आषाढी एकादशीच्या मस्त जोडून आलेल्या सुट्ट्यांचा आनंद गेल्या महिन्याच्या अखेरीस तुम्ही मनमुराद लुटलात आणि आता ऑगस्टमध्ये सण आणि उत्सवांची हीऽऽ भाऊगर्दी! त्यामुळे मुलांनो, तुमची नुसती चंगळ आहे नाही का? तर या सणासुदीच्या धामधुमीत आपल्या या लेखाला सुरुवात करताना एक छानशी गोष्ट आपण वाचायची आहे. आणि तिचं मार्मिक असं तात्पर्यही समजून घ्यायचं आहे. कथा आहे एका पोपटाची.
एकदा एका राजाला, एका आमराईत पायाला जखम झालेलं पोपटाचं पिल्लू सापडलं. त्यानं ते उचलून प्रासादात (प्रासाद म्हणजे राजवाडा, बरं का!) आणलं. त्याच्यावर उपचार केले. त्याला दाणापाणी घातलं. अन् मग त्या विठूचं सा:यांना वेडच लागलं. राजकन्येच्या गûयातला तर तो ताईत झाला. दिवसरात्र विठू विठू आणि विठू. त्याच्यासाठी उत्तमोत्तम डाळिंबं आण, रसदार आंबे आण, भिजविलेली पिवळीधम्मक चणाडाळ मागव; असं सुरू झालं. त्याच्यासाठी प्रशस्त असा चांदीचा अप्रतिम पिंजरा बनवला गेला. वाळा घातलेलं थंडगार पाणी त्याला रोज पाजलं जाई. त्याला न्हाऊमाखू घालण्यासाठी दासदासींमध्ये चढाओढ लागे.
दिवस सरत होते. राजकन्या मोठी होऊ लागली. विठूही मोठा झाला. त्याला छान कंठ फुटला. त्याच्या मधुर वाणीने तो आल्यागेल्याचं मनोरंजन करीत असे. राजकन्येला मात्र मध्येमध्ये विठूला सोडून कधी घोडेस्वारी शिकायला तर कधी गायन-नर्तन शिकायला जावे लागे. काही दिवस असेच गेले. मग मात्र एक चांगला लक्षात येण्यासारखा बदल घडायला लागला. विठू खूपच उदास राहू लागला. पहिल्यासारखं बोलेना. पहिल्यासारखं डाळिंबाचे दाणे खाईना. राजकन्या काळजीत बुडून गेली. तिने सोन्याचा आणखी मोठा पिंजरा विठूसाठी घडवून घेतला. पण अं हं! कसचं काय! मग एक दिवस हिरेमाणकं जडवलेला, खास कलाकुसर असलेला पिंजरा उत्तरेकडून मागवण्यात आला. पण नाही, विठू त्यातही एका बाजूला पडून राहू लागला. त्याची रयाच गेली. तजेला, तकाकी नष्ट झाली. पिसंही गळू लागली.
मग राजाच्या सेवेत असलेल्या बहुश्रुत नावाच्या पक्षितज्ज्ञाला बोलावण्यात आलं. त्याने पाहिलं. विठूला शारीरिक आजार तर नव्हता. पण तो मनोरुग्ण झाला होता, हे नक्की. बहुश्रुताने त्याच्यावर पाळत ठेवली. तेव्हा त्याला सत्य उमगलं. दुपारपासून राजकन्येच्या विविध शिकवण्यांना सुरुवात झाली. विठू एकटाच पिंज:यात पडलेला होता आणि खिडकीजवळच्या डेरेदार वृक्षांमधून असंख्य पोपटांचे थवे आवाज करू लागले. विठू धडपडत पिंज:याच्या त्या दिशेला आला, जिथून आकाशात भुर्र उडताना आपल्या अणकुचीदार चोचीने कधी वडाची लालबुंद फळं, तर कधी अध्र्याकच्च्या कैऱ्या चाखणारे त्याचे भाईबंद त्याला दिसत होते. आपले पंख पसरून आकाशात भराऱ्याघेणारे ते विहंग किती लोभस दिसत होते! विठू कुढत होता. आतल्या आत रडत होता. हताश होत होता. त्याला हिरेमाणकांचा पिंजरा नको होता. फळफळावळसुद्धा नको होती. त्याला साद घालत होतं मोकळं आकाश. बहुश्रुताने जाहीर केलं, विठू जिवंत हवा असेल, तर त्याला पिंज:यातून त्वरित मुक्त कराÓ. विठूचा जीव सा:यांनाच प्यारा होता. मोकûया आकाशात विहार करण्यासाठी राजकन्येने त्वरेने विठूला पिंज:यातून मुक्त केलं. आधी विठू गडबडला. खिडकीतच घोटाळला. पण मग लगेचच या मुक्त, हव्याहव्याशा स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी उंच आकाशात भरारला.
