो हो थेंबू ! थेंबूची ही छानशी गोष्ट. या थेंबूला आपल्यासाठी बोलका केलाय ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. बाळ फोंडके यांनी! ‘वयम्’ मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख खास बाल-किशोरांना वाचायला पाठवत आहोत.
मित्रांनो, मी आलोSSS
मी... पावसाचा थेंब!
तुम्ही जेव्हा माझं चित्र पाहता तेव्हा ते उलट्या भोवऱ्यासारखं दिसतं. तुमचे चित्रकार माझं चित्र नेहमी असंच काढतात. पण माझं खरं रूप तसं नाहीच मुळी. ते कसं आहे हे सांगण्यासाठीच तर मी तुमच्यासमोर आलोय. मी माझ्या खऱ्या रूपात तुमच्यासमोर आलो तर तुम्ही मला ओळखणार नाही.
तर दोस्तहो, मी आहे थेंबू. लिंबूटिंबू नाही. थेंबू. पाऊसथेंबू. म्हणजे पावसाचा थेंब. थेंबू हे माझं लाडकं नाव आहे. मी खरोखर कसा दिसतो हे सांगण्यासाठी तुम्हांला माझी सगळीच कहाणी सांगायला हवी. अगदी माझ्या जन्मापासूनची. तुम्हांला ठाऊकच आहे की, माझा जन्म ढगामध्ये होतो. ढग म्हणजे तरी काय हो! नुसती वाफ. हवेत तरंगणारी पाण्याची वाफ. म्हणजे ढगांमध्ये मी असतो तो वायुरूपात. आता दिसतो ना, तसं द्रवरूप धारण करण्यापूर्वी मला माझं बस्तान बसवायला काही बैठक शोधावी लागते. तशा अनेक बैठकी हवेत असतातच म्हणा. समुद्रातल्या खाऱ्या पाण्याची वाफ होऊन जेव्हा ती हवेत जाते, तेव्हा त्या पाण्यातल्या काही क्षारांचे बारीक बारीक कणही हवेत येतात. तिथंच विहरत राहतात. शिवाय धूळ तर नेहमीचीच आहे. आजकाल तर तुम्हा मंडळींच्या उपद्व्यापापायी अनेक प्रकारच्या प्रदूषकांचे कणही हवेत विहरत असतात. मला माझी बैठक म्हणून यातले कोणतेही कण चालतात. मग वायुरूपात असलेला मी, त्यांना सर्व बाजूंनी घट्ट मिठी मारून बसतो. त्यांना लपेटूनच टाकतो म्हणा ना! मग हवेत वरवर जाताना थंड हवेची झुळूक माझ्या अंगावरून गेली, की मला वायुरूपातून द्रवरूपात अवतरण्याची संधी मिळते. अर्थात तसं होतानाही मी त्या कणांना मारलेली मिठी सैल पडत नाही. त्यामुळं मग माझा जन्म होतो. आता मला सांगा, की तुमचा जन्म झाला तेव्हा तुम्ही आज आहात तितके उंच आणि आडवेतिडवे होता का? नाही ना? तुम्ही तर सानुले होता. एका मीटरपेक्षाही कमी उंची आणि वजन म्हणाल तर, तीन-चार किलो. माझा जन्म झाला ना, तेव्हा मीही आताच्या सारखा कसा असेन? मीही अगदी इवलासा होतो. अगदीच आकड्यांमध्ये सांगायचं, तर त्यावेळी मी एक सहस्रांश ते पाच शतांश मिलीमीटर व्यासाचा गोल होतो. हो, त्यावेळी मी संपूर्ण गोलाकार होतो. गोलमटोल. पण फार गुटगुटीत मात्र नाही.
पण त्या ढगात मी काही एकटाच नव्हतो. माझ्यासारखे माझे अनेक भाईबंद त्याच सुमाराला जन्माला आलेले होते. माझ्यासारखेच तेही स्वच्छंदपणे इकडंतिकडं मजेत भटकत होते. धावत होते. उड्या मारत होते. पण हळूहळू झालं काय, की आमची संख्या वाढायला लागली. दाटीवाटी झाली. आता तुमच्या शहरांमध्ये झालीय ना, तश्शी! मोकळेपणाने इकडंतिकडं पळापळी करणंच जमेना. कारण तसं करताना इतर भावंडांपैकी कोणा ना कोणाशी टक्कर ठरलेलीच. आणि दोन इवल्याशा थेंबूंची तशी टक्कर झाली की, तुमच्या समुद्रातल्या न्यायाप्रमाणेच पुढच्या घटना घडतात. तिथं समुद्रात नाही का, मोठा मासा छोट्या माशाला खाऊन टाकतो! तसा मग एखादा वजनदार भाऊ आला की तो हडकुळ्या भावाला खाऊन टाकतो. आपल्यात समाविष्ट करून टाकतो. तसं झालं की त्या लठ्ठंभारतीचं वजन आणि आकारमान दोन्हीही वाढतच जातं. मग मी इवलासा राहत नाही. मी मोठा मोठा होत जातो. आता मला सांगा, कोणतीही चीज वजनदार झाली की काय होतं? ती खाली पडायला लागते. पूर्ण पिकलेलं फळ कसं झाडावरून खाली पडतं, तसंच. त्यामुळं मीही खाली पडायला लागतो. पडतापडता माझी इतरांशी टक्कर होण्याचा सिलसिला चालूच राहिला. मग काय होणार? माझं वजन आणि आकारमान आणखीच वाढायला लागलं. ते साधारण अर्धा मिलीमीटर व्यासाचं झालं, तेव्हा मला लोक थेंब म्हणायला लागले. म्हणजे तोवर मी होतो फक्त थेंबांकुर. पण माझा व्यास जेव्हा एक मिलीमीटरपेक्षा मोठा झाला, तेव्हा मी गोलाकार राहिलो नाही. खालच्या बाजूनं मी थोडा दबला गेलो. हवेच्या दाबापायी हे घडून आलं. माझा घाट उलट्या ठेवलेल्या बशीसारखा किंवा वडापावच्या फक्त वरच्या भागातल्या पावासारखा दिसायला लागला.