तर मुलांनो, हा आहे स्वातंत्र्याचा खरा अर्थ! हे आहे त्याचं मर्म. सारे सुखोपभोग त्याच्यापुढे तुच्छ आहेत. स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्याहजारो स्वातंत्र्यसैनिकांनी हे अमूल्य दान तुमच्या-आमच्या पदरात टाकलं आहे. त्या स्वातंत्र्याचा उत्सव आपण १५ ऑगस्ट या आपल्या स्वातंत्र्यदिनी साजरा करतो. स्व + तंत्र म्हणजे स्वेच्छेनुसार वागण्याची मुभा असणारा, स्वत:च्या तंत्राने म्हणजे विचाराने कृती करू शकणारा. या आपल्या स्वातंत्र्यदिनाला आपण आपला तिरंगा आकाशात फडकावतो आणि आपल्या रोमारोमांत भिनलेल्या भारतीयत्वाला सलामी देतो. या आपल्या तिरंग्याची प्रतिकृती पिंगली वेंकय्या या कलाकाराने तयार केली. पण त्यावेळी अशोकचक्राच्या जागी चरख्याचं चित्र होतं. १९२१ साली राष्ट्रीय काँग्रेससाठी या ध्वजाची निवड महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर याच ध्वजाला स्वतंत्र भारताचा ध्वज म्हणून मान्यता देण्यात आली. मात्र तेव्हा चरख्याच्या जागी अशोकचक्राचं प्रतीक स्वीकारलं गेलं. सर्वांत वरचा भगवा रंग त्याग आणि बलिदान दर्शवतो. मधला पांढरा शुभ्र रंग शांतीचा संदेश देतो, तर सर्वांत खालचा हिरवा रंग सुफलता आणि समृद्धी यांचं प्रतीक आहे. २४ आऱ्या असलेलं निळं अशोकचक्र प्रगती, गतिमानता आणि कार्यशीलता यांचं प्रतीक आहे.
मुलांनो, आपल्या स्वतंत्र भारतातील विविध संस्थांनी त्यांच्या कामाविषयी तयार केलेली अनेक चांगली संस्कृत बोधवाक्यंही प्रचलित आहेत. त्या संस्थांच्या उद्दिष्टांशी इमान राखणाऱ्याकाही बोधवाक्यांचा अर्थ आपण समजून घेऊ. भारत सरकारचं बोधवाक्य आहे, सत्यमेव जयते, सत्य, शब्द अस्-असणे या क्रियावाचकापासून तयार झाला आहे. जे असतंच, ज्याचं अस्तित्व कधीच नाकारता येत नाही, ते सत्य. अर्थात सत्याचाच विजय होतो. मानवी जीवनातील परमतत्त्व सांगणारं असं हे वाक्य आहे. टपाल खात्याचं बोधवाक्य आहे, अहर्निशं सेवामहे म्हणजे आम्ही रात्रंदिवस सेवा करतो. आता इ-मेल आणि व्हॉट्स अॅपच्या जमान्यात पत्र आणि तारा यांचं महत्त्व वाटेनासं झालं आहे. पण वीजप्रवाह खंडित झाला, तरी निरोप देण्याचं काम सजगतेने करणाऱ्यातारखात्याने किती महत्त्वाचे निरोप आजवर लोकांपर्यंत पोहोचते केले आहेत. बहुजनहिताय बहुजनसुखाय हे एस्टीचं बोधवाक्यही त्यांची कामावरील निष्ठा व्यक्त करणारं आहे. रेल्वे आणि विमानांचा इतका सर्रास वापर होईपर्यंत तुमच्या-आमच्या गावात एसटीच तर आपल्या सर्वांचा आधार होती की. आयुर्विमा मंडळाचं बोधवाक्य आहे, योगक्षेमं वहाम्यहम्. आपण मिळवलेल्या धनाची योग्य काळजी हे मंडळ घेतं म्हणून त्यांचंही बोधवाक्य यथायोग्य असंच आहे. चोरांचा कर्दनकाळ ठरणाऱ्याआणि चांगल्या माणसांचं रक्षण करण्याचा वसा घेतलेल्या पोलिसांचं बोधवाक्य आहे, सद्रक्षणाय खलनिग्रहणाय म्हणजेच चांगल्यांच्या रक्षणासाठी आणि खल म्हणजे खलनायकांच्या समाचारासाठी ते आहेत. आपल्याला डहाणू, मुंबईपासून रत्नागिरी, सिंधुदुर्गापर्यंत विस्तीर्ण किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीचं रक्षण करणाऱ्यातटरक्षक दलाचं बोधवाक्य आहे ‘वयम् रक्षाम:’...आम्ही तुमचे रक्षण करतो. तुम्हांला माहितीये ना, जूनच्या तुफानी पावसात याच तटरक्षक दलाने आपला जीव धोक्यात घालून बुडत्या जहाजावरच्या खलाशांचे जीव वाचवले होते. बलाढ्य सागरी शत्रूशी दोन हात करणारं आपलं नौदल..त्यांचं बोधवाक्य आहे शं नो वरुण: म्हणजे जलदेवता आपले कल्याण करो.
जशी ही बोधवाक्यं अचूक उद्दिष्टं सांगणारी आहेत, तशीच संस्थांची, राष्ट्रांची प्रतीकंही बोलकी असतात. आपली न्यायदेवता डोûयांवर पट्टी बांधलेली आणि हातात तराजू घेतलेली दाखवतात. जात, रूप, कशाच्याही बाबतीत भेदभाव न करता, पुराव्यांचं अचूक मोजमाप ती करते. म्हणून ती तशी दाखवतात.
मुलांनो, स्वातंत्र्य आणि त्याची प्रतीकं यांचा विचार करताना आपल्याला अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीÓ अर्थात स्वातंत्र्यदेवतेच्या शिल्पाचा विचार नक्कीच करावा लागेल. हा पुतळा न्यूयॉर्क शहरातील लिबर्टी आयलंड-मॅनहॅटन इथे उभारला आहे आणि हा पुतळा घडवला आहे, एका फ्रेंच शिल्पकाराने. स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्याअमेरिकेला फ्रान्सच्या जनतेने दिलेली ही अनोखी भेट आहे. स्वातंत्र्य या तत्त्वाचा प्रचार जगभरात व्हावा आणि स्वातंत्र्याचं महत्त्व मनामनांत ठसावं, याकरिता ही स्वातंत्र्यदेवता मोठ्या दिमाखात हातात पेटती मशाल घेऊन उभी आहे. ही लिबर्टास या रोमन देवतेची प्रतिकृती आहे. तिचा पायघोळ झगा आणि डोक्यावरील गोलाकार मुकुट रोमन संस्कृतीची साक्ष देतात. तिच्या एका हातात पेटती मशाल तर दुसऱ्याहातात ग्रंथाचं बाड आहे. ती एक कायदेपुस्तिका आहे आणि त्यावर अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाची तारीख नोंदवलेली आहे. तिच्या पायाशी तुटलेला साखळदंड आहे. हेही तिच्या मुक्ततेचं प्रतीक आहे. हा पूर्ण पुतळा शुद्ध तांब्याचा आहे. स्वातंत्र्याची झळाळती आकर्षकता, त्याचं जाज्वल्य रूप या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतûयाच्या प्रत्येक पैलूमधून व्यक्त होतं. पायाभूत मूल्यांचा बोध करून देणारी अशी ही विविध बोधवाक्यं आणि प्रतीकं.
बोध हा शब्द बुध या संस्कृत क्रियावाचकाशी संबंधित असावा. या क्रियावाचकाचे कितीतरी विविध अर्थ आहेत. जागं होणं, समजणं, जाणणं, जाणीव होणं, जागरूक होणं, ज्ञान होणं, सचेतन होणं, असे ते विविध अर्थ. बोधवाक्यावरून त्या त्या संस्थांच्या उद्देशांचा बोध होतो. त्यांचं ध्येय किंवा ब्रीद आपल्याला समजतं. बोधकथा हा गोष्टींचा असा प्रकार आहे की, त्यात वर्णन केलेल्या घटनांवरून व्यवहारात उपयोगात आणता येण्यासारख्या काही तत्त्वांचं ज्ञान आपल्याला होतं. इतिहासात तुम्ही मध्ययुगानंतर आलेल्या प्रबोधनयुगाचा अभ्यास करता. या युगात माणसाला खऱ्याअर्थाने मानवतावादी विचारसरणीची जाणीव झाली. आणि त्या प्रभावामुळे शिल्पकला, स्थापत्य, चित्रकला, समाजजीवन अशा सर्वच क्षेत्रांत एक नवीच जागृती घडून आली. एखाद्याचं प्रबोधन करणं, म्हणजे उपदेशाने एखाद्याच्या जाणिवा प्रगल्भ करणं. तर गौतमाला आत्मज्ञान झाल्यावर त्याला बुद्ध अशी उपाधी मिळाली. आत्मज्ञानाचा हा प्रकाश ज्या वृक्षाखाली त्याला लाभला, त्या वृक्षाला बोधिवृक्ष असं म्हटलं जातं. रामदासस्वामींनी कसं जगावं, याचं ज्ञान ज्या ग्रंथाद्वारे करून दिलं आणि ज्याद्वारे समाजात नैतिक जागृती आणली, तो आहे दासबोध.
तर मुलांनो, अशा तऱ्हेने या सदरात आपण स्व-तंत्र आणि बोध या शब्दांचं सुंदर शब्दजाळं विणलं. हे विणलेलं जाळं छोटं असलं, तरी आपल्या आयुष्यात सर्वांत अधिक महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. ज्यांच्या जिवावर आपण सण आणि उत्सव निर्भयपणे साजरे करतो, त्या आपल्या स्वातंत्र्याचं अखंड रक्षण करणाऱ्या हजारो सैनिकांच्या बलिदानाची आठवण ठेवून, आपला यावर्षीचा स्वातंत्र्यदिन मोठ्या दिमाखात साजरा करू या.
-प्रा. मंजिरी हसबनीस
***